चालू घडामोडी : २ डिसेंबर

कुस्तीचे द्रोणाचार्य भालचंद्र भागवत यांचे निधन

  • कुस्ती खेळातील पहिले द्रोणाचार्य भालचंद्र भागवत यांचे १ डिसेंबर रोजी अमेरिका येथे निधन झाले.
  • पुण्यात जन्मलेल्या भालचंद्र यांचे शिक्षणही पुण्यातच झाले. घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाल्यामुळे त्यांनी या खेळात झटपट प्रावीण्य मिळविले होते.
  • शालेयस्तरापासून त्यांनी कुस्तीची मैदाने गाजवायला सुरवात केली होती. १९४८ ते १९५५ या कालावधीत शालेय आणि आंतरविद्यापीठ स्पर्धेत त्यांची जणू मक्तेदारीच होती.
  • पुढे १९५२मध्ये त्यांची हेलसिंकी ऑलिंपिकसाठी भारतीय संघात निवड झाली; पण त्यांना सहभागी होता आले नाही. त्यांची जागा तेव्हा खाशाबा जाधव यांनी घेतली होती. 
  • खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक आणि पंच या दोन्ही आघाड्यांवर आपली ठसठशीत मोहोर उमटवली होती.
  • त्यानंतर १९६२ ते १९९१ ते पतियाळात राष्ट्रीय क्रीडा संस्थेत कुस्तीचे मुख्य प्रशिक्षक होते.
  • याच कालावधीत त्यांनी टोकियो, मेक्सिको, म्युनिक आणि दिल्ली येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पंच म्हणूनही काम पाहिले. 
  • इराणचे अमीर हमेदी यांना ते गुरुस्थानी मानत होते. त्यांनीच सर्वप्रथम त्यांना ‘भाल’ म्हणून हाक मारली आणि पुढे कुस्ती विश्वात ते भाल भागवत म्हणूनच परिचित झाले.
  • राष्ट्रीय क्रीडा संस्थेत १२ वर्षे मुख्य कुस्ती प्रशिक्षक म्हणून काम करताना त्यांनी घडवलेल्या मल्लांनी सुवर्ण, रौप्य आणि ब्रॉंझ अशी एकूण १६० पदके मिळविली.
  • भारत सरकारने १९८५मध्ये क्रीडा मार्गदर्शकाला ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार देण्यास सुरवात केली. या पहिल्याच पुरस्काराचे भागवत मानकरी ठरले होते.

सीबीआयच्या प्रभारी संचालकपदी राकेश अस्थाना

  • केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) विद्यमान संचालक अनिल सिन्हा हे २ डिसेंबर रोजी निवृत्त होत असून त्यांच्या जागी राकेश अस्थाना यांची प्रभारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • १९८४च्या गुजरात तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले राकेश अस्थाना हे सध्या सीबीआयचे अतिरिक्त संचालक आहेत.
  • तसेच विविध महत्त्वाच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचेही (एसआयटी) ते प्रमुख आहेत.
  • सध्याच्या प्रतिनियुक्तीच्या आधी १० वर्षे (१९९२ ते २००२) त्यांनी सीबीआयमध्ये पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक रँकचे काम केले आहे.
  • त्यांनी चौकशी केलेल्या चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना शिक्षाही झाली होती.
  • नवीन संचालक नियुक्त होईपर्यंत राकेश अस्थाना हे प्रभारी संचालक म्हणून सीबीआयचे नेतृत्व करतील.

मॅग्नस कार्लसनची विश्वविजेतेपदाची हॅट्ट्रिक

  • नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने बुद्धिबळ विश्वातील आपले वर्चस्व अबाधित राखताना विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पध्रेत सलग तिसऱ्यांदा जेतेपद मिळविले.
  • रशियाचा सर्जी कर्जाकिनविरुद्धच्या १२ डावांत ६-६ अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये कार्लसनने ९-७ असा विजय मिळवला.
  • सहा तासांच्या या टायब्रेकर फेरीत ४ डावांमध्ये प्रत्येक खेळाडूला २५ मिनिटांत आपला खेळ पूर्ण करायचा होता. त्यामुळे दोघांकडूनही काही चुका झाल्या.
  • तरीही ब्लिट्झ प्रकारात हातखंडा असलेला आणि २०१०पासून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला कार्लसनच जेतेपदाचा दावेदार ठरला.
  • कार्लसनने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघातर्फे आयोजित या स्पर्धेत २०१३ आणि २०१४साली भारताच्या विश्वनाथन आनंदला नमवून जेतेपद पटकावले होते.

२०१६मध्ये सर्वाधिक शोध घेतलेला शब्द झेनोफोबिआ

  • ‘डिक्शनरी डॉटकॉम’ या ऑनलाइन शब्दकोशावर २०१६साली सर्वाधिक शोध घेतला गेलेला शब्द म्हणून ‘झेनोफोबिआ’ या इंग्रजी शब्दाची निवड झाली आहे.
  • ग्रीक भाषेतील ‘झिऑन्स’ म्हणजे अनोळखी किंवा पाहुणा आणि ‘फोबॉस’ म्हणजे भीती अशा दोन शब्दांचा मिलाफ होऊन इंग्रजीतील ‘झेनोफोबिआ’ हा शब्द तयार झाला आहे.
  • याचा अर्थ परदेशी नागरिकांबद्दल किंवा त्यांच्या संस्कृतीबद्दल वाटणारी भीती, तिरस्कार किंवा पूर्वग्रह असा होतो.
  • यंदाच्या वर्षांत या शब्दाशी निगडित अनेक घटना घडना घडल्या. ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडणे (ब्रेग्झिट), अमेरिकेतील पोलिसांकडून कृष्णवर्णीयांचे दमन, संघर्षग्रस्त सीरियातून युरोपमध्ये येणारे निर्वासितांचे लोंढे, आणि अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अशा सर्व घटनांतून परदेशी किंवा वेगळ्या संस्कृतीच्या व्यक्तींबद्दल भीती किंवा तिरस्कार व्यक्त केला जात होता.
  • त्याचा परिणाम ‘डिक्शनरी डॉटकॉम’ या ऑनलाइन शब्दकोशावर शोधल्या जाणाऱ्या शब्दांवरही दिसून आला.
  • अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील ओकलॅण्ड येथून गेल्या २१ वर्षांपासून ‘डिक्शनरी डॉटकॉम’ हे संकेतस्थळ चालवले जात आहे. २०१०पासून त्यांनी वर्षांतील सर्वात लोकप्रिय शब्द निवडण्यास सुरुवात केली.
  • ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या संपादकांनी यंदा ‘पोस्ट-ट्रथ’ या शब्दाची निवड केली. हा शब्द बहुधा राजकारणाच्या बाबतीत वापरला जातो आणि सत्याचे महत्त्व ओसरल्याच्या काळातील असा त्याचा ढोबळ अर्थ आहे.

1 टिप्पणी: