चालू घडामोडी : ३ ऑक्टोबर

जपानचे शास्त्रज्ञ योशिनोरी ओहसुमी यांना नोबेल पुरस्कार

  • जपानचे ख्यातनाम शास्त्रज्ञ योशिनोरी ओहसुमी यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • पेशींमधील विघटन आणि पुनर्रचनेविषयी संशोधन केल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • पेशींचा स्वनाश तसेच त्यांच्या काही भागांचा फेरवापर शरीरात कसा होतो हे त्यांनी यिस्टवरील संशोधनातून सिद्ध केले आहे.
  • ते वैद्यकशास्त्रात नोबेल मिळवणारे जपानचे सहावे संशोधक आहेत. आतापर्यंत जपानच्या २३ जणांना विविध शाखांत नोबेल मिळाले आहे.
 योशिनोरी ओहसुमी आणि त्यांचे संशोधन 
  • योशिनोरी ओहसुमी हे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणजे मायक्रोबायॉलॉजिस्ट असून त्यांचा जन्म १९४५मध्ये जपानमधील फुकुओका येथे झाला. १९७४मध्ये ते टोकियो विद्यापीठातून पीएच.डी. झाले.
  • अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील विद्यापीठात त्यांनी तीन वर्ष काम केल्यावर ते पुन्हा टोकियोत परतले आणि १९८८मध्ये त्यांनी संशोधन गटाची स्थापना केली.
  • २००९पासून ते टोकियोतील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
  • ओहसुमी यांनी १९९०च्या दरम्यान जिवाणूंमध्ये वाढणाऱ्या परावलंबी विषाणू (ऑटोफॅगी) याविषयी संशोधन केले होते.
  • यानुसार पेशींचे विघटन करुन त्यांची पूनर्रचना होणे शक्य असल्याचे त्यांच्या संशोधनातून समोर आले होते.
  • ऑटोफॅगी ही पेशी जैवशास्त्रातील एक मूलभूत प्रक्रिया आहे. मानवी आरोग्य आणि रोगांशी त्याचा निकटचा संबंध आहे. 
  • या संशोधनातून मधूमेह, कर्करोग आणि अन्य रोगांवरील उपचारपद्धतीमध्ये मदत झाली.
  • ७१ वर्षीय ओहसुमी यांना १९९०मध्ये कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटने सर्वोत्तम संशोधनासाठी सन्मानित केले होते.
  • २०१२मध्ये ओहसुमी यांना जागतिक पातळीवर मिळवलेल्या यशासाठी जपानमधील क्योटो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आयएमएफच्या चलनांमध्ये युआनचा समावेश

  • आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) गंगाजळीतील चलनांमध्ये चीनच्या युआन चलनाचा समावेश झाला आहे.
  • आयएमएफच्या मुक्त व्यापारयोग्य चलनांमध्ये अमेरिकी डॉलर, युरो, पौंड आणि येनचा समावेश होता. आता यात युआनचा समावेश झाला आहे.
  • आयएमफकडून मिळणारे कर्ज या ठराविक चलनांमध्ये संबंधित देशांना स्वीकारता येते. चीनमध्ये युआनला लोकांचा पैसा असे संबोधले जाते.
  • चीनमध्ये कम्युनिस्ट पक्ष देशाचा स्थापना दिन साजरा करीत असतानाच युआनचा समावेश झाल्याची घोषणा झाली आहे.
  • युआनचा समावेश करण्याचे सूतोवाच मागील वर्षी आयएमएफने केले होते. युआनचा समावेश केल्याने वित्तीय बाजारपेठांवर फारसा परिणाम होणे अपेक्षित नाही.
  • मात्र आयएमएफ आता अधिकृत गंगाजळीत युआनचा समावेश करणार असल्याचे चीनच्या आर्थिक आणि विनिमय धोरणाला बळ मिळणार आहे.

स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक

  • ‘स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक’ मोहिमेचा भाग म्हणून साधून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळांवर प्लास्टिकबंदीची घोषणा करण्यात आली आहे.
  • केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधत ही घोषणा केली.
  • सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे, तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपहारगृहांची सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
  • स्वच्छ भारत मोहिमेचा भाग म्हणून ही प्लास्टिकबंदी घालण्यात येत असून यामधून प्लास्टिक बाटल्या वगळण्यात आल्या आहेत.
  • स्मारकापासून १००मीटरच्या परिघात ही बंदी लागू राहील. एक महिन्यानंतर या मोहिमेचा आढावा घेऊन गरज पडल्यास दंडाची आकारणीही करण्यात येईल.

गुजरात व आंध्र प्रदेश देशातील पहिली हागणदारीमुक्त राज्ये

  • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये देशातील पहिली हागणदारीमुक्त राज्ये म्हणून घोषित केली आहेत.
  • केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाला २ ऑक्टोबर रोजी २ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.
  • याशिवाय आंध्रप्रदेशला मोठ्या शहरांतील घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारकडून १८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणाही करण्यात आली. 

वेलिंगकर यांचा ‘गोवा सुरक्षा मंच’

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यात ‘गोवा सुरक्षा मंच’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली.
  • स्थानिक भाषेच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांवर सार्वजनिक टीका करणाऱ्या वेलिंगकर यांची ३१ ऑगस्टला पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
  • त्यानंतर त्यांनी ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’चे वरिष्ठ नेते अनंत शिरोडकर यांच्या मदतीने राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.
  • या नव्या राजकीय पक्षाची धुरा शिरोडकर यांच्या हाती सोपवण्यात आली आहे.
 यादव, भूषण यांचा ‘स्वराज इंडिया’ 
  • आम आदमी पार्टीतून हकालपट्टी करण्यात आलेले योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनीही ‘स्वराज इंडिया’ नावाच्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली.
  • यादव या पक्षाचे प्रमुख असतील. हा पक्ष दिल्ली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवेल, मात्र पंजाब विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार नाही.
  • आपचे पंजाबमधील निलंबित आमदार धर्मवीर गांधी यांना ‘स्वराज इंडिया’ पाठिंबा देणार आहे.

बिहारमध्ये नवे दारुबंदी धोरण

  • बिहारमध्ये उच्च न्यायालयाने दारूबंदी धोरण रद्द केल्याच्या दोन दिवसानंतरच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नवे दारुबंदी धोरण जाहीर केले आहे.
  • नव्या दारुबंदी धोरणातील नियम व अटी अधिक कठोर आहेत. यात कारावासाचा कालावधी वाढविण्यात आला आहे. तर, दंडाची रक्कमही अधिक असेल.
  • एखाद्या घरात दारुची बाटली आढळल्यास त्या घरातील वयस्कर व्यक्तींना अटक करण्यात येईल, दारुबंदीचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या भागात सामुदायिक दंड लावण्यात येईल.
  • नव्या धोरणानुसार पोलिस अधिकाऱ्यांकडून एखाद्या व्यक्तीला जर या प्रकरणी त्रस्त केले जात असेल तर त्यांच्याविरुद्धही खटला चालविला जाईल.

  • भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील कायमस्वरूपी प्रतिनिधी : सईद अकबरुद्दीन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा