चालू घडामोडी : ७ जानेवारी

१४ वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन

  • कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे ७ ते ९ जानेवारी दरम्यान ‘१४ वे प्रवासी भारतीय दिवस’ संमेलन भरवण्यात आले आहे.
  • अनिवासी तरुण भारतीयांना आपल्या मातृभूमीतील संस्कृतीची ओळख निर्माण व्हावी हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.
  • स्टार्ट अप, पर्यटन आणि शैक्षणिक आदी क्षेत्रांत कार्यरत सव्वा तीन कोटी अनिवासी भारतीयांना आपल्या संस्कृतीशी जोडण्यासाठी दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस संमेलन भरविण्यात येते.
  • या संमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सूरीनामचे सर्वात तरुण उपराष्ट्रपती मायकल अश्विन अधिन यांच्या हस्ते झाले.
  • संमेलनातील ‘भारत को जानो’ या कार्यक्रमात भारतीय वंशाचे जवळपास १६० तरुण सहभागी झाले आहेत.
  • तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे २५० विद्यार्थी आणि बंगळुरूतील विविध महाविद्यालयांतील २०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
 प्रवासी भारतीय दिवस संमेलन 
  • ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये परतले होते. त्यामुळे दरवर्षी ९ जानेवारी दिवस भारतामध्ये प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • ह्याप्रित्यर्थ २००३पासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस संमेलन भरविण्यात येते.
  • यापूर्वीचे १३वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन गांधीनगर, गुजरात येथे २०१५मध्ये भरविण्यात आले होते.

सँडफर्ड फ्लेमिंग यांची १९०वी जयंती

  • आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेचा शोध लावणाऱ्या सँडफर्ड फ्लेमिंग यांना गुगलकडून डूडल स्वरूपात मानवंदना देण्यात आली आहे.
  • ७ डिसेंबर रोजी सँडफर्ड फ्लेमिंग यांची १९०वी जयंती आहे. त्यासाठी गुगलने त्यांच्या यशाची महती सांगणारे डुडल तयार केले आहे.
  • या डुडलमध्ये वाफेच्या इंजिनासह आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ दर्शविणारी २४ घड्याळे दाखविण्यात आली आहेत.
  • स्कॉटिश वंशाचे असणारे सँडफर्ड हे पेशाने डिझायनर होते. सँडफर्ड यांचा जन्म स्कॉटलंडच्या किक्रॅलडी येथे झाला होता.
  • सँडफर्ड यांनी १८४७मध्ये रॉयल कॅनेडियन इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेचा सिद्धांत मांडला.
  • जागतिक प्रमाणवेळेचे केंद्र इंग्लंडमध्ये ग्रीनिचला असावे असे त्यांनी सुचविले आणि प्रमाणवेळेच्या गणितांची रचना केली.
  • यासाठी त्यांनी रेखावृत्तानुसार १५ अंशांच्या फरकाने जगाची २४ भागांमध्ये विभागणी केली. या सिद्धांतामुळे आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ निश्चित झाली.
  • १८८४च्या  इंटरनॅशनल मेरिडियन परिषदेत त्यांची कल्पना अमान्य झाली पण ही पध्दत सोयीची असल्याने १९२९पर्यंत ती जगभर रूढ झाली.
  • याशिवाय, सँडफर्ड यांनी कॅनेडियन पॅसिफिक ही आंतरखंडीय रेल्वे उभारण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
  • फ्लेमिंग यांच्याकडे व्यापारी दृष्टीही होती. १८८२ साली त्यांनी कॅनडामध्ये कापूस उत्पादन करणारी कंपनी स्थापन केली.
  • तसेच त्यांनी कॅनडाच्या पहिल्या पोस्ट स्टॅम्पचेही डिझायनिंग केले. २२ जुलै १९१५ रोजी सँडफोर्ड यांचे निधन झाले.
  • त्यांच्या या सगळ्या कामगिरीमुळे १८९७साली इंग्लंडच्या राणीने त्यांचा ‘सर’ ही पदवी देत सन्मान केला.
 आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ 
  • आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेच्या निश्चितीपूर्वी जगाच्या विविध भागांतील लोक सूर्याच्या आकाशातील स्थितीवर स्वत:च्या घड्याळाची वेळ निश्चित करत.
  • मात्र, जेव्हा एखादी ट्रेन एका देशातून दुसऱ्या देशात जात असे तेव्हा वेळेचे गणित बिघडत असे. ही समस्या दूर करण्यासाठी सँडफोर्ड यांनी २४ तासांच्या घड्याळाचा विचार उचलून धरला.
  • प्रमाणवेळ ही जगातील वेगवेगळ्या स्थानांमध्ये पाळली जाणारी घड्याळाची एक वेळ आहे. बऱ्याचदा प्रमाणवेळेला ‘स्थानिक वेळ’ असेही संबोधले जाते.
  • प्रमाणवेळ ही यूटीसीपासून (जागतिक समन्वित वेळ) स्थानिक वेळफरकामध्ये लिहीली जाते. उदा. भारतीय प्रमाणवेळ यूटीसी+०५.३० अशी लिहिली जाते.

पेन्शनधारकांना आधार कार्ड क्रमांक बंधनकारक

  • पेन्शनधारक आणि सदस्यांना कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) १९९५नुसार, लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या ५० लाख पेन्शनधारक आणि जवळपास ४ कोटी भागधारकांना जानेवारी महिन्याअखेरीस आधार कार्ड क्रमांक देणे बंधनकारक केले आहे.
  • त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल तर, या महिन्याच्या अखेरीपर्यंत आपण आधार कार्डसाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे.
  • ईपीएफओने देशभरातील १२० वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अभियानाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा