चालू घडामोडी : २२ मार्च

विकल्प योजना १ एप्रिलपासून सुरु

  • रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २२ मार्च रोजी नव्या आरक्षण योजनेची घोषणा केली आहे. विकल्प योजना असे या नव्या योजनेचे नाव आहे.
  • या योजनेमुळे १ एप्रिलपासून विकल्प योजनेची निवड केलेल्या प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनमध्ये आसन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना राजधानी आणि शताब्दीसारख्या ट्रेनमधून कोणतीही अधिक किंमत न मोजता प्रवास करता येणार आहे.
  • मात्र सध्याच्या ट्रेनमधील प्रवाशांची यादी निश्चित झाल्यावरच प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनचा पर्याय निवडता येईल. 
  • प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशाने दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करण्यास नकार देत तिकीट रद्द केल्यास त्याच्याकडून दंड वसूल केला जाईल.
  • ट्रेन सुटण्याच्या ४ ते १२ तासांदरम्यान तिकीट रद्द केल्यास तिकीटाच्या रकमेतील ५० टक्के रक्कम कापण्यात येणार आहे.
  • रेल्वे मंत्रालयाकडून ६ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवली जाणार आहे. सुरुवातीला ‘विकल्प’ हा पर्याय फक्त ई-तिकीट असलेल्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असेल.
  • गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्ली-लखनऊ आणि दिल्ली-जम्मू क्षेत्रात विकल्प योजना लागू करण्यात आली होती आणि येथे ही योजना रेल्वेसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरली.
  • राजधानी, शताब्दी ट्रेनमधील आसने रिक्त राहू नयेत, यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली. या ट्रेन्समधील सरासरी १२% आसने रिक्त राहात असल्याने या योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या नव्या योजनेमुळे तिकीट कन्फर्म होण्याचे प्रमाण वाढले आणि त्यामुळे प्रवाशांकडून तिकीट रद्द करण्याचे प्रमाण घटले. त्यामुळे रेल्वेच्या नफ्यात मोठी वाढ झाली.
  • तिकीटे कन्फर्म न झाल्यामुळे दरवर्षी रेल्वेला ३,५०० कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यामध्ये विकल्प योजनेमुळे मोठी घट झाली आहे.

महावेध प्रकल्पाचे कंत्राट स्कायमेटला

  • महाराष्ट्रात स्वयंचलित हवामान केंद्रे उभारणीचा रखडलेला ‘महावेध प्रकल्प’ सुरू करण्याचे कंत्राट ‘स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड’ या खासगी कंपनीला मिळाले आहे.
  • या हवामान केंद्रांसाठी २०६५ ठिकाणी स्कायमेटला पाच मीटर बाय सात मीटरची मोफत जागा देण्यात येणार आहे. मात्र, जमिनीवर मालकी शासनाची राहील.
  • सरकारी जागा उपलब्ध नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा दिल्या जातील. मात्र, सात वर्षांनंतर हा प्रकल्प समाप्त होईल. त्यामुळे स्कायमेटला सर्व जागा सोडाव्या लागतील. 
  • त्या मोबदल्यात स्कायमेट शेतकऱ्यांसाठी मोफत माहिती पुरविणार आहे. कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन कोटी रुपयांची बॅंक गॅरंटी शासनाने आधीच घेतली आहे.
  • महावेध प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागिदारीतून ‘बांधा-मालक व्हा-चालवा (बीओओ)’ तत्त्वाने चालविला जाणार आहे.
  • स्कायमेट कंपनी पीकविमा कंपन्यांना माहिती विकून आपला खर्च भागविणार आहे. त्यासाठी प्रतिमहिना ३२५० रुपयांपेक्षा जास्त दराने माहितीची विक्री करता येणार नाही.
  • तीन वर्षांनंतर ३५७५ रुपये तर सहा वर्षांनंतर ३९०० रुपये प्रतिमहिन्याने माहिती विकण्याची परवानगी कंपनीला मिळाली आहे. विमा कंपन्यांना ही माहिती स्कायमेटकडूनच घेण्याचे बंधन राहणार आहे. 

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचे निधन

  • राजकीय घडामोडींचे साक्षेपी विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक गोविंद तळवलकर यांचे २१ मार्च रोजी अमेरिकेत निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
  • महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची धुरा तब्बल २७ वर्षं सांभाळलेले गोविंद तळवलकर हे पत्रकारितेतील मानदंड ठरले होते.
  • भाषेवरील प्रभुत्व, राजकीय आणि सामाजिक भान आणि प्रचंड व्यासंग या जोरावर त्यांनी अग्रलेखांना एका वेगळ्या उंचीवर नेले होते.
  • ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर यांनी त्यांचा उल्लेख ‘ज्ञान गुण सागर’ असा केला होता. लोकमान्य टिळक, एम एन रॉय यांच्या लेखनाचा त्यांच्यावर प्रभाव होता.
  • २२ जुलै १९२५ रोजी डोंबिवलीतील सुसंस्कृत घरात जन्मलेले गोविंद तळवलकर यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर पत्रकारितेत प्रवेश केला होता.
  • एका नियतकालिकामध्ये ते लिखाण करू लागले. त्यानंतर, २३व्या वर्षी ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाले होते.
  • त्यांचे लिखाण अत्यंत परखड, अभ्यासपूर्ण आणि अभिजात दर्जाचे होते. त्यांचे अनेक लेख, त्यांनी मांडलेले विचार आजही कालसुसंगत वाटतात.
  • राजकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींवर निर्भिडपणे प्रहार करत, सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक क्षेत्रातील अनेक विषयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी या लेखणीचा प्रभावी वापर केला होता. 
  • गोविंद तळवलकर यांनी मराठीसोबत इंग्रजीतही विपुल लिखाण केले. द टाइम्स ऑफ इंडिया, द टेलिग्राफ, द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, फ्रंटलाइन मॅगझिन, डेक्कन हेरॉल्ड या वृत्तपत्रांमधील त्यांचे लेखही गाजले होते.
  • पत्रकारितेतील या योगदानाबद्दल गोविंद तळवलकर यांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले होत.
  • त्याचप्रमाणे, बी डी गोयंका, दुर्गा रतन पुरस्कार आणि रामशास्त्री पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला होता.
  • त्यांची नौरोजी ते नेहरू, विराट ज्ञानी - न्यायमूर्ती रानडे, नेक नामदार गोखले, भारत आणि जग, इराकदहन, अग्निकांड, अग्रलेख, पुष्पांजली, नियतीशी करार, बदलता युरोप अशी २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

ब्रिटननेमध्येही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास बंदी

  • अमेरिकेपाठोपाठ आता ब्रिटननेही ६ मुस्लिम बहुल देशांतील प्रवाशांवर ब्रिटनमध्ये येताना विमानातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास बंदी घातली आहे.
  • यामध्ये टर्की, लेबेनॉन, जॉर्डन , इजिप्त, ट्युनिशिया आणि सौदी अरेबिया या देशांचा समावेश आहे.
  • सुरक्षाकारणास्तव खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचं कारण ब्रिटनने दिलं आहे.
  • या नियमानुसार या ६ देशातील प्रवाशांना विमानात लॅपटॉप, टॅबलेट, डीव्हीडी प्लेयर, आयपॅड आणि मोठ्या आकाराचे मोबाइल फोन नेता येणार नाहीत.
  • यापुर्वी २१ मार्च रोजी अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने १० मुस्लिम बहुल देशांतील प्रवाशांना अमेरिकेत येताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास बंदी घातली होती.

अमूल थापर यांची अमेरिकेतील न्यायालयात प्रमुख पदावर नियुक्ती

  • भारतीय वंशाचे अमेरिकी कायदेतज्ज्ञ अमूल थापर यांची अमेरिकेतील अपिली न्यायालयात प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नियुक्ती केली आहे. सिनेटच्या मंजुरीनंतर थापर हे अपिलीय न्यायालयाचा एक महत्त्वाचा भाग बनतील.
  • केंटकी, टेनिसी, ओहियो आणि मिशीगन येथील अपिलांवर येथे सुनावणी होते. या महत्त्वाच्या पदावर नियुक्त होणारे थापर हे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा