चालू घडामोडी : २१ सप्टेंबर

खेलो इंडिया कार्यक्रम

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील २ वर्षे सुधारित ‘खेलो इंडिया’ कार्यक्रम राबविण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी १७५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • देशाच्या तरुण पिढीमध्ये खेळांची संस्कृती रुजावी आणि त्यातून विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे नाव गाजविणारे खेळाडू तयार व्हावेत हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • त्यासाठी विविध क्रीडा प्रकारांतील १००० तरुण व प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून त्यांना सलग ८ वर्षे प्रत्येकी ५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल.
  • मुलांमधील क्रीडा कौशल्य लहान वयातच हेरून, दीर्घकालीन प्रशिक्षणाने गुणवान खेळाडू घडविण्याची अशी योजना देशात प्रथमच राबविली जात आहे.
  • देशभरातील निवडक २० विद्यापीठांना क्रीडा नैपुण्याची केंद्रे (स्पोर्टिंग एक्सलन्स हब) म्हणून विकसित करण्याचाही या कार्यक्रमात समावेश आहे.
  • त्यामुळे गुणवान खेळाडूंना त्यांच्या क्रीडाप्रकारातील निपुणता प्राप्त करत असतानाच जोडीला औपचारिक पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे सुलभ होईल.
  • याच कार्यक्रमात १० ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘राष्ट्रीय तंदुरुस्ती मोहीम’ हाती घेतली जाईल. शरीराने धट्टीकट्टी व खेळांमध्ये रस घेणारी तरुण पिढी निर्माण करणे हा याचा हेतू आहे.
 कार्यक्रमाची इतर उद्दिष्टे: 
  • लैंगिक व सामाजिक भेदाभेद न मानता समाजाच्या सर्व थरांना सामावून घेऊन खेळांव्दारे सामाजिक अभिसरण करणे.
  • अशांत व मागासलेल्या भागांतील तरुणांना खेळांकडे आकर्षित करून त्यांना विघातक कारवायांपासून परावृत्त करणे.
  • क्रीडा क्षेत्राच्या समग्र विकासाकडे लक्ष देणे. खेळांची किफायतशीर अर्थव्यवस्था निर्माण करणे.
  • खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, तरुणांमध्ये खेळांची आवड निर्माण करणे, प्रतिभावान खेळाडू हुडकून त्यांना प्रशिक्षण देणे, दर्जेदार स्पर्धांचे आयोजन करणे. 
  • शाळा व कॉलेज पातळीपासूनच क्रीडास्पर्धांचा दर्जा उंचावणे.
  • व्यक्ती, समाज व देशाच्या विकासाचे एक साधन म्हणून खेळांचा उपयोग करणे.

सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर ‘रयत क्रांती संघटना’ या नव्या संघटनेची घोषणा केली आहे.
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात मतभेद झाले होते.
  • मंत्रिपदावर असतानाही शेतकऱ्यांच्या हिताची तसेच संघटनेशी सुसंगत भूमिका न घेणे, असा ठपका ठेपत पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची ऑगस्टमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
  • या पार्श्वभूमीवर, कोल्हापूरमध्ये सदाभाऊ खोत यांनी ‘रयत क्रांती संघटना’ या नवीन संघटनेची घोषणा केली.
  • ‘संवादातून संघर्षाकडे’ असे या संघटनेचे घोषवाक्य असून, संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी हायटेक टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष सुरेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

नारायण राणे अखेर काँग्रेसमधून बाहेर

  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
  • काँग्रेस आणि शिवसेनेतील अनेकांचा त्यांना पाठिंबा असल्याचा तसेच शिवसेनेचे २७ आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोटही राणेंनी केला.
  • राजकीय कारकीर्दीतील नारायण राणे यांचे हे दुसरे बंड आहे. वयाच्या १६व्या वर्षापासून शिवसेनेमधून राणे यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली.
  • शिवसेनेमध्ये स्थानिक शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या नारायण राणेंची महत्वकांक्षी आणि आक्रमक नेते अशी ओळख आहे. 
  • १९९५साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यानंतर त्यांच्याकडे दुग्धविकास नंतर महसूलमंत्री पदाची जबाबदारी देण्यात.
  • त्यानंतर १९९९मध्ये मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपदावरुन हटवून त्याजागी राणेंची नियुक्ती करण्यात आली.
  • पण राणे यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ हा काही महिन्यांचा होता. कारण त्यानंतर निवडणूका झाल्या आणि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले.
  • शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राणे यांच्यामध्ये झालेल्या मतभेदातून ३ जुलै २००५ रोजी राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली.
  • त्यावेळी नारायण राणेंसोबत १० पेक्षा जास्त आमदार, हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेनेतून फुटून बाहेर पडले.
  • त्यानंतर नारायण राणेंनी २६ जुलै २००५ रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु वारंवार आश्वासन देऊनही राज्याचे मुख्यमंत्रीपद न दिल्यामुळे राणेंनी आता कॉंग्रेसचा राजीनामा दिला आहे.

जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांमध्ये ३ भारतीय

  • जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’ नियतकालिकाने ‘१०० ग्रेटेस्ट लिव्हिंग बिझनेस माईंडस’ या नावाने जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांची यादी जाहीर केली आहे.
  • यामध्ये लक्ष्मी मित्तल, रतन टाटा आणि विनोद खोसला या भारताच्या तीन उद्योजकांनी स्थान पटकावले आहे. हे तीनही व्यवसायिक फोर्ब्सच्या यादीनुसार लिविंग लिजेंड्स आहेत.
  • यापैकी लक्ष्मी मित्तल हे ‘आर्सेलो मित्तल’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत. तर विनोद खोसला हे सन मायक्रोसिस्टमचे सह-संस्थापक आहेत.
  • या यादीत अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे. ‘फोर्ब्स’ने त्यांचा उल्लेख ‘विक्रेता आणि विशेष गुण असलेला रिंगमास्टर’ असा केला आहे.
  • याशिवाय, या यादीमध्ये अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन, बर्कशायर हॅथवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन बफे आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेटस यांचाही समावेश आहे.
  • ही यादी तयार करताना फोर्ब्सकडून प्रत्येक क्षेत्रात नवनवीन कल्पना राबवणाऱ्या आणि जगावर दीर्घकाळ प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचा विचार करण्यात आला.

मेक्सिकोला भूकंपाचा जोरदार तडाखा

  • मेक्सिकोमध्ये १९ सप्टेंबर रोजी झालेल्या भयावह भूकंपाने २१ शाळकरी मुलांसह २५०हून अधिक जणांचे बळी घेतले असून, प्रचंड आर्थिक हानीही घडवून आणली आहे.
  • या ७.१ रिश्टर तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाच्या तडाख्याने अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकून पडले आहेत.
  • मदत व बचाव पथके ढिगारे उपसून त्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.
  • मेक्सिको सिटीबरोबरच प्युएब्ला, मॉरेलॉस, मेक्सिको स्टेट आणि गुएर्रेरो येथे जीवितहानी झाली.
  • मेक्सिकोमध्ये १९८५मध्ये झालेल्या भयानक विध्वसंकारी भूकंप झाला होता. त्यावेळी १० हजार लोक मृत्युमुखी पडले होते.
  • या भूकंपाआधी १२ दिवसांपूर्वी दक्षिणेकडील दोन प्रांतांत आलेल्या भूकंपात १०० जण ठार, तर दोनशेहून अधिक जखमी झाले होते.
  • मेक्सिकोचे पंतप्रधान: एन्रिके पेना निएटो

गुगलकडून HTCच्या स्मार्टफोन बिजनेसचे अधिग्रहण

  • गुगलने तायवानची कंपनी HTCकडून स्मार्टफोन बिजनेस खरेदी केला आहे. गुगलने सुमारे १.१ अब्ज डॉलरमध्ये हा करार केला.
  • एचटीसीच्या टीमसोबत काम करून सॅमसंग आणि अॅपलला टक्कर देण्याचा गुगलचा प्रयत्न असणार आहे.
  • गुगल आणि एचटीसी यांनी यापूर्वीही एकत्र काम केले आहे. गुगलचा पहिला नेक्सस डिव्हाइस देखील एचटीसीनेच बनवला होता.
  • पण या करारामुळे एचटीसीचा मोबाइल फोनचा बिझनेस ब्लॅकबेरीप्रमाणे बंद होणार नाही. यापुढेही एचटीसी स्वतःच्या ब्रॅंडसाठी काम करेल.
  • यापुर्वी गुगलने २०११मध्ये मोटोरोला कंपनी १२.५ अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली होती आणि काही स्मार्टफोनही लॉन्च केले होते. मात्र, कालांतराने मोटोरोलाला लिनोव्होने खरेदी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा