चालू घडामोडी : २ सप्टेंबर

राजीव महर्षी देशाचे नवे कॅग

  • केंद्र सरकारने माजी केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी यांची नियंत्रक आणि महालेखापालपदी (कॅग) नियुक्ती केली आली आहे.
  • महर्षी यांचा गृह सचिवपदाचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी संपला. त्यांनी दोन वर्षे या पदाची धुरा सांभाळली.
  • राजीव महर्षी यांच्यानंतर राजीव गऊबा यांच्याकडे केंद्रीय गृह सचिवपदाची जबाबादारी असेल.
  • १९७८च्या राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी असलेले राजीव महर्षी शशिकांत शर्मा यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.
  • राजीव महर्षी ३० वर्षांपासून अधिक काळापासून प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन विषयात स्ट्रॅथक्लाइड बिझनेस स्कूलमधून पदवी घेतली आहे.
  • त्यांनी इतिहास विषयात नवी दिल्लीतील सेंट स्टिफन्स महाविद्यालयातून बीए आणि एमए केले आहे.
  • राजीव महर्षींनी आतापर्यंत केंद्रात आणि राजस्थान सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
  • राजस्थान सरकारचे मुख्य सचिव, अर्थखात्याचे मुख्य सचिव, इंदिरा गांधी नहर बोर्डाचे सचिव, बिकानेरचे जिल्हाधिकारी सचिव या पदांवर त्यांनी काम केले आहे.
  • याशिवाय केंद्रात अर्थसचिव, खते विभागाचे सचिव या पदांवर काम करण्याचा अनुभव महर्षींना आहे.

केनेथ जस्टर अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या परस्पर संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केनेथ जस्टर यांची नियुक्ती अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून केली आहे.
  • भारतासोबत आर्थिक, व्यापारी आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून ते वाढविण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा या निर्णयावरून दिसून येते.
  • रिचर्ड वर्मा यांनी जानेवारी महिन्यात राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदावर केनेथ जस्टर यांची वर्णी लागली आहे.
  • ६२ वर्षांचे केनेथ जस्टर हे सध्या अमेरिकेन पराराष्ट्र खात्याचे सल्लागार म्हणून काम करतात.
  • केनेथ जस्टर यांनी जानेवारी ते जून या कालावधीत ट्रम्प यांचे आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक विषयांचे उप सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
  • केनेथ जस्टर यांच्याकडे हॉर्वर्ड लॉ स्कूलमधील कायद्याची पदवी आहे. याशिवाय हॉर्वर्डमधील जॉन एफ केनेडी स्कूलमधून पब्लिक पॉलिसीमध्ये मास्टर पदवी घेतली.
  • केनेथ जस्टर १९९२-१९९३ या दरम्यान स्टेट डिपार्टमेंटमध्ये अॅक्टिंग काऊन्सिलर राहिले आहेत.
  • याशिवाय १९८९ ते १९९२ दरम्यान त्यांनी डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेटमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणूनही काम केले आहे.

एस पी त्यागींवर आरोपपत्र दाखल

  • ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) माजी हवाईदल प्रमुख एस पी त्यागी यांच्यासह ९ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.
  • या ९ जणांमध्ये त्यागी यांचे चुलत भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांचाही समावेश आहे.
  • माजी हवाईदलप्रमुख त्यागी यांना ९ डिसेंबर रोजी याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नंतर २६ डिसेंबरला त्यांना जामीनही मिळाला होता.
  • त्यागी आणि इतर आरोपींनी ऑगस्ट वेस्टलँडप्रकरणात लाच घेतल्याचा सीबीआयने आरोप केला आहे.
  • हेलिकॉप्टर उत्पादकाला ५३ कोटी डॉलरचे कंत्राट मिळण्यासाठी या सर्वांनी मदत केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
 ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा 
  • भारताने इटलीच्या सरकारी मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून एडब्ल्यू १०१ जातीची १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा ३,५४६ कोटी रुपयांचा करार २०१०साली केला होता.
  • त्यातील ८ हेलिकॉप्टर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी तर ४ अन्य कारणांसाठी वापरली जाणार होती.
  • पूर्वीची रशियन एमआय-८ ही होलिकॉप्टर आता कालबाह्य़ ठरू लागल्याने ती बदलण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
  • १९९९साली प्रथम ही मागणी झाली. २००५साली त्यासाठी निविदा जाहीर करण्यात आल्या.
  • या पहिल्या निविदांमध्ये ६००० मीटर उंचीवर काम करू शकतील अशी हेलिकॉप्टर हवी असल्याची अट घालण्यात आली होती.
  • उंचीची (सर्व्हिस सीलिंग) ही अट संरक्षण मंत्रालयाने २००६साली शिथिल करून ४५०० मीटरवर आणली.
  • निवडीसाठीच्या या अटी बदलल्याने इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला फायदा झाला आणि अटी बदलण्यात हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल एस पी त्यागी यांचा हात असल्याचा संशय आहे.
  • भारताने १ जानेवारी २०१४ रोजी हा करार रद्द केला. तोपर्यंत करारातील ३ हेलिकॉप्टर भारताला मिळाली होती.
  • सीबीआयच्या तपासात त्यागी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटल्याचे पुरावे सापडले आहेत.
  • सीबीआयच्या तपासानुसार, त्यागींना टय़ुनिशियात नोंदणी असलेल्या कंपन्यांकडून भारत आणि मॉरिशसमधील बँक खात्यांमधून पैसे पोहोचवण्यात आले.
  • त्यागी यांना त्यांच्या संजीव, संदीप व राजीव या भावांमार्फत लाच मिळाली असा आरोप आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये ईडीने भारतात त्यांची मालमत्ता जप्त केली.

विक्रमी अवकाशयात्री पेगी व्हिटसन पृथ्वीवर परतणार

  • आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात २८८ दिवसांचे विक्रमी वास्तव्य करणारी नासाची महिला अवकाशयात्री पेगी व्हिटसन आता पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत आहे.
  • उड्डाण अभियंता जॅक फिशर व रशियाच्या रॉसकॉसमॉस अवकाश संस्थेचे कमांडर फ्योदोर युरीशिखिन यांच्यासह ती सोयूझ एमएस ०४ या अवकाश यानाने परत येत असून ते कझाकस्तानमध्ये उतरणार आहे.
  • पेगी व्हिटसन हिने अवकाशात २८८ दिवस वास्तव्य केले असून पृथ्वीभोवती ४६२३ प्रदक्षिणा मारल्या आहेत.
  • नोव्हेंबर २०१६ पासून ती अवकाशात होती. तिचे हे अवकाशातील तिसरे प्रदीर्घ वास्तव्य होते.
  • तिने कारकीर्दीत ६६५ दिवस अवकाश वास्तव्य केले असून कुठल्याही अमेरिकी अवकाशवीरापेक्षा हा काळ अधिक आहे. जागतिक पातळीवर तिचे आठवे स्थान आहे.
  • युरीशिखिन व फिशर हे एप्रिलमध्ये अवकाश स्थानकात गेले होते. त्यांनी अवकाशात १३६ दिवस पूर्ण केले आहेत.
  • युरीशिखिन याचे अवकाशात पाच मोहिमात मिळून ६७३ दिवस वास्तव्य झाले आहे. तो जागतिक क्रमवारीत सातवा आहे.
  • या अवकाश मोहिमेत पेगी व्हिटसन, फिशर व युरीशिखिन यांनी जैवतंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, पृथ्वी विज्ञानातील अनेक प्रयोग केले आहेत.

एलआयसीला ६१ वर्षे पूर्ण

  • ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ हे घोषवाक्य असणाऱ्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (एलआयसी) १ सप्टेंबर रोजी ६१ वर्षे पूर्ण केली आहेत.
  • एलआयसीने २०१६-१७च्या पहिल्या तिमाहीमध्ये आधारस्तंभ, आधारशिला, जीवन उमंग आणि प्रधानमंत्री वय वंदना या योजना आणल्या असून, आतापर्यंतच्या त्यांच्या योजनांची संख्या २३ आहे.
  • लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि पेन्शन, आजार यासाठीच्याही एलआयसीच्या योजना अतिशय लोकप्रिय आहेत.
  • १९५६साली अवघ्या ५ कोटी भांडवलावर उभ्या राहिलेल्या एलआयसीची मालमत्ता २५ लाख कोटी रुपयांची असून, त्यात उतरविलेल्या आयुर्विम्याची रक्कम २३ लाख २३ हजार ८०२ कोटी रुपये इतकी आहे.
  • एलआयसीने २०१६-१७ या वर्षात २१५.५८ लाख क्लेम सेटल केले. त्यातील रक्कम १ लाख १२ हजार ७०० कोटी रुपये आहे.
  • एलआयसीने आता संबंधित देशातील कंपन्यांच्या भागीदारीतून १४ देशांत पाय रोवले आहेत.
  • नेपाळ, श्रीलंका, सिंगापूर, बांगलादेश, बहारीन, मॉरिशस, कतार, कुवेत, ओमान, फिजी आदी ठिकाणी एलआयसीचे अस्तित्व आहे.

बीआरडी बालमृत्यूप्रकरणी डॉ. काफिल खानला अटक

  • गोररखपूरच्या बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयात (बीआरडी) ऑगस्ट महिन्यात झालेल्या बालमृत्यूप्रकरणी आरोपी डॉक्टर काफिल खानला अटक करण्यात आली आहे.
  • बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात फक्त ६ दिवसांमध्ये ६३ बालकांचा मृत्यू झाला होता.
  • १० आणि ११ ऑगस्ट रोजी ऑक्सिजन पुरवठा खंडित केल्यामुळे ३० मुलांना आपला जीव गमवावा लागला होता.
  • या घटनेनंतर युपीच्या वैद्यकीय शिक्षण अतिरिक्त मुख्य सचिव अनिता भटनागर यांना पदावरुन हटवण्यात आले होते.
  • तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयाच्या प्राचार्यांसह इतर ५ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
  • डॉ. खान यांच्यावर रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स चोरून आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे.
  • निलंबित करण्यात आलेले बीआरडी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजीव मिश्रा आणि त्यांची पत्नी डॉ पुर्णिमा यांना आधीच अटक करण्यात आली आहे.
  • डॉ काफिल यांच्या कृत्याला साथ दिल्याचा आरोप प्राचार्य मिश्रा यांच्यावर करण्यात आला आहे.
  • बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात ऑगस्ट महिन्यात एकूण २९६ बालकांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा