चालू घडामोडी : १ नोव्हेंबर

अर्णव गोस्वामी यांचा टाइम्स नाऊमधून राजीनामा

  • टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी १ नोव्हेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  • खासदार आणि बडे व्यापारी असलेले राजीव चंद्रशेखर यांच्याबरोबर अर्णव हे एक माध्यमसमूह सुरू करणार असल्याची चर्चा आहे.
  • अर्णव यांच्या द न्यूज अवर या कार्यक्रमामुळे टाइम्स नाऊच्या टीआरपीत प्रचंड वाढ झाली होती. ही वाहिनी २००५मध्ये सुरू झाली होती.
  • हा कार्यक्रम पहिल्यांदा २००७मध्ये प्रथम क्रमांकाचा प्राइम टाइम कार्यक्रम ठरला होता. तेव्हापासून हा कार्यक्रम नेहमी चर्चेत आणि वादात राहिला आहे.
 अर्णव गोस्वामी 
  • अर्णव गोस्वामी यांनी १९९५मध्ये कोलकाता स्थित दैनिक द टेलिग्राफमधून पत्रकारितेस सुरूवात केली होती.
  • त्यानंतर डीडी मेट्रो वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘न्यूज टू नाइट’ या एनडीटीव्हीच्या कार्यक्रमाचे वार्तांकन ते करत होते.
  • १९९८मध्ये एनडीटीव्हीने स्वतंत्र वाहिनी सुरू केल्यानंतर त्यांनी कार्यक्रम निर्माता म्हणून या वाहिनीत काम सुरू केले.
  • एनडीटीव्हीवर ते ‘न्यूज अवर’ हा कार्यक्रम सादर करत. त्यांनी २००३पर्यंत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
  • वर्ष २००६मध्ये त्यांची टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीच्या मुख्य संपादकपदी निवड झाली. तेव्हापासून ते न्यूज अवर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते.
  • गोस्वामी हे मुळचे आसामचे आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून समाजशास्त्रात बीए तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून एमए केले आहे.
  • पाकिस्तान स्थित एका दहशतवादी गटाने धमकी दिल्यामुळे गोस्वामी यांना नुकतीच ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

एस. रामदुरई यांचा एनएसडीए अध्यक्षपदाचा राजीनामा

  • एस. रामदुरई यांनी राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था (एनएसडीए) आणि राष्ट्रीय कौशल्यविकास महामंडळ (एनएसडीसी) या दोन सरकारी पदांचा राजीनामा दिला आहे.
  • एस. रामदुरई हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे माजी प्रमुख असून त्यांची टाटा समूहात दीर्घकाळ कारकीर्द राहिली आहे.
  • एनएसडीएच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष आणि कौशल्यविकास मंत्रालयाचे सचिव रोहित नंदन यांच्याकडे संस्थेचा हंगामी कार्यभार सोपविण्यात आला आहे.
  • रामदुरई यांची मे २०१३मध्ये म्हणजे संयुक्त लोकशाही आघाडी सरकारच्या (यूपीए) काळात एनएसडीएच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
  • एनएसडीए हे एक स्वायत्त मंडळ असून, त्याच्या अध्यक्षपदाला केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांच्या समकक्ष दर्जा आहे.
  • उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळाच्या पुरवठय़ासाठी प्रशिक्षण व विकासाचे उपाय शोधून काढणे या उद्देशाने एनएसडीएची स्थापना करण्यात आली.
  • रामदुरई यांच्यासह यूपीए काळात नियुक्त झालेले महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप चिनॉय आणि मुख्य परिचालन अधिकारी अतुल भटनागर यांनी यापूर्वीच राजीनामे देऊन पदत्याग केला आहे.

प्रसिध्द शिल्पकार सिल्व्हिओ गझानिगा यांचे निधन

  • ‘फिफा’ फुटबॉल विश्वचषकाची रचना करणारे प्रसिध्द शिल्पकार सिल्व्हिओ गझानिगा यांचे ३१ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
  • फिफा विश्वचषकाच्या डिझाइनसाठी १९७०मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत ‘फिफा’ने जगभरातील ५३ डिझाईन्समधून मधून गझानिगा यांचे शिल्प निवडले.
  • पण नंतर मूळ चषक स्वत:कडेच ठेवून त्याची प्रतिकृती दरवर्षी देण्याचा निर्णय करावा लागला. हीच प्रथा आजही सुरू आहे.
  • मूळचे (मिलान) इटालियन असलेले गझानिगा यांचे औपचारिक शिक्षण ‘सुवर्णकला आणि दागिने काम’ या विषयात झाले.
  • गझानिगा यांना फुटबॉलचे तीन आणि बेसबॉलचा एक अशा चार प्रतिष्ठेच्या चषकांच्या संकल्पनेची निमंत्रणे मिळाली आणि त्यांनी ते चषक डिझाईन केले.
  • इटलीचा राष्ट्रीय सन्मान (कमांडर ऑफ मेरिट) त्यांना २०१२मध्ये मिळाला आणि मिलान शहरानेही त्यांचा गौरव केला.

सिबुल्कोव्हाला डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे विजेतेपद

  • डॉमिनिका सिबुल्कोव्हाने जबरदस्त कामगिरी करत डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
  • सातव्या सीडेड सिबुल्कोव्हाने जागतिक रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या जर्मनीच्या अँजलिक कर्बरवर ६-३, ६-४ अशी मात केली.
  • या कामगिरीसाठी सिबुल्कोव्हाला ‘डब्ल्यूटीए कमबॅक प्लेअर ऑफ द इयर’ हा पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
  • मोसमाच्या अखेरीस रंगणाऱ्या या स्पर्धेत जागतिक रँकिंगमधील अव्वल आठ टेनिसपटू भाग घेतात, तर दुहेरीच्या स्पर्धेतही अव्वल आठ जोड्यांना प्रवेश मिळतो.
 व्हेसनिना-मॅकारोव्हा विजेत्या 
  • रिओ ऑलिम्पिक विजेत्या एलिना व्हेसनिना व एकतेरिना मॅकारोव्हा यांनी डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेत दुहेरीचे जेतेपदही पटकावले.
  • दुहेरीत एकत्र खेळायचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेचे पहिलेच जेतेपद ठरले आहे.
  • व्हेसनिना-मॅकारोव्हा यांनी बेथनी मटेक सँड्स व ल्युसी साफारोव्हा यांना ७-६ (७-५), ६-३ असे नमवत जेतेपदाचा मान पटकावला.
  • व्हेसनिना-मॅकारोव्हा या जोडीनेच उपांत्य सामन्यात सानिया मिर्झा-मार्टिना हिंगिस यांच्यावर मात केली होती.

1 टिप्पणी: