चालू घडामोडी : २८ जानेवारी

डॉ. विजय भटकर नालंदा विद्यापीठाचे नवे कुलगुरू

  • प्रसिद्ध संशोधक आणि ‘परम’ महासंगणकाचे (सुपरकॉम्प्युटर) निर्माते डॉ. विजय भटकर यांची बिहारमधील नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.
  • नालंदाचे मावळते प्रभारी कुलगुरू प्रा. पंकज मोहन यांच्याकडून भटकर पदभार स्वीकारतील. कुलगुरू म्हणून ते तीन वर्षे काम पाहतील.
  • दोन महिन्यांपूर्वी सिंगापूरचे माजी मंत्री असलेले जॉर्ज यिओ यांनी राजीनामा दिल्याने कुलपतिपद रिक्त झाले होते.
  • त्यामुळे पंकज मोहन यांच्यावर प्रभारी कुलगुरूपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
 विजय भटकर यांच्याविषयी 
  • ११ ऑक्टोबर १९४६ रोजी जन्मलेले विजय पांडुरंग भटकर हे मूळचे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा गावाचे आहेत.
  • भारतात 'परम' या पहिल्या सुपर कॉम्प्युटरची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा असणारे भटकर यांनी देशाच्या संगणक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
  • सुपरकॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या ‘सी-डॅक’ या संस्थेचे संस्थापक व पहिले कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी कार्य केले आहे.
  • त्याशिवाय त्यांनी ईआर अँड डीसी, ईटीएच रिचर्स लॅब, एमकेसीएल, इंडिया इंटरनॅशनल मल्टियुनिव्हर्सिटी इ. राष्ट्रीय संस्थांच्या स्थापनेतही प्रमुख सहभाग नोंदवला आहे.
  • भटकर यांनी भारत सरकारच्या विज्ञान सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
  • तसेच वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन देखरेख समिती (सीएसआयआर) या संस्थेच्या नियामक परिषदेचेही ते सदस्य होते.
  • महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या ई गव्हर्नन्स समितीवर त्यांनी काम केले आहे. देशातील आघाडीच्या विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यावसायिक संस्थांवर ते काम करीत आहेत.
  • अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या आयटी टास्क फोर्समध्येही त्यांचा समावेश होता.
  • पद्मभूषण, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी त्यांना भारत आणि महाराष्ट्र सरकारने यापूर्वी गौरविले आहे.
  • भटकर यांनी १२ पुस्तके आणि ८० शोधनिबंध लिहिले आहेत. सध्या ते इंडिया इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.
 नालंदा विद्यापीठाविषयी 
  • मुळ नालंदा विद्यीपाठाची उभारणी प्राचीन भारतातील मगध साम्राज्याच्या काळात झाली.
  • इसवी सन पाचशे ते इसवी सन बाराशे या आठशे वर्षांच्या काळात नालंदा विद्यापीठ अस्तित्वात होते.
  • विद्यीपाठात सुमारे दोन हजारांवर शिक्षक आणि दहा हजारांवर विद्यार्थी शिकत होते.
  • चीन, कोरिया, जपान, तिबेट, मंगोलिया, टर्की, श्रीलंका आणि दक्षिण-पूर्व आफ्रिका या भागातून बुद्धिवंत शिकण्यासाठी नालंदात येत असत.
  • ह्युआँग साँग या चीनी प्रवाश्याने नालंदाबद्दल तपशिलवार लिहून ठेवले आहे. बाराव्या शतकात परकीय आक्रमकांनी नालंदाचा विद्ध्वंस केला.
  • नालंदा विद्यापीठ पूर्व आणि पश्चिम जगाचा दुवा होता. नालंदा नष्ट होण्यापूर्वी जगामध्ये नालंदाशिवाय केवळ चार विद्यीपाठे होते.
  • त्यामध्ये कैरोमधील अल अझहर (स्थापना इ.स.९७२), इटलीमधील बोलोगना (इ.स.१०८८) आणि ब्रिटनमधील ऑक्सफर्ड (इ.स.११६७) यांचा समावेश होता.
  • नालंदा विद्यापीठाचा विद्ध्वंस झाल्यानंतर सुमारे आठ शतकांनी विद्यापीठाची पुनर्उभारणी करण्यात आली.
  • मार्च २००६मध्ये तत्कालिन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी बिहार विधानसभेत बोलताना पुनर्उभारणीची संकल्पना मांडली.
  • सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज येओ यांनी तत्काळ ‘नालंदा प्रस्ताव’ केंद्र सरकारकडे पाठविला. यानंतर नालंदा विद्यापीठाची पुनर्स्थापना करण्यात आली.

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक

  • दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक मिळवला आहे.
  • महाराष्ट्राने लोकमान्यांच्या १६०व्या जयंती वर्षानिमित्त आपल्या चित्ररथाद्वारे टिळकांचे बहुआयामी व्यक्तीमत्व सादर केले.
  • लोकमान्य टिळकांचे व्यक्तीमत्व आणि त्यांच्या सामाजिक जनजागृतीच्या कार्यावर आधारीत देखावा महाराष्ट्राच्या चित्ररथातून मांडण्यात आला होता.
  • या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती विख्यात कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केली.
  • त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ४० कारागिरांनी हा अतिशय लक्षवेधी चित्ररथ तयार केला होता.
  • यावर्षी अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला असून त्रिपुरा राज्याच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक मिळवला आहे. 
  • प्रजासत्ताक दिनाच्या संचलनापूर्वी चित्ररथांची एक स्पर्धा भरवण्यात येते. गेल्यावर्षी त्यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता.

शहीद हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्र

  • राष्ट्रीय रायफल्सचे शहीद हवालदार हंगपन दादा यांना २६ जानेवारी रोजी मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • त्यांनी काश्मीरच्या हिमाच्छादित पर्वतराजीत लपून बसलेल्या ३ दहशतवाद्यांचा एकट्याने खात्मा केला होता. परंतु या चकमकीत त्यांना आपला प्राण गमवावा लागला होता.
  • ६८व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या पत्नी चासेन लोवांग दादा यांना हा पुरस्कार प्रदान केला.
  • अशोक चक्र हा भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. शांततेच्या काळात दाखवलेल्या अतुलनीय कामगिरीबाबत हा पुरस्कार देण्यात येतो.
  • अरुणाचल प्रदेशच्या बोदुरिया गावातील मूळ रहिवासी हवालदार हंगपन यांना त्यांचे सहकारी प्रेमाने दादा अशी हाक मारत.
  • दादा १९९७मध्ये लष्कराच्या आसाम रेजिमेंटद्वारे लष्करात सहभागी झाले होते. नंतर त्यांची ३५ राष्ट्रीय रायफल्समध्ये नेमणूक करण्यात आली.

सेरेना विल्यम्सला ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

  • अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने तिची बहिण व्हीनस विल्यम्सचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनचे (महिला एकेरी) विजेतेपद पटकावले.
  • हा सेरेनाचा २३वा ग्रँड स्लॅम विजय असून, या विजेतेपदासह तिने स्टेफी ग्राफचा २२ ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मोडला आहे.
  • महिलांच्या टेनिस स्पर्धांमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅमची विजेती होण्यासाठी आता तिला अजून दोन विजेतेपदांची गरज आहे. सध्या हा विक्रम मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर आहे.
  • सेरेनाने अंतिम सामन्यात व्हीनसचा ६-४, ६-४ अशा दोन सरळ सेटमध्ये व्हीनसचा पराभव केला.
  • सेरेनाचे हे सातवे ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. या विजेतेपदासह तिने जागतिक क्रमावरीत पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

सात मुस्लिमबहुल देशांतील निर्वासितांना अमेरिकेत येण्यास बंदी

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका आदेशाद्वारे ७ मुस्लिमबहुल देशांतील निर्वासितांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
  • सीरिया, इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या सात देशातल्या नागरिकांवर अमेरिकाप्रवेशासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सध्या ही बंदी तात्पुरत्या स्वरुपात असणार आहे.
  • कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांपासून अमेरिकेचा बचाव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण ट्रम्प यांनी दिले आहे.
  • निवडणूकीपूर्वीच मुस्लिम नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती.
  • तसेच त्यांनी यापूर्वी स्थलांतरीत नागरिकांचा प्रश्न सोडविण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचे आदेश दिले आहेत.
  • आता या नव्या नियमामुळे अमेरिकेच्या निर्वासित आणि विस्थापित पुनर्वसन कार्यक्रमाला किमान १२० दिवसांची स्थगिती मिळाली आहे.
  • तसेच अमेरिकेत येणाऱ्या कोणाही नागरिकाला पुढील ९० दिवसांपर्यंत व्हिसा दिला जाणार नाही.
  • यादरम्यानच्या काळात, नवे नियम आणले जातील, ज्यांमध्ये व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या पार्श्वभूमीची कसून चौकशी करण्यात येईल.
  • विशेष म्हणजे या नियमातून काही धर्मांना अपवाद करण्यात आले आहे. म्हणजेच हे नियम ख्रिस्ती लोकांना लागू नसतील.
  • स्थानिक मुक्त चळवळींचे गट तसेच दहशतवादविरोधी अभ्यासकांनी हा निर्णय मुस्लिमांप्रति भेदभाव करणारा असल्याचे सांगत त्याचा निषेध केला आहे.
  • माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी निर्वासितांसाठी वार्षिक १.१० लाख इतकी मर्यादा घातली होती. ही मर्यादा ५० हजारापर्यंत आणण्याचा ट्रम्प यांचा इरादा आहे.

सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर कन्नड चित्रपट बनणार

  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट कन्नड भाषेत तयार केला जात आहे.
  • कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रख्यात कलाकार तारा व सुचिंद्र प्रसाद हे अनुक्रमे सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुलेंची भूमिका साकारणार आहे.
  • ज्येष्ठ पत्रकार सर्जू काटकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीवर आधारित चित्रपट काढण्यात येत आहे.
  • सावित्रीबाई फुले यांचे कार्य इतर भाषेतही कळावे आणि त्यांच्या थोरवीची जाणीव व्हावी म्हणून काटकर यांनी ही कादंबरी लिहिली.

ऑस्ट्रेलिया सरकारद्वारे तीन भारतीय वंशाच्या व्यक्तींचा सन्मान

  • सामाजिक कार्य आणि वैद्यकीय क्षेत्रामधील भरीव योगदानाबद्दल ऑस्ट्रेलिया सरकारने भारतीय वंशाच्या तिघांना सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे.
  • पुरुषोत्तम सावरीकर, माखनसिंग खांगुरे आणि विजय कुमार अशी या तिघांची नावे असून, त्यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया मेडल २०१७ जाहीर झाले आहे.
  • सावरीकर यांचा सिडनी येथे वैद्यकीय व्यवसाय आहे. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करत व्यापक जनहित साधल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • सावरीकर हे ऑस्ट्रेलियन इंडियन मेडिकल ग्रॅज्युएट्‌स असोसिएशनचे माजी अध्यक्ष असून, त्यांनी आकाशवाणी सिडनीचीही स्थापना केली आहे.
  • पर्थ येथे राहणारे माखनसिंग खांगुरे यांनीही न्यूरोरेडिओलॉजी, शिक्षण आणि इतर वैद्यकीय संघटनांच्या माध्यमातून जनतेची सेवा केल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे.
  • विजय कुमार हे न्यूक्लिअर मेडिसीन तज्ज्ञ आणि संशोधक आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनकार्याबद्दल ऑस्ट्रेलिया सरकारने त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • कुमार हे सिडनी येथील तमीळ संगम संघटनेचेहे सदस्य आहेत. त्यांना न्यूक्लिअर सायन्स क्षेत्रामधील योगदानाबद्दलही २००७ आणि २०१४मध्येही पुरस्कार मिळाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा