चालू घडामोडी : १० एप्रिल

भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान सहा सामंजस्य करार

  • ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्या चार दिवसाच्या भारत दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान खालील सहा सामंजस्य करार झाले.
    • आंतरराष्ट्रीय दहशतवाद
    • संगठित गुन्हेगारी
    • नागरी उड्डाण सुरक्षा क्षेत्रातील सहाय्य
    • पर्यावरण, जलवायू आणि वन्यजीव क्षेत्रातील सहाय्य
    • क्रीडा क्षेत्रातील सहयोग
    • आरोग्य आणि चिकित्सा क्षेत्रातील सहकार्य
  • याशिवाय भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जियोसायन्स ऑस्ट्रेलिया सोबत एक सामंजस्य करार केला आहे.
  • पृथ्वीचे अवलोकन आणि उपग्रह वाहून नेण्याची व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
  • यानंतर पंतप्रधान मोदी आणि टर्नबुल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हरियाणाच्या गुरुग्राममधील टेरी-डिकिन नॅनो बायोटेक्नोलॉजी सेंटरचे उद्घाटन केले.
  • २०१५मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर टर्नबुल यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
  • २०१४मध्ये तत्कालीन पंतप्रधान टॉनी अॅबोट भारत दौऱ्यावर आले होते. यानंतर मोदीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होते.
  • माल्कम टर्नबुल यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मंडी हाऊस मेट्रो स्थानकापासून अक्षरधामपर्यंत मेट्रोतून प्रवासही केला. 

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून मृत्यूदंडाची शिक्षा

  • ‘घातपाती कारवायां’मध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले कथित भारतीय गुप्तहेर कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.
  • रावळपिंडी येथील लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.
  • गेल्यावर्षी मार्च महिन्यात हेरगिरीच्या आरोपाखाली बलुचिस्तान प्रांतातून कुलभूषण जाधव यांना अटक करण्यात आली होती.
  • पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी जाधव घातपाती कारवाया करत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला होता.
  • याशिवाय, पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा एका व्हिडिओदेखील प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओत जाधव यांनी आपण भारतीय गुप्तहेर संस्था रॉ साठी काम करत असल्याची कबुली दिली होती.
  • बलुचिस्तान व कराचीत अशांतता निर्माण करण्यासाठी रॉने आपल्याला तैनात केल्याचे त्यांनी व्हिडिओत म्हटले होते. मात्र, या व्हिडिओत अनेक फेरफार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.
  • पाकिस्तानच्या लष्करी कायद्यातील कलम ५९ आणि गोपनीयतेच्या कायद्यातील कलम ३ नुसार जाधव यांच्यावर खटला भरण्यात आला होता.
  • भारताने जाधव यांना राजदूतावासाशी संपर्क साधू देण्याची (कॉन्सुलर अ‍ॅक्सेस) विनंती पाकिस्तानकडे केली होती. मात्र, ही विनंती पाकिस्तानने फेटाळून लावली होती.
  • मूळचे मुंबईचे असलेले कुलभूषण जाधव हे नौदलातील माजी अधिकारी आहेत. मुदतीपूर्वीच त्यांनी निवृत्ती स्वीकारली होती. निवृत्तीनंतर त्यांनी जहाजाने मालवाहतूक करण्याचा व्यवसाय सुरु केला होता.
  • जाधव यांना आमिष दाखवून बलुचिस्तानात नेण्यात आले होते. ते भारताचे नागरिक आहेत, पण ते गुप्तहेर नाहीत असे केंद्र सरकारचे म्हणणे होते.

मायकेल ग्रॅटझेल यांना जागतिक ऊर्जा पुरस्कार

  • जगाची उर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन ऊर्जा तंत्रज्ञानाचा शोध घेणारे जर्मन वैज्ञानिक मायकेल ग्रॅटझेल यांना २०१७चा जागतिक ऊर्जा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • जागतिक ऊर्जा पुरस्कार पर्यायी ऊर्जा साधनांवर संशोधनासाठी, रशियातील गॅझप्रॉम, एफएसके येस व सुप्रगुटनेझ या कंपन्यांकडून दिला जातो. आतापर्यंत १५ वर्षांत ३४ वैज्ञानिकांना हा पुरस्कार मिळाला आहे.
  • ग्रॅटझेल यांनी महागडय़ा सिलिकॉन सोलर सेलला त्यांनी पर्याय शोधत ग्रॅटझेल सेल (विद्युतघट) तयार केला आहे. तो प्रकाशसंवेदनशील मूलद्रव्यांवर आधारित आहे.
  • ग्रॅटझेल हे स्वित्झर्लंडमधील लॉसेनच्या पॉलिटेक्निक संस्थेत काम करतात. इलेक्ट्रॉन ट्रान्सफरवर आधारित अभिक्रिया व त्यातून ऊर्जेचे रूपांतर हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.
  • ग्रॅटझेल यांचे कार्यक्षेत्र स्वित्झर्लंड असले, तरी त्यांचा जन्म १९४४मध्ये जर्मनीमध्ये झाला. ते बर्लिन तंत्रज्ञान विद्यापीठाचे डॉक्टरेट असून असंख्य संस्थांच्या मानद डॉक्टरेट पदव्या त्यांच्याकडे आहेत.
  • १९८८मध्ये त्यांनी ब्रायन ओ रिगन यांच्याबरोबर ग्रॅटझेल सेलची निर्मिती केली. त्याचबरोबर लिथियम आयन बॅटरीत नॅनोपदार्थाचा वापर सुरू केला.
  • त्यांच्याकडे ८० पेटंट असून ९०० शोधनिबंध व दोन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. कॉर्नेल विद्यापीठ व सिंगापूरच्या नॅशनल टेक्निकल युनिव्हर्सिटीत ते अभ्यागत प्राध्यापक आहेत.
  • बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात तसेच चीनच्या ग्वांगझांग विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले आहे. जगातील पहिल्या दहा रसायनतज्ञांत त्यांचा क्रमांक आहे.
  • मिलेनियम २००० युरोपीयन नवता पुरस्कार, फॅरेडे पदक, डच हॅविंगा पुरस्कार, इटाग्लास पुरस्कार, गेरीशर व हार्वे पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
  • लिथियम आयन बॅटरीजमध्ये विद्युत साठा वाढवण्यासाठी त्यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे.
  • नॅनोक्रिस्टलाइन ऑक्साइड फिल्मचा वापर करून त्यांनी नवीन सोलर सेल तयार केला. त्यात झाडांच्या पानातील प्रकाशसंश्लेषण अभिक्रियेची नक्कल केली होती.
  • रंग संवेदनशील सोलर सेल त्यांनी तयार केले. त्यांची कार्यक्षमता २२ टक्क्य़ांहून अधिक आहे, ती पॉलिक्रिस्टलाइन सिलिकॉन सोलर सेलपेक्षा जास्त आहे.
  • रासायनिक-भौतिकशास्त्रीय तत्त्वांचा वापर करून त्यांनी नवीन सोलर सेल व बॅटरीजची निर्मिती केली.
  • ऊर्जा तंत्रज्ञानात कार्यक्षमतेच्या संदर्भात सुधारणा करताना त्यांनी नॅनो तंत्रज्ञानाचा केलेला वापर हे त्यांचे वेगळे वैशिष्टय़ आहे.

वाजपेयी यांचे ‘राष्ट्रधर्म’ नियतकालिक संकटात

  • भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ‘राष्ट्रधर्म’ नियतकालिक जाहिरातींच्या यादीतून बाहेर झाले आहे.
  • केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून ‘राष्ट्रधर्म’ची डायरेक्टेट ऑफ ऍडव्हरटाइझिंग ऍण्ड व्हिज्युअल पब्लिसिटीची मान्यता रद्द केली आहे.
  • केंद्रीय सूचना प्रसारण मंत्रालयाकडून ८०४ नियतकालिकांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील एकूण १६५ नियतकालिकांचा समावेश आहे.
  • ‘राष्ट्रधर्म’ नियतकालिकाची सुरुवात १९४७मध्ये झाली होती. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी कानपूरमध्ये शिक्षण घेत होते.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रांत प्रचारक भाऊराव देवरस आणि दिनदयाळ उपाध्याय यांनी वाजपेयी यांच्याकडे ‘राष्ट्रधर्म’च्या संपादकपदाची जबाबदारी दिली.
  • ‘राष्ट्रधर्म’च्या पहिल्याच अंकात अटल बिहारी वाजपेयी यांची ‘हिंदू तन-मन, हिंदू जीवन, हिंदू रग-रग मेरा परिचय’ ही प्रसिद्ध कविता प्रकाशित झाली.
  • संघाची विचारधारा देशभरात पोहोचवून राष्ट्रधर्मासाठी त्यांना जागरुक करण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रधर्म’ नियतकालिकाची सुरुवात करण्यात आली होती.
  • ऑक्टोबर २०१६पासून या नियतकालिकाच्या प्रती पीआयबी आणि डिएव्हिपीच्या कार्यालयांमध्ये जमा करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

इजिप्तमध्ये तीन महिन्यांची आणीबाणी

  • इजिप्तमधील दोन चर्चमध्ये ९ एप्रिलला झालेल्या दहशतवादी बाँब हल्ल्यांमध्ये किमान ४५ लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर १२० जण जखमी झाले आहेत.
  • यामुळे इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी तीन महिन्यांची आणीबाणी जाहीर केली आहे. 
  • तांता आणि अॅलेक्झांड्रिया या शहरांमध्ये हे बाँबस्फोट झाले. त्यानंतर अध्यक्ष सिसी यांनी राष्ट्रीय संरक्षण परिषदेची बैठक घेतली व तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली.
  • येथे अल्पसंख्यांक असणारे ख्रिश्चन ‘पाम संडे’चा सण साजरा करण्यासाठी चर्चमध्ये जमले असताना हा हल्ला करण्यात आला. ‘पाम संडे’चा दिवस ख्रिश्चन धर्मातील सर्वांत पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो. 
  • इस्लामिक स्टेटने (इसिस) हा हल्ला घडवून आणला असून, अल्पसंख्यांकावर अलीकडच्या काळात झालेला हा सर्वांत भीषण हल्ला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा