चालू घडामोडी : १९ मार्च

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ

  • उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत ४०३ पैकी ३१२ जागांवर विजय मिळविल्यानंतर भाजपाकडून भारतातील या सर्वात मोठ्या राज्याच्या २१व्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यात आली.
  • त्यांनी १९ मार्च रोजी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना प्रशासनात सहाय्य करण्यासाठी केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांनी उप-मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
  • आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात २ उपमुख्यमंत्री, २३ कॅबिनेट, स्वतंत्र कार्यभार असलेले ९ राज्यमंत्री आणि १५ राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात दोन उप-मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 योगी आदित्यनाथ 
  • ५ जून १९७२ रोजी जन्मलेले आदित्यनाथ केवळ २६व्या वर्षी प्रथम खासदार झाले. त्यांचे मूळ नाव अजय सिंह आहे. त्यांनी गढवाल विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतली आहे.
  • पदवीनंतर त्यांना संन्यास घेण्याची इच्छा झाली. नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊन ते संन्यासी झाले.
  • उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेले योगी आदित्यनाथ यांची प्रमुख ओळख कट्टर हिंदुत्वत्ववादी अशी आहे.
  • याच ओळखीला ते कायम जागत असल्याने ४४वर्षीय योगी आदित्यनाथ वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेक वेळा अडचणीत आले आहेत.
  • नेहमी भगवी वस्त्रे परिधान करणारे आदित्यनाथ यांची पूर्व उत्तर प्रदेशात मोठी ताकद आहे. गोरखपूर येथील गोरखपीठ हे त्यांचे शक्तिस्थळ आहे.
  • त्यांचे वडील महंत अवैद्यनाथ यांच्या निधनानंतर सप्टेंबर २०१४मध्ये त्यांच्याकडे या पीठाच्या प्रमुखपदाची जबाबदारी आली. मंदिर परिसरातील मुस्लिमांचेही ते संरक्षक आहेत अशी त्या परिसरात धारणा आहे.
  • २००२ मध्ये त्यांनी हिंदू वाहिनीची हिंदू वाहिनी नावाची संस्था उभारुन त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा विस्तार केला. हिंदू वाहिनी म्हणजे हिंदू युवकांचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रवादी गट आहे.
  • २००५मध्ये ख्रिश्चनांना पुन्हा धर्मात आणण्याच्या मोहिमेत ते सहभागी झाले होते. यावेळी १८०० ख्रिश्चनांनी पुन्हा हिंदू धर्माचा स्वीकार केला होता.
  • २००६मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवेळी त्यांनी गोरखपूरमध्ये हिंदू संमेलन आयोजित करून पक्षालाच आव्हान दिले होते.
  • सन २००७मध्ये जातीय सलोखा बिघडवला म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ हिंसाचार झाला होता.
  • योग, हिंदू धर्म यामध्ये रुची असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी उत्तर भारतात गोरक्षा आंदोलन चालविले होते.
  • राष्ट्र रक्षा अभियान या नावाने त्यांनी देशाच्या उत्तर भारतातील सीमांच्या संरक्षणाची मागणी सातत्याने केली आहे.
  • सोशल मीडियावर योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. ते उत्तर प्रदेशातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्ञात आहेत.
  • त्यांच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दंगे पसरवणे, हत्येचा प्रयत्न, हत्यार बाळगणे, चिथावणी देणे, धमकी देणे अशा प्रकरणांचा समावेश आहे.
  • योगिक शाक्तकर्म, हटयोग : स्वरप एवं साधना, हिंदू राष्ट्र नेपाळ : अतीत, वर्तमान एवं भविष्य आणि राजयोग : स्वरूप एवं साधना अशा धार्मिक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.
  • तसेच हिंदू वीकली आणि योगवाणी या मासिकांचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
 केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा 
  • उपमुख्यमंत्रीपदावर संधी देण्यात आलेले केशव प्रसाद मौर्य हे विश्व हिंदू परिषदेमधून भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेले नेते आहेत.
  • मागासवर्गीय समाजाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्या पाठीमागे ओबीसी आणि दलित वर्गाचा जनाधार आहे.
  • तर स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जाणारे लखनौचे महापौर दिनेश शर्मा हे उच्च-वर्णीय समाजातील आहेत. त्यांचीही निवड उपमुख्यमंत्रीपदी करण्यात आली आहे.
  • दोन वेळा महापौर बनलेले दिनेश शर्मा हे लखनौ विद्यापीठात ते वाणिज्य शाखेचे प्राध्यापक आहेत. अभ्यासू आणि प्रामाणिक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
  • २०१४मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यावर त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले तर गुजरातचे प्रभारी पदही त्यांना देण्यात आले.

प्रसिद्ध गिटारवादक चक बेरी यांचे निधन

  • अमेरिकेतील प्रसिद्ध गिटारवादक चक बेरी यांचे १८ मार्च रोजी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
  • त्यांच्या जन्म मिसौरीमधील सेंट लुईमध्ये १९२६मध्ये झाला होता. गायक आणि प्रसिद्ध गिटारवादक म्हणून चक बेरी यांची ओळख होती.
  • त्यांनी सात दशकांच्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी गायली. त्यामध्ये रोल ओव्हर बिथोवन आणि जॉन बी गुड अशा अनेक गाण्याचा समावेश आहे.
  • १९५५मध्ये त्यांचे मेबेलिन पहिले गाणे रिलीज झाले होते. या गाण्याला सुद्धा सर्वाधिक जास्त पसंती मिळाली होती.
  • चक बेरी यांना १९८४साली संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणाऱ्या ग्रॅमी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा