चालू घडामोडी : ४ नोव्हेंबर

अनिल खन्ना आयटाच्या अध्यक्षपदावरून पायउतार

  • सरकारशी असलेल्या कटू संबंधांच्या पार्श्वभूमीवर अनिल खन्ना यांनी अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या (आयटा) अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला.
  • इंदूर येथे ३ सप्टेंबर रोजी झालेल्या आयटाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये खन्ना यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली होती. तत्पूर्वी २०१२ ते २०१६ या कालावधीसाठीही खन्ना आयटाचे अध्यक्ष होते.
  • क्रीडा नियमावलीनुसार त्यांनी एक टर्म पदापासून दूर राहणे अपेक्षित असल्याने (कूलिंग ऑफ पिरियड) सरकारने त्यांनी अध्यक्षपदी राहण्यास विरोध केला होता.
  • खन्ना हे २०१२मध्ये प्रथम आयटाचे अध्यक्ष झाले, त्यापूर्वी त्यांनी दोनवेळा सरचिटणीसपदाचा कार्यकाळ पूर्ण केला होता.
  • सरकारने त्यावेळी कूलिंग ऑफ पिरियडचा मुद्दा उपस्थित करून खन्ना यांचे अध्यक्षपद अवैध ठरवले होते.
  • तथापि, क्रीडा नियमावलीत सरचिटणीस पदावरील व्यक्तीस अध्यक्ष होताना कूलिंग ऑफ पिरियडची अट पूर्ण करावी लागेल, असा उल्लेख नसल्याचे सांगत खन्ना यांनी अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला होता.
  • परिणामी, सरकारतर्फे नुकतीच आयटाची मान्यता रद्द करण्यात आली होती.

आपत्ती व्यवस्थापनासाठी दिल्लीमध्ये आशियाई देशांची परिषद

  • आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध देशांनी परस्परांना सहकार्य करणे, मदतीची देवाणघेवाण आदी विषयांवरील आशियाई देशांची परिषद ३ नोव्हेंबर रोजी दिल्लीत सुरू होणार आहे.
  • आपत्तीची संभाव्यता आणि तीव्रता कमी करण्याच्या संदर्भात गेल्या वर्षी (सेंदाई) जपानमध्ये झालेल्या परिषदेतील निर्णयांच्या अंमलबजावणीची रूपरेषा दिल्लीतील परिषदेत तयार करण्यात येणार आहे.
  • तसेच परिषदेच्या अखेरीस आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा ‘दिल्ली जाहीरनामा’ जारी केला जाणार आहे.
  • या परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे आणि केंद्रीय गृह मंत्रालयाची यामध्ये मुख्य भूमिका असेल. पंतप्रधान मोदी या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.
  • जपानसह सर्व आशियाई देशांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत. पाकिस्तानचे प्रतिनिधीही परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
  • आपत्तीची संभाव्यता कमी करणे, हा परिषदेचा मुख्य विषय आहे. यामध्ये सहा तांत्रिक चर्चासत्रे असतील, तर २२ विशिष्ट विषयांवर आधारित चर्चासत्रे होतील.
 परिषदेतील प्रमुख विषय 
  • आपत्तीची संभाव्यता कमी करणे.
  • त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची मदत घेणे.
  • नव्या स्वरूपाच्या आपत्तींच्या शक्यतेबाबत चर्चा करून त्या रोखण्याबाबत विचारविनिमय करणे.
  • विभागीय सहकार्य व देवाणघेवाण.

चंदीगडचे भारतीय वास्तुरचनाकार एम. एन. शर्मा यांचे निधन

  • चंडीगढ हे भारतातील पहिले सुनियोजित शहर वसवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले एम. एन. शर्मा यांचे वयाच्या ९३व्या वर्षी निधन झाले.
  • चंदीगडचे पहिले भारतीय मुख्य वास्तुरचनाकार अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी ‘द मेकिंग ऑफ चंदीगड : ल कॉर्बुझिए अँड आफ्टर’ हा ग्रंथ लिहिला.
  • चंदीगडच्या संकल्पनेवर निस्सीम प्रेम असणारे शर्मा हे कवीप्रमाणे भावनांच्या प्रकाशात या शहराबद्दल चिंतन करणारे विचारी कलावंत होते.
  • संपूर्ण चंदीगड युनिसेफने वास्तु-वारसा म्हणून घोषित करावे या मागणीचा पाठपुरावा ते अखेपर्यंत करीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा