चालू घडामोडी : १४ सप्टेंबर

रमेश रासकर यांना लेमेलसन एमआयटीचा पुरस्कार

  • भारतीय वंशाचे नाशिकला जन्मलेले वैज्ञानिक रमेश रासकर यांना ‘लेमेलसन एमआयटी’चा प्रतिष्ठेचा ५ लाख डॉलर्सचा पुरस्कार मिळाला आहे.
  • त्यांनी जगातील लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी नवप्रवर्तनात्मक संशोधन केले असून जीवनातील समस्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
  • रासकर हे एमआयटी मीडिया लॅबमधील कॅमेरा कल्चर रीसर्च ग्रुपचे संस्थापक असून मीडिया आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेत सहायक प्राध्यापक आहेत.
  • २००८मध्ये त्यांनी एमआयटी मीडिया लॅबमध्ये कॅमेरा कल्चर लॅब स्थापन केली. तेथे प्रतिमाचित्रण यंत्रे तयार केली जातात.
  • त्यांच्या नावावर सध्या ७५ पेटंट असून १२० शोधनिबंध त्यांनी लिहिले आहेत. ‘फेमटो फोटोग्राफी’ या अल्ट्रा फास्ट इमेजिंग सिस्टीमचा शोध लावण्यात त्यांचा सहभाग होता.
  • कमी खर्चातील डोळ्यांची काळजी घेणारी तंत्रे त्यांनी विकसित केली असून त्यांच्या कॅमेऱ्याच्या मदतीने पुस्तकाची पाने न उघडता पुस्तक वाचता येते.
  • रासकर हे संशोधन क्षेत्रातील उमदे नेतृत्व असून त्यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावून समाजाला जोडण्याचे काम केले. जगात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ते काम करीत आहेत.

पतंजलीचे प्रमोटर देशातील श्रीमंतांच्या यादीत

  • योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीचे प्रमोटर आचार्य बाळकृष्ण यांचा देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत समावेश झाला आहे.
  • हुरून इंडिया २०१६ यांनी प्रसिद्ध केलेल्या श्रीमंतांच्या यादीत बाळकृष्ण हे २५व्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही २५,६०० कोटी रूपये इतकी सांगण्यात आली आहे.
  • २०१६मध्ये पतंजलीच्या व्यवसायात सुमारे ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. पतंजली कंपनीची उलाढाल ही ५ हजार कोटी रूपये इतकी आहे.
  • बाळकृष्ण यांच्यावर शैक्षणिक कागदपत्रात हेराफेरी, बनावट पासपोर्ट आणि विदेशी चलन बाळगल्याप्रकरणी आरोप होते. परंतु अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना क्लिन चिट दिली होती.
  • बाळकृष्ण हे नेपाळचे नागरिक असून बरेली पासपोर्ट कार्यालयात हरिद्वारच्या पत्त्यावर पासपोर्ट बनवल्याची तक्रार सीबीआयकडे दाखल झाली होती.
  • बाळकृष्ण यांनी सहलेखकांसमवेत आतापर्यंत ४१ शोधनिबंध लिहिले आहेत. हे सर्व शोधपत्र योग, आयुर्वेद आणि औषधांसंबंधी आहेत. सध्या ते पंतजलीशी संबंधित ९ पदांवर कार्यरत आहेत.
  • पतंजली भारतातील सर्वात वेगाने विकसित होणारा कंज्युमर ब्रँड आहे. पतंजली आयुर्वेच्या ९४ टक्क्यांपेक्षा जास्त मालकी हक्क बाळकृष्ण यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते.
  • पतंजलीबरोबर गत दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या बाळकृष्ण यांनी २०११मध्ये आपल्यावर ५०-६० कोटींचे वैयक्तिक कर्ज असल्याचेही सांगितले होते.

जगातील पहिली चालकरहित बस फ्रान्समध्ये

  • जगातील पहिली चालकरहित बस फ्रान्समधील लायन येथे सुरू झाली असून ती या शहरातील काही भागात सेवा देणार आहे.
  • या बसमध्ये दोन इलेक्ट्रिक शटल असून त्यांच्या मदतीने दहा मिनिटांचा मार्ग प्रवासी पार करू शकतील, त्यात पाच थांबे आहेत.
  • चालकरहित बसमध्ये १५ प्रवासी बसू शकतात व त्या इलेक्ट्रिक बसेस आहेत. लिडार रडार तंत्रज्ञान त्यात वापरण्यात आले आहे व त्यात अपघात टाळण्यासाठी गती संवेदकांचा वापर केलेला आहे.
 लिडार 
  • लिडार रडार तंत्रज्ञान हे आपण नेमके कुठे आहोत व आजूबाजूला काय घडते आहे हे समजून घेण्यासाठी असते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने बसचे संचालन अतिशय स्मार्ट पद्धतीने करून अपघात टाळले जातात.
  • लिडार हे लाइट डिटेक्षन अँड रेजिंग या शब्दाचे लघुरूप असून त्याचा उपयोग प्रथम रडारमध्ये केला जात होता.
  • ती टेहळणी तंत्रज्ञानाची पद्धत असून त्यात एखादे लक्ष्य लेसरने प्रकाशित करून त्याचे अंतर मोजले जाते.
  • जास्त विवर्तन क्षमतेचे नकाशे, जिओमॅटिक्स, पुरातत्त्वशास्त्र, भूगोल, भूगर्भशास्त्र, वनसंवर्धन, वातावरणीय भौतिकशास्त्र यात हे तंत्रज्ञान वापरले

भारतीय वंशाच्या डायने गुजराती अमेरिकेत न्यायाधीशपदी

  • भारतीय-अमेरिकन वंशाच्या डायने गुजराती यांची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी न्यायाधीशपदी नियुक्ती केली आहे.
  • अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयातील न्यूयॉर्क खंडपीठात न्यायाधीशपदी डायने गुजराती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकी सिनेटच्या मंजुरीनंतर त्या कार्यभार स्विकारतील. 
  • भारतीय-अमेरिकन वंशाच्या गुजराती या २०१२पासून दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्याच्या न्यायाधीशांच्या कार्यालयात गुन्हे विभागाच्या उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
  • गुजराती या अमेरिकेतील वेस्ट पॉइंट येथील लष्करी अकादमीतील प्राध्यापक दामोदर गुजराती यांच्या कन्या आहेत.
  • दामोदर गुजराती यांनी १९६०मध्ये मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी संपादन केली होती. तसेच १९६५मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली होती.

No comments:

Post a Comment