चालू घडामोडी : ७ फेब्रुवारी

अमेरिकेकडून भारताला ‘विशेष संरक्षण भागीदारा’चा दर्जा

  • अमेरिकेने भारताला ‘विशेष संरक्षण भागीदारा’चा दर्जा देत, भारतासाठी अमेरिकेच्या निर्यात नियंत्रण कायद्यात महत्त्वाचे बदल केले आहेत.
  • हे बदल भारताच्यादृष्टीने फायदेशीर ठरणार असून त्यामुळे तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांचे हस्तांतरण सुलभ होणार आहे.
  • ओबामा प्रशासनाने भारताला दिलेला ‘विशेष संरक्षण भागीदार’ हा दर्जा नव्या प्रशासनानेही मान्य केला आहे.
  • याअंतर्गत भारतीय आणि अमेरिकी कंपन्यांना मान्यताप्राप्त अंतिम वापरकर्ते (व्हीईयू) असा दर्जा प्राप्त झाल्यानंतर नागरी आणि लष्करी उत्पादनांच्या निर्मितीसाठी वैयक्तिक परवान्याची गरज उरणार नाही.
  • या कायद्यानुसार संहारक शस्त्रास्त्रांचा अपवाद वगळता लष्कराशी संबंधित व्यापारी सामुग्रीची आयात करणाऱ्या भारतीय कंपन्यांना पूर्वमंजूरी मिळणार आहे.
  • त्यामुळे केवळ अपवादात्मक परिस्थितीत भारताला परवाना नाकारण्यात येऊ शकतो.
  • त्यामुळे जागतिक पुरवठा साखळी निर्माण करण्यात आणि बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीला तोंड देता येणे अधिक सुलभ होणार आहे.
  • अमेरिकेच्या मागीलवर्षीच्या अर्थसंकल्पात भारताला अमेरिकेचा प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून स्थान देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
  • गेल्या ५ वर्षात भारत आणि अमेरिकेत संरक्षण सामुग्रीच्या खरेदीसाठी ५०० कोटींचे व्यवहार झाले होते. आता नव्या कायद्यानुसार या व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या परवान्यांना आपोआप मंजूरी मिळणार आहे.
  • याशिवाय, नव्या कायद्यान्वये २५ टक्क्यांपेक्षा कमी अमेरिकन घटक असलेल्या सामुग्रीच्या खरेदीसाठी भारतीय कंपन्यांना अमेरिकी कायद्याची पुन्हा परवानगी घेण्याची गरज नाही.

आझाद हिंद सेनेचे सेनानी निझामुद्दीन यांचे निधन

  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चालक आणि आझाद हिंद सेनेमधील सक्रीय सदस्य निझामुद्दीन यांचे ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ते ११६ वर्षाचे होते.
  • उत्तरप्रदेशमधील आझमगडमध्ये राहणारे नेताजींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे निझामुद्दीन हे सैफूद्दीन या नावानेही परिचित होते.
  • निझामुद्दीन यांचा जन्म १९०१मध्ये झाला होता. ते सुभाषचंद्र बोस यांचे चालक आणि सुरक्षारक्षक होते. आझाद हिंद सेनेत ते कर्नल पदावर कार्यरत होते.
  • सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी हिटलरची भेट घेण्यासाठी गेले होते. या ऐतिहासिक भेटीचे निझामुद्दीन साक्षीदार होते.
  • नेताजींसोबत जपान, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर देशांमध्येही ते गेले होते. २०१६मध्ये ११६ वर्षीय निझामुद्दीन यांनी बँक खाते उघडल्याने ते चर्चेत आले होते.

ईडी प्रमुखांना दोन वर्षांचा स्थिर कार्यकाळ

  • सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) प्रमुख कर्नालसिंग यांना दोन वर्षांचा स्थिर कार्यकाळ केंद्र सरकारने जाहीर केला आहे.
  • सिंग यांना स्थिर कार्यकाळ देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • कर्नालसिंग हे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) १९८४च्या बॅचचे अधिकारी आहेत.
  • ऑक्टोबर २०१६मध्ये सिंग यांची ‘ईडी’च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते या वर्षी ऑगस्ट महिन्यात निवृत्त होणार होते.
  • परंतु मंत्रिमंडळाने आता त्यांना दोन वर्षांचा स्थिर कार्यकाळ देण्यास मंजुरी दिली आहे. हा कार्यकाळ २७ ऑक्टोबर २०१६ पासून गृहीत धरण्यात येईल.
  • केंद्रीय दक्षता आयोग कायद्यातील तरतुदीनुसार सिंग यांना किमान दोन वर्षांचा कार्यकाळ देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते.

भारतीय वंशाचे अनिश कपूर यांना इस्राईलमध्ये प्रतिष्ठित पुरस्कार

  • भारतीय वंशाचे प्रसिद्ध ब्रिटिश शिल्पकार अनिश कपूर यांना १० लाख अमेरिकन डॉलर्सचा इस्राईलमधील प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
  • सीरियन निर्वासितांच्या हक्कासाठी त्यांनी केलेल्या कामाबाबत आणि ज्युईश मूल्यांच्या बांधिलकीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
  • सरकारने निर्वासितांसाठी राबविलेल्या योजनांवर त्यांनी कडाडून टीका केली होती. 
  • मुंबईत जन्म झालेल्या कपूर यांचे वडील भारतीय, तर आई ज्युईश होती. पुरस्कारातून मिळालेला पैसा हा त्यांनी युद्धातील गरजूंना देण्याचे ठरविले आहे.
  • कपूर यांच्यासोबतच इत्झहाक पर्लमन, न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर मायकल ब्लुमबर्ग आणि अभिनेते दिग्दर्शक मायकल डग्लास यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

लता मंगेशकर डी लिट पदवीने सन्मानित

  • गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे डी लिट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • विद्यापीठाने २०११मध्ये आशा भोसले यांचा डी लिट पदवी देऊन गौरव केला आहे.
  • विद्यापीठाने यापूर्वी वि. वा. शिरवाडकर, शांताबाई दाणी, बाबा आढाव यांनाही डी लिट उपाधीने सन्मानित केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा