चालू घडामोडी : २० जानेवारी

विक्रमादित्यवर लावण्यात येणार एटीएम

  • भारताची सर्वात मोठी युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशिन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • देशाच्या रक्षणासाठी दिवसरात्र झटणाऱ्या जवानांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
  • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने ही मशिन बसवली जाणार असून सॅटेलाईटच्या मदतीने ही मशिन चालणार आहे. अशी सुविधा असलेली विक्रमादित्य ही पहिलीच युद्धनौका ठरणार आहे.
 आयएनएस विक्रमादित्य 
  • भारतीय नौदलात दाखल झालेली आयएनएस विक्रमादित्य ही तिसरी विमानवाहू युद्धनौका आहे.
  • या युद्धनौकेची २४ विमान आणि १० हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता आहे. २०१३मध्ये यूपीए सरकारच्या काळात ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली होती.
  • या विमानवाहू युद्धनौकेवर अतिअद्ययावत संवाद आणि युद्धयंत्रणा बसविण्यात आली आहे.
  • आयएनएस विक्रमादित्य या तरंगत्या युद्धभूमीची उंची ६० मीटर्स उंच असून, तिच्या २० मजल्यांमध्ये २४ डेक्स आहेत.
  • युद्धनौकेची लांबी २८४ मीटर्स म्हणजेच फुटबॉलची तीन मैदाने एका ओळीत ठेवली तर त्यांच्या लांबीइतकी आहे.

ईडन गार्डन्समधील स्टॅंडला गांगुलीचे नाव

  • माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या सन्मानार्थ ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानातील एका स्टॅंडला त्यांचे नाव दिले जाणार आहे. सध्या गांगुली हे बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.
  • गांगुली यांच्यासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचेही नाव एका स्टॅंडला दिले जाणार आहे. 
  • याव्यतिरिक्त माजी क्रिकेटपटू पंकज रॉय आणि बंगाल क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष बी.एन. दत्त, ए.एन. घोष आणि स्नेहांशू आचार्य यांचेही नाव ईडन गार्डन्समधील स्टॅंडला दिले जाणार आहे.
  • ईडन गार्डन्स हे मैदान आणि त्याचा परिसर हा लष्कराच्या अधिपत्याखाली असल्यामुळे येथे कोणताही बदल करण्यासाठी लष्कराची परवानगी घेणे आवश्यक असते.
  • ईडन गार्डन्सवरील काही स्टॅंडची दुरुस्ती आणि त्यांचे नाव बदलण्यासाठी बंगाल क्रिकेट संघटनेने लष्कराकडे गेल्या वर्षी मागितलेली परवानगी मंजूर झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे राष्ट्रपती

  • अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परंपरेप्रमाणे बायबलवर हात ठेवत अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांकडून देशाचे ४५वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
  • तर माइक पेन्स यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे आठ लाख अमेरिकन नागरिक उपस्थित होते.
  • यावेळी मावळते अध्यक्ष बराक ओबामा, माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि जिमी कार्टर हे देखील उपस्थित होते.  
  • राष्ट्राध्यक्षाने २० जानेवारीला शपथ घेण्याची परंपरा गेल्या २०० वर्षांपासून अमेरिकेत पाळली जात आहे. यावेळीही ही परंपरा कायम राहिली.
  • नोव्हेंबरमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावर मात केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा