चालू घडामोडी : ९ ऑगस्ट

जीएसटी विधेयक लोकसभेत मंजूर

  • बहुप्रतीक्षित जीएसटी (वस्तू व सेवाकर) करप्रणाली लागू करण्यासाठी आवश्यक असलेले १२२वे घटनादुरुस्ती विधेयक सुधारणांसह लोकसभेत एकमताने मंजूर झाले.
  • राज्यसभेने या आधीच घटनादुरुस्ती विधेयकावर शिक्कामोर्तब केल्यामुळे लोकसभेची मंजुरी केवळ औपचारिकताच होती.
  • ४४३ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले, तर ‘एआयएडीएमके’ पक्षाने विधेयकाविरुद्ध सभात्याग करून आपली नाराजी व्यक्त केली.
  • या घटनादुरुस्तीला निम्म्यांहून अधिक राज्यांच्या विधानसभांनी मंजुरी देणे गरजेचे असून, त्यानंतर दोन केंद्रीय कायदे व संबंधित राज्यांचा कायदा असे तीन कायदे केले जातील. त्यानंतर, जीएसटी करप्रणाली प्रत्यक्ष लागू होईल.

‘नीट’च्या विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी

  • भारतीय वैद्यक परिषद (सुधारणा) कायदा २०१६ आणि दंतवैद्यक (सुधारणा) कायदा २०१६ संसदेने पारित केलेल्या या दोन विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.
  • यामुळे आता देशभरात वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमांमधील प्रवेशाकरिता एकच राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) होणार आहे.
  • परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणून भ्रष्टाचाराला आळा घालणे, अनेक परीक्षा देण्याचा त्रास टाळणे आणि समुपदेशनातील विद्यार्थ्यांचे शोषण थांबवणे या उद्देशांसाठी या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
  • देशभरातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय संस्थांतर्फे संचालित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी समान प्रवेश परीक्षा घेणे या कायद्यांनुसार अनिवार्य करण्यात आले आहे. हिंदी, इंग्रजी व तत्सम भाषांमध्ये ही परीक्षा घेण्याची तरतूद कायद्यात आहे.

९ ऑगस्ट : क्रांती दिन

  • भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तत्कालीन कॉंग्रेसच्या नेतृत्वाने भारतातील इंग्रज सरकारला 'चले जाव'चा इशारा दिला.
  • या दिवसापासून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भारतीयांनी करेंगे या मरेंगे अशी निर्वाणीची भूमिका घेऊन, इंग्रजांना छोडो हिंदुस्थान हा अखेरचा इशारा दिला होता.
  • तोपर्यंत शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा ९ ऑगस्ट क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला.
  • १९४२च्या जुलैमध्ये छोडो हिंदुस्थानचा इशारा, नव्हे, आदेशच इंग्रजांना देण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला होता.
  • इतकी स्पष्ट आणि कडक भूमिका घेऊनही, इंग्रजांनी आणखी पाच वर्षे आपल्याला स्वातंत्र्य दिलेच नाही. ९ ऑगस्ट १९४२ ते १५ ऑगस्ट १९४७ हा कालावधी प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवायलाच हवा, इतका ऐतिहासिक आणि महत्त्वाचा आहे.

जपानवरील अणुबॉम्ब हल्याला ७१ वर्षे

  • दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावर विध्वसंक अणुबॉम्ब टाकले होते यामध्ये अनेक निरापराध लोकांचे बळी गेले होते.
  • हिरोशिमा शहरावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब टाकला होता. त्यात सुमारे १ लाख ४० हजार नागरिक ठार झाले होते. ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकला होता. त्यात ७४ हजार लोक ठार झाले होते.
  • कित्येक जण त्या अणुबॉम्बच्या स्फोटामुळे निर्माण झालेल्या आगीत ठार झाले. नंतर कितीतरी जखमी आणि स्फोटामुळे निर्माण झालेल्या किरणोत्सर्गाने आजारी पडून मरण पावले.
 लिटिल बॉय आणि फॅट मॅन 
  • अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडने मिळून अणुबॉम्ब तयार करण्याचे मिशन हाती घेतले होते. त्याला अमेरिकेनं ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’ असं नाव दिले.
  • संशोधकांना हाताशी धरून अमेरिकेने दोन अणुबॉम्ब तयार केले. छोट्या बॉम्बचे नाव होते ‘लिटिल बॉय’ आणि मोठ्या बॉम्बचे नाव होतं ‘फॅट मॅन’.
  • ‘लिटिल बॉय’ तयार झाल्यानंतर ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर टाकला गेला. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी नागासाकी शहरावर अमेरिकेनं ‘फॅट मॅन’ नावाचा अणुबॉम्ब टाकला.
  • या दोन्ही महाभयंकर स्फोटांनी जपानमध्ये विध्वंस घडविला. अणुबॉम्बचा स्फोट होऊन ज्वाळा उसळल्या. सुमारे ३ लाखांहून अधिक बळी घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा