चालू घडामोडी : ३० जून

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मंजूर

 • सातव्या वेतन आयोगाच्या बहुतांश शिफारशी स्वीकारून देशातील सुमारे एक कोटी केंद्र सरकारी कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांवर केंद्र सरकारने वेतनवर्षांव केला आहे.
 • यामुळे सुमारे २३.५ टक्के वेतनवाढ झाली असून सुमारे ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ५८ लाख निवृत्तिवेतनधारकांना १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे.
 • या वेतनवाढीचा तिजोरीवर १.०२ लाख कोटींचा म्हणजे देशांतर्गत एकूण उत्पन्नाच्या ०.७ टक्के इतका भार पडणार आहे. या वेतन आयोगासाठी सुमारे ७० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 • वेतन आयोगाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात १४.२७ टक्के वाढ सुचवली होती.
 • सहाव्या वेतन आयोगाने २० टक्के वाढ सुचवली होती. पण सरकारने ती २००८ मध्ये अंमलबजावणी करताना दुप्पट केली होती.
 • आता सातव्या आयोगाच्या वेतनवाढीत सर्व भत्ते मिळून २३.५५ टक्के वाढ होत आहे. ७० वर्षांत प्रथमच सर्वात कमी वेतनवाढ कर्मचाऱ्यांना मिळाली आहे, असे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
 भत्त्यांसाठी स्वतंत्र समिती 
 • केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या १९४ भत्ते लागू आहेत. त्यात सुसूत्रता आणण्यासाठी ५१ भत्ते पूर्णपणे रद्द करण्याची व आणखी ३७ प्रकारचे भत्ते इतर भत्त्यांमध्ये मिळविण्याची शिफारस आयोगाने केली होती.
 • याचे दूरगामी परिणाम होतील हे लक्षात घेऊन आयोगाच्या शिफारशी तूर्तास लागू न करता त्यावर अधिक सखोल विचार करण्यासाठी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. समिती चार महिन्यांत अहवाल देईल.
 • समितीच्या शिफारशींवर अंतिम निर्णय होईपर्यंत कर्मचाऱ्यांना लागू असलेले भत्ते सध्याप्रमाणेच मिळत राहतील. याखेरीज आणखीही दोन समित्या स्थापन करण्याचे मंत्रिमंडळाने ठरविले आहे.
 वेतन आयोग 
 • सरकार दर दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी वेतन आयोगाची स्थापना करते.
 • वेतन आयोग विद्यमान वेतनात दुरुस्ती करून शिफारस अहवाल केंद्राला सादर करते.
 • थोडय़ाफार फरकाने केंद्राकडून हा अहवाल स्वीकारला जातो व त्याचीच पुनरावृत्ती राज्य सरकारेही करतात.
 • पहिला वेतन आयोग १९४६ साली श्रीनिवास वरदचारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झाला.
 • या आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार १० रुपयांवरून ५५ रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. ती ४५० टक्क्यांची वाढ होती.
 • दुसरा वेतन आयोग न्या. जगन्नाथदास यांच्या अध्यक्षतेखाली १९५७ साली नेमला गेला. या आयोगाच्या शिफारशींमुळे कर्मचाऱ्यांना ५० टक्के वेतनवाढीचा लाभ झाला.
 • १९७० साली न्या. रघुवीर दयाळ यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त तिसऱ्या वेतन आयोगाने १९७३ साली सादर केलेल्या अहवालानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना २५० टक्के वेतनवाढ मिळाली.
 • १९८३ साली पी.एन. सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त चौथ्या वेतन आयोगाने ४ वर्षांत ३ टप्प्यांत आपला अहवाल सादर केला. त्यातील शिफारशींनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना तब्बल ४०० टक्के वेतनवाढीचा लाभ झाला.
 • १९९४ साली नियुक्त पाचव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष न्या. एस. रत्नावेल पांडियन यांनी १९९७ साली सादर केलेल्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांना ३५० टक्के वेतनवाढ मिळाली.
 • मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या काळात नियुक्त न्या. बी.एन. श्रीकृष्ण यांच्या सहाव्या आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी ४० टक्के वाढ झाली.
 • अशोक कुमार माथुर यांच्या अध्यक्षतेखालील सातव्या वेतन आयोगाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आपला अहवाल सादर करताना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात १४.२७ टक्के वाढ देण्याची शिफारस केली होती.

टोर्पेडो पाणतीर भारतीय नौदलाकडे सुपूर्त

 • संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अधिकृतपणे ‘वरुणास्त्र’ पाणतीर (टोर्पेडो) भारतीय नौदलाकडे सुपूर्त केले.
 • जड वजनाच्या पाणबुडीविरोधी पाणतीर नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्या उपस्थितीत डीआरडीओ येथे झालेल्या कार्यक्रमात नौदलाकडे सोपविण्यात आले.
 • नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेने (एनएसटीएल) हे पाणतीर विकसित केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वरुणास्त्राची रचना करण्यात आली आहे.
 • भारत डायनामिक्स लिमिटेडने वरुणास्त्राची निर्मिती केली आहे. हे वरुणास्त्र पाणबुडीबरोबरच मोठी जहाजेही उद्ध्वस्त करू शकते.
 • वरुणास्त्राच्या निर्मितीत डीआरडीओला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसन टेक्नॉलॉजीनेही मदत केली आहे.
 • अलीकडेच बंगालच्या खाडीत वरुणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण झाले. प्रक्षेपणादरम्यान वरुणास्त्र समुद्रात शेकडो किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्यात यशस्वी ठरले.
 • लढाऊ विमानानंतर स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीच्या दिशेने देशाची ही एक मोठी कामगिरी आहे. वरुणास्त्र दिल्ली श्रेणी, कोलकाता श्रेणी, कमोर्ता श्रेणी यांसारख्या मोठ्या जहाजांमध्ये बसविले जाईल. 
 वरुणास्त्राची क्षमता 
 • वरुणास्त्र पाणतीर समुद्राच्या आत पाण्यामध्ये ४० समुद्री मैल प्रतितास वेगाने शत्रूच्या पाणबुडीवर तसेच मोठ्या जहाजांवर हल्ला करून ते उद्‌ध्वस्त करू शकते.

चालू घडामोडी : २८ व २९ जून

एमटीसीआरमध्ये भारताचा प्रवेश

 • क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटात (मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम : एमटीसीआर) सदस्य म्हणून ३० जून रोजी भारताचा समावेश झाला आहे.
 • या गटात समावेश झाल्याचा फायदा अण्वस्त्र प्रसाराचे जागतिक नियम सुधारण्यासाठी होणार आहे. जागतिक स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात भारताचा प्रथमच समावेश झाला आहे.
 • परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी समावेशाच्या कागदपत्रांवर सही केली. भारताचा समावेश झाल्याने या गटातील देशांची संख्या ३५ झाली आहे.
 • चीनच्या अडवणुकीच्या धोरणामुळे भारताचा ‘एनएसजी’ गटात प्रवेश मिळविण्यास अपयश आले होते.
 • भारताचा अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यापासूनच भारत एनएसजी, एमटीसीआर, द ऑस्ट्रेलिया ग्रुप आणि वासेनार ऍरेंजमेंट या गटांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत होता. 
 मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम 
  MTCR
 • एमटीसीआरची १९८७ स्थापना झाली होती. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या सात देशांनी मिळून या गटाची स्थापना केली होती.
 • क्षेपणास्त्रे, रॉकेट यंत्रणा, मानवरहित विमाने आणि या संबंधित तंत्रज्ञानाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणे, हा या गटाचा मुख्य उद्देश आहे.
 • या गटाच्या नियमानुसार, तीन हजार किलोमीटरपर्यंत पाचशे किलो वजनाचे क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या तंत्रज्ञानावर बंधने आहेत. तसेच, सर्वसंहारक शस्त्रांच्या व्यापारावरही नियंत्रण ठेवले जाते.
 • ‘एमटीसीआर’मध्ये प्रवेश मिळाल्याने भारताला अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकत घेता येणार आहे. तसेच, ‘प्रीडेटर’सारखे मानवरहित अत्याधुनिक ड्रोन विमानेही घेता येणार आहेत.
 • तसेच रशियाच्याबरोबरीने विकसित केलेल्या ब्राम्होस क्षेपणास्त्राची निर्यात करण्याची सूटही मिळणार आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 
 • चीनने २००४ मध्ये एमटीसीआरचे सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. पण उत्तर कोरियाला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान दिल्याच्या आरोपावरून चीनचा अर्ज त्यावेळी नामंजूर करण्यात आला होता.

आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एन.एस. विश्वनाथन

 • केंद्रीय निवड समितीकडून रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एन.एस. विश्वनाथन यांची नियुक्ती करण्यात आली. एन.एस. विश्वनाथन हे रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते.
 • आयएफसीआय लिमिटेडच्या दक्षता विभागाचे मुख्य व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणारे विश्वनाथन पंजाब नॅशनल बँक, देना बँकेतही वरिष्ठ पदावर होते.
 • ३ जुलै रोजी डेप्युटी गव्हर्नरपदावर असणाऱ्या एच.आर.खान यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे विश्वनाथन यांची या पदावर नियुक्ती झाली आहे.
 • एच. आर. खान यांनी डेप्युटी गव्हर्नरपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधा व वित्तीय बाजार, परदेशी गुंतवणूक व व्यवहार, पेमेंट आणि सेटलमेंट, माहिती-तंत्रज्ञान, परकीय चलन आणि अंतर्गत ऋण व्यवस्थापन या विभागांची जबाबदारी सांभाळली होती.
 • रिझर्व्ह बँकेचे एकुण चार डेप्युटी गव्हर्नर्स असतात. यापैकी दोघांची निवड अंतर्गत पद्धतीने होते (एच. आर. खान आणि आर. गांधी), तर उर्वरित दोघांपैकी एक व्यावसायिक बँकर (बँक ऑफ बडोदाचे माजी अध्यक्ष एस.एस. मुंद्रा) आणि पतधोरण समितीचा मुख्य अर्थतज्ज्ञ (उर्जित पटेल) असतो. 

दुकाने, मॉल्स, थिएटर २४ तास खुली

 • दुकाने, मॉल्स, थिएटर २४ तास व ३६५ दिवस खुली ठेवण्यास मान्यता देणारा शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट केंद्रीय मंत्रिमंडळाने ३० जून रोजी मंजूर केला.
 • हा कायदा मंजूर केल्यामुळे सिनेमा थिएटर, स्टोअर्स, रेस्तराँ, बँका, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दुकाने (जी फॅक्टरी अॅक्ट अंतर्गत येत नाहीत ती) आणि कामाची आस्थापने वर्षभर चोवीस तास खुली राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
 • कामगार मंत्रालयाच्या शिफारशीवरून हा कायदा मंजूर करण्यात आला असून, आपापल्या गरजेप्रमाणे त्यातील तरतुदी बदलण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे.
 कायद्यातील तरतुदी 
 • कायद्यांतर्गत होणार यांचा समावेश : सार्वजनिक ठिकाणी असणारी मनोरंजनाची केंद्रे, शॉपिंग मॉल, रेस्तराँ, स्थानिक बाजारपेठा, फॅक्टरी अॅक्ट १९४८ अंतर्गत न येणारी आस्थापने.
 • या शिवाय दहा किंवा अधिक कर्मचारी कार्यरत असणारी आस्थापने. 
 • कायदा लागू न होणारी ठिकाणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इन्शुरन्स कंपन्या.
 • महिला कमर्चाऱ्यांनाही रात्रपाळीत काम करण्यास परवानगी.
 • कामाच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुरक्षा, पिण्याचे पाणी, कॅंटीन, प्राथमिक उपचार सुविधा, स्वच्छतागृहे अशा प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक.
 • आयटी तसेच बायोटेक्नोलॉजीसारख्या कुशल कर्मचाऱ्यांसाठी प्रतिदिन ९ तास व आठवड्याचे ४८ तासच कामाची वेळ बंधनकारक करण्याचा नियमही याद्वारे शिथिल होणार.
 • या कायद्यामुळे ईझ ऑफ डुइंग बिझनेसला चालना मिळणार तसेच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे. 

आयएमसीच्या अध्यक्षपदी दीपक प्रेमनारायण

 • इंडियन र्मचट्स चेंबरचे (आयएमसी) नवे अध्यक्ष म्हणून दीपक प्रेमनारायण यांची निवड करण्यात आली आहे. चेंबरच्या १०८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रेमनारायण अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
 • २०१६-१७ या आर्थिक वर्षांसाठी त्यांची निवड झाली आहे. मालमत्ता व्यवस्थापन, स्थावर मालमत्ता, आदरातिथ्य, वित्तीय सेवा आदी क्षेत्रांतील आयसीएस ग्रुपचे प्रेमनारायण हे संस्थापक आणि कार्यकारी संचालक आहेत.
 • फर्स्टरँड बँक, ट्रिंगल रीअल इस्टेट इंडिया फंडवर ते संचालक म्हणून आहेत. चेंबरचे उपाध्यक्ष या नात्याने ते या आधी कार्यरत होते. 

चीनचे पहिले जेट विमान

 • चीनमध्ये बनविण्यात आलेल्या पहिल्या जेट विमानाने चेंगडू ते शांघाय असे व्यावसायिक उड्डाण यशस्वीपणे पूर्ण केले.
 • ७० प्रवाशांसह उड्डाण केलेले ‘एआरजे२१-७००’ हे जेट विमान आता व्यावसायिक विमान कंपन्यांना टक्कर देण्यास सज्ज झाले आहे.  चीनमध्ये सध्या सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पक्षाने चीनमध्ये सुरू केलेल्या बदलातील हे एक पाऊल आहे.
 • आत्तापर्यंत परदेशी बनावटीच्या विमानांवर अवलंबून असलेल्या चीनच्या मार्केटसाठी ही विमाने आशेचा किरण ठरत आहेत.
 • ‘कमर्शिअल एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ऑफ चीन’या सरकारी मालकीच्या निर्मिती क्षेत्रातील कंपनीमार्फत ही विमाने बनविण्यात आली आहेत.
 • आता यापुढे जाऊन ‘सी९१९’ या कंपनीमार्फत बोइंग आणि एअरबससारखी मोठी विमाने बनविण्याचा चीनचा मानस आहे. 
 • २१व्या शतकातील ‘एशियन रिजनल जेट’ म्हणून या विमानाचे नाव ‘एआरजे २१-७००’ असे ठेवण्यात आले आहे.

चालू घडामोडी : २७ जून

कोपा अमेरिका स्पर्धेत चिली विजयी

 • कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या चिलीने अर्जेंटिनाचा पराभव करून विजेतेपद मिळविले.
 • निर्धारित वेळेत आणि जादावेळेतही सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आउटवर ठरला. यात चिलीने ४-२ अशी बाजी मारून सलग दुसऱ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
 • चिलीचा कर्णधार ब्राव्हो याने गोलकीपर म्हणून अतिशय सुरेख कामगिरी करत संघाचा विजय साकारला. त्यालाच सामनावीर घोषित करण्यात आले. 
 • अर्जेंटिनाला २०१५च्या कोपा अमेरिका स्पर्धेतही चिलीने अंतिम सामन्यात पराभूत केले होते. त्या वेळी चिली स्पर्धेचे यजमान होते.
 • तो सामनाही निर्धारीत आणि जादा वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आउटवर ठरला. त्यात चिलीने अर्जेंटिनाला ४-१ अशी मात देऊन विजेतेपद पटकावले होते.
 कोपा अमेरिका स्पर्धेबद्दल 
 • कोपा अमेरिका ही कॉन्मेबॉल ह्या दक्षिण अमेरिकेमधील फुटबॉल मंडळाद्वारे आयोजित केली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे.
 • कोपा अमेरिकाच्या विजेत्याला फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत आपोआप आमंत्रण मिळते. इ.स. १९१६ साली पहिली कोपा अमेरिका स्पर्धा भरवली गेली.
 • २०१६ची कोपा अमेरिका सेन्तेनारियो कोपा अमेरिका स्पर्धेची ४५वी आवृत्ती अमेरिका देशामध्ये खेळवली गेली.
 • कॉन्मेबॉल ह्या फुटबॉल संघटनेला व कोपा अमेरिका स्पर्धेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्पर्धेची ही विशेष आवृत्ती प्रथमच दक्षिण अमेरिका खंडाच्या बाहेर आयोजीत करण्यात आली.
 • ह्या स्पर्धेत कॉन्मेबॉलमधील १० तर कॉन्ककॅफमधील ६ असे एकूण १६ राष्ट्रीय संघ सहभाग घेत आहेत.

मेसीची निवृत्ती

 • अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेसीला पेनल्टी शूटआउटमध्ये गोल करण्यात आलेल्या अपयशाने निराश झालेल्या मेसीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. 
 • अर्जेंटिनाने १४ वेळा कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मात्र, १९९३नंतर त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे.
 • अर्जेंटिनाला २०१४च्या विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात जर्मनीविरुद्ध; तर गेल्या वर्षी याच स्पर्धेत सॅंटीयागोमध्ये चिलीविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते.3 
 • या अपयशामुळे अर्जेंटिनाला सलग तिसऱ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत अपयशाला सामोरे जावे लागले आहे. 
 लिओनेल मेसीची कारकीर्द 
 • राष्ट्रीयत्व: अर्जेंटिना
 • जन्म: २४ जून १९८७ (वय २९)
 • जन्म ठिकाण : रोसारिओ, अर्जेंटिना
 • क्लब : बार्सिलोना
 • आंतरराष्ट्रीय सामने : ११३
 • आंतरराष्ट्रीय गोल : ५५
 • आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण : १७ ऑगस्ट २००५ वि. हंगेरी
 • वर्ल्डकप : १४ सामने ५ गोल
 • बॅलड डीओर पुरस्कार : ५ (२००९, २०१०, २०११, २०१२, २०१५)
 • वर्ल्डकप गोल्डन बॉल : २००९, २०११
 • ऑलिम्पिक प्लेअर ऑफ टुर्नामेंट : २००८
 इतर महत्वाचे 
 • मेसीने १७ ऑगस्ट २००५ रोजी म्हणजे वयाच्या १८व्या वर्षी अर्जेंटिनाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले.
 • मेसीने १ मार्च २००६मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय गोल केला. क्रोएशियाविरुद्ध त्याने हा गोल केला.
 • २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अर्जेंटिनाने सुवर्णपदक मिळवले. त्या संघात मेसीचा समावेश होता.
 • २०१३मध्ये मेसीने अर्जेंटिनाकडून खेळताना पहिली हॅटट्रिक नोंदवली. स्वित्झर्लंडविरुद्धच्या मैत्रीपूर्ण लढतीत त्याने ही कामगिरी केली.
 • याच वर्षी मेसीने गुआटेमालाविरुद्ध हॅटट्रिक नोंदवून दिएगो मॅराडोनाला (आंतरराष्ट्रीय गोलमध्ये) मागे टाकले.
 • २०१४च्या वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाने अंतिम फेरीत धडक मारली. पण अर्जेंटिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
 • २०१६च्या कोपा अमेरिका स्पर्धेत पनामाविरुद्ध मेसीने १९ मिनिटांत हॅटट्रिक नोंदवली.
 • मेसी हा अर्जेंटिनाकडून सर्वाधिक सामने (११३) आणि सर्वाधिक गोल करणारा (५५) खेळाडू आहे.
 • मेसी हा आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीत सर्वाधिक गोल करणारा (२७) अर्जेंटिनाचा खेळाडू आहे.
 • मेसीने २०१२मध्ये बारा आतरराष्ट्रीय गोल केले आणि एका कँलेंडर वर्षात सर्वाधिक गोल करणाऱ्या अर्जेंटिनाच्याच गॅब्रिएल बटिस्टुटाशी बरोबरी केली.
 • तसेच २०१२मध्येच एकूण ९१ गोल केल्याने त्याची नोंद गिनिजबुकमध्ये झाली.
 • मेस्सीने आजपर्यंतच्या कारकिर्दीत ५००पेक्षा जास्त गोल केले आहेत.
 • फिफाच्या जागतिक संघात मेस्सीला आजवर ९ वेळा स्थान मिळाले आहे.
 • जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूच्या पुरस्काराच्या नामांकनामध्ये पहिल्या तिघांच्या यादीत मेस्सी आजपर्यंत सर्वाधिक म्हणजे नऊवेळा समावेश राहिला आहे.

भारताचे आणखी चार खेळाडू रिओसाठी पात्र


 मोहंमद अनास 
 • भारताचा धावपटू मोहंमद अनास याने पोलिश अॅथलेटिक्स चँपियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत ऑलिंपिकसाठीची पात्रता प्राप्त केली.
 • अनास याने रिओ ऑलिंपिकसाठी आवश्यक असणारी ४५.४० सेकंदांची वेळ गाठत पात्र ठरला. या प्रकारात पात्र ठरणारा अनास हा एकविसावा भारतीय धावपटू ठरला आहे.
 सरबानी नंदा 
 • ओडिशाची धावपटू सरबानी नंदाने अल्मटी (कझाकस्तान) येथे झालेल्या महिलांच्या २०० मीटर प्रकारात २३.०७ सेकंद अशी वेळ नोंदवली.
 • रिओसाठी महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पात्र ठरण्याचा निकष २३.३० सेकंद असा होता. तो तिने पूर्ण करून ऑलिम्पिकमधील प्रवेशाचे स्वप्न साकार केले.
 • या वर्षी तिने दक्षिण आशियाई स्पर्धेत महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक, तर महिलांच्या १०० मीटर शर्यतीत रौप्यपदक मिळवले होते.
 अंकित शर्मा 
 • पुरुषांच्या लांब उडीत अंकित शर्माने ८.१९ मीटर अशी कामगिरी नोंदवली. याच बरोबर त्याने नवा राष्ट्रीय विक्रमही नोंदविला. यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम ८.०९ मीटर असा होता.
 • रिओसाठी पुरुषांच्या लांब उडीसाठी पात्र ठरण्याचा निकष ८.१५ मीटर होता.
 • हरियाणाच्या अंकितने या वर्षी झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक, तर गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.
 अतनू दास 
 • भारतीय तिरंदाजी संघटनेने अतनू दासची रिओ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या रिकर्व्हसाठी निवड केली आहे.
 • अतनू प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत पुरुष गटात अतनू हा एकमेव भारतीय तिरंदाज आहे.

बिल कुनिंगहम यांचे निधन

 • प्रसिद्ध फॅशन छायाचित्रकार बिल कुनिंगहम यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
 • कुनिंगहम यांनी ४० वर्षे न्यूयॉर्क टाइम्समध्ये फॅशन छायाचित्रकार म्हणून काम केले होते. कुनिंगहम हे न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उदयोन्मुख छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध होते.
 • त्यांच्या निधनाबद्दल न्यूयॉर्क टाइम्सने त्यांना समर्पित छायाचित्रकार आणि सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ होते, अशा शब्दांत आदरांजली वाहिली.
 • पिशव्यांवरील फुलांच्या नक्षीसाठीही प्रसिद्ध होते. मात्र, अनेक लोकांच्या मते ही कोणतीही फॅशन नसून केवळ मूर्खपणा आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

चालू घडामोडी : २६ जून

आयफा पुरस्कार २०१६

 • स्पेनमधील माद्रिद येथे १७व्या आयफा २०१६च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
 • या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण व प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बाजीराव मस्तानी‘ चित्रपटाला सर्वाधिक नऊ पुरस्कार मिळाले.
 • यापाठोपाठ पिकू चित्रपटाला पाच पुरस्कार मिळाले. सलमान खानची भूमिका असलेल्या 'बजरंगी भाईजान'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.
 पुरस्कार विजेते 
 • सर्वोत्कृष्ट चित्रपट - बजरंगी भाईजान
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणवीरसिंग (बाजीराव मस्तानी)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - दीपिका पदुकोण (पिकू)
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी)
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - अनिल कपूर (दिल धडकने दो)
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - प्रियांका चोप्रा (बाजीराव मस्तानी)
 • सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख अभिनेत्री - भूमी पेडणेकर (दम लगा के हैशा)
 • सर्वोत्कृष्ट पटकथा : जूही चतुर्वेदी (पिकू)
 • स्पेशल अवॉर्ड फॉर वुमन ऑफ द ईअर : प्रियांका चोप्रा
 • सर्वोत्कृष्ट डेब्यू कपल अवॉर्ड : सूरज पंचोली आणि आथिया शेट्टी
 • बेस्ट परफार्मेंस इन ए नेगेटीव्ह रोल : दर्शन कुमार
 • बेस्ट परफॉर्मेंस इन कॉमिक रोल : दीपक डोब्रियाल (तनु वेड्स मनु रिर्टन्स) 
 • सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) : विकी कौशल (मसान)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मोनाली ठाकुर (मोह-मोह के धागे : दम लगा के हईश्शा)
 • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : पपोन (मोह-मोह के धागे : दम लगा के हईश्शा)
 • सर्वोत्कृष्ट लिरिक्स : वरुण ग्रोवर (दम लगा के हईश्शा)

हॉवित्झर तोफा खरेदीस मंजुरी

 • सुमारे ७५० दशलक्ष डॉलर खर्च करून भारतीय लष्करासाठी हलक्या वजनाच्या १४५ हॉवित्झर तोफा अमेरिकेकडून घेण्याच्या प्रस्तावाला सरंक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
 • तसेच देशी बोफोर्स म्हणून विकसित करण्यात आलेल्या धनुष तोफांचे देशातच मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या प्रस्तावांनादेखील संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली.
 • मनोहर पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘डिफेन्स अ‍ॅक्विझिशन कौन्सिल’च्या (डीएसी) बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
 • या बैठकीत सुमारे २८ हजार कोटी रुपयांच्या नव्या संरक्षणसामग्री खरेदीच्या प्रस्तावांवरही चर्चा झाली.
 • अमेरिकेकडून घेतल्या जाणाऱ्या हॉवित्झर तोफांची २५ किमी अंतरावर मारा करण्याची क्षमता असून, चीन सीमेवर अरुणाचल प्रदेश आणि तिबेटमधील डोंगराळ भागात त्या तैनात करण्याची योजना आहे.
 धनुष तोफा 
 • १९८०च्या दशकात बोफोर्स तोफा खरेदी करताना विदेशी उत्पादकाने तंत्रज्ञानाचेही हस्तांतरण केले होते.
 • त्याचा उपयोग करून कोलकाता येथील ऑर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाने ३८ किमी पल्ल्याच्या, ओढून नेता येणाऱ्या ‘धनुष’ तोफा विकसित केल्या आहेत.
 • देशी बोफोर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तोफांचे उत्पादन करण्याच्या आघाडीवर समाधानकारक प्रगती होत असल्याचीही ‘डीएसी’ने नोंद घेतली.
 • अशा तीन तोफा प्रत्यक्ष वापरकर्त्याच्या उपयोगासाठी ३० जूनपर्यंत व आणखी ३ सप्टेंबरअखेर उपलब्ध करून दिल्या जातील. त्यानंतर या तोफांचे देशातच मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाईल.

जितु रायला रौप्य

 • पिस्तूल किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या जितू रायने तीनवेळा ऑलिम्पिक पटकावणाऱ्या कोरियन जाँगोह जिनवर मात करत आयएसएसएफ वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले.
 • १० मीटर एअर पिस्तूलच्या फायनल्यमध्ये केलेली १९९.५ गुणांची कमाई त्याला रौप्यपदक मिळवून देणारी ठरली. 
 • तीनवेळा ऑलिम्पिक जिंकणाऱ्या जाँगोहने प्राथमिक फेरीत १७८.८ गुणांची कमाई करत अव्वल क्रमांक पटकावला होता; पण फायनल्समध्ये जितूने मागे टाकल्याने त्याला ब्राँझवर समाधान मानावे लागले.
 • जितूचे हे यंदाच्या मोसमातील दुसरे तर वर्ल्डकपमधील एकूण सहावे पदक ठरले आहे. 
 • रिओ ऑलिम्पिकचा यजमान देश असलेल्या ब्राझीलच्या फेलिप अल्मिदा वूने सुवर्णपदक पटकावले. त्याचे यंदाच्या मोसमातील हे दुसरे सुवर्ण आहे.

द्युती चंदचा रिओप्रवेश

  Dyuti chand
 • भारताची अॅथलिट द्युती चंद ही रिओ ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित झालेली ९९वी खेळाडू ठरली आहे. अलमती, कझाखस्तान येथे पार पडलेल्या १०० मीटरच्या शर्यतीत चमकदार कामगिरी करत द्युतीने ही कामगिरी केली.
 • ऑलिम्पिक प्रवेशासाठी १०० मीटरच्या शर्यतीत ११.३२ सेकंद हा मार्क पार करणे महत्त्वाचे होते. द्युतीने ही शर्यत ११.३० सेकंदात पूर्ण केली.
 • यंदा नवी दिल्लीत एप्रिलमध्ये पार पडलेल्या फेडरेशन कप राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत द्युतीचा रिओ ऑलिम्पिक प्रवेश थोडक्यात हुकला होता. तेव्हा तिने १०० मीटरची शर्यत ११.३३ सेकंदात पूर्ण केली होती.
 • द्युतीव्यतिरिक्त ओपी जैशा आणि ललिता बाबर या भारतीय अॅथलिट्सने ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे.
 • तैवान येथे पार पडलेल्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही द्युतीने सुवर्णपदक पटकावले होते. 
 • १९८०मधील पी.टी उषानंतर प्रथमच भारताची अॅथलिट ऑलिम्पिकमधील १०० मीटरसाठी पात्र ठरली आहे.
 • २०१४मध्ये द्युतीवर बंदी घालण्यात आली होती. तिच्या शरीरातील हॉरमॉन्समध्ये तुलनेत पुरुषांचे हॉरमॉन्स जास्त असल्याने आयएएएफने ही बंदी घातली होती.

टीएनसीए अध्यक्षपदी एन. श्रीनिवासन

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) माजी चेअरमन एन. श्रीनिवासन यांची १५व्यांदा तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या (टीएनसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे. 
 • टीएनसीएच्या ८६व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत श्रीनिवासन यांना अध्यक्षपदी बिनविरोध निवडण्यात आले. 
 • बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन हे २००२-०३ मध्ये पहिल्यांना टीएनसीएचे अध्यक्ष निवडले गेले होते. त्या वेळी त्यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एसी मुथय्या यांना पराभूत केले होते. 
 • २०१३साली आयपीएलमध्ये त्यांचा जावई गुरुनाथ मयप्पनचे नाव स्पॉट फिक्सिंगमध्ये पुढे आल्यामुळे त्यांना सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

ब्रेग्झिट

 • युरोपीय महासंघात कायम राहावे अथवा नाही, यासाठी ब्रिटनमध्ये झालेल्या मतदानात जनतेने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
 • ब्रिटनमधील ५१.९ टक्के नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान केले.
 • ब्रिटनने युरोपीय संघातून (युरोपियन युनियनमधून) बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला ‘ब्रेग्झिट’ असे नाव देण्यात आले आहे. 
 • ब्रिटनच्या स्पेलिंगमधील ‘बी’ आणि ‘आर’ ही अक्षरे आणि ‘एग्झिट’ (बाहेर पडणे) यांना जोडून ‘ब्रेग्झिट’ शब्द तयार केला आहे.
 • अशाच प्रकारे पूर्वी युरोपीय संघातून ग्रीस हा देश बाहेर पडण्याची शक्यता होती तेव्हा ‘ग्रेग्झिट’ असा शब्द वापरण्यात आला होता. 
 युरोपीय संघ काय आहे? 
 • दुसऱ्या महायुद्धातील भीषण संहारानंतर युरोपमध्ये पुन्हा युद्धाचा प्रसंग उद्भवू नये आणि अधिकाधिक देशांमध्ये दृढ व्यापारी संबंध असावे, या विचाराने युरोपीय संघाची स्थापना झाली होती.
 • सुरुवातीला जर्मनी आणि फ्रान्सच्या पुढाकाराने १९५०मध्ये सहा देशांनी कोळसा आणि पोलादाचा वाटा एकत्रित केला. 
 • त्यानंतर ७ वर्षांनी रोम येथे झालेल्या करारानुसार ‘युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी’ची (ईईसी) स्थापना झाली. ब्रिटन त्यामध्ये १९७३साली सामील झाला.
 • या संघटनेचे नाव पुढे युरोपियन युनियन (ईयू) असे बदलले आणि सध्या युरोपातील ब्रिटन धरून २८ देश त्याचे सदस्य आहेत.
 • सदस्य देशांची संयुक्त बाजारपेठ स्थापन करणे, वस्तू सेवा आणि कामगारांची मुक्त वाहतूक करणे असे त्याचे उद्देश होते. 
 • आता त्यात पर्यावरण आणि मानवी हक्कांचे संरक्षण, विभागीय असमतोल दूर करणे, शिक्षण व संशोधन या क्षेत्रातील सहकार्य याची भर पडली आहे.
 • युरोपियन कमिशन, युरोपीयन काऊन्सिल, युरोपियन पार्लमेंट आणि कोर्ट ऑफ जस्टिस या ४ उपसंस्थांच्या माध्यमातून युरोपियन युनियनचे काम चालते. त्याचे मुख्यालय ब्रसेल्स येथे आहे.

 यापूर्वी युरोपीय संघातून कोणता देश बाहेर पडला होता का? 
 • आजवर कोणताही स्वतंत्र देश युरोपीय संघातून बाहेर पडलेला नाही.
 • मात्र डेन्मार्कचा एक स्वायत्त भाग असलेल्या ग्रीनलँड या अटलांटिक महासागरातील मोठय़ा बेटावर १९८२साली या प्रश्नावर सार्वमत घेण्यात आले होते.
 • त्या वेळी ग्रीनलँडच्या जनतेने ५२ टक्के विरुद्ध ४८ टक्के अशा फरकाने युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

 ब्रिटनची युरोपीय संघातून बाहेर पडण्याची कारणे? 
 • ब्रिटन गेली ४३ वर्षे युरोपीय संघात आहे. मात्र त्यातही काही बाबतीत ब्रिटनने आपले वेगळे अस्तित्व राखले होते. ब्रिटनमध्ये युरो या संयुक्त चलनाऐवजी स्टर्लिग पाऊंड हेच चलन प्रचारात होते.
 • शेंगेन करारानुसार युरोपीय संघाच्या सदस्य देशांच्या सीमा बऱ्याच खुल्या करण्यात आल्या होत्या. ब्रिटनचा त्यात सहभाग नव्हता.
 • संघाचे सदस्य एकत्र खर्चासाठी काही निधी गोळा करतात आणि त्यांनाही संघातून विकासकामांसाठी काही निधी परत मिळतो.
 • संघाच्या एकूण निधीत २०१५ साली ब्रिटनचा १२.५७ टक्के म्हणजे ८.५ अब्ज पाऊंड इतका वाटा होता. मात्र त्या प्रमाणात ब्रिटनला मिळणारा परतावा अन्य देशांच्या तुलनेत कमी होता.
 • सध्या युरोपमध्ये गरीब देशांतून श्रीमंत देशांत होत असलेले स्थलांतर आणि त्यातून येणारी अस्वस्थता हेही कळीचे मुद्दे होते.
 • गेल्या काही वर्षांत युरोपीय संघाने ब्रिटनच्या नागरिकांच्या रोजच्या जीवनावर मोठा प्रभाव मिळवला असल्याची आणि ब्रिटनच्या स्वतंत्र अस्तित्वाला बाधा पोहोचत असल्याची भावना घर करू लागली होती.
 • पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या कॉन्झर्वेटिव्ह (हुजूर) पक्षातील काही सदस्य, युनायटेड किंगडम इंडिपेंडन्स पार्टी (यूकेआयपी) आणि अन्य स्तरांतून सार्वमत घेण्याची मागणी होत होती.
 • याच विषयावर ब्रिटनने १९७५ साली एकदा सार्वमत होते आणि त्या वेळी ब्रिटिश जनतेने युरोपीय संघात राहण्याचा निर्णय घेतला होता.
 • त्यानंतर इतक्या वर्षांत ब्रिटिश जनतेला आपल्या आकांक्षा व्यक्त करण्याची संधी मिळालेली नाही असा सूर आता उमटू लागला होता.

 सार्वमत आणि त्याचा निकाल 
 • कॅमेरून यांनी जनतेला वचन दिले होते की जर ते २०१५ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत जिंकून आले तर ते या विषयावर मतदान घेतील.
 • त्यानुसार २३ जून रोजी ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात आले. तत्पूर्वी ब्रिटनने युरोपीय संघात राहावे आणि बाहेर पडावे असे म्हणणे असलेल्या दोन्ही बाजूंना प्रचार करण्याची संधी देण्यात आली.
 • ब्रिटनच्या ७१.८ टक्के मतदारांनी म्हणजे सुमारे ३० दशलक्ष नागरिकांनी मतदान केले. २३ जूनला मतदान संपल्यावर मतमोजणी सुरू होऊन २४ जून रोजी निकाल जाहीर झाला.
 • त्यापैकी ५२ टक्के नागरिकांनी ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडावे या बाजूने कौल दिला. तर ४८ टक्के नागरिकांनी ब्रिटनने युरोपीय संघाचे सदस्यत्व कायम ठेवावे या बाजूने मतदान केले.

 आता ब्रिटनचे आणि युरोपीय संघाचे भवितव्य काय? 
 • ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी आक्टोबपर्यंत पदत्याग करण्याची घोषणा केली आहे.
 • लिस्बन करारातील ५०वे कलम लागू करण्याची जबाबदारी नवे पंतप्रधान पार पाडतील, असे कॅमेरून यांनी सांगितले.
 • त्यानुसार ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू होईल. ती पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांचा किंवा त्याहून अधिक काळ लागेल.
 • त्या काळात ब्रिटनला युरोपीय संघाशी केलेल्या जुन्या करारांशी आणि नियमांशी बांधील राहावे लागेल. मात्र संघाच्या निर्णय प्रक्रियेत भाग घेता येणार नाही.
 • ब्रिटनला युरोपीय संघातील जुन्या सहकाऱ्यांशी (उरलेल्या २७ देशांशी) कशा प्रकारचे व्यापारी संबंध ठेवायचे आहेत त्यासंबंधी कराराची रूपरेषा ठरवली जाईल.
 • सार्वमताचा निकाल ब्रिटिश पार्लमेंटवर बंधनकारक नाही आणि पार्लमेंटचे सदस्य मिळून तो स्वीकारण्यास नकार देऊ शकतात. पण जनतेच्या भावनेविरोधात जाऊन राजकीय पक्ष तशी भूमिका घेण्याची शक्यता नाही.
 • ब्रिटनला पुन्हा संघात सामील व्हायचे असल्यास तसे करता येऊ शकते. पण त्यासाठी सर्व प्रक्रिया नव्याने सुरू कराव्या लागतील आणि सर्व सदस्य अनुकूल असतीलच असे नाही.
 • ब्रिटन सोडून उरलेल्या २७ देशांनिशी युरोपीय संघाचे काम पूर्ववत चालू राहील.
 • ब्रिटनच्या पाठोपाठ अन्य काही देशही बाहेर पडण्याची मागणी करू शकतात. तसेच ब्रिटनमध्येही स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याची मागणी जोर धरू शकते, असा अंदाज आहे.

 ब्रिटनमध्ये फुट 
 • ब्रिटनमधील इंग्लंड, आयर्लंड, स्कॉटलंड व वेल्स या चार प्रांतांमध्ये उभी फूट पडल्याचे या सर्व्माताद्वारे स्पष्ट झाले आहे. 
 • आयरिश व स्कॉटिश नागरिकांनी मोठ्या प्रमाणात 'इयु'मध्ये राहण्याच्या बाजूने कौल दिला, मात्र इंग्लंडची लोकसंख्या बरीच मोठी असल्याने निकाल विरुद्ध गेला.
 • ब्रिटनबरोबर राहायचे की नाही, यावर स्कॉटलंडमध्ये गेल्याच वर्षी सार्वमत घेण्यात आले, तेव्हा निसटत्या बहुमताने स्कॉटलंडने ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
 • स्कॉटिश व आयरिश लोक स्वत:ला ब्रिटिश मानण्यापेक्षा युरोपियन मानणे जास्त पसंत करतात.
 • आता 'इयु'मधून बाहेर पडण्याच्या पार्श्वभूमीवर स्कॉटलंडमध्ये पुन्हा सार्वमत घ्यावे ही मागणीही गेल्या तीन दिवसांत पुढे आली. तशीच भावना आयर्लंडमध्येही आहे.
 • केवळ कायदेशीर व ऐतिहासिक अपरिहार्यता म्हणून इतका काळ ब्रिटनचा भाग बनून राहिलेले हे दोन प्रांत जर खरोखरच दूर झाले, तर उरलेला इंग्लंड देश एकाकी पडेल.

 या घटनेचा ब्रिटन, युरोप आणि भारतावर होणारा परिणाम 
 • या घटनेचे ब्रिटन आणि जगावर नेमके काय परिणाम होतील याबाबत सध्या साशंकता असून ते येत्या काही वर्षांत अधिक स्पष्ट होईल.
 • ब्रिटिश पाऊंडाची किंमत गेल्या ३० वर्षांतील नीचांकी पातळीवर गेली. सध्या जगभरच्या शेअर बाजारांमध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत. ते बरेचसे तात्पुरत्या स्वरूपाचे असतील.
 • ब्रिटनमधील अर्थतज्ञांच्या मते युरोपीय संघातून बाहेर पडल्यामुळे २०३० सालापर्यंत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा आकार ३.८ ते ७.५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
 • सध्या ब्रिटनचे १.२ दशलक्ष नागरिक युरोपीय संघाच्या सदस्य देशांत राहतात. तर अन्य सदस्य देशांचे ३ दशलक्ष नागरिक ब्रिटनमध्ये राहतात.
 • युरोपीय संघाच्या नियमांमुळे सदस्य देशांच्या नागरिकांना सामूहिक पारपत्रावर मुक्तपणे फिरता येत होते. आता याबाबत ब्रिटन आणि अन्य देश काय भूमिका घेतात ते पाहावे लागेल.

चालू घडामोडी : २५ जून

राजकोट : नॅशनल अर्थ अवर कॅपिटल २०१६

 • कार्बनचे उत्सर्जन कमी करण्याबरोबर नवीकरणीय ऊर्जा वापरास दिलेले प्राधान्य यामुळे गुजरातमधील राजकोट शहराला ‘नॅशनल अर्थ अवर कॅपिटल २०१६’ पुरस्कारने गौरविण्यात आले आहे.
 • ‘वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर’च्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ)वतीने आयोजित ‘ग्लोबल अर्थ अवर सिटी चॅंलेज’ (ईएचसीसी) स्पर्धेत २१ देशांतील १२५ शहरांचा सहभाग होता,
 • या वेळी ग्लोबल अर्थ अवर कॅपिटल पुरस्कारासाठी समितीने फ्रान्सची राजधानी पॅरिस या शहराची निवड केली.
 • हवामान बदलाविरोधात लढा देण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्न करणाऱ्या शहरांची निवड ईएचसीसी स्पर्धेतून केली जाते.
 • यंदा राजकोटला हा मान मिळाला असून, विविध देशांतील इतर १७ शहरांनाही नॅशनल अर्थ अवर कॅपिटल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • विकास साधताना कार्बनचे उत्सर्जन कमी करणे, नवीकरणीय ऊर्जा वापरास प्राधान्य देणे यासाठी राजकोटने अवलंबलेली धोरणे उल्लेखनीय असून, त्याची दखल घेत या शहराची निवड करण्यात आली.
 • या स्पर्धेत राजकोटशिवाय भारतातील ११ शहरांनीही सहभाग दर्शविला होता. त्यापैकी पुणे, कोइमतूर या शहरांनी अंतिम फेरीतपर्यंत मजल मारली होती.
 • या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शहरांचे मूल्यमापन करून जगातील एका शहराची ग्लोबल अर्थ अवर कॅपिटलप्रत्येक देशातील एका शहराची नॅशनल अर्थ अवर कॅपिटल या पुरस्कारांसाठी निवड केली जाते.
 • यापूर्वी ठाणे, कोइमतूर तसेच नवी दिल्ली या शहरांना नॅशनल अर्थ अवर कॅपिटल हा सन्मान प्राप्त झाला आहे.

मेहबुबा मुफ्ती विजयी

 • जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग विधानसभा पोटनिवडणुकीत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री व पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी विजय मिळवला आहे.
 • मुफ्ती यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे हिलाल शाह अहमद यांचा ११ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार इफ्तिकार हुसेन मिसगर तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.
 • मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनामुळे अनंतनाग विधानसभेची जागा रिक्त झाली होती. सईद यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रिपदी आलेल्या मेहबुबा यांनी येथून निवडणूक लढविली.

बांगलादेशातील श्रोत्यांसाठी आकाशवाणी मैत्री

 • भारत व बांगलादेशातील श्रोत्यांसाठी ‘आकाशवाणी’ येत्या २८ जूनपासून ‘आकाशवाणी मैत्री’ नावाची नवी वाहिनी सुरू करणार आहे.
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते कोलकत्यात होणाऱ्या समारंभात या बंगाली भाषेतील वाहिनीचे उद्घाटन होणार आहे. 
 • या वाहिनीवर भारत व बांगलादेशातील कला, संस्कृती, साहित्य, संगीत, क्रीडा संबंधित कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत.
 • पश्चिम बंगाल सरकारच्या ‘बांगलादेश बेतार’ या वाहिनीकडे येथील कार्यक्रमांसाठी कंटेंट तयार करण्यात येणार आहे. 
 • या वाहिनीवर संगीत कार्यक्रम तसेच प्रश्नमंजुषा, विविध विषयांवर चर्चा अशांसारखे कार्यक्रम प्रसारित केले जातील. त्यामध्ये भारत व बांगलादेशातील नागरिक एकाचवेळी सहभाग घेऊ शकणार आहेत.
 • पश्चिम बंगाल व बांगलादेशातील शेती तसेच निसर्ग साधारणतः सारखाच आहे, त्यामुळे दोन्ही भागांतील शेतकऱ्यांना या वाहिनीचा लाभ होणार आहे.
 • बांगलादेशातील अनेक लोक भारतात आरोग्य सुविधा घेण्यास येतात, त्यांच्यासाठीही कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. 
 • साधारणपणे दिवसभरात साडेसहा तास या वाहिनीवरून कार्यक्रम प्रसारित केले जातील. त्यानंतर हा कालावधी सोळा तासांपर्यंत वाढविला जाणार आहे.

चालू घडामोडी : २४ जून

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे

 • भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे याची निवड करण्यात आली आहे. कुंबळे यांच्याकडे एका वर्षासाठी मार्गदर्शनाची धुरा असेल.
 • सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या निवड समितीने २१ उमेदवारांमधून अनिल कुंबळे याची निवड केली.
 • टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर झिंबाब्वे दौऱ्यासाठी हंगामी प्रशिक्षक म्हणून संजय बांगर यांची नियुक्ती झाली होती.
 • भारतीय क्रिकेटच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळालेला कुंबळे हा कर्नाटकचा दुसरा प्रशिक्षक आहे. युवा आणि ‘अ’ संघाचे प्रशिक्षक म्हणून माजी कर्णधार राहुल द्रविड यांची यापूर्वीच नियुक्ती झाली आहे.
 अनिल कुंबळे यांची कारकिर्द 
 • लेगस्पिनर असलेल्या कुंबळेने १३२ कसोटी सामन्यांमध्ये ६१९ बळी घेतले असून मुथय्या मुरलीधरन (८०० बळी) व शेन वॉर्न (७०८ बळी) यांच्यानंतर सर्वाधिक विकेटच्या क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानी आहे.
 • त्यासोबतच, नाबाद ११० धावांच्या खेळीसह त्याने कसोटीत २,५०६ धावाही केल्यात.
 • एकदिवसीय सामन्यांमध्ये कुंबळेने २७१ सामन्यांमध्ये ३३७ गडी बाद केले आहेत आणि ९३६ धावा केल्या आहेत.
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९५६ बळी घेणारा कुंबळे हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे.
 • १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटीच्या एका डावात सर्व १० बळी घेण्याचा पराक्रम कुंबळेच्या नावावर आहे.
 पुरस्कार व सन्मान 
 • १९९५मध्ये अर्जुन पुरस्कार
 • १९९६मध्ये विस्डेन पुरस्कार
 • २०१२पासून आयसीसी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
 • २०१५मध्ये ‘हॉल ऑफ फेम’ बहुमान
 क्रिकेट निवृत्तीनंतरची कामगिरी 
 • कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद
 • राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अध्यक्षपद
 • बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचे सदस्य
 • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मार्गदर्शक
 • मुंबई इंडियन्सचे प्रमुख मार्गदर्शक

एलआयसी अध्यक्षांचा राजीनामा

 • सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव आयुर्विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) अध्यक्ष एस. के. रॉय यांनी व्यक्तिगत कारणाने पदाचा राजीनामा दिला.
 • रॉय यांच्या राजीनाम्याला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय नियुक्ती मंडळाने संमती दिली आहे. त्यांच्या नियोजित कार्यकाळाची आणखी दोन वर्षे शिल्लक होती.
 • त्यांच्या जागी नव्या उमेदवाराच्या निवडीची प्रक्रिया येत्या महिन्यात पूर्ण होईल, तोवर रॉय हेच अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहतील.
 • जून २०१३ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कारकीर्दीत रॉय यांची पाच वर्षांसाठी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ते १९८१पासून महामंडळाच्या सेवेत आहेत.
 • एलआयसीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाची त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यांच्या कारकीर्दीत एलआयसीचा ६५ टक्क्यांवर घसरलेला बाजारहिस्सा पुन्हा ७१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
 • अध्यक्षाने मुदतीपूर्वी बाहेर पडण्याचा एलआयसीत परंपराच राहिली आहे. या आधी माजी अध्यक्ष जी. एन. वाजपेयी हे मुदतीपूर्वी राजीनामा देऊन सेबीच्या संचालक मंडळावर गेले होते.
 • रॉय यांच्यापूर्वीचे अध्यक्ष टी. एस. विजयन हेही संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच विमा नियामक प्राधिकरणावर अध्यक्ष म्हणून रुजू झाले.

विकास कृष्णन आणि मनोज कुमार रिओसाठी पात्र

 • विकास कृष्णन आणि मनोज कुमारने (६४ किलो) बाकू (अझरबैझान) येथे एआयबीए जागतिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून रिओ ऑलिम्पिकमधील आपले स्थान निश्चित केले.
 • मनोज कुमारने लाईट वेल्टरवेट (६४ किलो) गटातील उपांत्यपूर्व फेरीत ताजिकिस्तानच्या राखीमॉव शाकवकतद्झॉन याचा ३-० असा पाडाव केला.
 • विकासने मिडलवेट (७५ किलो) गटात कोरियाच्या ली डॉंगयुन याच्याविरुद्ध ३-० असा विजय संपादला.
 • ऑलिंपिकसाठी आता भारताचे एकूण तीन मुष्टियोद्धे पात्र ठरले आहेत. याआधी चीनला झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेद्वारे शिवा थापाने ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे.
 • माजी आशियाई कांस्यपदक विजेता मनोज आणि विकास दोघेही २०१२च्या लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते. मनोजचे उपांत्यपूर्व फेरीत आव्हान संपुष्टात आले होते, तर विकास प्राथमिक फेरीत पराभूत झाला होता.

‘इनमोबी’ कंपनीला दंड

 • ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांच्या ठावठिकाण्याची (लोकेशन्स) माहिती घेतल्याप्रकरणी अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने ‘इनमोबी’ या भारतीय कंपनीला ९ लाख ५० हजार डॉलर्सचा दंड ठोठावला आहे.
 • इनमोबीवर पहिल्यांदा चार दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठाविण्यात आला होता, परंतु कंपनीची आर्थिक परिस्थिती पाहता तो कमी करण्यात आला.
 • याशिवाय कंपनीने जमा केलेली सर्व माहिती नष्ट करावी असा आदेश देण्यात आला.
 • कंपनीने लहान मुलांची माहितीही जमा केली असल्याने त्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून ‘चिल्ड्रन ऑनलाइन प्रायव्हसी प्रोटेक्शन ॲक्ट‘नुसार (कोप्पा) हे आदेश देण्यात आले आहेत.
 काय आहे इनमोबी? 
 • इनमोबी ही मोबाईलद्वारे जाहिरात करणारी भारतीय कंपनी आहे.
 • बंगळूमध्ये कंपनीचे मुख्यालय असून कंपनीत एक हजार पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
 • भारतामध्ये २००७साली स्थापन झालेल्या या कंपनीच्या जगभर १७ शाखा आहेत.

चालू घडामोडी : २३ जून

‘एससीओ’मध्ये भारताचा प्रवेश

 • भारताने शांघाय सहकार्य संघटनेत (एससीओ) २३ जून रोजी पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश केला. भारताबरोबर पाकिस्तानने देखील एससीओमध्ये पूर्ण सदस्यत्व प्राप्त केले आहे.
 • एससीओच्या पूर्ण सदस्यत्वावर शिक्कामोर्तब होण्यासाठी भारताला एक वर्षाच्या कालावधीत ३५ आक्षेप नोंदवावे लागणार आहेत आणि आता भारत संघटनेच्या सर्व बैठकांना उपस्थित राहू शकणार आहे.
 शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) 
 • या संघटनेची स्थापना २००१मध्ये झाली.
 • चीन, कझाकस्तान, किर्गीझस्तान, रशिया, ताजिकीस्तान आणि उझबेकिस्तान हे या संघटनेचे संस्थापक देश होत.
 • या देशांपैकी उझबेकिस्तान वगळता इतर देश १९९६ मध्ये स्थापन झालेल्या ‘शांघाय फाइव्ह’ या गटाचे सदस्य होते.
 • अफगाणिस्तान, बेलारूस, इराण व मंगोलिया हे ‘एससीओ’शी निरीक्षक देश म्हणून संलग्न आहेत.
 • दहशतवाद, फुटीरतावाद आणि टोकाची भूमिका या तीन अपप्रवृत्तींविरोधात लढण्यासाठी आणि उपखंडीय समृद्धीसाठी यंत्रणा निर्माण करण्याकरिता शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) स्थापन झाली.

वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी विशेष पॅकेज

 • केंद्र सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रातील रोजगारनिर्मिती व निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पॅकेजला २३ जून रोजी मंजुरी दिली.
 • वस्त्रोद्योग व परिधान क्षेत्रातील विशेष पॅकेज हे रोजगारनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, यामुळे भारताला निर्यातवृद्धीसाठी चांगली संधी निर्माण होणार आहे.
 • सरकारच्या निर्णयामुळे येत्या तीन वर्षांत एक कोटी रोजगार तयार होतील. या क्षेत्रात ७० टक्के रोजगार महिलांना मिळतो, त्यामुळे एका अर्थाने महिला सक्षमीकरणाला हातभार लागणार आहे.
 पॅकेजची वैशिष्ट्ये 
 • या क्षेत्रातील दरमहा १५००० रुपयांपेक्षा कमी वेतन असलेल्या नव्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजनेंतर्गत पहिल्या तीन वर्षांसाठी केंद्र सरकारतर्फे अंशदान १२ टक्के असेल. 
 • या कर्मचाऱ्यांसाठी ‘ईपीएफ’मधील गुंतवणूक ऐच्छिक असेल. 
 • कर्मचाऱ्यांना आठवड्यातील आठ तास ओव्हरटाइम करता येईल. 
 • रोजगार वाढविण्यासाठी तयार कपडे निर्मितीतील उद्योगांचे अंशदान १५ टक्क्यांवरून २५ टक्के करणार.

स्वीडनमध्ये ‘इलेक्ट्रिक रोड’

 • इंधनावर चालणाऱ्या वाहनांतून निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वीडनमध्ये ‘इलेक्ट्रिक रोड’ तयार केला असून, या रस्त्याची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली. 
 • इलेक्ट्रिक रस्त्यावर धावणाऱ्या एका ट्रकला हायब्रिड इलेक्ट्रिक मोटारीच्या माध्यमातून ऊर्जा पुरविण्याचा प्रयोग यावेळी करण्यात आला.
 • सार्वजनिक रस्त्यावर अवजड वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक ऊर्जेचा वापर करण्याचा प्रयोग करणारा स्वीडन हा जगातील पहिला देश ठरला आहे.
 • स्वीडनमधील ‘ट्रॅफिकव्हर्केट’ नावाच्या वाहतूक प्रशासन विभागाने हा रस्ता तयार केला आहे.
 इलेक्ट्रिक रोड 
 • पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाशिवाय इलेक्ट्रिक ऊर्जा वापरून वाहन चालविण्याची व्यवस्था असलेल्या रस्त्यांना ‘इलेक्ट्रिक रोड’ म्हटले जाते.
 • अशा रस्त्यांवर बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यासाठी संपूर्ण रस्त्यावर ऊर्जा पुरविण्याची (चार्जिंग) व्यवस्था केलेली असते.
 • हा प्रयोग म्हणजे इंधनमुक्त वाहनांच्या दिशेने जाण्याची एक पायरी आहे. इलेक्ट्रिक रोडमध्ये कार्बन उत्सर्जनच होत नसल्याने प्रदूषण थांबविता येते. पर्यावरणपूरक वाहतुकीचा हा एक मार्ग आहे.

‘व्हाइस मीडिया’चा ‘टाइम्स’सोबत सहकार्य करार

 • ‘व्हाइस मीडिया’ कंपनीने विस्ताराच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पाऊल टाकत भारतातील सर्वात मोठी मीडिया कंपनी असलेल्या ‘टाइम्स’ समूहाशी सहकार्य करार केला आहे.
 • ‘टाइम्स’शी झालेल्या भागीदारी करारानुसार, ‘व्हाइस मीडिया’ मुंबईत निर्मिती केंद्र सुरू करणार असून टेलिव्हिजन, मोबाइल, डिजिटल मीडिया क्षेत्रात संयुक्तपणे काम करणार आहे.
 • त्याचबरोबर, ‘व्हाइसलँड’ हे पेड टीव्ही नेटवर्कही सुरू करणार आहे. या करारामुळं ‘व्हाइस’ला मीडियातील विस्तारासाठी टाइम्स ब्रँडची मोठी मदत मिळणार आहे.
 • या कराराअंतर्गत व्हाइस मीडिया देशात ठिकठिकाणी स्टुडिओ उभारणार असून त्याद्वारे दैनंदिन घडामोडींसह लाइफस्टाइलशी संबंधित विविध कार्यक्रम २४ तास प्रसारित करणार आहे.

मेरी कोमचे रिओमध्ये प्रवेश नाही

 • लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती भारताची बॉक्सर मेरी कोमला रिओ ऑलिंपिकमध्ये विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान देण्याची विनंती आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) फेटाळली आहे. 
 • भारतीय ऑलिंपिक असोसिएशन आणि बॉक्सिंग इंडियाच्या अस्थायी समितीने तिला विशेष प्रवेशिकेद्वारे रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्याची विनंती केली होती.
 • मेरी कोमला पात्रता स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला होता. ऑलिम्पिकमध्ये पुन्हा पदक मिळवण्याची क्षमता तिच्याकडे असल्यामुळेच तिच्याकरिता विशेष प्रवेशिका मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते.

अंजू जॉर्जचा केरळ क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

 • केरळचे क्रीडा मंत्री ई. पी. जयराजन यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्यामुळे भारताची आघाडीची धावपटू अंजू बॉबी जॉर्जने केरळ क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
 • अंजूने राजीनामा दिल्यानंतर या परिषदेत असलेल्या अन्य १३ सदस्यांनीही पदे सोडली आहेत. त्यात नामांकित व्हॉलीबॉलपटू टॉम जोस यांचाही समावेश आहे. 
 • अंजूच्या जागी आता तिचे बंधू अजित मार्कोस यांची नियुक्ती झाली आहे. भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचे ते आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले प्रशिक्षक आहेत.
 • अंजूला ओमन चंडी यांच्या नेतृत्वाखालील याआधीच्या यूडीएफ सरकारने क्रीडा परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते. 
 • क्रीडा परिषदेच्या अन्य सदस्यांत भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश, व्हॉलीबॉलपटू टॉम जोसेफ आणि अ‍ॅथलिट प्रीजा श्रीधरन यांचा समावेश आहे.
 • अंजू बॉबी जॉर्ज विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणारी भारताची एकमेव महिला अ‍ॅथलिट आहे.

इस्त्रोचे ऐतिहासिक प्रक्षेपण

 • ‘पीएसएलव्ही- सी ३४’ या प्रक्षेपकाच्या साह्याने एकाच वेळी वीस उपग्रह अवकाशात सोडण्याच्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) मोहिमेस २२ जून रोजी यश आले.
 • श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणाचे यशस्वी प्रक्षेपण झाल्याने अंतराळ क्षेत्रात इस्त्रोने मिळविलेले हे मोठे यश आहे.
 • अन्य अवकाश संशोधन संस्थांच्या तुलनेत इस्त्रोने १० पट कमी खर्चात हे प्रक्षेपण केले.
 • याआधी पीएसएलव्ही-सी ९ च्या साह्याने ‘इस्रो’ने २००८ मध्ये एकाच वेळी १० उपग्रह अवकाशात सोडले होते. मात्र, ते सर्व एकाच कक्षेत सोडले होते. 
 • एकाचवेळी सर्वाधिक यशस्वी उपग्रह प्रक्षेपित करणारा भारत हा अमेरिका आणि रशियानंतर तिसरा देश बनला आहे.
 • २०१४ मध्ये रशियाने एकाचवेळी ३७ उपग्रहांना यशस्वीरित्या कक्षेत स्थापित केले होते. तर २०१३मध्ये अमेरिकेच्या नासाने २९ उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते.
 • इस्त्रोचे प्रमुख : किरण कुमार

उपग्रहांबाबत

 • अवकाशात सोडण्यात आलेल्या वीस उपग्रहांचे एकूण वजन १२२८ किलो आहे. भारत, अमेरिका, कॅनडा, जर्मनी व इंडोनेशिया या पाच देशांचे वीस उपग्रह या वेळी सोडण्यात आले.
 • या वीस उपग्रहांमध्ये १७ छोटे परदेशी उपग्रह आहेत. कार्टोसॅट हा भारताचा मुख्य पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह असून, उर्वरित २ उपग्रह भारतीय शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत.

भारतीय उपग्रह

 • ‘कार्टोसॅट- २’चे वजन ७२७.५ किलो आहे. दूरसंवेदन आणि निरीक्षणासाठी प्रामुख्याने याचा उपयोग होईल. 
 • ‘कार्टोसॅट-२’द्वारे काढण्यात येणाऱ्या छायाचित्रांचा वापर नियोजनासाठी प्रामुख्याने करण्यात येणार आहे, त्यातही पाणीवाटपाच्या दृष्टीने त्याचा वापर होणार आहे.
 • ‘सत्यभामा’ हा उपग्रह चेन्नईतील सत्यभामा विद्यापीठाने तयार केला असून, त्याचे वजन दीड किलो आहे. हरितगृहवायूंची माहिती गोळा करण्याचे काम तो करेल. 
 • ‘स्वयम्‌’ हा ९९० ग्रॅम वजनाचा उपग्रह पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीईओपी) विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. कम्युनिटी रेडिओसाठी त्याचा वापर होणार आहे.
 • महासागरात भरकटलेले जहाज किंवा जंगलात हरवलेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी ‘स्वयम्’ उपग्रह पुण्यातील उपयुक्त ठरणार आहे.
 • हा संपूर्णतः भारतीय बनावटीचा उपग्रह आहे. त्याचा १०० मिलिमीटर बाय १०० मिलिमीटर बाय ११३ मिलिमीटर एवढा लहान आकार आहे.
 • जगातील सर्वांत लहान दुसरा असलेला हा उपग्रह तयार करण्यासाठी महाविद्यालयात २००८ पासून संशोधन सुरू होते. त्यासाठी इस्रोशी करार करण्यात आला होता.

विदेशी उपग्रह

 • लापान-३ (इंडोनेशिया) : नैसिर्गिक संसाधने व पर्यावरणाच्या अभ्यासाठी पाठवलेला पृथ्वी निरीक्षण उपग्रह.
 • बायरोस (जर्मनी) : अतितापमानाच्या घटनांची माहिती गोळा करणारा उपग्रह.
 • एम ३ एमसॅट (कॅनडा) : सागरी निरीक्षण आणि संदेशवहन उपग्रह.
 • जीएचजीसॅट-डी (कॅनडा) : हरितगृहवायूंची माहिती गोळा करणारा पृथ्वी निरीक्षण उपग्रह.
 • स्कायसॅट जेन-२ (अमेरिका) : गुगलच्या टेरा बेला कंपनीचा ११० किलो वजनाचा अर्थ इमेजिंग उपग्रह. या उपग्रहाद्वारे पृथ्वीची उच्च प्रतीची छायाचित्रे आणि व्हिडिओ काढली जातील.
 • डोव्ह उपग्रह (अमेरिका) : अमेरिकेच्या पृथ्वी निरीक्षण करणारे १२ डोव्ह उपग्रह.

चालू घडामोडी : २२ जून

जगातील सर्वात मोठे कॅमेरा संग्रहालय

 • भारतीय छायाचित्रणाचा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने गुडगावमध्ये जगातील सर्वात मोठे कॅमेरा संग्रहालय उभे राहत आहे.
 • ऑगस्ट महिन्यात जागतिक छायाचित्रणदिनी म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी हे संग्रहालय खुले करण्याचा मानस आहे.
 • गुडगाव महानगरपालिका आणि छायाचित्रकार आदित्य आर्य यांच्या सहकार्यातून हे संग्रहालय उभे राहणार आहे. आर्य यांच्याकडे सध्या कॅमेऱ्याचे दुर्मिळ ६०० ते ७०० मॉडेल आहेत.
 • रघू राय, रघुबीर सिंग, कुलवंत राय, दयानिता सिंग, पाब्लो बार्थलोमेव, होमाई वायरवाला या महान व्यक्तींनी भारताचे नाव छायाचित्रण क्षेत्रात उज्ज्वल केले आहे.

पाकिस्तानातील कव्वाली गायक साबरी यांची हत्या

 • पाकिस्तानातील प्रख्यात कव्वाली गायक अमजद साबरी यांची अज्ञात इसमांनी मोटारसायकलवरून येऊन गोळ्या घालून हत्या केली.
 • साबरी कारने प्रवास करीत असताना काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर गोळीबार सुरू केला, त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जखमींना कराचीतील अब्बासी शहीद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 • अमजद साबरी हे पाकिस्तानचे प्रख्यात गझलगायक गुलाम फरीद साबरी यांचे चिरंजीव होते. साबरी हे आत्मविभोर मुक्त कव्वाली गायनासाठी सुपरिचित होते.
 • पाकिस्तानातील साबरी गायन घराणे सुफी संगीत व गूढ कवितांसाठी प्रसिद्ध आहे.

उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांची चाचणी

 • उत्तर कोरियाने देशाच्या पूर्व सागरी तटाजवळील भागामध्ये दोन मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली. 
 • यांपैकी पहिली चाचणी अपयशी ठरली. या चाचणींतर्गत डागण्यात आलेले क्षेपणास्त्र सुमारे १५० किमी अंतर कापल्यानंतर समुद्रामध्ये कोसळले. मात्र यानंतर काही तासांनी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने ४०० किमी अंतर पार केले.
 • गेल्या काही महिन्यांत उत्तर कोरियाकडून चार वेळा क्षेपणास्त्र चाचणीचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. 
 • क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाद्वारे बंदी घालण्यात आली आहे. उत्तर कोरिया आण्विक क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

मेस्सीचा विक्रमी ५५वा गोल

 • अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सीने कोपा अमेरिका स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात गोल करून आपल्या देशाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा मान मिळवला आहे.
 • अमेरिकेसोबत झालेल्या उपांत्य लढतीत मेस्सीने कारकीर्दीतील ५५वा गोल केला. या सामन्यात ४-० असा विजय मिळवत अर्जेंटिना संघ सलग दुसऱ्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला. 
 • अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू गॅब्रिएल बटिस्टुटाच्या नावावर सर्वाधिक ५४ गोल्सची नोंद होती. मेस्सीने ५५ वा गोल करून गॅब्रिएलला मागे टाकले. 
 • १९९३ नंतर अर्जेंटिनाला एकदाही कोपा अमेरिका चषक जिंकता आलेला नाही. २०१५ मध्ये अंतिम सामन्यात चिलीने अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का दिला होता.

सॉफ्टबँक अध्यक्षपदावरून निकेश अरोरा पायउतार

 • जगभर ई-कॉमर्स कंपन्यांसाठी अर्थबळ निर्माण करणाऱ्या जपानच्या बलाढ्य सॉफ्टबँक समूहाच्या अध्यक्षपदावरून भारतीय वंशाचे निकेश अरोरा यांना अखेर पायउतार व्हावे लागले.
 • सॉफ्टबँकचे संस्थापक मासायोशी सन यांचे वारसदार मानले गेलेले अरोरा यांच्याबद्दल गुंतवणूकदारांमधील नाराजी याचे कारण ठरली.
 • एकेकाळी गुगलमध्ये वरिष्ठ स्थानावर असलेले अरोरा हे दोनच वर्षांपूर्वी सॉफ्टबँकमध्ये रुजू झाले होते. आता ते कंपनीच्या सल्लागाराची भूमिका पार पाडतील.
 • त्यांच्या राजीनाम्यानंतर सॉफ्टबँकचे संस्थापक ५९ वर्षीय सन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदासह अध्यक्षपदही स्वत:कडे घेतले आहे.
 सॉफ्टबँक 
 • सन यांनी १९८१मध्ये सॉफ्टवेअर वितरण कंपनी म्हणून सॉफ्टबँकची स्थापना केली. तिचा जपानमधील व्यवसाय दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या व्होडाफोनने २००६ मध्ये ताब्यात घेतला.
 • यानंतर तिचे रूपांतर मोबाइलवर आधारित सेवा कंपनीत करण्यात आले. या क्षेत्रातील जपानमधील तिसरी मोठी कंपनी सॉफ्टबँक बनली.
 • जूनच्या सुरुवातीला सॉफ्टबँकने आघाडीची चिनी ई-कॉमर्स कंपनी अलिबाबामधील हिस्सा आधीच्या ३२ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर १० अब्ज डॉलर मोबदल्यात आणला.
 • सॉफ्टबँकची भारतातील गुंतवणूक १ अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. स्नॅपडिल, ओला कॅब्स, हाऊसिंग डॉट कॉम, ओयो रुम्ससारख्या कंपन्यांमध्ये तिची गुंतवणूक आहे.
 • स्नॅपडीलसारख्या कंपनीत ६२ कोटी डॉलरची गुंतवणूक करणाऱ्या सॉफ्टबँकच्या इतिहासात अरोरा यांच्या रूपात प्रथमच समूहाबाहेरील व्यक्तीकडे अध्यक्षपद गेले होते.

चालू घडामोडी : २१ जून

दिनविशेष : आंतरराष्ट्रीय योग दिन (दुसरा)

सनवे तायहूलाइट जगात सर्वात वेगवान व कार्यक्षम महासंगणक

 • चीनचा नवा सनवे तायहूलाइट हा महासंगणक जगात सर्वात वेगवान व कार्यक्षम ठरला आहे. तो ९३ पद्म (पद्म : १ वर पंधरा शून्य) आकडेमोडी सेकंदाला करू शकतो.
 • सनवे तायहूलाइट संगणक नॅशनल रीसर्च सेंटर ऑफ पॅरलल कम्प्युटर इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने तयार केला असून त्यात चीननिर्मित संस्कारक वापरले आहेत.
 • चीनमधील नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग सेंटर या संस्थेचा तियानहे २ हा महासंगणक गेली सहा वर्षे टॉप ५०० यादीत पहिल्या क्रमांकावर होता.
 • सनवे तायहूलाइट हा संगणक तियानहे २ पेक्षा दुप्पट वेगवान व तिप्पट कार्यक्षम आहे. तियानहे संगणक सेकंदाला ३३.८६ पद्म गणने करीत होता. तो आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 • टायटन हा क्रे एक्स ४० संगणक अमेरिकेच्या ऊर्जा खात्याच्या ओकरिज नॅशनल लॅबोरेटरीत बसवला असून त्याचा वेग सेकंदावा १७.५९ पद्म इतका आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 • आयबीएम ब्लू जीन म्हणजेच सिक्वोया हा लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीतील महासंगणक चौथ्या क्रमांकावर असून जपानचा फुजित्सु येथील के महासंगणक पाचव्या क्रमांकावर आहे.
 • अमेरिकेचा मीरा, ट्रिनिटी, युरोपचा पिझजेन्ट. जर्मनीचा हॅझेल हेन, सौदी अरेबियाचा शाहीन २ हे महासंगणक पहिल्या दहामध्ये आहे.
 • चीनकडे १६७ तर अमेरिकेत १६५ महासंगणक आहेत. यादीतील पहिले दोनही महासंगणक चीनचे आहेत. वर्षांतून दोनदा वेगवान महासंगणकाची यादी जाहीर केली जाते.

एसबीआयद्वारे दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वित्तपुरवठा

 • सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असणारी भारतीय स्टेट बँक दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वित्तपुरवठा करीत असल्याचे उघड झाले आहे.
 • अशाप्रकारे दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जगभरात १५८ बँका आहेत. त्यातील स्टेट बँक ही पहिलीच भारतीय बँक ठरली आहे.
 • 'डच कॅम्पेन ग्रुप पॅक'द्वारा जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये स्टेट बँकेचे नाव आहे. गुंतवणूक करणाऱ्या अन्य बँकांमध्ये जेपी मॉर्गन, बारक्लेज, बँक ऑफ अमेरिका, क्रेडिट सूस आदी नामवंत बँकांचाही समावेश आहे.
 • या बँकांनी जून २०१२ ते एप्रिल २०१६पर्यंत क्लस्टर बॉम्ब तयार करणाऱ्या सात कंपन्यांमध्ये २८०० कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे.

हरिका द्रोणावली कझाकिस्तानच्या बुद्धिबळ स्पर्धेत विजयी

 • ग्रँडमास्टर हरिका द्रोणावली हिने कझाकिस्तानच्या युरासियान बिल्ट्स बुद्धिबळ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पूरस्कार मिळविला आहे.
 • भारताच्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूने २५०० डॉलर आणि ६० ईएलओ गुण मिळविले. यासोबतच ती स्पर्धेत पहिल्या १० खेळाडूंच्या यादीत सहभागी झाली.
 • हरिकाने गेल्या अठवड्यात हंगेरीच्या जलाकारोस आतंरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवातदेखील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. यात ती क्लासिकल रँकिंगच्या यादीत नवव्या स्थानावर होती.
 • हरिका आणि यिफान यांनी स्पर्धेच्या अखेरीस समान १२.५ गुण मिळविले होते आणि तिने टायब्रेकरमध्ये विजय मिळविला.

स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन संमेलन

MPSC Toppers आणि Aachiever’s Academy यांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षांचे (MPSC आणि Banking) मोफत मार्गदर्शन मिळवून देणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन रविवार, दि. २६ जून २०१६ करण्यात येणार आहे.
या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत वाजवी शुल्कात स्पर्धापरीक्षांचे ८ महिने मार्गदर्शन करण्यात येईल. या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे.

सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.


 परीक्षेकरीता नोंदणी 
 • MPSCच्या विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी MPSC<Space>तुमचे नाव<Space>तुमचे शहर.
 • Bankingच्या विद्यार्थांनी नोंदणीसाठी BANK<Space>तुमचे नाव<Space>तुमचे शहर.
 • असा SMS टाईप करून ७२७६ २९० २१५ या मोबाईल क्रमांकावर पाठवा.
 • तुमच्या काही शंका असल्यास आम्हाला ७३०३ ३१८ ६३३ किंवा ९७६६ ०३१ ७८२ या Whatsapp क्रमांकावर Message करा.

 शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल 
 • हि परीक्षा पूर्णपणे मोफत आहे.
 • परीक्षा दिनांक : २६ जून २०१६, रविवार
 • वेळ : सायंकाळी ५.०० वाजता
 • स्थळ : रोटरी क्लब कम्युनिटी हॉल, वडवली सेक्शन, अंबरनाथ (पूर्व), ठाणे. पिन : ४२१५०१.

चालू घडामोडी : २० जून

हवाई आणि संरक्षण क्षेत्रात १०० टक्के एफडीआय

 • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने औषधनिर्मिती, हवाई आणि संरक्षण क्षेत्रात १०० टक्के थेट परदेशी गुंतवणूकीला (एफडीआय) मंजुरी देण्याचा निर्णय घेतला.
 • याशिवाय विमा, ई- कॉमर्स, पेन्शन, ब्रॉडकास्टिंग आणि सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रातदेखील १०० टक्के एफडीआयला मंजुरी देण्यात आली आहे.   
 • व्यवसाय सुलभता वाढून देशात अधिक परकीय गुंतवणूक यावी व त्यातून गुंतवणूक, उत्पन्न व रोजगार यात वाढ व्हावी या उद्देशाने ‘एफडीआय’ धोरण आता अधिक उदार व सुगम करण्यात येत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
 • थेट परकीय गुंतवणूक क्षेत्रातली नोव्हेंबरनंतरची ही दुसरी मोठी सुधारणा आहे. नोव्हेंबर २०१५मध्ये सरकारने १२ क्षेत्रांमधील एफडीआयच्या नियमांमध्ये शिथिलता आणली होती. 
संरक्षण
 • संरक्षण क्षेत्रात ४९ टक्क्यांच्या वर थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. ज्यामुळे देशाला आधुनिक तंत्रज्ञान मिळू शकेल.
 • एफडीआयच्या या गुंतवणुकीसाठी शस्त्र अधिनियम १९५९च्या अंतर्गत छोटे हत्यार आणि अन्य युद्ध सामग्री बनविणाऱ्या उद्योगांनाही हे नियम लागू करण्यात आले आहेत.
 • याआधी संरक्षण क्षेत्रात केवळ अद्ययावत तंत्रज्ञान पुरविण्याच्या अटीवर ४९ टक्के गुंतवणूक र्निबधमुक्त होती. आता ही अट काढून टाकण्यात आली आहे.
औषध निर्मिती
 • औषधनिर्मिती क्षेत्रात स्वयंचलित मार्गानेत ७४ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. ७४ टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल.
 • नव्या प्रकल्पांमध्ये मात्र सरकारी मंजुरीशिवाय १०० टक्के एफडीआयला मंजुरी देण्यात आली आहे.
हवाई सेवा
 • नागरी विमान वाहतूक क्षेत्रात स्वयंचलित ४९ टक्क्यांपर्यंत गुंतवणूकीस मंजुरी होती. आता केंद्र सरकारच्या पूर्वसंमतीने ४९ टक्क्यांपुढे १०० टक्के परकीय गुंतवणूक करता येणार आहे.
 • विमानतळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी ७४ टक्क्यांवरील विदेशी गुंतवणुकीसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत होती.
खासगी सुरक्षा सेवा
 • खासगी सुरक्षा सेवेत सरकारच्या मंजुरीनंतर आता ७४ टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी असेल. सध्या या क्षेत्रात ४९ टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे.
खाद्यपदार्थ
 • खाद्यपदार्थ व्यापारात सरकारी परवानगीनंतर १०० टक्के गुंतवणूक करता येणार आहे.
 • खाद्यपदार्थाची निर्मिती वा प्रक्रिया भारतात झाली असेल तर खाद्यपदार्थाच्या ई-व्यापार क्षेत्रातही सरकारी परवानगीनंतर १०० टक्के एफडीआय मंजूर करण्यात आला आहे.

मलेशियामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा

 • ‘आझाद हिंद सेने’च्या नऊ सदस्यांच्या उपस्थितीत कौलालंपूर (मलेशिया) येथील ‘भारतीय सांस्कृतिक केंद्र’ परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
 • यावेळी उपस्थित असलेल्या ‘आझाद हिंद सेने’च्या नऊ सदस्यांमध्ये तीन महिलांचा समावेश होता. या तीन महिला ‘आझाद हिंद सेने’च्या ‘झाशी राणी रेजिमेन्ट’चा भाग होत्या.
 • ‘झाशी राणी रेजिमेन्ट’च्या ९० वर्षीय सदस्य मीनाक्षी पेरुमा यांनी कार्यक्रमादरम्यान बंगाली आणि तामीळ भाषेत ‘आझाद हिंद सेने’चे गीतदेखील गायले. 
 • गेल्या वर्षी मलेशिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील भारतीय सांस्कृतिक केंद्राचे ‘नेताजी सुभाष चंद्र बोस भारतीय सांस्कृतिक केंद्र’ असे नामकरण करण्याची घोषणा केली होती.

ऑलिम्पिक मशाल हाती घेणारी सर्वांत वयस्क व्यक्ती

 • जगातील सर्वांत वयस्क स्काई डाइव्हरचा गौरव मिळविल्याच्या तीन वर्षांनंतर १०६ वर्षीय ऐडा जेमान्क्यू ऑलिम्पिक मशाल हाती घेणारी सर्वांत वयस्क व्यक्ती बनली आहे.
 • जेमान्क्यूने अ‍ॅलेक्झांडर काप्तारेंकोचा विक्रम मोडला होता. अ‍ॅलेक्झांडर याने २०१४च्या सोची हिवाळी ऑलिम्पिक मशाल रिलेत सहभाग नोंदवला होता. तेव्हा त्यांचे वय १०१ होते.
 • जेमान्क्यूने अमेजेनेयाचे शहर मकापात ऑलिम्पिक मशाल हाती घेतली.
 • ऑलिम्पिक मशालीचा हा प्रवास ९५ दिवसांचा आहे. ही मशाल ब्राझीलच्या ३२५ शहरांतून जाणार आहे.
 • मशालीचा प्रवास ५ ऑगस्ट रोजी रियोच्या माराकाना स्टेडियममध्ये संपणार आहे. यादरम्यान जवळपास १२ हजार धावपटू सहभागी होतील.

मोहमद मोर्सी यांना ४० वर्षे कारावासाची शिक्षा

 • देशाची गुपिते कतारला पुरवल्याच्या गुन्ह्यासाठी इजिप्तचे पदच्युत इस्लामवादी अध्यक्ष मोहमद मोर्सी यांना स्थानिक न्यायालयाने ४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
 • याच प्रकरणात ‘मुस्लीम ब्रदरहूड’च्या सहा सदस्यांना सुनावलेली मृत्युदंडाची शिक्षा न्यायालयाने कायम केली आणि इतर दोघांना २५ वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
 • मोर्सी यांना याच प्रकरणी १५ वर्षांचा अतिरिक्त तुरुंगवास सुनावण्यात आल्यामुळे त्यांच्या कैदेची मुदत ४० वर्षे झाली आहे. हा निकाल अंतिम नसून त्याविरुद्ध अपील केले जाऊ शकते.
 • लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या देशाच्या पहिल्या अध्यक्षांना २०१३ साली हटवण्यात आल्यानंतर हिंसाचार करण्याच्या आरोपाखाली मुस्लीम ब्रदरहूडचा सर्वोच्च मार्गदर्शक मोहमद बाडी आणि या प्रतिबंधित संघटनेच्या इतर ३५ सदस्यांना गेल्या महिन्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेविरुद्धचे अपील प्रलंबित आहे.