चालू घडामोडी : २० मे

दादर-सावंतवाडी एक्स्प्रेसचे नामकरण तुतारी एक्स्प्रेस

  • कोकणात धावणाऱ्या दादर-सावंतवाडी ट्रेनचे नाव बदलून ‘तुतारी एक्स्प्रेस’ करण्यात आले आहे.
  • दादर-सावंतवाडी मार्गावर १ जुलै २०११ रोजी राज्यरानी एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. त्यामुळे एका रात्रीत प्रवास करता येणे शक्य झाले.
  • त्यामुळे प्रवाशांनी या ट्रेनला पसंती दिली. कोकणातील चाकरमन्यांसाठी दादर-सावंतवाडी ही ट्रेन सर्वाधिक आवडीची आहे.
  • कोकणातील रत्नागिरीमधील गणपतीपुळ्याजवळ जन्मलेले आणि केशवसुत टोपण नावाने सुप्रसिद्ध असलेले मराठी कवी कृष्णाजी केशव दामले यांच्या सन्मानार्थ या ट्रेनचे नामकरण ‘तुतारी एक्स्प्रेस’ करण्यात आले आहे. 
  • ‘तुतारी’ हे केशवसुतांच्या लोकप्रिय कवितेचे नाव आहे. देशावर ब्रिटिशांचे राज्य असताना केशवसुतांनी या कवितेची रचना केली.
  • या कवितेतून केशवसुतांनी ब्रिटिशांविरोधात एकत्र येण्याचे आणि पेटून उठण्याचे आवाहन केले होते. या कवितेने अनेकांना ब्रिटिशांविरोधात उभे राहण्याची प्रेरणा दिली.

आरोग्य सेवा निर्देशांकात भारत पिछाडीवर

  • ग्लोबल बर्डन ऑफ डिसिसने प्रसिद्ध केलेल्या आरोग्य अहवालामध्ये भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक शेजारील देशांपेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे.
  • बांगलादेश, भुतान, श्रीलंका, चीन या देशांपेक्षा भारताचा आरोग्य सेवा निर्देशांक खालावल्याचे या अहवालात दिसून येत आहे.
  • १९९०-२०१५ दरम्यानच्या कालावधीचा विचार करुन १९५ देशांच्या आरोग्य दराचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे.
  • आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रगतीपथावर असलेल्या भारताला आरोग्याच्या बाबतीतील ध्येय गाठता न आल्याचे या अहवालातून नमूद केले आहे.
  • या अहवालानुसार गेल्या २५ वर्षांमध्ये भारताच्या आरोग्य दरामध्ये १४.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • १९९० मध्ये ३०.७ टक्क्यांवर असलेला आरोग्य निर्देशांक २०१५ मध्ये ४४.८ टक्क्यांवर पोहोचला होता.
  • भारताच्या तुलनेत श्रीलंकेचा आरोग्यसेवा निर्देशांक ७२.८ टक्के, बांग्लादेशचा ५१.७ टक्के, भुतानचा ५२.७ टक्के आणि नेपाळचा ५०.८ टक्के इतका आहे.
  • पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही दोनच राष्ट्र आरोग्य सेवा निर्देशांकाच्या बाबतीत भारताच्या मागे आहेत.

हसन रुहानी यांची इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

  • इराणचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी हे २ कोटी ३५ लाखांहून अधिक मते मिळवून दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले आहेत.
  • रुहानी यांचे मुख्य प्रतिस्पर्धी इब्राहिम रईसी यांना १ कोटीच्या आसपास मते मिळाली. मोस्तफा मीरसाली आणि मोस्तफा हासीमीताबा हे सुद्धा शर्यतीत होते.
  • उदारमतवादी आणि सुधारणावादी अशी प्रतिमा असलेल्या ६८ वर्षीय रूहानी यांचा हा दुसरा कार्यकाळ असेल.
  • रूहानी यांनी २०१३मध्ये निवडणूक जिंकून पहिल्यांदा इराणचे राष्ट्राध्यक्ष बनले होते. त्यांचा कार्यकाल ४ वर्षाचा होता.
  • २०१५मध्ये रुहानी यांनी जागतिक महासत्तांबरोबर इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रम मर्यादा आणण्याचा करार करुन जागतिक निर्बंधातून सवलत मिळवली.
  • ईराणचे इतर देशांशी संबंध दृढ करण्यासाठी हसन रूहानी यांनी इराणचे दरवाजे जगासाठी खुले केले. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचा प्रयत्न केला.

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताला सुवर्ण

  • शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकले आहे.
  • अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीत सिंग या त्रिकुटाने अंतिम लढतीत कोलंबियाच्या संघाला २२६-२२१ अशा गुणफरकाने पराभूत केले.
  • भारतीय पुरुष संघाने उपांत्यफेरीत अमेरिकेला २३२-२३० अशा गुणफरकाने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

झाकीर नाईकला सौदी अरेबियाचे नागरिकत्व

  • वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक याला इंटरपोलपासून बचावासाठी सौदी अरेबियाचे नागरिकत्व देण्यात आले आहे.
  • नाईकची स्वंयसेवी संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर (आयआरएफ) भारत सरकारने बंदी घातली आहे.
  • भारताच्या सुरक्षेला धोका असल्यामुळे आयआरएफवर बंदी घालण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
  • याशिवाय राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नाईकविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी करावी यासाठी तयारी सुरू केली होती.
  • नाईकविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी झाल्यास त्याला फरारी समजून जगातील कोणतीही सुरक्षा यंत्रणा कुठूनही अटक करू शकते.
  • बांगलादेशची राजधानी ढाका येथे गतवर्षी काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यातील काही हल्लेखोरांनी आपल्याला झाकीर नाईकपासून प्रेरणा मिळाल्याचे म्हटले होते.
  • अटकेपासून वाचण्यासाठी झाकीर नाईक भारतातून सौदी अरेबियात पळून गेला होता व त्याने सौदी अरेबियाच्या नागरिकत्वासाठी अर्जही केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा