चालू घडामोडी : १० मे

आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती

  • पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेला नेदरलँडमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
  • हेरगिरी व विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून कुलभूषण यांना बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानने अटक केली होती.
  • जाधव हे भारताच्या ‘रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
  • कुलभूषण भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असून, त्यांचा हेरगिरीशी संबंध नाही असे भारताने अनेकदा स्पष्ट करत पाकिस्तानचे आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले होते.
  • तरीही पाकिस्तानने जाधव यांच्यावर लष्करी कायद्यानुसार खटला चालवून १० एप्रिल रोजी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
  • त्यानंतर भारताने यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाचे दार ठोठावले होते. ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे यांनी कुलभूषण यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडली.
  • त्यानंतर ‘इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस’ या संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे.
  • आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयामुळे कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर दबाव आणणे आता शक्य होणार आहे.

आम आदमी पक्षाला आयकर विभागाची नोटीस

  • भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे बेजार झालेल्या आम आदमी पक्षाला आयकर विभागाने कायदेशीर नोटीस बजावली आहे.
  • यामध्ये बँक खात्यांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी पक्षाविरोधात खटला का चालवला जाऊ नये? असा सवाल आयकर विभागाने उपस्थित केला आहे.
  • तसेच मिळालेल्या देणग्यांबद्दल चुकीची माहिती दिल्यामुळे आयकर विभागाने आम आदमी पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
  • आम आदमी पक्षाला २०१५च्या विधानसभा निवडणुकीआधी मिळालेल्या २ कोटी रुपयांच्या स्त्रोताबद्दल माहिती देण्यात अपयश आले आहे.
  • ‘आप’च्या बँक खात्यांची माहिती, संकेतस्थळावर देण्यात आलेली माहिती आणि आयकर विभागाला दिलेली माहिती यामध्ये मोठी तफावत आहे.
  • २०१३-१४मध्ये पक्षाच्या खात्यामध्ये ४० कोटी रुपये जमा झाले. मात्र संकेतस्थळावर फक्त १९ कोटी रुपये दाखवण्यात आले आहेत.
  • तर निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत आम आदमी पक्षाने या कालावधीत केवळ १० लाखांचा निधी मिळाल्याचे सांगितले आहे.
  • त्यामुळे आयकर विभागाने आयकर कायद्याच्या कलम २७७ ए व २७६ सी अंतर्गत ‘आप’ला नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पक्षाला १६ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

पीटर पुले यांना अमेरिकन केमिकल सोसायटीचा पुरस्कार

  • सैद्धांतिक रसायनशास्त्रात संशोधन करणारे प्रा. पीटर पुले यांना अमेरिकन केमिकल सोसायटीचा २०१७मधील पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • अमेरिकन केमिकल सोसायटीचा पुरस्कार हा सैद्धांतिक रसायनशास्त्रातील अभिनव संशोधनासाठी दिला जातो. यापूर्वी अनेक नोबेल विजेत्या संशोधकांना हा पुरस्कार मिळाला आहे.
  • पीटर पुले यांचा जन्म हंगेरीत १९४१मध्ये झाला. सैद्धांतिक रसायनशास्त्रज्ञ ही त्यांची खरी ओळख आहे. त्यांनी एकूण २२० शोधनिबंध व ६ पुस्तके लिहिली आहेत.
  • सध्या जे विल्यम फुलब्राइट कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस या संस्थेतील रसायनशास्त्र व जैवरसायनशास्त्र विभागात ते मानद प्राध्यापक आहेत.
  • अमेरिकेतील अर्कान्सा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातही ते सुप्रतिष्ठित प्राध्यापक आहेत.
  • ते जगातील ३०० महत्त्वाच्या रसायनशास्त्रज्ञांपैकी एक आहेत. ‘पीक्यूएस कॉम्प्युटेशनल केमिस्ट्री’ या संगणक आज्ञावलीची निर्मिती त्यांनी केली आहे. 
  • त्यांनी रेणूंचा आकार ठरवण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यामुळे द्रव्याच्या अभ्यासाच्या पद्धती अधिक अचूक झाल्या.
  • त्यांच्यामुळे पुंज रसायनशास्त्रातील ग्रॅडियंट पद्धतीचा परिचय जगाला प्रथम झाला. त्यातून संगणकीय रासायनिक आज्ञावलीच्या मदतीने रेणूंच्या भौमितीय रचनांची मांडणी किंवा त्याचा अंदाज करणे सोपे झाले.
  • रॉयल स्वीडिश अकादमीनेही त्यांच्या संशोधनाचा संदर्भ १९९८च्या नोबेल पुरस्काराच्या वैज्ञानिक माहितीत अंतर्भूत करून त्यांचा बहुमान केला आहे.
  • सैद्धांतिक रसायनशास्त्रासह त्यांनी स्पंदनात्मक वर्णपंक्तिशास्त्र, रेणवीय पृष्ठभाग, चुंबकीय गुणधर्ममापन, रेणवीय इलेक्ट्रॉनिक रचनेचे गणन अशा अनेक शाखांमध्ये संशोधन केले आहे.
  • हंगेरी विज्ञान अकादमीचे परदेशी सदस्य होण्याचा मान त्यांना १९९३मध्ये मिळाला. रसायनशास्त्राचे ‘रॉबर्ट बोस्ट मानद प्राध्यापक’ हा मोठा मानही त्यांना मिळाला आहे.
  • आंतरराष्ट्रीय पुंज रेणवीय विज्ञान अकादमीचे ते सदस्य आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय पुंज रेणवीय विज्ञान अकादमीचे पदक, अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ट पुरस्कार, श्रॉडिंजर पदक असे अनेक मानसन्मान मिळाले.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

  • राज्यशासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेचा अकोला जिल्ह्यातील कोहळ येथील तळ्यातून गाळ काढून शुभारंभ करण्यात आला.
  • शासनामार्फत राज्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
  • या योजनेंतर्गत जिल्हा परिषदमार्फत जिल्ह्यातील ५० गावतलाव व १० पाझर तलाव आणि जलसंधारण विभागामार्फत १० पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे.

अमेरिकेतील एफबीआयचे संचालक जेम्स कॉमी बडतर्फ

  • अमेरिकेतील फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनचे (एफबीआय) संचालक जेम्स कॉमी यांची ट्रम्प प्रशासनाने तडकाफडकी बडतर्फ केले आहे.
  • जनतेचा एफबीआयवरील विश्वास कायम राहावा म्हणून नवीन संचालकांची नेमणूक करण्याची गरज आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
  • जेम्स कॉमी यांचा एफबीआयच्या संचालकपदावरील कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान एफबीआयने हिलरी क्लिंटन यांच्या ईमेल प्रकरणाचा तपास सुरु केला होता.
  • निवडणुकीचा प्रचार रंगात असताना एफबीआयने हा निर्णय घेतल्याने हिलरी क्लिंटन यांचा पराभव झाल्याचा दावा केला जातो.
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात रशियाचा सहभाग असल्याचा आरोप केला जात असून या प्रकरणाचा तपासही एफबीआयकडून सुरु आहे.
  • अशावेळी कॉमी यांना तडकाफडकी बडतर्फ करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. डेमोक्रेटिक पक्षानेही या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा