चालू घडामोडी : ६ जुलै

मोदींकडून भारतीय हुतात्मा जवानांना आदरांजली

  • नरेंद्र मोदी यांनी इस्राईल दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी ६ जुलै रोजी हैफा या प्राचीन शहरातील भारतीय सैनिकांच्या स्मृतिस्थळाला आदरांजली वाहिली.
  • पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिश लष्करासाठी लढणाऱ्या भारतीय जवानांनी इस्राईलच्या हैफा शहराला जर्मन आणि तुर्की लष्कराच्या ताब्यातून मुक्त केले होते. या युद्धात ४४ भारतीय जवान हुतात्मा झाले होते.
  • मोदी आणि इस्राईलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्या हस्ते यावेळी स्मृतिस्थळाचे अनावरण करण्यात आले.
  • १९१८साली इस्रायलमध्ये बलिदान देणाऱ्या या जवानांच्या स्मृतीसाठी भारतीय लष्कर आजही २३ सप्टेंबर रोजी हैफा दिवस पाळते.
  • या जवानांनी केलेल्या कामगिरीची आठवण म्हणून १९२२साली नवी दिल्लीमध्ये ३ मूर्ती हे स्मृतिस्थळ बांधण्यात आले. या रस्त्याचे नाव आता ३ मूर्ती हैफा मार्ग असे करण्यात येणार आहे.
 इस्रायलमधील फुलाला मोदींचे नाव 
  • या दौऱ्यादरम्यान इस्रायल सरकारने मोदींच्या सन्मानार्थ इस्रायल क्रॅसनथमन (गुलदाउदी) या फुलाचे नाव बदलून त्याला 'मोदी' नाव दिले.
  • त्यामुळे यापुढे इस्रायलमध्ये गुलदाउदीचे फूल ‘मोदी’ फूल म्हणून ओळखले जाणार आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये जीएसटी करप्रणाली लागू

  • देशभरात ‘एक देश एक कर’ यानुसार १ जुलैपासून जीएसटी करप्रणाली लागू झाली. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये ही करप्रणाली लागू करण्यात आली नव्हती.
  • परंतु जम्मू-काश्मीर विधानसभेत जीएसटी बिल मंजूर करण्यात आल्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्येही ६ जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे.
  • जम्मू-काश्मीर मंत्रिमंडळ आता राज्यपालांना शिफारशी पाठवणार आहे. शिफारशी मंजूर होताच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मंजुरीचे आदेश देतील.
  • त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्येही इतर राज्यांप्रमाणे ६ जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी सुरु होईल.
  • जम्मू-काश्मीरमध्ये जीएसटीसाठी ४ जुलैपासून चार दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते.
  • अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही गोंधळातच पीडीपी आणि भाजप सरकारला जीएसटी बिल मंजूर करुन घेण्यात यश आले.
  • भारतीय संविधानातील कलम ३७०नुसार जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे.
  • जम्मू-काश्मीरचे स्वतःचे संविधान असल्यामुळे केवळ राज्य सरकारलाच कर वसूली करण्याचा अधिकार आहे.
  • त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये जीएसटी करप्रणाली लागू करून घेण्यासाठी स्वतंत्र जीएसटी विधेयक मंजूर करून घ्यावे लागले.

ललित मोहन दास यांना ‘बिजू पटनायक विज्ञान पुरस्कार’

  • वैज्ञानिक ललित मोहन दास यांना ओदिशा सरकारचा ‘बिजू पटनायक विज्ञान पुरस्कार’ देण्यात आला आहे.
  • ८०च्या दशकात हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्याची कल्पना मांडणारे दास हे काळाच्या पुढे होते व आजही आहेत.
  • हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्यात अनेक अडचणी आहेत. पण दास यांनी ८०च्या दशकात हायड्रोजनवर आधारित वाहनात वापरता येईल, अशी इलेक्ट्रॉनिक इंधन ज्वलनप्रणाली तयार केली होती.
  • आयआयटी दिल्लीच्या प्रयोगशाळेत त्यांनी जगातील पहिली हायड्रोजन आधारित तिचाकी हायअल्फा ही गाडी तयार केली होती.
  • २०१२मध्ये अशा १५ गाड्या प्रदर्शित करण्यात आल्या. १ किलो हायड्रोजनमध्ये या गाड्या प्रवाशांना घेऊन ८३ किमी सफर करीत होत्या.
  • दास यांच्या मते हायड्रोजन हा पुनर्नवीकरणीय व अपारंपरिक ऊर्जास्रोत आहे व तो पाण्यापासून तयार होतो. हायड्रोजन जळाला की परत पाणी तयार होते, त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्नच नाही.
  • दास हे मूळचे ओदिशाचे. रूरकेलामधील महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी घेतली व नंतर खरगपूर येथून एमटेक झाले.
  • सुरुवातीलाच त्यांनी पर्यायी इंधनावर संशोधन केले. हायड्रोजन, सीएनजी, सीएनजी ब्लेंड हे त्यांचे संशोधनाचे विषय आहेत. त्यांच्या नावावर ८० शोधनिबंध आहेत.
  • त्यांना यापूर्वी  विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने राजीव गांधी सन्मान दिला असून लॉकहीड मार्टिनचा पुरस्कार व शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराचेही ते मानकरी आहेत.
  • अमेरिकेतील हायड्रोजन इंधन वाहन प्रकल्प, फ्रान्समधील स्वयंचलित किफायतशीर वाहन प्रकल्प, लेसर डायग्नॉस्टिक ऑफ कार या प्रकल्पात ते सहभागी आहेत.
  • एकूणच आजच्या पर्यायी इंधनाच्या संशोधनात अशा वैज्ञानिकांच्या वेगळ्या प्रयोगांची देशाला मोठी गरज आहे.

आशियाई सांघीक स्नूकर स्पर्धेत भारताला विजेतेपद

  • किर्गीस्तानच्या बिश्केक शहरात पार पडलेल्या आशियाई सांघीक स्नूकर स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानवर मात करत विजेतपद पटकावले.
  • पंकज अडवाणी आणि लक्ष्मण रावत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हे यश मिळविले. भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून अशोक शांडिल्य होते. 
  • पंकज अडवाणीचे हे या हंगामातील दुसरे आशियाई आणि एकूण आठवे विजेतेपद आहे. तर लक्ष्मण रावतचे हे पहिले अजिंक्यपद ठरले आहे.

गुजरातमध्ये हुक्का बारवर बंदी

  • गुजरात सरकारने ६ जुलैपासून राज्यातील सर्व हुक्का बार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारच्या हुक्का बारवर बंदी घालणारे गुजरात हे देशातील पहिलेच राज्य बनले आहे. 
  • गुजरात सरकारने ‘सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादन कायदा २००३’मध्ये सुधारणा करत प्रतिबंधात्मक पदार्थांच्या श्रेणीमध्ये हुक्क्याचाही समावेश केला आहे.
  • यासंबंधीचे विधेयक गुजरात विधिमंडळाने मार्च महिन्यात मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहोर उमटविली आहे.
  • हुक्का बारमुळे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याने त्यावर बंदी घालण्याच्या मागणीने जोर धरला होता.
  • या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात पोलिस कठोर कारवाई करणार असून, यात १ ते ३ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.
  • तसेच दोषी व्यक्तीस २० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
  • अशा प्रकारचे कृत्य दखलपात्र गुन्हा ठरणार असून, बेकायदा हुक्का बार चालविणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास मोहीम राबविली जाणार आहे. 
 हुका सिगारेटपेक्षाही धोकादायक 
  • नियमितपणे हुक्का बारला जाणारी व्यक्ती सिगारेटपेक्षा शंभर ते दोनशेपटीने अधिक धूर आपल्या फुफ्फुसांमध्ये ओढत असते.
  • सर्वसाधारणपणे एक धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती सिगारेटचे २० झुरके घेते; पण हुक्का पार्लरमध्ये जाणारा दोनशे झुरके घेतो.
  • हुक्क्यामधील कार्बन मोनोक्साईडसारखे घटक शरीरास हानिकारक असतात. तसेच त्यात धोकादायक ‘कार्सिनोजेनिक’ घटकही आढळून आल्याचे अमेरिकी कॅन्सर सोसायटीने म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा