चालू घडामोडी : १० जानेवारी

इंडिया आयएनएक्सचे उद्घाटन

  • मुंबई शेअर बाजाराच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय एक्स्चेंजचे (इंडिया आयएनएक्स) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगर येथील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक (गिफ्ट) सिटी येथे उद्घाटन झाले.
  • इंडिया आयएनएक्स हा असा अत्याधुनिक प्लॅटफॉर्म आहे जो केवळ चार मायक्रो सेकंदांमध्ये कार्यरत होतो.
  • हे एक्स्चेंज २२ तास कार्यरत राहणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणि अनिवासी भारतीयांना जगभरात कोठेही ट्रेडिंग शक्य होणार आहे.
  • इक्विटी डेरिव्हटिव्हज, करन्सी डेरिव्हटिव्हज, कमॉडिटी डेरिव्हटिव्हज यांसह इंडेक्स आणि स्टॉक्समध्ये ट्रेडिंग सुरू करणे हा प्राथमिक उद्देश आहे.
  • याशिवाय आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण झाल्यानंतर याच ठिकाणी डिपॉझिटरी रिसिप्ट आणि बॉण्डचेही व्यवहार होणार आहेत.

कल्याण कृष्णमूर्ती फ्लिपकार्टचे नवे सीईओ

  • फ्लिपकार्टच्या मुख्य-कार्यकारी अधिकारी पदावरुन फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बंसल यांना हटविण्यात आले आहे.
  • त्यांच्या जागेवर कल्याण कृष्णमूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते फ्लिपकार्टमध्ये कॅटेगरी डिजाईन ऑर्गनायजेशनचे प्रमुख या पदावर कार्यरत आहेत.
  • कृष्णमूर्ती हे फ्लिपकार्टमध्ये येण्याआधी फ्लिपकार्टची प्रमुख गुंतवणूकदार कंपनी टायगर ग्लोबलमध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर काम करीत होते.
  • बिन्नी बंसल यांना समूहाचे मुख्याधिकारी बनविण्यात आले आहे तर सचिन बंसल हे समुहाचे कार्यकारी अध्यक्ष या पदावर कायम राहणार आहेत.
  • सचिन बंसल आणि बिन्नी बंसल या दोघांनी २००७मध्ये फ्लिपकार्टची स्थापना केली होती.
  • सचिन बंसल यांना मागील वर्षी मुख्याधिकारी या पदावरुन हटवून त्यांच्या जागी बिन्नी बंसल यांची नियुक्ती करण्यात आली होती.

बेशिस्त कंपन्यांच्या यादीत एअर इंडिया तिसऱ्या क्रमांकावर

  • प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, विमानांच्या पाळल्या जाणाऱ्या वेळा यांच्या आधारे फ्लाईटस्टॅट्सने सर्वाधिक बेशिस्त व सर्वोत्तम सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांची यादी तयार केली आहे.
  • विमानांच्या वेळा न पाळण्याच्या, चांगल्या सुविधा न देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत एअर इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • एअर इंडियाचे वेळ न पाळण्याचे प्रमाण ३८.७१ टक्के इतके आहे. या यादीत एल अल ही इस्रायली कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे.
  • एल अल कंपनीच्या विमानांच्या वेळा न पाळण्याचे प्रमाण ५६ टक्के आहे. तर या यादीत आईसलँडएअर कंपनी (४१.०५ टक्के) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • एअर इंडियानंतर या यादीत चौथ्या क्रमांकावर फिलीपाईन्स एअरलाईन्स (३८.३३ टक्के), पाचव्या क्रमांकावर एशियाना एअरलाईन्स (३७.४६ टक्के) आहे.
  • विमानांच्या वेळा कसोशीने पाळण्यात केएलएम या नेदरलँडच्या कंपनीचा क्रमांक पहिला लागतो. केएलएम कंपनीच्या विमानांची वेळ चुकण्याचे प्रमाण फक्त ११.४७ टक्के आहे.
  • या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आयबेरिया (११.८२ टक्के), तिसऱ्या क्रमांकावर जपान एअरलाईन्स (१२.२ टक्के) आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डो प्लेयर ऑफ द इयर

  • फिफा संघटनेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने  ख्रिस्तियानो रोनाल्डोला चौथ्यांदा सन्मानित करण्यात आले आहे.
  • याआधी २००८, २०१३, २०१४ असा तीनवेळा रोनाल्डोने हा पुरस्कार मिळविला आहे.
  • पोर्तुगाल संघाच्या युरो चषक स्पर्धेतील विजयामध्ये रोनाल्डोने महत्वाची भूमिका बजावली होती. रोनाल्डोला नुकताच बॅलन डीओर पुरस्कारही मिळाला आहे.
  • रोनाल्डोने २०१६मध्ये पोर्तुगाल आणि रियल मांद्रीद संघाकडून खेळताना ५९ गोल केले तर १६ गोलमध्ये त्याने सहाय्यकाची भूमिका वठवली.
  • या शर्यतीत रोनाल्डोला फ्रान्सच्या अँन्टोनी ग्रीजमन व अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी या प्रमुख खेळाडूंचे आव्हान होते.
  • उत्कृष्ट रेफ्री म्हणून इटलीच्या क्लाऊडीओ रेनोडी यांना फिफाने सन्मानित केले. त्यांनी फ्रान्सच्या झिनेदीन जिदानला मागे टाकून हा पुरस्कार पटकावला.
  • फिफाचे अध्यक्ष: जिआनी इन्फॅन्टीनो

पाकिस्तानचा क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा

  • पाकिस्तानने पाणबुडीतून सोडल्या जाणारे पहिले आण्विक क्रुझ क्षेपणास्त्र ‘बाबर-३’ची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला आहे.
  • अणवस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले बाबर-३ हे क्षेपणास्त्र ४५० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते.
  • हे क्षेपणास्त्र पाण्याखाली नियंत्रणासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक दिशादर्शक आणि मार्गदर्शन प्रणालीने सज्ज आहे.
  • बाबर-३ ही जमिनीवरून मारा करणाऱ्या बाबर-२ या क्षेपणास्त्राची विकसित आवृत्ती आहे. डिसेंबरमध्ये बाबर-२ ची यशस्वी चाचणी करण्यात आली होती.
  • भारताने यापूर्वीच म्हणजे २००८मध्येच पाणबुडीवरून सोडण्यात येऊ शकणाऱ्या आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.
  • याशिवाय, २०१३मध्ये भारताने पाणबुडीवरून डागण्यात येणारे क्रुझ क्षेपणास्त्र विकसित करण्यात यश मिळवले होते.
  • काही दिवसांपूर्वीच भारताने संपूर्ण चीनला टप्प्यात आणणाऱ्या अग्नी-४ व अग्नी-५ या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा