चालू घडामोडी : ८ मार्च

मोफत एलपीजी कनेक्शनसाठी आधार अनिवार्य

  • दारिद्र्य रेषेखाली असलेल्या महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन हवे असेल तर त्यांच्याकडे आधारकार्ड असणे अनिवार्य राहील अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमार्फत तीन वर्षांच्या कालावधीमध्ये पाच कोटी महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात येईल असे सरकारने जाहीर केले होते.
  • ज्या लोकांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्याकडे आधारकार्ड असणे अनिवार्य राहील असे पेट्रोलियम मंत्रालयाने जाहीर केले आहे.
  • ज्या महिलांकडे आधारकार्ड नाही त्यांनी ३१ मेपूर्वी त्यासाठी अर्ज करावा लागेल. आधारकार्डासाठी अर्ज केला असल्यास केवळ आधार नोंदणीच्या पावतीद्वारे या योजनेचा लाभ घेता येईल.
  • मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये गॅस सबसिडीसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनासाठीही आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले होते.
  • केंद्र सरकारद्वारा मिळणाऱ्या सर्व सरकारी सुविधांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे.

आयडीएफसी बँकेकडून आधार पे अॅप लाँच

  • खासगी बँकींग क्षेत्रातील आयडीएफसी बँकेने पहिले 'आधार पे अॅप' लाँच केले आहे. या अॅपद्वारे स्मार्टफोन नसलेल्या व्यक्तीदेखील कॅशलेस व्यवहार करू शकतात, हे या अॅपचे वैशिष्ट्य आहे.
  • भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून केंद्र सरकारद्वारे देशभरात डिजिटल व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच ‘आधार पे’ एक भाग आहे.
 आधार पे अॅपची वैशिष्ट्ये 
  • या अॅपचा वापर केल्यास क्रेडिट किंवा डेबिट कार्डची सुविधा पुरवण्याच्या मोबदल्यात बँकांकडून जोर सेवाकर लावला जातो तो व्यापारी सवलत दर  (Merchant Discount Rate) द्यावा लागणार नाही.
  • एखादा व्यापारी किंवा दुकानदार स्मार्टफोनशिवाय पैसे भरण्यासाठी या अॅपचा वापर करू शकतो. 
  • या अॅपद्वारे पैशांचा व्यवहार करण्यासाठी बोटांचे ठसे किंवा बायोमीट्रिक डेटा प्रमाणित केला जाणार आहे. त्याशिवाय व्यवहार पूर्ण होणार नाही.
  • यासाठी बँक खात्यांसोबत आधार कार्ड क्रमांक जोडलेला असणे गरजेचे आहे.
  • तसेच कॅशलेस व्यवहारासाठीच या अॅपचा वापर केला जाऊ शकतो. याद्वारे कोणत्याही प्रकारचा फंड ट्रान्सफर करण्याचा पर्याय सध्या उपलब्ध नाही.
  • सध्या आधार पे अॅपद्वारे जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणे शक्य आहे.
  • हे आधार पे अॅप UIDAI आणि NPCI (National Payments Corporation Of India) यांनी एकत्रितपणे अॅप विकसित केले आहे.

नोटाबंदीमुळे देशातील अब्जाधीशांच्या संख्येत घट

  • हुरन ग्लोबल रिच या आंतरराष्ट्रीय संस्थेने अब्जाधीशांची यादी तयार केली आहे. या संस्थेच्या अहवालानुसार नोटाबंदीमुळे भारतातील अब्जाधीशांची संख्या घटली आहे.
  • या अब्जाधीशांच्या यादीत भारतातील १३२ जणांचा समावेश असून, त्यात रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी प्रथम स्थानी कायम आहेत.
  • अंबानी यांच्यानंतर एस पी हिंदूजा हे दुसऱ्या, तर सन फार्मासिटीकलचे दिलीप संघवी हे तिसऱ्या स्थानी आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या.
  • या नोटाबंदीमुळे देशातील ११ अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाल्याने त्यांना यंदा अब्जाधीशांचा यादीत स्थान मिळवता आलेले नाही.
  • भारतात अब्जाधीशांकडे एकूण ३९२ अब्ज डॉलर इतकी संपत्ती असून, त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • या अहवालानुसार, मुंबईत ४२, दिल्लीत २१ आणि अहमदाबादमध्ये एकूण ९ अब्जाधीश आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात एकूण ५१ अब्जाधीश आहेत.
भारतीय अब्जाधीश आणि त्यांची संपत्ती
क्र. नाव संपत्ती (अब्ज डॉलर)
१. मुकेश अंबानी २६
२. एस पी हिंदुजा १४.५
३. दिलीप संघवी १४
४. पल्लोनजी मिस्त्री १२.३
५. लक्ष्मी निवास मित्तल १२

बंगाली लोकसंगीतकार कालिकाप्रसाद भट्टाचार्य यांचे निधन

  • ख्यातनाम बंगाली लोकसंगीतकार व गायक कालिकाप्रसाद भट्टाचार्य यांचे ८ मार्च रोजी पश्चिम बंगालमधील पालसित येथे रस्ता अपघातात निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते.
  • भट्टाचार्य हे दोहार या बांगला बँडच्या त्यांच्या चार सहकाऱ्यांसह प्रवास करीत होते. त्यांच्या एसयूव्ही वाहनास मागून आलेल्या ट्रकने धडक दिली.
  • भट्टाचार्य यांना इतरासंह वर्धमान मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे भट्टाचार्य यांना मृत घोषित करण्यात आले.
  • भट्टाचार्य यांचा जन्म सिलचर येथे झाला होता. ग्रामीण बंगालमधील लोकगीते त्यांनी लोकप्रिय केली शिवाय त्यांनी ‘दोहर’ नावाचा बँड स्थापन केला होता.
  • जतीश्वर (२०१४), मोनेर मानुष (२०१०) व भुवन माझी (२०१७) अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.

अश्विन आणि जडेजा आयसीसी क्रमवारीत सामाईकरित्या प्रथम स्थानी

  • रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या भारतीय संघाच्या फिरकी जोडीला कसोटी गोलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत सामाईकरित्या प्रथम स्थान मिळाले आहे.
  • एकाच संघाच्या फिरकीजोडीने कसोटी क्रमवारीत प्रथम स्थान प्राप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • याआधी क्रिकेट विश्वात कोणत्याही संघाच्या फिरकी जोडीला एकाच वेळी प्रथम स्थानावर कब्जा करण्याची किमया करता आली नव्हती.
  • ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बंगळुरू कसोटीत अश्विनने दोन्ही डावात एकूण ८ विकेट्स घेतल्या, तर जडेजाने एकूण ७ विकेट्स घेतल्या.
  • या कसोटीपूर्वी अश्विन कसोटी क्रमवारीत प्रथम स्थानावर, तर जडेजा दुसऱया स्थानावर होता.
  • याआधी २००८ साली दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेन आणि श्रीलंकेचा फिरकीपटू मुरलीधरन यांना सामाईकरित्या अव्वल स्थान मिळाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा