चालू घडामोडी : १९ जुलै

प्रसिध्द गणितज्ञ मरियम मिर्झाखानी यांचे निधन

  • फिल्डस मेडल हा पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या महिला व प्रसिध्द इराणी-अमेरिकन गणितज्ञ मरियम मिर्झाखानी यांचे निधन झाले.
  • स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. मिर्झाखानी यांचे १४ जुलै २०१७ रोजी ४० व्या वर्षी स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले.
  • मरियम यांचा जन्म १९७७ मध्ये इराणची राजधानी तेहरानमध्ये झाला. हॉर्वर्ड विद्यापीठाने २००४ मध्ये त्यांना पीएचडी प्रदान केली होती.
  • त्यांना तरुणपणी आंतरराष्ट्रीय मॅथेमॅटिकल ऑलंपियाडमध्ये २ सुवर्ण पदकांनी गौरवण्यात आले होते.
  • १३ ऑगस्ट २०१४ रोजी मिर्झाखानी गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानला जाणाऱ्या फिल्ड्स मेडल या सर्वात प्रतिष्ठित पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
  • भौमितिक व गतिकी प्रणालीच्या संशोधनासाठी कोरियात सेऊल येथे झालेल्या इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ मॅथेमेटिशियन्स या अधिवेशनामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला (एकमेव) आणि पहिल्या इराणी नागरिक आहेत.
 फिल्ड्स मेडलविषयी.. 
  • फिल्ड्स मेडल गणितातले संशोधन आणि त्या क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी दिले जाते.
  • गणितातले नोबेल अशी या पुरस्काराची ओळख असून १९३६पासून ते प्रदान केले जातात. आतापर्यंत ५२ गणितज्ञांना हा पुरस्कार मिळाला आहे.
  • यासाठी वयोमर्यादा ४० वर्षे असून दर ४ वर्षानी दोन, तीन अथवा चार गणितज्ञांना हे पुरस्कार जाहीर केले जातात.
  • भारतीय वंशाच्या डॉ. मंजूल भार्गव यांनी २०१४मध्ये हा पुरस्कार मिळवला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय आहेत.

चीनने तिबेटमध्ये पाठवली लष्करी सामुग्री

  • सिक्कीम जवळच्या डोकलाम भागात भारतीय सैन्याबरोबर तणाव वाढलेला असताना चीनने तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टनांची लष्करी सामुग्री पाठवली आहे.
  • साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या चिनी लष्कराच्या मुखपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या संघर्षात आणखी भर पडणार आहे.
  • पश्चिम थिएटर कमांडने उत्तर तिबेटच्या कुनलून पर्वतरांगामध्ये हजारो टनांची सैन्य सामुग्री पाठवली आहे.
  • पश्चिम थिएटर कमांडकडे शिनजियांग आणि तिबेटवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असून हीच कमांड भारताबरोबरचे सीमा विषय हाताळते. 
  • चीनकडे यादोंगपासून ल्हासापर्यंत पसरलेल्या रेल्वे आणि रस्ते नेटवर्कच्या माध्यमातून लष्करी सामुग्री सिक्कीमच्या नथू-ला खिंडीपर्यंत पोहोचवण्याची क्षमता आहे.
  • चीनी सैन्याला एक्सप्रेस वे नेटवर्कच्या माध्यमातून ७०० किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी फक्त सहा ते सात लागू शकतात. 
  • डोकलाम भाग भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवर आहे. भूतानमध्ये येणारे डोक्लाम म्हणजे आपल्या डोंगलाँग प्रांताचा भाग आहे, असा चीनचा दावा आहे.
  • त्यामुळे येथे भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. भारतीय सैन्य मागे हटायला तयार नसल्याने चीनकडून युद्धाची भाषा केली जात आहे.

नागालँडमध्ये राजकीय अस्थिरता

  • नागालँडमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून मुख्यमंत्री शूरहोजेली लिजित्सू बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेत गैरहजर राहिले.
  • मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
  • नागालँडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्ष नागा पीपल्स फ्रंटमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.
  • या कलहातून माजी मुख्यमंत्री टी आर झेलियांग यांनी १५ जुलै रोजी राज्यपालांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला होता.
  • नागालँड विधानसभेत एकूण ६० आमदार असून यातील ४३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा झेलियांग यांनी केला होता.
  • त्यामुळे १९ जुलै रोजी विधानसभेत मुख्यमंत्री लिजित्सू यांना बहुमत सिद्ध करायचे होते. मात्र ते विधानसभेत गैरहजर राहिले.
  • बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्याने लिजित्सू यांनी गैरहजर राहणे पसंत केल्याचे सांगितले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा