चालू घडामोडी : ५ जुलै

भारत आणि इस्त्रायल दरम्यान ७ करार

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक इस्त्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि इस्त्रायल यांनी विविध क्षेत्रांतील ७ करारांवर स्वाक्षरी केली.
  • पंतप्रधान मोदी आणि इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अवकाश, जलव्यवस्थापन, कृषी या क्षेत्रांसह सुमारे १७ हजार कोटींच्या ७ करारांवर स्वाक्षरी केली.
  • भारत-इस्रायल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कृषीच्या ३ वर्षांच्या कार्यक्रमाची घोषणाही यावेळी करण्यात आली.
  • यासोबतच पिण्याचे पाणी आणि स्वच्छता क्षेत्रातही भारत आणि इस्रायलमध्ये सहकार्य करार करण्यात आला आहे.
  • तसेच इस्रो आणि इस्रायलमध्ये आण्विक घड्याळ विकसित करण्यासाठी सहयोगाची योजना आखण्यात आली आहे.
  • औद्योगिक संशोधन, विकास आणि नवप्रवर्तनासाठी ४० दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा करण्याचा निर्णयही भारत आणि इस्त्रायल यांनी घेतला. त्यासाठी दोन्ही देश प्रत्येकी २० दशलक्ष डॉलर निधीचे योगदान देतील.
  • त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या ‘नमामि गंगे’ योजनेंतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेसाठीही भारत आणि इस्रायलमध्ये एक करार झाला आहे.
  • जलसंधारण, लहान उपग्रह या क्षेत्रांतही प्रगती करण्यासंदर्भात इस्रायल आणि भारतामध्ये करार झाले आहेत.
  • इस्रायलने सध्या भारतातील शेती, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये संबंध वाढीस लागावेत यासाठी ५ अब्ज डॉलर्सचा विशेष निधी उभारला आहे.
  • इस्रायलच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलचे राष्ट्रपती रुवेन रिलविन यांचीदेखील भेट घेतली.
 मोदींनी केले भारतीय समुदायाला संबोधित 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ३ दिवसीय इस्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तेल अवीव येथे भारतीय समुदायाला संबोधित केले.
  • यावेळी त्यांच्यासोबत इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू तसेच हजारोंच्या संख्यने भारतीय नागरिक उपस्थित होते.
  • मोदींनी आपल्या भाषणात दिल्ली-मुंबई-तेल अवीव दरम्यान थेट विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली.
  • इस्रायलमध्ये लष्करी सेवा बजावलेल्या भारतीय नागरिकांना ओसीआय कार्ड (भारतीय नागरिकत्व) देण्याचे आश्वासनही दिले.
  • तसेच मूळ भारतीय असलेल्या इस्रायली किंवा ज्यू नागरिकांसाठी ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजन (पीआयओ) कार्ड देण्यासंबंधीची प्रक्रिया सुलभ बनविली जाणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमध्ये एक भारतीय सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याचीही घोषणा केली. 
 मोदी आणि मोशे यांची भेट 
  • २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पालकांचे छत्र हरपलेल्या मोशे होल्ट्झबर्ग (११) या मुलाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.
  • मोदींची भेट हा मोशे आणि त्याच्या आजी-आजोबांसाठी भावनिक क्षण ठरला. मोशे आणि त्याच्या कुटुंबाला मोदी यांनी या वेळी भारतभेटीचे निमंत्रण दिले.
  • लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या २६/११च्या हल्ल्यात मुंबईतील नरीमन हाऊस येथे मोशेचे पालक आणि इतर सहा जणांचा मृत्यू झाला होता.

कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविली

  • राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
  • यानुसार २००९नंतरच्या कर्जमाफीनंतरच्या कालावधीत कर्ज घेतलेल्या परंतु ३० जून २०१६पर्यंत थकित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही आता या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
  • त्याचप्रमाणे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठीची मुदत एक महिन्याने वाढवून ती ३१ जुलै २०१७ करण्यात आली आहे.
  • दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड योजनेंतर्गत (ओटीएस) दीड लाखावरील रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे.
  • राज्य शासनाने २८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ जाहीर केली होती.
  • या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१२ नंतर पीक कर्ज किंवा मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.
  • मात्र, १ एप्रिल २०१२ पूर्वी कर्ज घेतलेले अनेक थकित शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते.
  • त्यामुळे १ एप्रिल २०१२ हा निकष काढून त्यात २००९ नंतरच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अंकित कवात्रा यांना ब्रिटनचा तरुण नेतृत्व पुरस्कार

  • ‘फीडिंग इंडिया’ संस्थेचे संस्थापक अंकित कवात्रा यांना ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी बकिंगहॅम पॅलेस येथे ‘तरुण नेतृत्व पुरस्कारा’ने सन्मानित केले.
  • जागतिक कंपनीतील ऐषारामाची नोकरी सोडून भुकेल्या लोकांची क्षुधाशांती करण्यासाठी कवात्रा यांनी ‘फीडिंग इंडिया’ ही संस्था स्थापन केली.
  • २०१४मध्ये त्यांनी स्थापन केलेली ही स्वयंसेवी संस्था भारतातील ४३ शहरांत ४५०० स्वयंसेवकांमार्फत १३.५० कोटी लोकांना जेवण पुरवते.
  • कवात्रा यांनी गेल्या दोन वर्षांत अनेक उपक्रम राबवले आहेत. अनेक अन्नदान केंद्रे व मुलांसाठी आश्रमशाळा त्यांनी सुरू केल्या आहेत. 
  • त्यांच्या ‘द मॅजिक ट्रक’ या उपक्रमाद्वारे २४ तास वातानुकूलित असलेल्या वाहनात शहरातील दान केलेले अन्न गोळा केले जाते.
  • आपल्याकडे वाया जाणाऱ्या अन्नाची किंमतच ३.७५ कोटी आहे. त्यामुळे एका परीने मानव सेवा करताना अंकित अर्थव्यवस्थेलाही हातभार लावत आहे.
  • यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी दिला जाणारा ‘संयुक्त राष्ट्रे तरुण नेतृत्व पुरस्कार’ अंकित कवात्रा यांना मिळाला आहे.

उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

  • उत्तर कोरियाने ५ जुलै रोजी त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत लांब पल्ल्याच्या आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.
  • उत्तर कोरियाच्या उत्तर प्योंगान प्रांतातून ही चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र ९३० किमी लांब जात समुद्रात कोसळले. या क्षेपणास्त्राने २८०० किमी उंची गाठली होती, असाही दावा जपानने केला आहे.
  • ६७०० किमी उंची गाठण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र अलास्कापर्यंत पोचू शकते, असा अंदाज अमेरिकेतील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
  • उत्तर कोरियाच्या सततच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्यावर अनेक निर्बंध घातले आहेत.
  • तरीही दबावाला न झुगारता उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन वारंवार क्षेपणास्त्र तसेच अण्वस्त्र चाचण्या घेत आहेत.
  • यामुळे त्यांचा पारंपरिक शत्रू असलेल्या दक्षिण कोरियाबरोबरील तणावात भर पडणार आहे. 
  • अमेरिकेच्या स्वांतत्र्यदिनीच त्यांच्यावर हल्ला करण्याची उघड धमकी देणाऱ्या उत्तर कोरियाने ही चाचणी केल्याने, अमेरिकेने संताप व्यक्त केला आहे.
  • उत्तर कोरियाचा एकमेव मित्रदेश असलेल्या चीनने मात्र इतर देशांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
  • इतर देशांनी चर्चेच्या माध्यमातूनच प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे चीनने आवाहन केले आहे.

इग्नुमध्ये तृतीयपंथींना मोफत शिक्षण

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नु) या देशातील सर्वांत मोठ्या मुक्त विद्यापीठात सुमारे २०० अभ्यासक्रमांचे शुल्क तृतीयपंथीसाठी पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
  • या प्रवेशांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नसले तरी या विद्यार्थ्यांना तृतीयपंथी अशी ओळख सिद्ध करण्यासाठी तशी नोंद असलेले आधार कार्ड किंवा कोणत्याही सरकारी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र मात्र सादर करावे लागेल.
  • या सवलतीचा तृतीयपंथींखेरीज अन्य कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी ओळखपत्राची ही अट घालण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा