चालू घडामोडी : १४ मे

चीनच्या ओबोर परिषदेवर भारताचा बहिष्कार

  • चीनमध्ये आजपासून १४ व १५ मे रोजी होणाऱ्या ‘वन बेल्ट वन रोड’ (ओबोर) शिखर बैठकीमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
  • ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने नाराज भारताने या बैठकीसाठी उच्चस्तरीय प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सीपीईसीच्या माध्यमातून चीन पाकिस्तानमधल्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारणार आहे.
  • तसेच अरबी समुद्रातलं ‘ग्वादार’ हे पाकिस्तानचे बंदर चीन विकसित करणार आहे. या बंदरांचे रूपांतर चीन एका नाविक तळामध्ये करणार असल्याची भीती भारताला आहे.
  • त्याचप्रमाणे ‘सीपीईसी’ प्रकल्पाचा मोठा भाग हा पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने या प्रकल्पाला भारताचा विरोध आहे.
 ओबोर परिषद 
  • ‘वन बेल्ट वन रोड’ हा चीनचा महत्त्वाकांक्षी महाप्रकल्प आहे. प्राचीन कालखंडात असलेल्या ‘रेशीम मार्गाच्या’ धर्तीवर नवे व्यापारी मार्ग तयार करण्याचा चीनचा प्रयत्न आहे.
  • यामध्ये मध्ये आशियातून मोठया प्रमाणावर रस्ते आणि लोहमार्गांचे जाळे विकसित करण्यात येणार आहे. यामुळे चीन युरोपशी अधिक चांगल्या प्रकारे जोडला जाणार आहे.
  • त्याचप्रमाणे अनेक जलमार्ग विकसित केल्यावर चीनचे आफ्रिका खंडाशीही व्यापारी संबंध दृढ होतील.
  • या महाप्रकल्पात सहभागी होणाऱ्या देशांची एक मोठी ‘ओबोर’ परिषद चीनमध्ये १४ व १५ मे रोजी भरवली जात आहे.
  • या बैठकीमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह २९ देशांचे व सरकारांचे प्रमुख उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
  • श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे उपपंतप्रधान व अर्थमंत्री कृष्णबहादूर महारा तसेच बांगलादेश व मालदीवचे शिष्टमंडळ परिषदेत उपस्थित राहतील.
  • जगातील महासत्तांपैकी अमेरिका, फ्रान्स, जर्मनी व ब्रिटन यांनी त्यांचा सहभाग निश्चित केला आहे.
  • चीनच्या या संमेलनात अशिया, युरोप आणि अफ्रिकेला महामार्ग, रेल्वे मार्ग आणि जल मार्गाने जोडण्याबाबत चर्चा होणार आहे.

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार

  • रुग्णसेवेचे पवित्र कार्य करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वप्ना जोशी, चंद्रकला चव्हाण आणि कल्पना गायकवाड या महाराष्ट्रातील तीन परिचारिकांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला.
  • राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात देशभरातील एकूण ३५ परिचारिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • ‘फ्लॉरेन्स नाइटिंगेल’ यांच्या जन्मदिन ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाते.
  • सन्मानपदक, प्रशस्तिपत्र आणि ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार १९७३पासून प्रदान करण्यात येतात.

आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताला एकूण १० पदके

  • आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुमित कुमारने अखेरच्या दिवशी पुरुषांच्या १२५ किलो वजन गटाच्या फ्रीस्टाईलमध्ये रौप्यपदक जिंकले.
  • अंतिम लढतीत सुमित कुमारला इराणच्या मोहम्मद काझीम मोहेबीने २-६ अशा फरकाने पराभूत करत सुवर्णपदक जिंकले.
  • अशा प्रकारे भारतीय पैलवानांनी या स्पर्धेत एक सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण दहा पदकांची कमाई केली.
  • याआधी बँकॉकला झालेल्या मागील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताने एकूण ९ पदके पटकावली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा