चालू घडामोडी : ४ ऑगस्ट

मृत्यू प्रमाणपत्रासाठी आधार बंधनकारक

  • केंद्र सरकारने मृत्यूची नोंद करण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक केला आहे. गृहमंत्रालयाने याबाबतची अधिसूचना काढली आहे.
  • जम्मू काश्मीर, मेघालय आणि आसाम वगळता सर्व राज्यातील नागरिकांसाठी १ ऑक्टोबर २०१७ पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. 
  • त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना, अर्जदाराला मृत्यू झालेल्या व्यक्तीचे आधार कार्ड अथवा आधार क्रमांक सादर करावे लागणार आहे.
  • जर मृत्यू झालेल्या व्यक्तीने आधार कार्ड काढलेच नसेल तर मग तसे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
  • जर एखाद्याने खोटी माहिती दिली तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही गृहमंत्रालयाकडून देण्यात आला आहे. 
  • केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रजिस्ट्रार जनरल इंडियाने पत्रक काढून मृत्यूच्या दाखल्यासाठीच्या नवीन नियमाची माहिती दिली.
  • यामुळे मयत व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही, तसेच त्या व्यक्तीविषयीची माहितीही सरकारकडे उपलब्ध असेल.
  • तसेच यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवून देण्यासाठी एकाहून जास्त कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत.

राज्यसभेतही भाजप सर्वांत मोठा पक्ष

  • राज्यसभेत ५८ खासदारांसह भाजप काँग्रेसला मागे टाकत सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. राज्यसभेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या खासदारांची संख्या ही ५७ इतकी झाली आहे.
  • मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर राज्यसभेत भाजपचे नूतन खासदार संपतिया उइके यांनी शपथ घेतली.
  • केंद्रीय मंत्री अनिल दवे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. उइके हे बिनविरोध निवडून आले.
  • नरेंद्र मोदी सरकार मे २०१४मध्ये सत्तेवर आल्यापासून राज्यसभेत सर्वाधिक भाजपचे खासदार असण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • परंतु अद्यापही भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) या वरिष्ठ सभागृहात निर्णायक बहुमत नाही.
  • २०१८पर्यंत राज्यसभेत काँग्रेस पक्षच सर्वांत मोठा पक्ष राहिला असता. पण त्यांच्या दोन सदस्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या खासदारांची संख्या कमी झाली आहे.

मुगलसराय स्टेशनला दीनदयाल उपाध्याय यांचे नाव

  • उत्तर प्रदेशमधल्या प्रमुख रेल्वे स्टेशनांपैकी एक असलेल्या मुगलसराय या स्टेशनचे नाव बदलून जनसंघाचे नेते दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याच्या योगी मंत्रिमंडळाच्या निर्णयाला केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
  • कोणत्याही स्टेशन, गाव आणि शहराचे नाव बदलण्यासाठी राज्य सरकारांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते.
  • जून महिन्यात योगी मंत्रिमंडळाने मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदारांनी या नामकरणाला विरोध केला होता.

बराक ओबामा दिसणार डॉक्युमेंट्रीमध्ये

  • इस्त्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष तसेच माजी पंतप्रधान शिमोन पेरेज यांच्या आयुष्यावर आधारित बनवण्यात येणाऱ्या डॉक्युमेंट्रीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अभिनेत्री व गायिक बार्बरा स्ट्रायसँड दिसणार आहेत. 
  • Never Stop Dreaming: The Life and Legacy of Shimon Peres असे डॉक्युमेंट्रीचे नाव आहे. ऑस्कर विजेते रिर्चड ट्रंक या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शक आहेत.
  • २०१६मध्ये या डॉक्युमेंट्रीवर काम करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी ६० तासांची मुलाखत रेकॉर्ड करायची होती. मात्र सप्टेंबर २०१६मध्ये पेरेज यांचे अनपेक्षितपणे निधन झाले. 
 शिमोन पेरेज यांच्याविषयी 
  • इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष शिमोन पेरेज यांचे वयाच्या ९३व्या वर्षी २८ सप्टेंबर २०१६ रोजी निधन झाले.
  • पेरेज यांनी दोनदा इस्त्रायलचे पंतप्रधानपद भूषवले आहे. यानंतर त्यांनी देशाचे राष्ट्राध्यक्ष पदही सांभाळले.    
  • १९९४मध्ये राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कार्याकाळादरम्यान शिमोन पेरेज यांनी इस्त्रायल-फिलिस्तिनमधील विवाद मिटवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. 
  • या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी त्यांना १९९४ साली नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • शिमोन पेरेज यांनी २००७ पासून २०१४ पर्यंत इस्त्रायल देशाचे नववे राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली

अभिनेते रॉबर्ट हार्डी यांचे निधन

  • ‘हॅरी पॉटर’ सिनेमातील लोकप्रिय अभिनेते रॉबर्ट हार्डी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
  • रॉबर्ट यांनी ‘हॅरी पॉटर’मध्ये कॉरनेलियस फज ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांनी थिएटर, टिव्ही आणि सिनेमांमध्ये ७० वर्षांक्षाही अधिक काळ काम केले.
  • हार्डी यांनी ६ सिनेमांमध्ये ब्रिटीश पंतप्रधान विंसटन चर्चिल यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तसेच त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष फ्रँकलिन डी रूसवेल्ट यांची व्यक्तिरेखा साकारली होती.
  • १९२५मध्ये जन्मलेल्या हार्डी यांनी दुसऱ्या महायुद्धावेळी रॉयल एअर फोर्समध्ये नोकरी केली होती. दुसरे महायुद्ध संपल्यावर त्यांनी आपले लक्ष अभिनयाकडे वळवले. 
  • १९७८ ते १९९० मध्ये त्यांनी ‘ऑल क्रिएचर्स ग्रेट अॅण्ड स्मॉल’ ही नावाजलेली मालिका केली.
  • अभिनयातील त्यांच्या योगदानाबद्दल ‘सीबीई’ पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा