चालू घडामोडी : २६ जानेवारी

प्रजासत्ताक दिन सोहळा राजपथावर साजरा

  • भारताच्या ६८व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राजधानी दिल्लीत राजपथावर तसेच देशभरात उत्साहाने साजरा झाला.
  • यावेळी भारतीय सैन्याने जगाला आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवले. शिस्तबद्ध संचलन आणि चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
  • युएईचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
  • त्यांच्यासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह इतर नेतेही हजर होते. 
  • संयुक्त अरब अमिरातीच्या १७९ सैनिकांनी केलेले संचलन हे यंदाच्या राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते.
  • यासोबतच नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (ब्लॅक कॅट्स) पहिल्यांदाच राजपथावरील संचलनात सहभाग घेणार आहेत.
  • यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. 
  • यासोबतच राज्य सरकार आणि केंद्राचे विविध चित्ररथदेखील उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते.

वैज्ञानिक पी के के नायर यांचे  निधन

  • पॅलिनॉलॉजी (परागकणशास्त्र) या शास्त्रातील भारतातील सर्वोच्च वैज्ञानिक पी के के नायर यांचे  २१ जानेवारी रोजी निधन झाले.
  • भारतात परागकणशास्त्राचा विकास व प्रसार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी एकूण २० पुस्तके लिहिली व २५० शोधनिबंध प्रकाशित केले.
  • सपुष्प वनस्पतींमध्ये अँजियोस्पर्मस असतात, त्याबाबतचा ‘ट्रायफायलेटिक सिद्धांत’ त्यांनी मांडला होता.
  • हवेत असणाऱ्या कणांचा डेटाबेस त्यांनी एरोस्पोरा नावाने तयार केला होता. या कणांमुळे मानवाला अ‍ॅलर्जी होऊन श्वासाचे विकार जडत असतात.
  • जैवतंत्रज्ञान अभ्यासतंत्रे वापरून त्यांनी काही नर जनुके शोधून काढली होती, ती वनस्पतींच्या उत्पादनात सुधारणा करणारी होती.
  • नायर यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९३० रोजी केरळातील चांगनासेरी येथे झाला. लखनऊ विद्यापीठातून त्यांनी पॅलिओबॉटनीत पीएचडी केली.
  • त्यांनी पर्यावरण, बगीचा नियोजन, पोलन मॉर्फोलॉजी, एरोबायोलॉजी, इकॉनॉमिक बॉटनी अशा अनेक विषयांत संशोधन केले.
  • ते लखनऊ येथील कौल सायन्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व द एनव्हायर्नमेंट रीसोर्स रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक होते.
  • सीएसआयआरमध्ये त्यांना ‘सुप्रतिष्ठ (तहहयात) वैज्ञानिक’ हे पद देण्यात आले होते.
  • तिरूअनंतपुरम येथील ट्रॉपिकल बोटॅनिक गार्डन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेचे ते उपसंचालक होते.
  • त्यांनी १९६४मध्ये सुरू केलेली पॅलिनॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ही परागकण संशोधन शास्त्रास वाहिलेली संस्था हा त्यांचा फार मोठा वारसा आहे.
  • त्यांनी लिहिलेले ‘इसेन्शियल्स ऑफ पॅलिनोलॉजी’ हे पुस्तक परागकणशास्त्रावरील रूढार्थाने पहिले क्रमिक पुस्तक होते.
  • ब्रिटिश कौन्सिलचे अभ्यागत, रशियाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त होते.

राहूल द्रविडचा डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास नकार

  • बंगळूर विश्वविद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेली मानद डॉक्टरेट पदवी घेण्यास माजी क्रिकेटपटू राहूल द्रविड याने नकार दिला आहे.
  • बंगळुरु विश्वविद्यापीठाने २७ जानेवारीला होणाऱ्या ५२व्या दीक्षांत समारंभात द्रविडला डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला होता.
  • डॉक्टरेट स्वीकारण्याऐवजी आपण क्रीडा क्षेत्रात संशोधन करुन डॉक्टरेट मिळवण्याचा प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया द्रविडने दिली आहे.
  • यापूर्वी २०१४साली गुलबर्गा विद्यापिठाकडूनही त्याला डॉक्टरेट पदवी देण्यात येणार होती पण त्यावेळीही द्रविडने नकार दिला होता.
  • २०१२मध्ये द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या तो भारत 'अ' आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे.

भारतातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणात घट

  • बर्लिनस्थित लाचविरोधी संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील भ्रष्टाचाराचे प्रमाण थोड्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती समोर आले आहे.
  • जागतिक आर्थिक मंच आणि इतर संघटनांकडे असणाऱ्या माहितीच्या आधारे या संघटनेने जगातील सर्वाधिक पारदर्शक आणि कमी भ्रष्टाचार असणाऱ्या देशांची यादी तयार केली आहे.
  • ही यादी तयार करताना देशांमधील सार्वजनिक जीवनात नेमका किती भ्रष्टाचार आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे.
  • भ्रष्टाचार मोजताना ० ते १०० असे गुण देण्यात आले आहेत. शून्य गुण म्हणजे सर्वाधिक भ्रष्टाचार आणि शंभर गुण म्हणजे सर्वाधिक पारदर्शकता असे या गुणांचे स्वरुप आहे.
  • या यादीत न्यूझीलंड आणि डेन्मार्क या देशांनी संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे. या देशांमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण अतिशय कमी आहे.
  • भारत, चीन आणि ब्राझीलला लाचविरोधी संघटनेने ४० गुण दिले आहेत. त्यामुळे भारतसाह चीन आणि ब्राझीलचा समावेश मध्यम भ्रष्टाचार असलेल्या देशांच्या गटात झाला आहे.
  • २०१५मध्ये झालेल्या सर्वेक्षणात भारताला ३८ गुण मिळाले होते. यंदा त्यामध्ये २ गुणांची वाढ झाली आहे.
  • न्यूझीलंड आणि डेन्मार्क देशांनी प्रत्येकी ९० गुण मिळवत यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
  • न्यूझीलंड, डेन्मार्क पाठोपाठ फिनलंड, स्वीडन, स्विझर्लंड, नॉर्वे, सिंगापूर, नेदरलँड आणि कॅनडाचा क्रमांक लागतो. या देशांमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे हा अहवाल सांगतो.
  • सोमालिया देशातील सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 
  • याशिवाय भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांमध्ये सीरिया, दक्षिण सुदान, उत्तर कोरिया, अफगाणिस्तान आणि इराकचा समावेश आहे.
  • एकाही देशाला भ्रष्टाचार पूर्णपणे मोडून काढता आलेला नाही, हे लाचविरोधी संघटनेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
  • यासोबतच जवळपास दोन तृतीयांश देशांना ५० पेक्षा कमी गुणांची कमाई करता आलेली नाही. त्यामुळे जगभरात भ्रष्टाचार मोठी समस्या असल्याचे या अहवालाने अधोरेखित केले आहे.
  • या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या १७६ देशांची स्थिती विचारात घेता भ्रष्टाचाराची जागतिक सरासरी ४३ इतकी आहे.
  • त्यामुळे भारतातील भ्रष्टाचार हा जागतिक सरासरीपेक्षा जास्त असल्याचे हा अहवाल सांगतो.

बोल्टला ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक गमावावे लागणार

  • जमैकाचा धावपटू उसेन बोल्टला बिजिंग ऑलिम्पिकमध्ये ४x१०० मीटर रिले शर्यतीत मिळालेले सुवर्णपदक काढून घेण्यात येणार आहे.
  • उसेन बोल्टचा साथीदार नेस्टा कार्टर उत्तेजक चाचणीत दोषी आढळला आहे. मेथीलहेक्सानेमाईन हे द्रव्य कार्टरच्या नमुन्यात आढळले आहे.
  • २००८सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बोल्टचा समावेश असलेल्या जमैकाच्या चमुने ४x१०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली होती.
  • पण त्या संघाचा सदस्य असलेल्या नेस्टा कार्टरने प्रतिबंधित उत्तेजकांचे सेवन केल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) केलेल्या पुनर्तपासणीत स्पष्ट झाले आहे.
  • यामुळे जमैकाच्या संघाचे रिलेचे सुवर्णपदक काढून घेतले जाणार आहे. त्याऐवजी ट्रिनिदाद आणि टोबॅगोच्या संघाला सुवर्णपदक देण्यात येईल. तसेच जपानला रौप्य तर ब्राझिलला कांस्यपदक बहाल केले जाईल. 
  • बोल्टकडे एकूण नऊ ऑलिम्पिक सुवर्णपदके होती, मात्र त्यापैकी एक परत करावे लागल्याने ती संख्या आठवर पोहचली आहे.
  • बोल्टने २००८ (बीजिंग), २०१२ (लंडन) आणि २०१६ (रिओ) ऑलिम्पिकमध्ये १००, २०० आणि ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये सुवर्ण पदके जिंकली आहेत.

श्रमभूषण पुरस्कार २०१५

  • केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने २०१५साठीचे ‘श्रमभूषण’ पुरस्कार एका महिलेसह चार कामगारांना जाहीर केला आहे . एक लाख रुपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • केंद्र व राज्य सरकारांचे सार्वजनिक उपक्रम आणि ५००हून अधिक कर्मचारी असलेले खासगी कारखाने यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमधून दरवर्षी ‘श्रमरत्न’, ‘श्रमभूषण’, ‘श्रमवीर /श्रम विरांगना’ आणि ‘ श्रमश्री/ श्रमदेवी’ अशा विविध वर्गातील पुरस्कारांचे विजेते निवडले जातात.
  • सन २०१५साठी ‘श्रमरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार कोणालाही जाहीर झालेला नाही. 
  • चौघांना ‘श्रमभूषण’, २४ जणांना श्रमवीर /श्रम विरांगना’ व २८ जणांना ‘श्रमश्री/ श्रमदेवी’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 श्रमभूषण पुरस्कार विजेते 
  • एम. रामकृष्णन (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स)
  • श्रीमती अभिलाशा पेठे (स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया)
  • श्यामसुंदर गंगाराम पाडेकर (लार्सन अ‍ॅण्ड ट्युब्रो)
  • रतनकुमार शामराव कांबळे (बजाज ऑटो)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा