चालू घडामोडी : ४ मे

इंदूर : देशातील सर्वांत स्वच्छ शहर

  • केंद्र सरकारने केलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१७’मध्ये मध्यप्रदेशातील इंदूरने देशातील सर्वांत स्वच्छ शहराचा मान पटकावला आहे.
  • राज्यांचा विचार करता गुजरातमधील १२ शहरांनी टॉप ५०मध्ये स्थान मिळवल्याने या राज्याची कामगिरी सर्वांत सरस ठरली.
  • जाहीर करण्यात आलेल्या यादीत महाराष्ट्रातील ४४ शहरांचा समावेश आहे, पण टॉप-१०० मध्ये फक्त सात शहरे जागा मिळवू शकली.
  • या यादीमध्ये ४३४ शहरांचा समावेश असून इंदूरपाठोपाठ मध्य प्रदेशातीलच भोपाळने दुस‍रा, तर आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणमने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
  • भुसावळला शेवटून दुसरे म्हणजेच ४३३वे स्थान मिळाले आहे. तर उत्तर प्रदेशमधील गोंडा शहर (४३४) सर्वांत अस्वच्छ ठरले आहे.
  • या यादीमध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई आठव्या क्रमांकावर तर पुणे १३व्या आणि मुंबई २९व्या क्रमांकावर आहे.
  • २००२पासून नवी मुंबईने स्वच्छतेविषयी मिळविलेला सलग चौथा पुरस्कार असून विविध क्षेत्रातील एकूण १४ महत्त्वाचे पुरस्कार मिळविले आहेत.
  • ‘स्वच्छ भारत’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. ‘स्वच्छ सर्व्हेक्षण २०१७’ अंतर्गत या योजनेचा आढावा घेण्यात आला.
  • शहरी भागांमध्ये हागणदारीमुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित, घनकच‍ऱ्याचे संकलन, प्रक्रिया व विल्हेवाट या प्रमुख मुद्द्यांच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले.
  • गेल्यावर्षी स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणासाठी देशातल्या ७३ शहरांचा समावेश करण्यात आला होता.
  • यामध्ये पहिल्या १० शहरांत महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांचा समावेश होता.
टॉप १० स्वच्छ शहरे
क्र. शहर राज्य
इंदूर मध्यप्रदेश
भोपाळ मध्यप्रदेश
विशाखापट्टनम आंध्रप्रदेश
सुरत गुजरात
म्हैसूर कर्नाटक
तिरुचिरापल्ली तमिळनाडू
एनडीएमसी नवी दिल्ली
नवी मुंबई महाराष्ट्र
तिरुपती आंध्रप्रदेश
१० बडोदा गुजरात

डॉ. संजय प्रतिहार यांना युवा वैज्ञानिक पुरस्कार

  • तेजपूर विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. संजय प्रतिहार यांना भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या युवा वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • त्यांनी गुंतागुंतीच्या बहुधातू रसायन प्रक्रियेवर संशोधन पूर्ण केले असून त्याचा वापर कृषी क्षेत्रात कसा करता येईल हे सिद्धांताने मांडले आहे.
  • त्यांच्या या सिद्धांतामुळे पिकांना आवश्यक असे धातूयुक्त जीवनसत्त्व देणे शक्य होणार आहे. या संशोधनाचा फायदा केवळ कृषी क्षेत्रालाच नव्हे तर उद्योगांनाही होणार आहे.
  • डॉ. प्रतिहार यांनी रसायनशास्त्रात पदवी व इनऑर्गेनिक रसायनशास्त्रात बनारस हिंदू विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.
  • नंतर त्यांनी आयआयटी खरगपूरच्या रसायनशास्त्र विभागातून ऑर्गोनोमेटॅलिक रसायनशास्त्रात पीएचडी मिळविली आहे.
  • यापूर्वी त्यांना विज्ञान-तंत्रज्ञान विभागातर्फे ‘इन्स्पायर प्रोफेसर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याचबरोबर त्यांना ‘सीएसआयआर’तर्फे वरिष्ठ संशोधन अभ्यासवृत्तीही मिळाली होती.
  • २०१७मध्ये त्यांना संशोधन क्षेत्रासाठी ‘व्हिजिटर्स’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. याबरोबर याच वर्षांत त्यांना ‘गांधीयन यंग टेक्नॉलॉजी इनोव्हेशन’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.
  • भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीची स्थापना १९३५मध्ये करण्यात आली. भारतीय वैज्ञानिकांची ही सर्वोच्च संस्था असून विज्ञानातील सर्व शाखांचे ती प्रतिनिधित्व करते.
  • देशातील तरुणांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण करणे तसेच त्याचा वापर  विधायक व देशहिताच्या कामासाठी करणे या दृष्टीने ही अकादमी काम करीत आहे.

फिफा क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ टॉप-१००मध्ये

  • जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) प्रसिद्ध केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाने टॉप-१०० मध्ये स्थान मिळवले आहे.
  • सुमारे २१ वर्षांनंतर भारतीय फुटबॉल संघाने जागतिक क्रमवारीत हे स्थान प्राप्त केले आहे. यापूर्वी १९९६मध्ये भारत टॉप-१०० मध्ये पोहोचला होता.
  • फेब्रुवारी १९९६ मध्ये भारताला ९४ वे स्थान मिळाले होते. आतापर्यंत भारताची हीच सर्वश्रेष्ठ फिफा क्रमवारी आहे.
  • भारतासोबत निकारागुआ, लिथुआनिया आणि इस्टोनिया हे संघ देखील संयुक्तपणे १००व्या स्थानावर आहेत.
  • स्वातंत्र्यानंतर भारताने केवळ ६ वेळा अव्वल शंभर संघांमध्ये प्रवेश मिळवला आहे. आशियाई क्रमवारीत भारतीय संघ अकराव्या स्थानावर आहे.

गोव्यामध्ये किशोरी आमोणकर यांच्या नावाने शिष्यवृत्ती

  • गोवा राज्य सरकारने दिवंगत ज्येष्ठ गायिका किशोरी आमोणकर यांच्या नावाने संशोधन शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.
  • ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर रिसर्च फेलोशिप इन इंडियन क्लासिकल म्युझिक,’ असे या शिष्यवृत्तीचे नाव आहे.
  • तरुणांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी, आमोणकरांचा वैभवशाली वारसा जतन व्हावा आणि शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला चालना मिळावी म्हणून ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे.
  • किशोरी आमोणकर यांच्या सन्मानार्थ सुरू केलेली ही शिष्यवृत्ती ३१ मार्च २०२२ पर्यंत असेल. राज्य सरकार संचलित कला अकादमीच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येईल.
  • गोव्यातील संगीतकारांनी या शिष्यवृत्तीचा फायदा घेऊन भारतीय शास्त्रीय संगीत, गायन, नृत्य आणि वाद्य आदी क्षेत्रांच्या अभ्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल.

फेसबुककडून भारतात एक्स्प्रेस वायफाय सुविधा

  • सध्या सर्वात आघाडीवर असणाऱ्या फेसबुक ही सोशल नेटवर्किंग साईट भारतात व्यावसायिक स्तरावर एक्स्प्रेस वायफाय सुविधा सुरु करणार आहे.
  • देशातील ग्रामीण भागातील जनतेला यामुळे सार्वजनिक हॉटस्पॉटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध होणार आहे.
  • याआधी २०१५मध्ये ही सुविधा ग्राहकांना मोफत देण्यात आली होती. मात्र नेट न्यूट्रॅलिटीवरुन काही वाद झाल्याने ती स्थगित करण्यात आली होती.
  • त्यावेळी ही सुविधा पूर्णपणे मोफत असल्याने ठराविक वेबसाईटचाच वापर करता येत होता.
  • मात्र आता या सुविधेव्दारे इंटरनेटवरील कोणत्याही वेबसाईटचा वापर ग्राहकाला करता येणार असून, त्यासाठी ठराविक किंमत मोजावी लागणार आहे.
  • सध्या या सुविधेसाठी फेसबुकने एअरटेल कंपनीबरोबर भागीदारी केली असून, येत्या काही महिन्यांत २० हजार ग्राहकांना याव्दारे एक्स्प्रेस वायफाय हॉटस्पॉट वापरता येणार आहे.
  • ही एक्स्प्रेस वायफाय सुविधा देशातील उत्तराखंड, गुजरात, राजस्थान आणि मेघालय याठिकाणी जवळपास ७०० हॉटस्पॉट उपलब्ध करुन देणार आहे.
  • भारताशिवाय केनिया, टांझानिया, नायजेरिया आणि इंडोनेशिया या देशांमध्येही ही एक्स्प्रेस वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

एआयआयबीकडून भारताला १६० दशलक्ष डॉलरचे कर्ज

  • चीन पुरस्कृत एशिएन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने (एआयआयबी) आंध्र प्रदेशातील वीजव्यवस्था सुधारणा प्रकल्पाला १६० दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे.
  • एआयआयबीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा भागधारक आहे. भारतातील प्रकल्पाला एआयआयबीकडून कर्ज मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • आंध्र प्रदेशातील वीज पारेषण आणि वितरणव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या प्रकल्पाला बँकेने कर्ज दिले आहे.
  • ’२४X७ सर्वांसाठी ऊर्जा’ नावाचा हा प्रकल्प भारत सरकारच्या २०१४ साली सुरू करण्यात आलेल्या ‘सर्वांसाठी ऊर्जा’ योजनेचा भाग आहे. 
  • निवडक राज्यांत सर्वांना पाच वर्षांत कार्यक्षम, विश्वसनीय आणि परवडणारी वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेनेही अर्थसाह्य केले आहे.
  • या प्रकल्पामुळे आंध्र प्रदेश आणि भारताच्या आर्थिक विकासाला थेट योगदान मिळेल. व्यवसाय आणि शेतीलाही त्याचा थेट लाभ मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा