चालू घडामोडी : २६ ऑगस्ट

दिल्ली विधानसभेत जीएसटीला मंजुरी

  • दिल्ली विधानसभेने २४ ऑगस्ट रोजी वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे.
  • यामुळे हे विधेयक मंजूर करणारे दिल्ली तिसरे बिगर भाजपशासित आणि एकूण आठवे राज्य बनले आहे
  • दिल्ली विधानसभेत या विधेयकावर काही काळ चर्चा होऊन नंतर आवाजी मतदानाने ते मंजूर करण्यात आले. 
  • ‘जीएसटी’ विधेयक ही कररचनेतील मोठी सुधारणा असून, यामुळे देशाची अर्थव्यवस्था वाढण्यास हातभार लागणार आहे.
  • दिल्ली विधानसभेमध्ये विरोधी पक्षात केवळ तीन सदस्य असून, तिघेही भाजपचे आहेत. या विधेयकावरील मतदानावेळी हे तिघेही गैरहजर होते.

रिओतील नेमबाजांच्या अपयशाच्या चौकशीसाठी समिती

  • रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांना आलेल्या अपयशाची चौकशी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने आढावा समिती नेमली आहे.
  • या समितीच्या प्रमुखपदी नेमबाज अभिनव बिंद्रा याची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणारा अभिनव पाच सदस्यीस समितीचा प्रमुख असेल.
  • या समितीमध्ये अभिनवसह माजी टेनिसपटू मनिषा मल्होत्रा, असोसिएशनचे सचिव राजीव भाटीया आणि दोन पत्रकारांचा समावेश आहे.
  • ही समिती खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेणार असून त्रुटी शोधून काढणार आहेत.
  • त्यांनी सुचवलेल्या सुचनांवर असोसिएशन काम करणार आहे आणि पुढील ऑलिम्पिकमध्ये या चुका पुन्हा होऊ नये, याची काळजी घेणार आहे.
  • रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या अभिनवने निवृत्ती जाहीर केली आहे.

दि लिजेंड टॉवर गैरव्यवहार

  • माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळातील वाळकेश्वर येथील जय किसान (आताचे नाव ‘दि लिजेंड टॉवर’)चा नवा गैरव्यवहार समोर आला आहे.
  • अंदाजे १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेले बेकायदा बांधकाम तेव्हाच्या सरकारने केवळ १८.६९ कोटी रुपये दंड आकारून अधिकृत केले.
  • याप्रकरणी चार अधिकाऱ्यांसह तत्कालीन मुख्यमंत्री व गृहनिर्माणमंत्री अशोक चव्हाण अडचणीत येण्याची शक्यता आहे. 
  • ‘दि लिजेंड‘मधील आलिशान सदनिका अतिशय महागड्या आहेत. या सदनिका अनेक गर्भश्रीमंत अनिवासी भारतीयांनी विकत घेतल्या आहेत.
  • विशेष म्हणजे, परदेशात राहणाऱ्या व्यक्ती इथल्याच रहिवासी आहेत, अशी खोटी कागदपत्रे तयार करून या सदनिका खरेदी केल्या आहेत.
  • बेकायदा बांधकाम केलेल्या सदनिका अधिकृत केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सध्या चार अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
  • यात तत्कालीन गृहनिर्माण सचिव सीताराम कुंटे, तत्कालीन कक्ष अधिकारी (सध्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांचे खासगी सचिव) श्रीकांत पुलकुंडवार, उपसचिव दिलीप शिंदे व अवर सचिव संतोष भोगले यांचा समावेश आहे. 

नसिरुद्दीन शाह यांचे आत्मचरित्र मराठीत अनुवादित

  • खलनायक, नायक व चरित्र अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवणारे अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी लिहिलेले आत्मचरित्र ‘ऍण्ड देन वन डे’ मराठीत अनुवादित करण्यात आले आहे.
  • ‘आणि मग एक दिवस’ असे या पुस्तकाचे नाव असून सई परांजपे यांनी हा अनुवाद केला आहे.
  • या मराठी अनुवादाचे प्रकाशन २ सप्टेंबरला प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. 

कोलंबिया सरकारचा बंडखोरांच्या संघटनेसोबत शांतता करार

  • कोलंबिया सरकार‘रेव्होल्युशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया’ (एफएआरसी) या बंडखोरांच्या संघटनेत २४ ऑगस्ट रोजी शांतता करार करण्यात आला.
  • यामुळे गेल्या ५० वर्षांपासून देशात सुरू असलेले गनिमी युद्ध अखेर संपुष्टात येणार आहे. 
  • जगात सर्वाधिक काळ चाललेले युद्ध अशी या युद्धाची ओळख असून, यात आतापर्यंत २ लाख २० हजार नागरिक मारले गेले आहे.
  • दीर्घ संघर्ष संपवून शांतता व स्थिरता निर्माण करण्यासाठी हा शांतता करार करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.

तुरुंगात शिक्षा भोगत असलेला नेता कराचीचा महापौर

  • पाकिस्तानमधील सर्वांत मोठे शहर असलेल्या कराचीने तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या वासीम अख्तर या नेत्याला आपला महापौर म्हणून निवडले आहे. 
  • वासीम अख्तर याच्यावर दहशतवाद आणि देशद्रोहाचा आरोप आहे. तो मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) या पक्षाचे नेता असून, त्याने पूर्वी मंत्रिपदही भूषविले आहे.
  • पाकिस्तानच्या सरकारविरोधी भूमिका घेणारा एमक्यूएम हा कराचीमधील प्रबळ पक्ष आहे.
  • २००७मध्ये सिंध प्रांताचे गृहमंत्री असताना अख्तर यांनी दंगल मोडून काढण्यासाठी अत्यंत कडक कारवाईचे आदेश दिले होते.
  • यानंतर पाकिस्तान सरकारने त्यांच्यावर देशद्रोह आणि दहशतवादाचा आरोप ठेवत त्यांना अटक केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा