चालू घडामोडी : १ फेब्रुवारी

खासदार ई अहमद यांचे निधन

  • इंडियन युनियन मुस्लीम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार ई अहमद यांचे निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते. 
  • अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिभाषण सुरू असताना त्यांची प्रकृती बिघडली.
  • त्यानंतर त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
  • लोकसभा खासदार म्हणून २५ वर्षांची दीर्घ कारकीर्द राहिलेले ई अहमद केरळमधील मल्लापुरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते.
  • तसेच, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये ई अहमद यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाची जबाबदारी पाड पाडली होती.
  • मुस्लिम विद्यार्थी संघटनेचे सचिव म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरूवातीच्या काळात ते केरळ विधानसभेवर निवडून गेले होते. १९८२ ते १९८७मध्ये ते केरळ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.
  • ई अहमद यांनी पश्चिम आशिया आणि भारतामध्ये सौहादपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
  • याशिवाय, त्यांनी १९९१ ते २०१४ या काळात अनेकदा संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्वही केले होते.
  • अहमद यांनी आखाती देशांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.
  • हज यात्रेदरम्यान पवित्र काबा विधींसाठी जगभरातून आमंत्रण देण्यात आलेल्या मोजक्या व्यक्तींमध्ये ई अहमद यांचा समावेश होता.

अनुष्का शर्मा ‘स्वच्छ भारत’चा प्रचार करणार

  • शहर विकास मंत्रालयाद्वारे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी अभिनेत्री अनुष्का शर्माची निवड करण्यात आली आहे.
  • महिला आणि ग्रामीण भागांमध्ये स्वच्छ भारत अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी लोकप्रियतेच्या निकषावर अनुष्काची निवड करण्यात आली आहे.
  • पंतप्रधान मोदींच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करणारी अनुष्का शर्मा पहिली महिला आहे.
  • यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार केला आहे.

द्रव्याची नवी अवस्था टाइम क्रिस्टल्स

  • अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातील वैज्ञानिकांना काल स्फटिक अर्थात टाइम क्रिस्टल्स तयार करण्यात यश आले आहे.
  • मेरीलँड विद्यापीठाच्या ख्रिस मन्रो व सहकाऱ्यांनी येटेरबियमचे १० आयन वापरून या स्फटिकांची निर्मिती केली आहे.
  • याची संकल्पना कॅलिफोर्निया विद्यापीठाचे नॉर्मन येव व इतर दोन संशोधक गटांनी मांडली होती.
  • द्रव्याची ही नवी अवस्था असून ती काळाशी सममित आहे. हे स्फटिक त्यांची रचना काळाच्या मितीत सतत पुनरावृत्त करतात.
  • साधारण स्फटिकांची आण्विक रचना अवकाशमितीत पुनरावृत्त होते, तर टाइम क्रिस्टल्सची आण्विक रचना ही कालमितीत पुनरावृत्त होते.
  • हे स्फटिक गतिहीन समतोलात स्थिर होत नाहीत व ते स्पंदित होत राहतात. असमतोलित द्रव्य अवस्थेचे हे उदाहरण आहे.
  • मेरीलँडमधील प्रयोगात येटेब्रियमच्या अणूंवर चुंबकीय क्षेत्र व लेसरचा मारा करून त्यांची आण्विक रचना कालमितीत पुनरावृत्त करण्यात आली.
  • टाइम क्रिस्टल्स हे क्युबिट सिस्टीमसारखे काम करतात म्हणजे त्यांचा उपयोग क्वांटम संगणकात करता येऊ शकतो.
  • अगदी सुरुवातीला या स्फटिकांची संकल्पना नोबेल विजेते वैज्ञानिक फ्रँक विलझेक यांनी २०१२मध्ये मांडली होती.

नील गॉरस्यूख अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

  • अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पुराणमतवादी न्यायाधीश नील गॉरस्यूख यांचे नामांकन केले आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी या निवडीला कडाडून विरोध केला आहे. 
  • सर्वोच्च न्यायालयावर नामांकन करण्यात आलेले ४९ वर्षीय नील हे गेल्या २५ वर्षांतील सर्वांत कमी वयाचे न्यायाधीश आहेत.
  • मूळचे कोलोरॅडोमधील असलेले नील गॉरस्यूख हे 'टेन्थ सर्किट'साठीच्या अमेरिकन अपिलीय न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा