चालू घडामोडी : ६ ऑगस्ट

विजेंदरकडून चीनच्या मैमतअली पराभूत

  • अत्यंत रोमांचक झालेल्या लढतीत भारताचा बॉक्सर विजेंदर सिंगने चीनच्या झुफिकार मैमतअली याला नमवत व्यावसायिक बॉक्सिंग कारकिर्दीमध्ये सलग नववी लढत जिंकली आहे.
  • या विजयासह विजेंदरने आपल्या डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट विजेतेपदाचा बचाव केलाच, त्याचबरोबर मैमतअलीचे डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट विजेतेपद आपल्याकडे घेतले.
  • वरळीतील एनएससीआय स्टेडियममध्ये झालेल्या एकूण दहा फेऱ्यांच्या या लढतीमध्ये तिन्ही परीक्षकांनी एकमताने विजेंदरला विजयी घोषित केले.
  • या सामन्यात विजेंदरने उत्कृष्ट बचावतंत्र दाखवत प्रतिस्पर्ध्याला अचूक आणि जोरदार ठोसे लगावले.
  • सध्या सुरू असलेल्या भारत-चीन सीमावादामुळे वातावरण गंभीर असताना विजेंदर-मैमतअली या लढतीकडे भारत विरुद्ध चीन असा रंग चढला होता.

भारत २०२२ ईटीएफची घोषणा

  • विविध ६ उद्योग क्षेत्रातील नेमक्या २२ कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेल्या ‘भारत २०२२’ नावाच्या नवीन एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)ची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ४ ऑगस्ट रोजी येथे केली.
  • प्रस्तावित भारत २२ ईटीएफमध्ये सरकारी बँकांव्यतिरिक्त, सरकारच्या ‘एसयू-यूटीआय’अंतर्गत काही खासगी कंपन्यांत असलेल्या गुंतवणुका तसेच केंद्रीय सार्वजनिक उपक्रम अशा एकूण २२ कंपन्यांच्या समभागांना  सामावले जाईल.
  • या ईटीएफमधून प्रत्येक व्यक्तिगत कंपनीत कमाल १५ टक्के मर्यादेपर्यंत तर उद्योग क्षेत्रवार कमाल २२ टक्क्य़ांपर्यंत गुंतवणूक असेल.
  • जगभरात सर्वत्रच ईटीएफची कामगिरी चांगली असून, ईटीएफ मालमत्तांमध्ये उमदी वाढ दिसून येत आहे.
  • यापूर्वीचा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या ‘सीपीएसई-ईटीएफ’चा प्रयोग आणि त्याला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्याचे जेटली यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रांद्वारे उत्तर कोरियावर कडक निर्बंध

  • अमेरिकेच्या दबावाला न जुमानता सातत्यानं अण्वस्त्र चाचणी करणाऱ्या उत्तर कोरिया या देशावर संयुक्त राष्ट्राने कडक निर्बंध लादले आहेत.
  • उ. कोरियावर कडक निर्बंध लादण्यासाठी अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव मांडला होता. त्याला सर्व देशांच्या संमतीने मंजुरी देण्यात आली.
  • उत्तर कोरियाने लागोपाठ घेतलेल्या अण्वस्त्र चाचण्यांमुळे कोरियन द्विपकल्पात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियावर हे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
  • यामुळे मासे व समुद्री खाद्यपदार्थ, कोळसा, लोह इत्यादींच्या निर्यातीवर निर्भर असलेल्या उत्तर कोरियाला आता निर्यात करता येणार नाही.
  • सर्व देशांनी हे प्रतिबंध पाळल्यास उत्तर कोरियाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.
  • ४ जुलै रोजी उत्तर कोरियाने केलेल्या आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइल परीक्षण घेतल्यानंतर हा प्रस्तावाचा मसुदा तयार करण्यात आला.
  • उत्तर कोरियाचा सर्वात मोठा व्यापारी सहयोगी असलेल्या चीनसोबत जवळपास १ महिन्याच्या चर्चेनंतर अमेरिकेने या प्रस्तावाचा मसुदा तयार केला आहे.
  • संयुक्त राष्ट्राने २००६ पासून आतापर्यंत उत्तर कोरियावर जवळपास ७ वेळा निर्बंध लादले आहेत. मात्र त्यानंतरही उत्तर कोरियाच्या भूमिकेत कोणताही फरक पडलेला दिसला नाही.

पाकच्या मंत्रिमंडळात हिंदू खासदाराचा समावेश

  • पाकिस्तानच्या हंगामी पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आलेल्या शाहिद खाकन अब्बासी यांच्या मंत्रिमंडळात खासदार दर्शन लाल या हिंदू खासदाराचाही समावेश करण्यात आला आहे.
  • मागील २० वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच एका हिंदू नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
  • राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी ४७ खासदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये १९ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
  • ६५ वर्षीय दर्शन लाल यांना पाकिस्तानच्या चारही प्रांताच्या समन्वयासाठी जबाबदारी देण्यात आली आहे.
  • लाल हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. सध्या ते सिंध प्रांतातील मीरपूर मथेलो शहरात वैद्यकीय व्यवसाय करतात.
  • २०१३मध्ये ते पीएमएल-एन पक्षाकडून अल्पसंख्यांक कोट्यातून दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले होते.
  • नवाझ शरीफ मंत्रिमंडळात संरक्षण आणि ऊर्जा मंत्रालय सांभाळणाऱ्या ख्वाजा आसिफ यांना अब्बासींनी विदेश मंत्री म्हणून निवडले आहे.
  • पाकिस्तान सरकारला २०१३नंतर प्रथमच पूर्णवेळ विदेश मंत्री मिळाला आहे. पाकिस्तानच्या अखेरच्या विदेश मंत्री या हिना रब्बानी होत्या.
  • पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाझ शरीफ यांना मागील आठवड्यात पनामा पेपर्स भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यामुळे त्यांना पंतप्रधान पदावरूनही पायउतार व्हावे लागले.
  • त्यानंतर शरीफ यांचे निकटवर्तीय शाहिद अब्बासी यांची हंगामी पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती.

अखेरच्या शर्यतीत उसेन बोल्टला कांस्यपदक

  • ‘फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ’ नावाने प्रसिध्द जमैकाच्या उसेन बोल्टला वर्ल्ड अॅथलेटिस्कस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • आतापर्यंतच्या कारकीर्दीत बोल्टला मिळालेले हे पहिले कांस्यपदक आहे, यापूर्वीच्या प्रत्येक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदक मिळविले आहे.
  • अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनने ही शर्यत ९.९२ सेकंदांमध्ये पूर्ण करत सुवर्ण पदकावर नाव कोरले.
  • तर अमेरिकेच्याच क्रिश्चन कोलमनने ९.९४ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक आपल्या नावे केले.
  • मात्र खराब सुरुवात झाल्याने युसेन बोल्टला अंतिम रेषा पार करण्यासाठी ९.९५ सेकंद इतका वेळ लागला.
  • उसैन बोल्टने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये ६ सुवर्ण तर विश्व चॅम्पियनशिपमध्ये ११ विजेतेपदांची कमाई केली आहे.
  • २०१२च्या लंडन आणि २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने तीन-तीन सुवर्णपदके कमावली आहेत.
  • ९.५८ सेकंदात १०० मीटर, तर १९.१९ सेकंदात २०० मीटर अंतर पार करण्याचा विश्वविक्रमही उसैन बोल्टने २००९च्या बर्लिनमधील स्पर्धेत नोंदवला.
  • याचबरोबर २००८च्या ऑलिम्पिकमधील चार बाय १०० मीटर रिले शर्यतीत त्याचा सहकारी नेस्ता कॅन्टर हा उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे जमैकाला मिळालेले हे सुवर्णपदक काढून घेण्यात आले होते.
  • सध्या लंडन येथे सुरु असलेली वर्ल्ड चॅम्पियनशीप ही बोल्टची अखेरची स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतर कारकिर्दीची सांगता करणार असल्याचे त्याने याआधीच जाहीर केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा