चालू घडामोडी : १९ सप्टेंबर

पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

  • देशातील एकूण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या संख्येमध्ये आणि खर्चामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.
  • देशातील सर्व राज्यांची ३० एप्रिल २०१७ पर्यंतची पायाभूत सुविधा प्रकल्पांची स्थिती दर्शविणारा अहवाल निती आयोगाने तयार केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
  • ५ कोटीहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश निती आयोगाने आपल्या अहवालात केला आहे.
  • या अहवालातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सरकारी, सार्वजनिक तसेच सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्पांचा (पीपीपी) समावेश आहे.
  • या अहवालानुसार, देशात एकूण ८,३६७ पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत ५०,५८,७२२ कोटी इतकी आहे.
  • त्यापैकी महाराष्ट्रात एकूण १,०९७ पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत ५,९७,३१९ कोटी इतकी आहे.
  • देशातील या एकूण पायाभूत प्रकल्पांच्या किंमती मध्ये महाराष्ट्राचा सहभाग हा सर्वात जास्त म्हणजे ११.८ टक्के इतका आहे.
  • महाराष्ट्रापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य असून, देशातील एकूण प्रकल्प किमतीच्या ७ टक्के वाटा उत्तर प्रदेशाचा आहे.
  • अरूणाचल प्रदेशाचा क्रमांक तिसरा असून, या राज्याचा वाटा देशाच्या एकूण पायाभूत प्रकल्पांच्या किंमतीत ६.३ टक्के इतका आहे.
  • तमिळनाडू चौथ्या क्रमांकावर तर गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये या राज्यांचा वाटा अनुक्रमे ६.२ टक्के व ५.७ टक्के इतका आहे.
  • या राज्यांच्या खालोखाल कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा, बिहार, राजस्थान आदी राज्यांचा क्रमांक लागतो.
राज्य प्रकल्पांचा खर्च (कोटींत)
महाराष्ट्र ५,९७,३१९
उत्तर प्रदेश ३,५४,४१९
अरुणाचल प्रदेश ३,१७,३१०
तामिळनाडू ३,१४,०६६
गुजरात २,९०,२२६

९१वे मराठी साहित्य संमेलन बडोद्यामध्ये

  • ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान गुजरातमधील बडोदा या शहराला देण्यात आला आहे.
  • गुजरातमधील प्रमुख शहर असलेल्या बडोद्यामध्ये मराठी भाषिकांचे प्रमाण लक्षणीय आहे. तसेच गायकवाड राजघराण्यामुळे या शहराचे महाराष्ट्राशी अनेक शतकांपासून राजकीय नाते आहे.
  • ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद याआधी बुलढाणा जिह्यातील हिवरा येथील विवेकानंद आश्रमाला देण्यात आले होते.
  • मात्र शुकदास महाराजांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेने केलेल्या आरोपांनंतर हिवरा येथील विवेकानंद आश्रमाने संमेलनाच्या यजमानपदापासून माघार घेतली होती.
  • बडोद्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन असणार आहे. तर स्वातंत्र्योत्तर काळात बडोद्यात होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असेल. सुमारे ८३ वर्षांनंतर बडोद्यात मराठी साहित्य संमेलन आयोजित होणार आहे.
  • यापूर्वी १९०९मध्ये सातवे, १९२१मध्ये अकरावे व १९३४मध्ये विसावे साहित्य संमेलन बडोद्यात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अनुक्रमे का. र. कीर्तीकर, न. चिं. केळकर, ना. गो. चापेकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते.

लोकसंख्या नियंत्रणासाठी आसाममध्ये कायदा

  • दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना ग्रामपंचायत आणि नगरपालिकेची निवडणूक लढवता येणार नाही, असा कायदा आसाम सरकारने मंजूर केला आहे.
  • यासोबतच दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवण्याची तरतूदही या कायद्याद्वारे करण्यात आली आहे.
  • नव्या नियमानुसार, लग्न करताना किमान वयोमर्यादेचे पालन करणाऱ्या व्यक्तींनाही सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरवण्यात येईल.
  • लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी आसामच्या विधानसभेत मोठ्या वादळी चर्चेनंतर हा नवा कायदा मंजूर केला आहे.
  • २००१ मध्ये आसामची लोकसंख्या २.६६ कोटी होती. २०११ च्या जनगणनेनुसार आसामची लोकसंख्या ३.१२ कोटी इतकी आहे. गेल्या १० वर्षांमध्ये लोकसंख्येत १७.०७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
  • लोकसंख्येच्या तुलनेत रोजगारांत वाढ होत नसल्याने जनतेसमोर अनेक आर्थिक समस्या आहेत. त्यामुळेच आता लोकसंख्येला लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • याशिवाय वृद्ध आई-वडील आणि अपंग बहिण-भावाच्या जबाबदारीशी संबंधित एक कायदादेखील आसामच्या विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे.
  • या कायद्याचे नाव प्रणाम (पॅरेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी अॅण्ड नॉर्म्स फॉर अकाऊंटेबिलिटी अॅण्ड मॉनिटरिंग) असे आहे.
  • याअंतर्गत वृद्ध आई-वडिल आणि अपंग बहिण-भावाची जबाबदारी नाकारणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील १० ते १५ टक्के रक्कम कापून, ही रक्कम पीडित व्यक्तीच्या खात्यात वळवली जाणार आहे.
  • आसाममध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार निवडून आले आहे. या सरकारचे नेतृत्त्व भाजपच्या सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे आहे.

किडनी रोग तज्ज्ञ डॉ. कृपालसिंग यांचे निधन

  • भारताचे ‘फादर ऑफ नेफ्रॉलॉजी’ (किडनी रोग तज्ज्ञ) म्हणून ओळखले जाणारे डॉ कृपालसिंग चुग यांचे रक्ताच्या कर्करोगाने १७ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
  • चुग पोस्टग्रॅज्युएट इन्स्ट‌ट्यिूट ऑफ मेड‌किल एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे माजी प्राध्यापक आणि नेफ्रॉलॉजी विभागाचे प्रमुख होते.
  • त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच सन २०००मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले होते.

चीनी खगोलशास्त्रज्ञ डॉ. नान रेन्डाँग यांचे निधन

  • खगोलशास्त्र संशोधनात चीनला एका वेगळ्या क्षितिजावर नेणारे चीनचे खगोलशास्त्रज्ञ, संशोधक तसेच अभियंता डॉ. नान रेन्डाँग यांचे १५ सप्टेंबर रोजी निधन झाले.
  • ‘फाइव्ह हंड्रेड मीटर अ‍ॅपर्चर स्पेरिकल टेलिस्कोप’ (फास्ट) ही जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण उभारण्यामध्ये नान रेन्डाँग यांचा सिंहाचा वाटा होता.
  • चीनच्या गुझाऊ प्रांतात उभारण्यात आलेल्या या रेडिओ दुर्बिणीचे काम १९९४मध्ये सुरू झाले व ते पूर्ण करण्यासाठी सुमारे बावीस वर्षे लागली.
  • ही रेडिओ दुर्बीण कुठे, कशी उभारायची या सगळ्याचे नियोजन त्यांनीच अचूकपणे केले. ‘फास्ट’ दुर्बिणीमागे सर्वात मोठे शक्तिस्थान तेच होते.
  • या दुर्बिणीच्या मदतीने विश्वातील पल्सार म्हणजे स्पंदक तारे, कृष्णविवरे, न्यूट्रॉन तारे अशा असंख्य घटकांचा वेध घेता येणार आहे.
  • या दुर्बिणीद्वारे चीनला अवकाशावर नजर ठेवणारा महानेत्रच डॉ. नान रेन्डाँग यांनी प्राप्त करून दिला आहे.
  • खगोलशास्त्र व खगोलभौतिकीत चीनच्या हेफेई शहरात असलेल्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठातून त्यांनी पीएचडी प्राप्त केली.
  • नान रेन्डाँग हे तीन वर्षे जपानमधील राष्ट्रीय वेधशाळेत प्राध्यापक होते. तेथे त्यांना मायदेशात वर्षांला मिळणारे वेतन एका दिवसाला मिळत होते.
  • असे असतानाही देशाला गरज असताना ते परत आले व रेडिओ दुर्बिणीच्या प्रकल्पाचे नेतृत्व हाती घेतले.
  • नान यांना रेडिओ दुर्बिणीशिवायही अनेक कौशल्ये ज्ञात होती. त्यांना दृश्यकला अवगत असल्याने ‘फास्ट’ या दुर्बिणीचे ओळखचिन्हही त्यांनी तयार केले होते.
  • त्यात त्यांचे अनेक विद्यार्थी काम करीत होते. त्यामुळे रेडिओ खगोलशास्त्रज्ञांची पुढची पिढी घडवण्याचे कामही त्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा