चालू घडामोडी : १७ एप्रिल

काचेचे छत असणाऱ्या रेल्वे डब्यांचे लोकार्पण

  • रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी १६ एप्रिल रोजी विस्टाडोम कोच (काचेचे छत असणारे डबे) असलेल्या रेल्वेचे लोकार्पण केले.
  • काचेच्या छतांसह एलईडी दिवे, फिरती आसने आणि जीपीएस आधारित सूचना यंत्रणा ही नव्या रेल्वेची वैशिष्ट्ये आहेत.
  • ही रेल्वे विशाखापट्टणम ते अरकू दरम्यान धावणार आहे. या नव्या रेल्वेमुळे रेल्वे प्रवास आणखी सुकर आणि आरामदायी होणार आहे.
  • या नव्या रेल्वेचे सर्व डबे वातानुकूलित असतील आणि या डब्यांचे छत काचेचे असल्याने प्रवाशांना अरकूच्या दऱ्यांमधील निसर्ग सौंदर्य पाहता येणार आहे.
  • अपंगांचा विचार करुन या रेल्वेच्या डब्यांची रचना करण्यात आली असून डब्यांना स्वयंचलित दरवाजेही आहेत.
  • विस्टाडोम कोचमध्ये निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी खास व्यवस्था असेल. यासोबतच यात माहिती आणि मनोरंजनाची सुविधा असेल. 
  • ४ विस्टाडोम कोच उभारण्यासाठी रेल्वेला ४ कोटींचा खर्च आला आहे. सध्या या डब्यांची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरु आहे.
  • यातील दोन डबे विशाखापट्टणम-अरकू मार्गावर धावणार आहेत. तर इतर दोन डबे जम्मू-काश्मीरमध्ये पाठवले जाणार आहेत.

सहारा समूहाच्या अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचा आदेश

  • सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाच्या लोणावळ्यातील (पुणे) अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचा आदेश दिला आहे.
  • त्याचबरोबर सहारा समूहाचे प्रमूख सुब्रतो राय यांना पुढील सुनावणीवेळी वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
  • गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास सहारा समूह अपयशी ठरल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. सहाराला गुंतवणूकदारांचे १४ हजार कोटी रुपये अद्याप परत करायचे आहेत. 
  • त्यापैकी ५ हजार कोटी रुपये १७ एप्रिलपर्यंत ‘सेबी’कडे जमा न केल्यास अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव पुकारला जाईल, असे न्यायालयाने बजावले होते.
  • अ‍ॅम्बी व्हॅलीचा लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘ऑफिशियल लिक्विडेटर’ कार्यालयामार्फत करण्यात येईल.
  • यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सहारा चिटफंड प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अॅम्बी व्हॅली जप्त करण्याचे आदेश दिले होते.
  • सहारा समूहाने चांगला प्रस्ताव दिल्यास हा लिलाव टाळता येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या माहिती आयुक्तांना मारहाण

  • मुंबईतील दादर येथील आंबेडकर भवनाची वास्तू पाडल्याच्या रागातून महाराष्ट्राचे माहिती आयुक्त तथा माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांना भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
  • गायकवाड हे शासकीय दौऱ्यावर औरंगाबादमध्ये १७ एप्रिल रोजी आले होते. तेथे भारिपचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ व इतर कार्यकर्त्यांनी त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण केली.
  • भारिपच्या महिला कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या पत्नीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. 
  • नंतर पोलिसांनी गायकवाड दाम्पत्याची सुटका करून विमानतळावर सुखरूप पोहोचविले. गायकवाड यांनी मुंबई विमानतळ पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.
  • या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी अमित भुईगळ यांच्यासह ४ पुरूष व २ महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

नारदा स्टिंग ऑपरेशनप्रकरणी तृणमूल काँग्रेस नेते अडचणीत

  • नारदा स्टिंग ऑपरेशनप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या १३ जणांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर दाखल केला आहे.
  • यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे तृणमूलचे राज्यसभा सदस्य मुकूल रॉय, लोकसभा सदस्य सौगत रॉय आणि कोलकाताचे महापौर सोवन चटर्जी यांचाही समावेश आहे.
  • पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीआधीचं हे स्टिंग ऑपरेशन आहे. या स्टिंगची टेप अनेक न्यूज चॅनेल्सना पाठवण्यात आली होती.
  • सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे काही नेते लाच घेताना या टेपमध्ये दिसत होते. या सर्वांवर गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा