चालू घडामोडी : १७ सप्टेंबर

सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी गुजरातमधील महत्त्वाकांक्षी सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण करण्यात आले.
  • नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणाचे भूमिपुजन ६० वर्षांपूर्वी ५ एप्रिल १९६१ रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते झाले होते.
  • अमेरिकेतील ग्रँड कुली धरणानंतर सरदार सरोवर धरण हे जगातील दुसरे सर्वात मोठे धरण असून, काँक्रिटच्या वापरात हे जगातील सर्वात मोठे धरण आहे.
  • धरणाच्या बांधकामाला १९८७मध्ये सुरुवात झाली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास जावा यावर भर दिला.
  • गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांना सरदार सरोवर प्रकल्पातून फायदा होणार आहे.
 सरदार सरोवर धरण प्रकल्पाची वैशिष्ट्ये 
  • १.२ किमी लांबीचे हे धरण असून १६३ मीटर खोल आहे.
  • सरदार सरोवर धरणाच्या निर्मितीत वापरण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटचे प्रमाण हे सर्वाधिक आहे.
  • सरदार सरोवर प्रकल्पाची उंची १२१.९२ मीटरवरुन १३८ मीटरपर्यंत वाढण्यात आली आहे. उंची वाढवल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
  • आता या धरणात ४.७३ दशलक्ष घटनमीटरपर्यंत पाणी साठवता येणार आहे. त्यामुळे सुमारे १० लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार असून कोट्यवधी लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
  • या धरणावरील दोन वीज प्रकल्पांमधून आजवर ४,१४१ कोटी युनिट वीजेची निर्मिती करण्यात आली आहे.
  • यापैकी एका वीज प्रकल्पाची वीजनिर्मिती क्षमता १,२०० मेगावॅट तर दुसऱ्या वीज प्रकल्पाची २५० मेगावॅट इतकी आहे.
  • या धरणाच्या माध्यमातून १६ हजार कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला आहे. महसूलाची ही रक्कम धरण उभारणीच्या रकमेच्या दुप्पट आहे.
  • या धरणाच्या प्रत्येक दरवाजाचे वजन ४५० टनांपेक्षा जास्त आहे. हे दरवाजे पूर्णपणे बंद करण्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागतो.
  • या धरणाच्या जलविद्युत प्रकल्पांतून तयारी होणारी वीज मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांना पाठवली जाते.
  • यातून निर्माण केली जाणारी सुमारे ५७ टक्के वीज ही महाराष्ट्राला दिली जाते. तर २७ टक्के वीज मध्यप्रदेश आणि १६ टक्के वीज गुजरातसाठी पाठवली जाते.
 नर्मदा बचाव आंदोलन 
  • सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचे हक्क व मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेले ‘नर्मदा बचाव आंदोलन’ देशभरात चर्चेचा विषय ठरला होता.
  • या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली आणि त्यामुळेच जागतिक बँकेने सरदार सरोवर प्रकल्पासाठी दिलेला निधी परत घेतला होता.
  • या प्रकल्पामुळे मध्यप्रदेशामधील सुमारे १९२ गावांतील ४०,००० कुटुंबांना विस्थापित व्हावे लागल्याचा दावा नर्मदा बचाव आंदोलनकर्त्यांनी केला. मात्र, सरकारी आकडेवारीनुसार हा आकडा १८,३८६ आहे.
  • त्यामुळे आंदोलनकर्त्यांकडून या धरणाचे दरवाजे उघडून याची पाणीपातळी कमी करावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.
  • या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी मेधा पाटकर गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. 
  • त्यांच्या प्रयत्नांमुळेच १९९६मध्ये या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर २०००मध्ये न्यायालयाने या प्रकल्पाच्या उर्वरित कामाला परवानगी दिली होती.

कोरिया सुपर सीरिजमध्ये सिंधूने विजयी

  • कोरिया ओपन सुपर सीरिजच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी व्ही सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा २२-२०, ११-२१, २१-१८ असा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  • जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेली पी व्ही सिंधू कोरियन ओपन जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. 
  • सिंधूचे हे कारकिर्दीतील तिसरे सुपरसीरिज विजेतेपद आहे. तिने २०१६मध्ये चायना सुपर सिरीज आणि इंडियन ओपन सुपर सिरीज स्पर्धा जिंकली होती.
  • या विजयासह जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ओकुहाराकडून झालेल्या पराभवाची परतफेड सिंधूने केली आहे.
  • २०१७ या वर्षात भारताचे सर्वाधिक ६ खेळाडू वेगवेगळ्या सुपर सिरीज स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत. याबाबतीत भारताने जपान, चीन यासारख्या मातब्बर देशांनाही मागे टाकले आहे.

पंतप्रधान स्कॉलरशिप योजना

  • देशातील उच्च विद्याविभूषितांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान स्कॉलरशिप योजना जाहीर केली आहे.
  • या योजनेद्वारे, देशातील प्रतिभावान विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊ नये व भारतातच त्यांना उत्कृष्ट दर्जाचे उच्च शिक्षण घेता यावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
  • या योजनेंतर्गत दरवर्षी गुणवत्तेच्या निकषांवर निवडलेल्या १००० विद्यार्थ्यांना दरमहा ७५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल.
  • भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची २० विद्यापीठे असावीत आणि जगातील पहिल्या २०० विद्यापीठांमध्ये त्यांची गणना व्हावी, यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विविध स्तरांवर प्रयत्न चालविले आहेत.
  • मनुष्यबळ विकासमंत्री: प्रकाश जावडेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा