चालू घडामोडी : ५ मे

दक्षिण आशियाई उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) ५ मे रोजी दक्षिण आशियाई उपग्रहाचे (जीसॅट-९) अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले.
  • श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रावरून इस्रोच्या जीएसलव्ही एफ-०९ या प्रक्षेपकाच्या मदतीने जीसॅट-९ चे प्रक्षेपण करण्यात आले. जीसॅट-९च्या मोहिमेचा कालावधी १२ वर्षांचा असेल.
  • या उपग्रहाचा उद्देश हा दक्षिण अशियायी भागात देशांना दूरसंचार आणि संकटकाळात मदत व परस्परांत संपर्क उपलब्ध व्हावा असा आहे.
  • जीसॅट-९ च्या निर्मितीसाठी २३५ कोटींचा खर्च आला आहे. या उपग्रहामुळे सहभागी देशांना डीटीएच, काही विशिष्ट व्हीसॅट क्षमता उपलब्ध करून देईल. 
  • दक्षिण आशियातील ७ देश जीसॅट-९ उपक्रमाचा भाग आहेत. यामध्ये भारतासह श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि मालदीवचा समावेश आहे. पाकिस्तानचा या उपक्रमात सहभाग नाही.
  • या उपग्रहामुळे संदेशवहन सेवेचे जाळे अधिक घट्ट होणार आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन कार्यातदेखील जीसॅट-९ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
  • या उपग्रहाची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४मध्ये नेपाळमधल्या १८व्या सार्क परिषदमध्ये मांडली होती. त्यानंतर इस्रोकडून ‘सार्क उपग्रह’ विकसित करण्याचे काम सुरू झाले होते.
  • पाकिस्तानने यात सहभागी होण्यास नकार दिल्यामुळे सार्कऐवजी 'दक्षिण आशियाई उपग्रह' असे या उपग्रहाचे नामकरण करण्यात आले आहे.
 दक्षिण आशियाई उपग्रहाची वैशिष्ट्ये 
  • उपग्रहाचे वजन: २२३० किलो
  • उपग्रहाचा कार्यकाल: १२ वर्षांपेक्षा जास्त
  • स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिन असलेल्या जीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे उपग्रहाचे प्रक्षेपण.
  • स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनचा वापर केलेले ‘जीएसएलव्ही’चे सलग चौथे यशस्वी उड्डाण.
  • आत्तापर्यंत जीएसएलव्ही प्रक्षेपकाची दहापैकी पाच उड्डाण अयशस्वी ठरल्याने जीएसएलव्हीला नॉटी बॉय (naughty boy) म्हणूनही ओळखले जाते.

सीआयआयच्या अध्यक्षपदी शोभना कामिनेनी

  • ‘सीआयआय’ अर्थात भारतीय औद्योगिक महासंघाच्या अध्यक्षपदी शोभना कामिनेनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • भारतीय औद्योगिक महासंघ ही उद्योग जगताची सर्वोच्च व देशव्यापी बिगरसरकारी संघटना आहे.
  • सीआयआयच्या स्थापनेपासून या संघटनेच्या अध्यक्षपदावर विराजमान होणाऱ्या शोभना या पहिल्या महिला आहेत.
  • शोभना यांनी अर्थशास्त्रातील स्नातक पदवी तसेच अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून रुग्णालय व्यवस्थापन विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
  • दक्षिणेत विशेष लोकप्रिय असलेल्या व रुग्णालय साखळीचे विस्तृत जाळे असलेल्या अपोलो हॉस्पिटल एंटरप्राइजेसच्या त्या कार्यकारी उपाध्यक्षा आहेत.
  • अपोलो रुग्णालयाचे प्रकल्प, पायाभूत सुविधा आदींमध्ये त्या लक्ष घालतात. तसेच अपोलो फार्मसी या औषध व्यवसायाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.
  • अपोलो समूहातील केईआय या मालवाहतूक तसेच पायाभूत सेवा कंपनीच्याही त्या उपाध्यक्षा आहेत. पतीबरोबर त्यांनी या कंपनीची स्थापना केली. 
  • समूहाची आरोग्य विमा क्षेत्रातील अपोलो म्युनिच हेल्थ इन्शुरन्सची त्यांनी सहा वर्षांपूर्वी स्थापना केली.
  • अपोलो ग्लोबल प्रोजेक्ट्स कन्सल्टन्सी आणि अपोलो फार्माच्या संशोधन व नावीन्य विभागाचे प्रमुखपदही त्या सांभाळतात.
  • ब्ल्यु स्टार, हीरो मोटोकॉर्पसारख्या कंपन्यांवर त्या स्वतंत्र संचालक आहेत. एनसीसी (नॅशनल कॅडेट कॉर्प.), सिस्कोसारख्या कंपन्यांवर त्या सल्लागार आहेत.
  • आरोग्यनिगासारख्या क्षेत्रात येणाऱ्या संबंधांमुळे त्यांनी ‘बिलियन हार्ट्स बिटिंग’ ही सामाजिक संस्थाही स्थापन केली आहे.

निर्भया प्रकरणात चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम

  • संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या दिल्ली निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
  • निर्भया प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या निर्णयामुळे निर्भयाला न्याय मिळवून दिल्याची भावना देशभरात व्यक्त होत आहे.
  • दोषींचे कृत्य प्रचंड घृणास्पद असल्याचे तसेच या प्रकरणातील क्रौर्य अतिशय गंभीर स्वरुपाचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले.
  • निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना साकेतच्या जलदगती न्यायालयाने फाशीची सुनावली होती. यावर १४ मार्च २०१४रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते.
  • यानंतर दोषींनी सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतर फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली होती.
  • सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयाप्रमाणे केली. प्रत्येक सोमवारी, शुक्रवारी आणि शनिवारी प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली.
  • या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने तिहार तुरुंगात असताना आत्महत्या केली, तर अल्पवयीन आरोपीने बालसुधारगृहात तीन वर्षांची शिक्षा पूर्ण केली आहे.

ब्रिटनचे प्रिन्स फिलिप शाही जबाबदारीतून निवृत्त

  • ब्रिटनचे राजकुमार व ड्यूक ऑफ एडिन्बर्ग प्रिन्स फिलिप यांनी शाही जबाबदारीतून निवृत्तीची घोषणा केली आहे.
  • ९५ वर्षीय फिलिप येत्या ऑगस्टनंतर कोणत्याही जाहीर कार्यक्रमात शाही घराण्याचे सदस्य म्हणून हजर राहणार नाहीत.
  • राजे फिलिप सुमारे ७८० विविध संस्थांशी आश्रयदाते तसेच अध्यक्ष वा पदाधिकारी नात्याने संबंधित असून, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती आहेत.
  • ड्यूक ऑगस्टपर्यंत पूर्वनियोजित कार्यक्रमांत सहभागी होत राहतील. त्यानंतर ते दौरे आणि भेटीगाठींचे कोणतेही नवे निमंत्रण स्वीकारणार नाहीत.
  • प्रिन्स फिलिप यांनी महाराणींसोबत सर्व महत्त्वपूर्ण परदेश दौरे केले आहेत. यात भारताच्या तीन दौऱ्यांचाही समावेश आहे.
  • त्यांनी १९६१मध्ये भारताचा पहिला दौरा केला होता. त्यानंतर १९८३ आणि १९९७मध्ये त्यांनी भारताचे आणखी दोन राजकीय दौरे केले होते.
  • फिलीप यांचा जन्म ग्रीसमध्ये झाला. ते १८ महिन्याचे असताना त्यांच्या कुटुंबाला ग्रीस सोडून बाहेर पडावे लागले.
  • वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी रॉयल आर्मीत कामाला सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धात ते लढले आणि त्यासाठी त्यांना ग्रीक वॉर क्रॉस ऑफ ऑनरही मिळाला.
  • ते उत्तम विमान चालवतात. वयाच्या ७०व्या वाढदिवसापर्यंत त्यांनी ५००० पायलट आवर्स इतके तास विमान चालविले आहे.
  • दूरदर्शनवर मुलाखत देणारे ते  राजघराण्यातील पहिले सदस्य आहेत. १९६१मध्ये कॉमनवेल्थ संदर्भात त्यांची मुलाखत घेण्यात आली होती.

शिवपाल यादव यांचा समाजवादी सेक्युलर मोर्चा

  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत समाजवादी पक्षाच्या पराभवानंतर आता समाजवादी पक्षात फूट पडली असून पक्षाचे वरिष्ठ नेते शिवपाल यादव यांनी नवीन पक्षाची घोषणा केली आहे. 
  • समाजवादी सेक्युलर मोर्चा असे या पक्षाचे नाव असून या पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव असणार आहेत.
  • मुलायम सिंह यादव यांचा सन्मान परत आणण्यासाठी आणि समाजवादी लोकांना एकत्र आणण्यासाठी या पक्षाच्या माध्यमातून कार्य करण्यात येईल, असे शिवपाल यादव यांनी म्हंटले आहे.
  • मुलायम सिंह यादव यांनी १९९२मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यानंतर गेल्या वर्षभरात पक्षात अंतर्गत वाद-विवाद होत होते.
  • त्याचबरोबर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी पक्षाच्या तिकीट वाटपावरुन समाजवादी पक्षाचे नेत्यांमध्ये फुट पडली होती.
  • उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा एक गट आणि पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव आणि शिवपाल यादव यांच्यासह काही नेत्यांचा दुसरा गट तयार झाला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा