चालू घडामोडी : १६ सप्टेंबर

अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा सत्ताबदल

 • अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल या पक्षात प्रवेश केला आहे.
 • काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री नबाम तुकी यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच आमदारांनी पक्षांतर केल्याने काँग्रेसमधील पक्षांतर्गत कलह समोर आले आहे.
 • एकूण ६० आमदारांच्या विधानसभेत काँग्रेसचे ४७ आमदार आहेत. भाजपकडे ११ आमदार असून २ अपक्ष आहेत. काँग्रेसच्या ४७ पैकी २ आमदारांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे.
 • आता मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री  मुख्यमंत्री चोवना मेन यांच्यासह ४२ आमदारांनी पीपीएमध्ये प्रवेश केला.
 • पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल हा पक्ष भाजपप्रणित पूर्वोत्तर विकास आघाडीतील घटक पक्ष असून, या पक्षाची स्थापना १९७९मध्ये करण्यात आली होती.
 • पूर्वोत्तर राज्यांवरील पकड मजबूत करण्यासाठी भाजपने प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करुन या आघाडीची स्थापना केली होती.
 अरुणाचलमधील अस्थिरता 
 • अरुणाचलमधील अस्थिर परिस्थितीला डिसेंबर २०१४मध्ये सुरुवात झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी महत्त्वाची मंत्रीपदे निकटवर्तीयांकडे ठेवल्यामुळे इतर गट नाराज झाले.
 • त्यातच नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार तसेच पुनर्रचना करण्यात आली.
 • काँग्रेसचे दिवंगत माजी नेते कालिखो पूल यांनी २४ आमदारांसह फेब्रुवारी २०१६मध्ये काँग्रेससोडून पीपीएमध्ये प्रवेश केला आणि या आधारे त्यांनी काही काळ मुख्यमंत्रीपदही भूषवले होते.
 • अरुणाचल प्रदेशमधील या राजकीय अस्थितरतेनंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. यावरुन काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयापर्यंत संघर्ष करून ही सत्ता पुन्हा मिळवली.
 • दोन महिन्यांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार आले आणि पेमा खांडू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
 • आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसह सर्वच आमदारांनी पीपीएत प्रवेश करुन काँग्रेसला हादरा दिला आहे.

पुणे मेट्रोसाठी जागतिक बँकेचे कर्ज

 • पुणे मेट्रोसाठी जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इंन्वेस्टमेंट बँक यांनी ६,३२५.५० कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहेत.
 • पुण्यातील वाहतूकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मेट्रो रेल्वे लवकरात लवकर करण्यासाठी राज्य सरकारने पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती.
 • या समितीच्या अहवालानुसार केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अर्थ विषयक विभागाने हे कर्ज मंजूर करुन घेतले.
 • हे कर्ज स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनीमार्फत घेतले जाणार असून ते २ ते ३ टप्प्यात वितरित केले जाईल.
 • केंद्रिय अर्थ मंत्रालय, जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इंन्वेस्टमेंट बँक यांच्यासोबत बैठका होऊन लवकरच प्रत्यक्ष करारनामा केला जाणार आहे. 

आर कॉम आणि एअरसेल या कंपन्यांचे एकत्रीकरण

 • अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन्स (आर कॉम) आणि एअरसेल या मोबाईल सेवा प्रदात्या कंपन्यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
 • ग्राहक तसेच महसुली उत्पन्नाच्या रूपात देशातील मोठी कंपनी यातून उदयास आली आहे.
 • एअरसेलच्या विलिनीकरणानंतर एकत्रित १९.४० कोटी मोबाईलधारक संख्येमुळे आर कॉमने आयडिया सेल्युलरला ग्राहकसंख्येत मागे टाकले आहे.
 • आर कॉम व एअरसेल यांची एकत्रित मालमत्तांचे मूल्य आता ६५,००० कोटी रुपयांवर जाणे अपेक्षित आहे.
 • एअरसेल खरेदीमुळे ४२,५०० कोटी रुपयांहून अधिक कर्जभार असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा काही भार हलका होणार आहे.
 • मॅक्सिस कम्युनिकेशन्सने २००६मध्ये एअरसेल खरेदी केली होती. यावेळी ३५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. भारतातील ही तेव्हाची सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक ठरली होती.

जितेश गढीया हाऊस ऑफ लॉर्डसचे सर्वात कमी वयाचे सदस्य

 • भारतीय वंशाचे जितेश गढीया यांनी नुकतीच त्यांनी ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डसचे सर्वात कमी वयाचे सदस्य म्हणून शपथ घेतली.
 • ब्रिटिश संसदेच्या या वरिष्ठ सभागृहात सुमारे २० मूळ भारतीय सदस्य आहेत. त्यातील एक असलेल्या गढीया यांनी एक नवा इतिहास रचला आहे.
 • त्यांनी महाराणी एलिझाबेथ यांच्याप्रती प्रामाणिक राहण्यासाठीची शपथ भारताचा प्राचीन वैदिक ग्रंथ ऋग्वेदवर हात ठेऊन घेतली.
 • ऋग्वेद हा जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. मूळ गुजरातेतील गढीया हे १९७२मध्ये युगांडा येथून ब्रिटनमध्ये आले. तेव्हा ते दोन वर्षांचे होते.
 • गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लंडनच्या वेम्बले स्टेडियममध्ये मोदी यांनी केलेले भाषण गढीया यांनीच लिहून दिले होते.
 • ‌ब्रिटनच्या संसदेत नव्या सदस्यांना शपथ घेताना बायबलशिवाय दुसऱ्या एका धार्मिक ग्रंथाची निवड करण्याची परवानगी असते. मात्र यापूर्वी कधी कुणीही ऋग्वेदची निवड केली नव्हती.
 • गढीया हे संसदेला ऋग्वेदाची प्रत भेट म्हणून देणार आहेत. १६७ वर्षे जुनी ही प्रत १८४९मध्ये प्रसिद्ध जर्मन शिक्षक डॉ. मॅक्स म्युलर यांनी संपादित आणि प्रकाशित केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा