चालू घडामोडी : ६ जानेवारी

फोर्ब्सची सुपर अचिव्हर्स यादी प्रसिध्द

  • प्रतिष्ठीत फोर्ब्स या मासिकाने २०१७च्या ‘सुपर अचिव्हर्स’च्या यादीत ३० भारतीय वंशाच्या नवउद्योजकांना स्थान दिले आहे.
  • आरोग्य, नवनिर्माण, क्रीडा, आर्थिक इत्यादी २० क्षेत्रांतील ३० भारतीय वंशाच्या व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
  • यात तीस वर्षांखालील तरुण उद्योजकांचा समावेश असून, विशेष म्हणजे यात महिलांचाही समावेश आहे.
 या यादीतील काही नवउद्योजक 
  • विवेक कोप्पार्थी: निओ लाईट कंपनीचे सहसंस्थापक. कावीळ (जॉन्डीस) या आजारावर उपचार करणारे फोटो थेरपी डिव्हाइस (प्रकाश चिकित्सा उपकरण) विकसित केले आहे.
  • याशिवाय त्यांची कंपनी नवजात बालकांमधील हायपोथेरमिया (अंगातील तापमान कमी असणे) या आजारावर उपचार करण्यासाठी उपकरण विकसित करत आहे.
  • प्रार्थना देसाई: आरोग्य क्षेत्रातील जिप्लिन कंपनीच्या संस्थापक. विकसनशील देशांमध्ये ड्रोनच्या मदतीने लोकांवर उपचार करण्यासाठी उपक्रम सुरू केला.
  • शॉन पटेल: ऑर्थो निंजा या कंपनीच्या माध्यमातून शल्यचिकित्सकांमध्ये संवाद घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी एक मोबाईल अॅप विकसित करत आहेत.
  • रोहन सुरी: अव्हेरिया हेल्थ सोल्युशन्सचे संस्थापक. उष्माघाताचे निरीक्षण अधिक चांगल्या पद्धतीने करता यावे, यासाठी एक प्रणाली विकसित केली.
  • आदित्य अग्रवाल: किसान नेटवर्कचे सहसंस्थापक. लहान शेतकऱ्यांना उत्पादित केलेला माल विकण्यासाठी ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून दिली.

रॉकफेलरच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे राजीव शहा

  • अमेरिकेतील सर्वांत मोठी आणि प्रभावशाली देणगीदार संस्था असलेल्या रॉकफेलर फाउंडेशनचे १३वे अध्यक्ष म्हणून राजीव जे. शहा यांची नियुक्ती झाली आहे.
  • शहा हे ज्युडीथ रॉडिन यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. रॉडिन या मागील बारा वर्षांपासून या संस्थेच्या अध्यक्ष होत्या.
  • सध्या शाह या संस्थेचे विश्वस्त आहेत. ते या संस्थेचे सर्वांत तरुण आणि भारतीय वंशाचे पहिले अध्यक्ष ठरले आहेत.
  • राजीव शहा २००९ ते २०१५ या काळात युनायटेड स्टेट्‌स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचे (यूएसएआयडी) प्रमुख होते. 
  • त्यांनी अमेरिकेच्या कृषी विभागात मुख्य शास्त्रज्ञ आणि कनिष्ठ सचिव या पदांवरही काम केले आहे.
  • बिल अँड मेलिंडा गेट्‌स फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेही ते आठ वर्ष कार्यरत होते.
  • २०११मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अनिवासी भारतीयांना देण्यात येणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

इलेक्ट्रॉनिक चीप असलेले ई-पासपोर्ट

  • केंद्र सरकारने पासपोर्टच्या गैरवापराला आळा बसविण्यासाठी बायोमेट्रीक माहितीने परिपूर्ण असलेले ई-पासपोर्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या ई-पासपोर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप असणार आहे. पासपोर्टच्या डेटा पेजमध्ये जी माहिती असेल, तीच माहिती या चीपमध्ये असणार आहे.
  • संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ई-पासपोर्टसाठी मंजुरी देण्यात आली आहे. ई-पासपोर्टमुळे संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती सुरक्षित राहू शकणार आहे.

धार्मिक अभ्यासाचे विद्वान ह्य़ूस्टन स्मिथ यांचे निधन

  • विविध धर्मग्रंथ आणि धर्मशास्त्राचा अफाट व्यासंग असलेले हे विद्वान प्रा. ह्य़ूस्टन स्मिथ यांचे ३० डिसेंबर २०१६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
  • स्मिथ यांचा जन्म १९१९मध्ये चीनमधील एका ख्रिश्चन परिवारात झाला. १७ वर्षे तेथे राहिल्यानंतर ते शिक्षणासाठी अमेरिकेत आले.
  • शिकागो विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी स्वामी सत्प्रकाशानंद यांच्या मार्गदर्शनाखाली वेदान्त तसेच बौद्ध आणि सूफी इस्लामचा अभ्यास केला.
  • डेन्व्हर विद्यापीठात स्मिथ यांनी १९४४ ते १९४९ या काळात अध्यापन केले. नंतर वॉशिंग्टन विद्यापीठात त्यांनी १० वर्षे शिकवण्याचे केले.
  • नंतर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे प्राध्यापक व तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
  • वॉशिंग्टन विद्यापीठात असताना त्यांनी तयार केलेल्या ‘रिलिजन्स ऑफ मॅन्स’ आणि ‘सर्च फॉर अमेरिका’ या दोन मालिकांची खूप प्रशंसा केली गेली.
  • पुढे त्यांना आर्थर क्रॉम्टन यांच्यासमवेत ‘सायन्स अ‍ॅण्ड ह्य़ूमन रिस्पॉन्सिबिलिटी’ या अन्य एका चित्रवाणी मालिकेची निर्मिती करण्याची संधी मिळाली.
  • हिंदू धर्म, तिबेटी बौद्ध आणि सूफी संप्रदायावर स्मिथ यांनी माहितीपट बनवले, त्यांसही विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
  • त्यांच्या ‘द वर्ल्ड्स रिलिजन्स’ या जगभर गाजलेल्या पुस्तकाच्या २० लाख प्रती विकल्या गेल्या होत्या.
  • १९९६मध्ये बिल मॉयर्स यांनी स्मिथ यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याचा गौरव करणारा माहितीपट बनवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा