चालू घडामोडी : ८ ऑगस्ट

पंतप्रधानांच्या हस्ते मिशन भगीरथचे उद्घाटन

    Mission Bhagirath
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ ऑगस्ट रोजी तेलंगणगमधील मिशन भगीरथच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले.
  • तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या गजवेल विधानसभा मतदार संघातील कोमतीबांदा खेड्यात मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण झाले.
  • याचवेळी मोदी यांच्या हस्ते हैदराबाद ते करीमनगर या १५२ किलोमीटर लांबीच्या मनोहराबाद-कोथापल्ली नव्या रेल्वमार्गाचा पायाभरणी समारंभही पार पडला.
  • २०१४मध्ये तेलंगण राज्याची स्थापना झाल्यानंतर मोदी यांची या राज्याला ही पहिलीच भेट आहे.
 मिशन भगीरथ 
  • राज्यात प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी पाईपलाईनद्वारे पुरविण्याचा हा तेलंगण सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
  • मिशन भगीरथ ही ४० हजार कोटी रुपये खर्चाची योजना आहे. या योजनेद्वारे गजवेल विधानसभा मतदार संघातील ६७ हजार घरांना पिण्याचे शुद्ध पाणी पाईपलाईनद्वारे मिळेल.
  • ग्रामीण भागात एका व्यक्तिला पिण्याचे १०० लिटर आणि शहरी भागात १५० लिटर पाणी देण्याचा प्रयत्न आहे. २०१८ पर्यंत हे पाणी देण्यात येईल.

गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना दंड

  • गोवा सरकारने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांना दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
  • यासाठी गोवा विधानसभेत नवीन दुरुस्ती करण्यात आलेला राज्य उत्पादन शुल्क कायदा मांडण्यात आला.
  • या कायद्यानुसार गोव्यात ठिकठिकाणी मद्यपान निषेध असलेले फलक लावण्यात येणार आहेत. 
  • फलक लावलेल्या परिसरात मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
  • गोव्यात येणाऱ्या पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी, समुद्र किनारे आणि रस्त्यांवर मद्यपान करण्याच्या अनेक तक्रारी पाहता गोवा सरकारने हा निर्णय घेतला आहे.

मायकेल फेल्प्सने जिंकले १९वे सुवर्ण पदक

  • अमेरिकेचा अव्वल जलतरणपटू मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे.
  • मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये आजवरचे १९वे सुवर्ण पदक जिंकले आहे. १९ सुवर्णपदकांसह २३ पदकांची विक्रमी कामगिरी करणारा फेल्प्स हा जगातील पहिला जलतरणपटू ठरला आहे.
  • मायकेल फेल्प्सचा समावेश असलेल्या अमेरिकेच्या संघाने ४ बाय १०० मी. फ्री-स्टाईल रिले प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
  • अमेरिकेच्या संघात मायकेल फेल्प्ससह कॅलेब ड्रेसेल, रायन हेल्ड आणि नॅथन अॅड्रियनचा समावेश होता.
  • फेल्प्सने त्याच्या पहिल्याच म्हणजेच अथेन्स ऑलिम्पिकमध्ये ६ सुवर्ण आणि २ कांस्य पदकांची कमाई केली होती.
  • त्यानंतर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मायकेलने ८ सुवर्ण पदके कमावली, तर लंडन ऑलिम्पिकमध्ये ४ सुवर्ण आणि २ रौप्य पदकांवर मायकेलने आपले नाव कोरले होते.

थायलंडमध्ये लष्कराच्या नव्या राज्यघटनेला मान्यता

  • थायलंडमध्ये झालेल्या सार्वमतात नागरिकांनी लष्कराने तयार केलेल्या राज्यघटनेच्या बाजूने कौल दिला.
  • थायलंडमध्ये राजकीय अस्थिरतेच्या कारणावरून दोन वर्षांपूर्वी लष्कराने सत्ता हस्तगत करत त्यांच्या मर्जीने चालणारे सरकार स्थापन केले होते. 
  • लष्कराच्या पाठबळावरील सरकारने जुनी राज्यघटना बदलून नव्या राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता. या मसुद्यात लष्कराला अनेक विशेषाधिकार दिले आहेत.
  • यासाठी झालेल्या मतदानात थायलंडमधील नागरिकांनी लष्कराने तयार केलेल्या नव्या मसुद्याच्या बाजूने कौल दिला आहे. तसेच, यामुळे २०१७मध्ये नव्या राज्यघटनेनुसारच निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
  • नव्या राज्यघटनेच्या मसुद्याला देशातील मोठ्या पक्षांनी विरोध केला होता. सरकारने त्याविरोधात प्रचार करण्यासच बंदी घातली होती.
  • आता या मसुद्याच्या बाजूने मतदान झाल्याने याचे राज्यघटनेत रूपांतर होणार आहे. हा निकाल थायलंडची दिशा बदलविणारा ठरण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा