चालू घडामोडी : १२ जून

आशुतोष कुंभकोणी नवे महाधिवक्ता

  • राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • माजी महाधिवक्ता रोहित देव यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्याने नवीन महाधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • कुंभकोणी हे गेली ३५ वर्षे वकिली व्यवसायात असून, ते गेली २५ वर्षे उच्च न्यायालयात वकिली करीत आहेत.
  • राज्यघटना, महसूल, सहकार, शिक्षण, करविषयक तंटे, जनहित याचिका, फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया व भारतीय दंडविधान अशा विविध प्रकरणांमध्ये त्यांनी बाजू मांडली आहे.
  • ते गेली काही वर्षे राज्य सरकारच्या महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये विशेष ज्येष्ठ वकील म्हणून काम पाहात आहेत.
  • मुंबई विद्यापीठासह राज्यातील महापालिका व अन्य अनेक महत्त्वाच्या संस्थांची बाजू त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयात मांडली आहे.
  • उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यावर काही काळाने त्यांनी राजीनामा दिला होता. ते काही वर्षे सहमहाधिवक्ताही होते.
  • शेतकरी आत्महत्या, राज्यात समान पाणीवाटप अशा अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी ‘न्यायमित्र’ (ॲमिकस क्युरी ) या नात्याने न्यायालयास साहाय्य केले आहे.
  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीत नियुक्त करण्यात आलेले आशुतोष कुंभकोणी हे चौथे महाधिवक्ता आहेत.
  • फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यावर नागपूर येथील ज्येष्ठ वकील सुनील मनोहर यांची नियुक्ती या पदावर झाली.
  • त्यांनी काही महिन्यांतच वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा दिल्यावर नागपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांची नियुक्ती झाली.
  • त्यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे ते वादग्रस्त ठरले आणि त्यांनी राजीनामा दिला.
  • त्यानंतर पुन्हा नागपूर येथील ज्येष्ठ वकील रोहित देव यांची नियुक्ती झाली होती.

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती

  • राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली तीन मंत्र्यांची समिती स्थापण्यात आली आहे.
  • गृहमंत्री राजनाथसिंग, अर्थमंत्री अरुण जेटली आणि नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचा या समितीमध्ये समावेश आहे.
  • विविध राजकीय पक्षांशी चर्चा करून राष्ट्रपतीपदाची यंदाची निवडणूक सर्वसंमतीने व्हावी या प्रयत्नासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. 
  • १७ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची २८ जून पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
  • ही त्रिसदस्य समिती लहान मोठ्या तमाम राजकीय पक्षांशी विचारविनिमय आणि चर्चा करून सर्वसंमतीचा उमेदवार ठरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

जितू-हीनाला सुवर्णपदक

  • भारताच्या जितू राय आणि हीना सिधूने आयएसएसएफ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत मिश्र गटात १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक मिळवले.
  • या जोडीने अंतिम फेरीत रशियावर ७-६ अशी मात केली. जितू-हीनाचे हे मिश्र गटातील दुसरे सुवर्णपदक आहे. 
  • यावर्षी वर्ल्ड कपमध्ये मिश्र प्रकारातील सुवर्णपदकाचा समावेश पदकतक्त्यात करण्यात येणार नाही. या प्रकाराचा समावेश टोकियो २०२०च्या ऑलिंपिकमध्ये करण्यात आला आहे.
  • गबाला येथे सुरू असलेल्या या नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये तीन सुवर्णपदकांसह एकूण सहा पदके मिळवून चीन प्रथम स्थानी आहे.

ज्येष्ठ तेलुगू कवी नारायण रेड्डी यांचे निधन

  • ज्येष्ठ तेलुगू कवी, लेखक आणि ज्ञानपीठ विजेते सी. नारायण रेड्डी यांचे १२ जून रोजी निधन झाले. रेड्डी हे सीनारे या नावाने प्रसिद्ध होते.
  • रेड्डी हे आधुनिक तेलुगू लेखक होते. त्याचप्रमाणे ते बहुश्रुत कवी, तेलुगू चित्रपटाचे गीतकार, शिक्षणतज्ञही होते.
  • रेड्डी यांच्या विविध कविता, चित्रपट संगीत, नाटकांची गाणी, गझल याच्यासह ८० साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. रेड्डी यांनी चित्रपटांसाठी ३५०० गाणी लिहिली आहेत.
  • रेड्डी यांचा जन्म २९ जुलै १९३१ रोजी करीमनगर जिल्ह्यातील हनुलजीपेटा या दुर्गम गावात झाला होता.
  • तरुणपणीच्या काळात त्यांचा रोमॅंटिक तेलुगू कवींमध्ये समावेश होता. १९८० मध्ये ‘विश्वंभर’ नावाने त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता.
  • त्यांना १९७७मध्ये पद्मश्री, तर १९९२मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

कॅनेडियन ग्रांप्रीत हॅमिल्टन विजेता

  • मर्सिडिझ संघाचा ब्रिटिश ड्रायव्हर लुइस हॅमिल्टनने फॉर्म्युला वन मालिकेतील कॅनेडियन ग्रांप्री शर्यतीचे विजेतेपद पटकावले आहे.
  • त्याने ही शर्यत १ तास ३३ मिनिटे ५.१५३ सेकंदांमध्ये पूर्ण केली. हॅमिल्टनचे हे कॅनेडियन ग्रांप्रीचे सहावे विजेतेपद ठरले.
  • हॅमिल्टनने २००७ मध्ये पहिल्यांदा कॅनेडियन ग्रांप्रीचे विजेतेपद पटकावले होते. एकूण कारकिर्दीतील त्याचे हे ५६वे विजेतेपद ठरले.
  • मर्सिडिझ संघाचाच वॉल्टर बोट्टास या शर्यतीत दुसऱ्या, रेड बुल-टॅग ह्युएर संघाचा डॅनिएल रिसियार्डो तिसऱ्या स्थानावर राहिला.
  • या विजेतेपदासह हॅमिल्टनने गुणतक्त्यातील दुसरे स्थान अधिक भक्कम केले आहे. फेरारी संघाचा सेबॅस्टियन व्हिटेल गुणतक्त्यात प्रथम स्थानी आहे.
  • सांघिक क्रमवारीत मर्सिडिझचा संघ २२२.२ गुणांसह प्रथम स्थानी, तर फेरारीचा संघ २१४.३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा