चालू घडामोडी : २ फेब्रुवारी

राजकीय पक्षांकडे येणाऱ्या बेहिशेबी देणग्यांवर टाच

  • राजकीय पक्षांकडे येणाऱ्या बेहिशेबी देणग्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
  • या तरतुदीनुसार केवळ २,००० रुपयांपर्यंतच्या देणग्याच रोखीने घेण्याची मुभा राजकीय पक्षांना देण्यात आली आहे. सध्या ही मर्यादा २०,००० रुपये आहे.
  • तसेच सर्व अटीशर्ती पूर्ण करणाऱ्या राजकीय पक्षांनाच प्राप्तिकरातून सूट देण्यात येणार आहे.
  • अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार राजकीय पक्षांना यापुढे चेक आणि डिजिटल माध्यमातूनच देणग्या स्वीकाराव्या लागतील.
  • याशिवाय राजकीय पक्षांना देणग्या देण्यासाठी खास निवडणूक रोखे (इलेक्शन बॉण्ड) काढण्याचाही निर्णयही घेण्यात आला आहे.
  • १९५१च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार, २०,००० रुपयांपेक्षा अधिकच्या देणग्यांचा तपशील निवडणूक आयोगाला देण्याचे बंधन राजकीय पक्षांवर आहे.
  • पण याचाच दुसरा अर्थ असा आहे की, रोख स्वरूपात अमर्यादित देणग्या घेण्याची मुभाच राजकीय पक्षांना मिळाली आहे.

कुवेतमध्ये पाच मुस्लिम देशातील नागरिकांना प्रवेशबंदी

  • अमेरिकेपाठोपाठ कुवेतने पाकिस्तानसह पाच मुस्लिम देशातील नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे.
  • कुवेतने सीरिया, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणमधील नागरिकांना  व्हिसा देणे स्थगित केले आहे.
  • कुवेतमध्ये कट्टरपंथीय इस्लामी दहशतवाद्यांनी हात-पाय पसरु नये यासाठी खबरदारी म्हणून कुवेतने ही प्रवेशबंदी केली आहे. 
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २९ जानेवारी रोजी सिरिया, इराण, इराक, सुदान, लिबीया, येमेन आणि सोमालिया या देशातील नागरीकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली होती.
  • अमेरिकेच्याआधीच कुवेतने सीरियातील नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध लादले होते. कुवेतने २०११मध्ये सीरियाच्या नागरिकांना व्हिसा देणे बंद केले होते.

रेक्स टिलर्सन अमेरिकेचे नवे परराष्ट्रमंत्री

  • एक्सॉन मोबीलचे माजी अध्यक्ष रेक्स टिलर्सन यांची अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सिनेटने ५६-४३ अशा मतांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिल्यानंतर ६४ वर्षीय टिलर्सन यांना उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.
  • सिनेटने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश निश्चित झाला आहे.
  • सिनेटमधील डेमॉक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी टिलर्सन यांचे रशिया आणि व्लादिमीर पुतीन यांच्याशी असलेल्या संबंधांवरून त्यांना विरोध दर्शविला आहे.

सुनील जोशी हत्याप्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग निर्दोष

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणी नऊ वर्षांनंतर साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
  • २९ डिसेंबर २००७ रोजी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून जोशी यांची हत्या केली होती. जोशी त्यावेळी काँग्रेस नेत्याच्या हत्येप्रकरणी फरार होते. 
  • २०११ मध्ये या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला. त्यानंतर एनआयएने ३ वर्षांनी विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.
  • २०१५मध्ये सत्र न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंग आणि अन्य सात जणांवर आरोप दाखल केले होते.
  • सुनील जोशी हे साध्वी प्रज्ञासिंग यांच्याप्रमाणेच मालेगाव, समझौता एक्स्प्रेस आणि अजमेर बॉम्बस्फोट प्रकरणांतील आरोपी होते.
  • साध्वी प्रज्ञासिंग यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप मध्य प्रदेश पोलिसांनी केला होता. मात्र एनआयएने हा आरोप खोडून काढला होता.

एअरसेल मॅक्सिस खटल्यामध्ये मारन बंधूंची पुराव्याअभावी मुक्तता

  • एअरसेल मॅक्सिस खटल्यातून माजी केंद्रीय दूरसंचारमंत्री दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी मारन यांच्यासह अन्य आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली आहे.
  • सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालयाने मारन बंधूंसह इतर आरोपींविरोधात खटला दाखल करण्यात आला होता.
  • या खटल्यावर निकाल देताना न्यायालयाने या सर्वांविरोधात सबळ पुरावे नसल्याचे सांगत सर्वांची खटल्यातून मुक्तता केली. 
  • २००६साली चेन्नईतील टेलिकॉम प्रमोटर सी. शिवशंकर यांच्यावर एअरसेल आणि तिच्या सहयोगी कंपन्यांमधील त्यांचे समभाग मलेशियातील मॅक्सिस ग्रुपला विकण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप मारन यांच्यावर होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा