चालू घडामोडी : ७ ऑगस्ट

निती आयोग उपाध्यक्षपदी राजीव कुमार

  • निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर आता राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • देशाच्या विविध क्षेत्रांतील धोरणांची निश्चिती करण्यासाठी असलेला नियोजन आयोग मोडीत काढून मोदी सरकारने निती आयोगाची स्थापना केली.
  • कुमार हे ऑक्स्फर्ड विद्यापीठाचे डीफिल व लखनौ विद्यापीठाचे पीएचडी आहेत. औद्योगिक व शैक्षणिक वर्तुळातही त्यांचे नाव आहे.
  • राजीव कुमार यांनी सरकारला सल्ला देणाऱ्या अनेक वैचारिक मंचांवर काम केलेले आहे, शिवाय अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते पदाधिकारी आहेत.
  • सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे ते वरिष्ठ फेलो असून ते पुण्याच्या गोखले इन्स्टिटय़ूट ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिक्स या संस्थेचे कुलपती आहेत.
  • ते फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे (फिक्की) सरचिटणीस व कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संस्थेत मुख्य अर्थतज्ज्ञ होते.
  • कौन्सिल फॉर रीसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स या संस्थेत ते मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक होते.
  • त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे संचालक म्हणून काम केलेले असल्याने त्यांना बँकिंग क्षेत्राची सखोल माहिती आहे.
  • राजीव कुमार हे गेली ३५ वर्षे अर्थशास्त्रात काम करीत आहेत. ते सहज योगाचे साधकही आहेत. त्यांनी ‘पहले इंडिया’ नावाची एक स्वयंसेवी संस्थाही स्थापन केली आहे.
  • पंतप्रधान मोदी यांचे राजकारण व धोरणे यावर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. ‘मोदी अ‍ॅण्ड हिज चॅलेंजेस’ हे पुस्तक त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध आहे.

हाफिज सईदचा राजकीय पक्ष स्थापन

  • जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदने ‘मिल्ली मुस्लिम लीग’ नावाने पक्षाची स्थापना केली आहे.
  • हाफिजने या पक्षाच्या अध्यक्षपदी जमात-उद-दावाच्या सैफुल्ला खालिदची नियुक्ती केली आहे.
  • मागील ६ महिन्यांपासून नजरकैदेत असलेल्या हाफिजने काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या स्थापनेसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता.
  • २०१८ मधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सईदने पक्ष बांधणीला सुरुवात केली असून लवकरच पक्षाच्या चेहऱ्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.
  • सध्या पाकिस्तानच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. पनामा पेपर्स प्रकरणात नवाज शरीफ यांना पंतप्रधानपद गमवावे लागले आहे.
  • याशिवाय शरीफ यांच्यावर टीका करणारे तहरीक-ए-इन्साफचे इम्रान खान यांच्यावर त्यांच्याच पक्षातील महिला नेत्याने अश्लिल मेसेज पाठवल्याचे आरोप केल्यामुळे इम्रान खान अडचणीत आले आहेत.
  • यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी सईदने राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.
  • पंजाब सरकारने ३१ जानेवारी रोजी हाफिज सईद आणि त्याच्या ४ साथीदारांना दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत ताब्यात घेतले होते. त्यामुळे सईद गेल्या ६ महिन्यांपासून नजरकैदेत आहे.
  • जमात-उद-दावा विरोधात कारवाई केली नाही तर पाकिस्तानवर निर्बंध लादण्यात येतील, अशी ताकीद अमेरिकेने दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

कृष्णराजला ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेचे जेतेपद

  • इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या बीआरडीसी या ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकने विजेतेपद पटकावले आहे.
  • १९ वर्षांनंतर एखाद्या भारतीय रेसरने ही स्पर्धा जिंकली आहे. १९ वर्षांपूर्वी भारताचा प्रसिद्ध रेसर नरेन कार्तिकेयनने अशी कामगिरी केली होती.
  • कृष्णराज कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र असून, गेली ८ वर्षे तो कार्टिंग स्पर्धांमध्ये सहभागी होत चमकदार कामगिरी करत आहे.
  • गो कार्टिंगमध्ये यशस्वी ठसा उमटवल्यानंतर, गेल्या ४ वर्षापासून कृष्णराज फॉर्म्युला कार रेसिंगमध्ये सहभागी होत आहे.
  • ५ आणि ६ ऑगस्ट रोजी ब्रिटिश फॉर्म्युला थ्री रेसिंगच्या फेरीतील दुसऱ्या रेसमध्ये कृष्णराजने प्रथम क्रमांक अर्थात पोल पोझिशन पटकावली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा