चालू घडामोडी : १६ मार्च

नाशिकचा भूषण अहिरे एमपीएससीमध्ये महाराष्ट्रात प्रथम

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा २०१६चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
  • नाशिक जिल्ह्यातील भूषण अशोक अहिरे या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आला असून त्याला उप-जिल्हाधिकारी पद मिळाले आहे.
  • आयोगाने भूषण अहिरे, श्रीकांत गायकवाड, संजय कुमार ढवळे, भसके संदीप आणि नीलम बाफना अशा एकूण ५ उमेदवारांची शिफारस उप-जिल्हाधिकारी पदासाठी केली आहे.
  • सातारा जिल्ह्यातील पूनम संभाजी पाटील ही विद्यार्थिनी ५०७ गुणांसह राज्यात महिलांमध्ये पहिली आली आहे. तिची निवड सह-पोलीस आयुक्त या पदासाठी करण्यात आली आहे.
  • पोलीस अधीक्षक किंवा सह पोलीस आयुक्त या पदासाठी ३० उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. ६ उमेदवारांची निवड सहाय्यक आयुक्त सेवा कर विभागासाठी करण्यात आली आहे.
  • एमपीएससीतर्फे १० एप्रिल २०१६ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (पूर्व) परीक्षेसाठी १,९१,६३६ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता.
  • पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे १,५७५ उमेदवार मुख्य परीक्षा देण्याकरिता यशस्वी ठरले होते. त्यापैकी एकूण १३० उमेदवार या परीक्षेमध्ये यशस्वी झाले आहेत.
  • यशस्वी विद्यार्थ्यांची विस्तृत यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अमरिंदर सिंग पंजाबचे २६वे मुख्यमंत्री

  • पंजाबचे राज्यपाल व्ही पी सिंह बदनौर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांना १६ मार्च रोजी राज्याचे २६वे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली.
  • ७५ वर्षीय अमरिंदर दुसऱ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले असून याआधी २००२-२००७ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्री होते.
  • त्यांनी पटियाला शहर मतदारंसघातून विधानसभा निवडणूक लढवली. येथून त्यांनी सलग तीनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. 
  • त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भाजप, शिरोमणी अकाली दल, आप यांना पराभूत करत, पंजाबमध्ये ११७ पैकी ७७ जागा जिंकून विजय मिळवला.
  • निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये सहभागी झालेले नवज्योतसिंग सिद्धू यांना कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. अमरिंदर मंत्रिमंडळात ७ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
  • अमरिंदर यांच्याकडे सामान्य प्रशासन, कार्मिक, गृह, न्याय या खात्यांचा कार्यभार राहील. मनप्रीत बादल पंजाबचे नवे अर्थमंत्री असतील.
  • तर मोहिंद्रा यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विधिमंडळ कामकाज, संशोधन आणि वैद्यकीय शिक्षण आणि सिद्धूंकडे स्थानिक स्वराज संस्था, पर्यटन आणि सांस्कृतिक व्यवहार ही खाती देण्यात आली आहेत.

गोव्यात पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली भाजपचे बहुमत सिद्ध

  • गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत इतर पक्ष व अपक्षांच्या मदतीने २२ विरूद्ध १६ मतांनी बहुमत सिद्ध करीत विश्वासदर्शक ठराव जिंकला.
  • काँग्रेसचे नेते विश्वजीत राणे सभात्याग करीत ते मतदानाला गैरहजर राहिले. त्यामुळे काँग्रेसचे १७ आमदार जिंकूनही त्यांच्या बाजूने केवळ १६ मते मिळाली.
  • गोव्यात भाजपचे १३ आमदार निवडून आले आहेत. भाजपला गोवा फॉरवर्ड पक्षाचे (जीएफपी) तीन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तीन आणि इतर तीन आमदारांचे समर्थन मिळाले आहे.
  • कॉंग्रेस राज्यातील मोठा पक्ष असूनही राज्यपालांनी सरकार स्थापण्यासाठी भाजपला निमंत्रित केले. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
  • सर्वोच्च न्यायालयानेही राज्यपालांचाच निर्णय योग्य ठरवत पर्रिकर यांना ४८ तासांत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते.

नोबेलप्राप्त रसायन शास्त्रज्ञ जॉर्ज ओला यांचे निधन

  • कार्बन संयुगांच्या रासायनिक अभिक्रियांच्या अभ्यासासाठी १९९४मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल मिळविणारे रसायन शास्त्रज्ञ जॉर्ज ओला यांचे ८ मार्च रोजी निधन झाले.
  • १९२७ मध्ये हंगेरीत जन्मलेले ओला हे ज्यू होते. १९४९मध्ये त्यांना बुडापेस्ट येथील टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून पीएचडी मिळाली.
  • १९५६पर्यंत ते बुडापेस्ट येथील केमिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट येथे कार्यरत होते. त्यानंतर ते डाऊ कंपनीच्या अमेरिकेतील प्रयोगशाळेत रुजू झाले.
  • हायड्रोकार्बनच्या अभ्यासात त्यांनी अधिक चांगल्या प्रकारे ज्वलनशील असलेल्या गॅसोलिनचा शोध लावला होता. त्यांच्या संशोधनातून काही नवीन औषधांची निर्मितीही शक्य झाली.
  • डॉ. ओला यांनी महाआम्ले म्हणजे सुपरॲसिड्सचा शोध लावला, ती आम्ले सल्फ्युरिक आम्लापेक्षा लाखो पटींनी तीव्र होती. हायड्रोकार्बन रसायनशास्त्रात महाआम्लांना फार महत्त्वाचे स्थान आहे.
  • नंतरच्या काळात त्यांनी काबरेकेशनची रचना व वर्तन शोधून काढले. ओला यांच्या संशोधनाने काबरेकेशनचे एक नवे विश्व खुले झाले व त्यातून आधुनिक कार्बनी रसायनशास्त्र बदलून गेले.
  • ‘अ लाइफ ऑफ मॅजिक केमिस्ट्री’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. त्यात त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा