चालू घडामोडी : १५ मार्च

मनोहर पर्रीकर चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री

  • गोव्याचे १३वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांनी १४ मार्च रोजी चौथ्यांदा शपथ घेतली. पर्रीकरांनी कोकणी भाषेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
  • पर्रीकर यांच्याव्यतिरिक्त आणखी तेरा मंत्र्यांना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.
  • सध्या पर्रीकरांकडे एकूण २३ आमदारांचा पाठिंबा आहे. ते १६ मार्च रोजी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करणार आहेत.
  • गोव्यात भाजपाच्या सत्ता स्थापनेला स्थगिती देण्यासाठी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली होती.
  • ४० सदस्यांच्या गोवा विधानसभेत बहुमतांसाठी २१ सदस्यांची आवश्यकता आहे. भाजपाचे १३ आमदार निवडून आले असून, काँग्रेसचे संख्याबळ १७ आहे. असे असतानाही भाजपाने छोटया पक्षांना आणि अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे.

बिरेन सिंह हे भाजपचे मणिपूरमधील पहिले मुख्यमंत्री

  • गोव्यापाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपाचे सरकार स्थापन झाले. राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी भाजपच्या एन बिरेन सिंग यांना मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
  • यावेळी इतर आठ मंत्र्यांनीही पदाची शपथ घेतली. तर नॅशनल पीपल्स पार्टीचे आमदार वाय. जॉयकुमार सिंह यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
  • मणिपूरमध्ये प्रथमच भाजपाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले आहे. भाजपाला नागा पीपल्स फ्रंटने (एनपीएफ) पाठिंबा दिला आहे. 
  • एनपीएफपूर्वी नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) चार आमदारांनी भाजपाला पाठिंबा घोषित केला होता.
  • त्यामुळे ६० सदस्यीय मणिपूर विधानसभेत आपल्याला ३२ सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपाने केला आहे.
  • गोव्याप्रमाणे मणिपूरमध्येही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. पण बहुमताचा आकडा जमवण्यात अपयशी ठरल्याने इथेही काँग्रेसची सत्ता स्थापनेची संधी हुकली आहे.
  • बिरेन सिंह हे भाजपचे राज्यातील पहिले मुख्यमंत्री असतील. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. हीनगॅंग मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
  • फुटबॉल खेळाडू ते पत्रकार आणि त्यानंतर राजकीय नेते असा प्रवास केलेले बिरेन सिंह हे मावळते मुख्यमंत्री इबोबी सिंह यांचे विश्वासू सहकारी होते.

शशांक मनोहर यांचा आयसीसी चेअरमनपदाचा राजीनामा

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) चेअरमन शशांक मनोहर यांनी आपल्या पदाचा वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे.
  • शशांक मनोहर यांची १२ मे २०१६ रोजी दोन वर्षांसाठी आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती.
  • कर्तव्यकठोर प्रशासक अशी ओळख असलेल्या मनोहर यांनी दोन वेळा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद भूषवले आहे.
  • २५ सप्टेंबर २००८ ते १९ सप्टेंबर २०११ दरम्यान मनोहर यांनी पहिल्यांदा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते.
  • त्यानंतर २०१५साली जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा शशांक मनोहर यांच्याकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते.
  • मात्र आयसीसीच्या चेअरमनपद भूषणवण्याची संधी मिळाल्यावर मनोहर यांनी १० मे २०१६ रोजी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

दिल्लीत जीवनमानाचा दर्जा सर्वाधिक वाईट

  • जागतिक स्तरावरील सर्वात मोठी मानवी संसाधन सल्लागार संस्था असलेल्या ‘मर्सा’ने जगभरातील शहरांमधील राहणीमानाचे आणि तेथील मुलभूत सोयीसुविधांचे सर्वेक्षण करुन अहवाल तयार केला आहे.
 या अहवालातील काही ठळक मुद्दे 
  • भारताची राजधानी असलेले दिल्ली शहर सलग दुसऱ्या वर्षी जीवनमानाचा दर्जा सर्वाधिक वाईट असलेले देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर ठरले आहे.
  • तर मुलभूत सोयीसुविधांचा विचार केल्यास बंगळुरू शहर सर्वात शेवटी आहे.
  • जीवनमानाचा दर्जा उत्तम असलेल्या शहरांमध्ये जागतिक स्तरावर दिल्लीला १६१वा क्रमांक देण्यात आला आहे.
  • राहणीमानाच्या दर्जाचा विचार केल्यास हैदराबाद भारतातील सर्वोत्तम शहर आहे. मात्र जागतिक स्तरावरील यादीत हैदराबादचा क्रमांक १४४वा आहे. मागील वर्षी या यादीत हैदराबादला १३९वे स्थान देण्यात आले होते.
  • राहणीमानाचा दर्जा विचारात घेऊन तयार करण्यात आलेल्या यादीत पुणे १४५व्या, बंगळुरू १४६व्या तर मुंबई १५४व्या स्थानावर आहे.
  • सर्व भारतीय शहरांची गेल्या वर्षीच्या तुलनेत अधोगती झाली असताना चेन्नईने मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रगती साधली आहे.
  • सार्वजनिक वाहतूक, बसेसची सुविधा आणि नव्याने सुरू झालेली मेट्रो यामुळे चेन्नईतील जीवनमानाचा दर्जा उंचावला आहे.
  • जागतिक स्तरावरील इतर शहरांच्या तुलनेत भारतातील शहरांची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे.
  • राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी भारतातील शहरे फारशी चांगली नाहीत.

फिफा वर्ल्डकप आयोजन समितीच्या उपाध्यक्षपदी बाबुल सुप्रियो

  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी फिफा अंडर १७ वर्ल्डकप आयोजन समितीच्या उपाध्यक्षपदी बाबुल सुप्रियो यांची निवड झाल्याचे जाहीर केले आहे.
  • ऑक्टोबर २०१७मध्ये फिफा अंडर १७ वर्ल्डकप स्पर्धा होत असून या स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदाच भारतात होतात होत आहे. भारतातील सहा शहरात फिफा अंडर १७ वर्ल्डकप स्पर्धा होणार आहेत.  

उत्तर प्रदेशचे माजी मंत्री गायत्री प्रजापती यांना अटक

  • उत्तर प्रदेशातील मावळत्या राज्य सरकारमधील मंत्री व बलात्कार प्रकरणातील आरोपी गायत्री प्रजापती यांना लखनौमधून अटक करण्यात आली.
  • पोलिसांनी आधी प्रजापती यांच्या तीन साथीदारांना अटक केली असून, प्रजापतींच्या दोन्ही मुलांची व पुतण्याची चौकशी करून त्यांचा माग काढला. 
  • एका १६ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करीत तिच्या आईवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रजापती यांच्यावर आरोप आहे.
  • सध्या ही मुलगी येथील ‘एम्स’ रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहत आहे. कोणालाही तिला भेटण्यास मज्जाव आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा