चालू घडामोडी : २८ नोव्हेंबर

प्राप्तिकर सुधारणा विधेयक लोकसभेत सादर

  • नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा धारकांना चाप लावण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्राप्तिकर सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले आहे.
  • या सुधारित विधेयकानुसार ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत जमा झालेल्या बेहिशेबी रकमेवर कर लावण्याचा प्रस्ताव आहे.
  • बँक खात्यात जमा होणाऱ्या बेहिशेबी रकमेवर ५० टक्के तर ही बेहिशेबी रक्कम आयकर विभागाने पकडल्यास त्यावर तब्बल ८५ टक्के कर लावण्याची तरतूद या विधेयकात केलेली आहे.
  • यामध्ये बेहिशेबी रकमेवर ३० टक्के कर, १० टक्के दंड आणि ३३ टक्के सरचार्ज आकारला जाईल. हा सरचार्ज एकूण कराच्या १३ टक्के असणार आहे. या सरचार्जला ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण सेस’ असे नाव देण्यात आले आहे.
  • मात्र जो व्यक्ती बेहिशेबी रक्कम स्वतःहून जाहीर करणार नाही आणि आयकर विभागाने त्याला पकडले तर अशा व्यक्तींना ७५ टक्के कर आणि १० टक्के दंड भरावा लागेल.
  • याशिवाय काळा पैसा धारकांना जाहीर केलेल्या रकमेच्या २५ टक्के रक्कम ही गरीब कल्याण योजनेच्या निधीत जमा करावी लागेल.
  • या पैशांचा वापर शिक्षण, आरोग्य, सिंचन, पायाभूत सुविधा, शौचालय अशा विविध कामांसाठी केला जाणार आहे. ४ वर्षांसाठी हे पैसे या योजनेसाठी वापरले जातील.
  • १० नोव्हेंबरपासूनच्या नोटाबंदीच्या प्रक्रियेत चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा केवळ बँकेतच जमा करण्याची मुभा आहे. ती येत्या ३० डिसेंबपर्यंत लागू आहे.

हाँगकाँग सुपर सिरीजमध्ये समीर वर्माला रौप्यपदक

  • हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूपाठोपाठ समीर वर्मालाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 
  • पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत यजमान हाँगकाँगच्या एनजी का लाँग अँगसने समीरवर २१-१४, १०-२१, २१-११ अशी मात केली.
  • उपांत्य फेरीत समीरने डेन्मार्कच्या यान ऑर्गेनसेनला पराभवाचा धक्का दिला होता.
  • १९८२मध्ये प्रकाश पदुकोण यांनी ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एकाही भारतीयाला या स्पर्धेतील पुरुष एकेरीचे जेतेपद पटकाविता आले नाही.

निको रोसबर्ग विश्वविजेता

  • अबू धाबीमधील अटीतटीच्या शर्यतीनंतर मर्सिडीज संघाच्या निको रोसबर्गने द्वितीय स्थान पटकावत पहिल्यांदाच फॉर्म्युला वन विश्वविजेतेपदावर नाव कोरले.
  • वर्षांतील शेवटच्या या शर्यतीत रोसबर्गचा सहकारी लुइस हॅमिल्टनने बाजी मारली. परंतु सरस गुणांच्या बळावर रोसबर्गने जेतेपदावर नाव कोरले.
  • अबू धाबी शर्यतीपूर्वी गुणतालिकेत रोसबर्ग हॅमिल्टनपेक्षा १२ गुणांनी आघाडीवर होता.
  • विश्वविजेतेपदासाठी त्याला अबू धाबी शर्यतीत अव्वल तीनमध्ये स्थान पटकावणे अनिवार्य होते.
  • निकोचे वडील केके रोसबर्ग यांनी १९८२मध्ये विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.

टाटा स्टीलचा लिबर्टी हाऊस समूहाशी करार

  • टाटा स्टीलने यूकेमधील लिबर्टी हाऊस समूहाशी करार केला. यामुळे युकेमधील स्पेशॅलिटी स्टील्स ही टाटा समूहाची कंपनी विकण्यास चालना मिळणार आहे.
  • या कंपनीचे मूल्य १०० दशलक्ष पौंड इतके आहे. टाटा स्टील व लिबर्टी हाऊस यांच्यात इच्छापत्रावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
  • लिबर्टी हाऊस समूह हा भारतीय वंशाचे व्यावसायिक संजीव गुप्ता यांच्या मालकीचा आहे.
  • स्पेशॅलिटी स्टीलमध्ये १७०० कर्मचारी काम करत आहेत. हा व्यवसाय विकल्यास या कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण होणार आहे.

आयआरसीटीसीच्या अर्जामध्ये तृतीयपंथीय पर्याय समाविष्ट

  • ‘आयआरसीटीसी’तर्फे (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) तिकीट आरक्षणाच्या अर्जामध्ये ‘पुरुष’ आणि ‘स्त्री’ या दोन पर्यायांसह ‘तृतीयपंथीय’ असा पर्यायही समाविष्ट करण्यात आला आहे.
  • दिल्लीस्थित जमशेद अन्सारी या वकीलाने दिल्ली हायकोर्टात याविषयी याचिका दाखल केली होती.
  • या याचिकेवर रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत दाद मागावी, असे म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने ती फेब्रुवारीमध्ये निकाली काढली होती.
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन आरक्षण करण्याच्या आणि आरक्षण रद्द करण्याच्या दोन्ही अर्जांमध्ये हा बदल करण्यात आला आहे.
  • तृतीयपंथी व्यक्तींची काळजी आणि संरक्षण यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल २०१४मध्ये हिजडे, तृतीयपंथी, द्विलिंगी यांना तृतीयलिंगी समजण्यात येऊन त्यांचे हक्क अबाधित राखावे, असा आदेश दिला होता.

नोटबंदीमुळे सीआरआरमध्ये वाढ

  • पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्याने देशातील बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोटा जमा झाल्याने बाजारातील रोखता वाढली होती.
  • त्यामुळे सर्व बँकांनी जमा रकमेपैकी सर्व रक्कम रिझर्व्ह बँकेत ‘कॅश रिझर्व्ह रेशो’ (सीआरआर) म्हणून जमा करण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे.
  • नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांमध्ये जमा होणाऱ्या अतिरिक्त रकमेचा सांभाळ करणे अवघड होत आहे.
  • बाजारातील वाढत्या रोखतेवर नियंत्रण मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर ‘सीआरआर’चा दर १०० टक्के करण्यात आला. 
  • बँकांमध्ये जमा होणाऱ्या रकमेचा जो हिस्सा रिझर्व्ह बँकेकडे जमा होतो, त्याला ‘सीआरआर’ असे संबोधले जाते. त्यावर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा