चालू घडामोडी : ३१ ऑक्टोबर

राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत हिना सिधूला सुवर्ण

  • ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या हिना सिधूने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 
  • १० मी एअर पिस्तुल प्रकारात हिनाने ६२६.२ गुणांची कमाई करत पहिले स्थान पटकावले. हिनाचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक ठरले.
  • काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीत पार पडलेल्या आयएसएसएफ विश्वकप स्पर्धेत हिनाने जितू रायसोबत १० मी पिस्तुल मिश्र प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.
  • हिनाव्यतिरीक्त भारताच्या दिपक कुमारने १० मी एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
  • लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणारा गगन नारंग या प्रकारात चौथ्या क्रमांकावर राहिला.

रेल्वे अर्जावर तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्याय

  • रेल्वेकडून लवकरच रेल्वे तिकिटासाठीच्या आरक्षण अर्जावर तृतीयपंथीयांना स्वतंत्र पर्याय दिला जाणार आहे.
  • सध्या आरक्षण अर्ज भरताना त्यावर पुरुष आणि महिला यांच्यासाठी अनुक्रमे ‘एम’ आणि ‘एफ’ असे दोन पर्याय देण्यात येतात.
  • मात्र आता त्यामध्ये तृतीयपंथीयांसाठी ‘टी’ हा पर्याय द्यावा, अशी सूचना रेल्वेकडून देण्यात आली आहे. ‘टी’ म्हणजे ट्रान्सजेंडर अर्थात तृतीयपंथी.
  • या बदलामुळे तृतीयपंथीयांच्या तिसऱ्या लिंगासाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध झाला आहे. यापूर्वी हा पर्याय ट्रान्सजेंडर (महिला/ पुरुष) असा होता.
  • २०१४च्या ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथींना तिसऱ्या लिंगाचा दर्जा दिला होता.
  • या निर्णयानंतर निर्णयानंतर पासपोर्ट, शिधावाटप पत्रिका, बँकांचे अर्ज, मतदार ओळखपत्र यांच्यासह अनेक ओळखपत्रकांवर तिसऱ्या लिंगासाठी ‘टीजी’, ‘टी’ किंवा ‘इतर’चा पर्याय देणे सुरू केले होते.
  • केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय सध्या तृतीयपंथींशी संबंधित अनेक प्रकरणांवर काम करत आहे. शिवाय संसदेच्या स्थायी समितीकडून प्रस्तावित तृतीयपंथी जन विधेयक २०१६चे परीक्षणही केले जात आहे.

फुटबॉल महासंघाच्या निवडणुका अवैध

  • काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी झालेली निवड रद्द करत, पाच महिन्यांत नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.
  • फुटबॉल महासंघाने घेतलेल्या निवडणुकांमधून राष्ट्रीय क्रीडा संहितेचे उल्लंघन झाल्याचे मतही दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
  • याचसोबत दिल्ली उच्च न्यायालयाने माजी मुख्य निवडणुक आयुक्त एस वाय कुरेशी यांची फुटबॉल महासंघावर प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.
  • २००८साली फुटबॉल महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष प्रियरंजन दासमुन्शी यांचे निधन झाले. यानंतर २००९साली पटेल यांनी महासंघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली.
  • डिसेंबर २०१६मध्ये फुटबॉल महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पटेल यांची पुन्हा एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
  • दर चार वर्षांनी या निवडणुका होतात. प्रफुल्ल पटेल यांची ही अध्यक्ष म्हणून सलग तिसरी वेळ आहे. 
  • पटेल यांच्या निवडीला क्रीडा क्षेत्रात सुधारणांसाठी काम करणारे कार्यकर्ते राहुल मेहरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
  • पटेल यांच्याच नेतृत्वाखाली फुटबॉल महासंघाने फिफाच्या १७ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते.
  • तसेच २०१९साली होणाऱ्या १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाच्या यजमानपदासाठी भारताने प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.

प्रज्ञाशोध परीक्षेत ओबीसींना आरक्षण

  • राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) माध्यमातून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात आता इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांनाही आरक्षण देण्यात येणार आहे.
  • या परीक्षेमध्ये एससी, एसटी आणि अपंग व्यक्तींसाठी आरक्षणाची तरतूद आहे. यामध्ये आता ओबीसींचाही समावेश करण्यात येईल.
  • २०१८च्या शैक्षणिक वर्षासाठी ओबीसींच्या जागांवर प्रवेश देणे सुरु झाले आहे. त्यानंतर २०१९ साठी ओबीसींचा नवा कोटा लागू होणार आहे.
  • त्याचबरोबर सरकारने एनटीएससी शिष्यवृत्तीतही दुप्पट वाढ करण्याचे ठरवले आहे. ही शिष्यवृत्तीची रक्कम १००० रुपयांवरुन २००० रुपये होणार आहे.
  • त्याचबरोबर पीएचडीसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत युजीसीच्या नियमांप्रमाणे बदल होईल.
  • राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा १९६२मध्ये नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कीम अंतर्गत सुरु करण्यात आली होती.
  • विद्यार्थ्यांमधील उच्च बुद्धिमापन आणि शैक्षणिकदृष्ट्या हुशार मुलांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते.
  • सुमारे एक कोटी विद्यार्थी या परीक्षेसाठी दरवर्षी पात्र ठरतात. यांपैकी १००० यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.

चालू घडामोडी : ३० ऑक्टोबर

भारताकडून चाबहारचा प्रथमच वापर

  • भारताद्वारे इराणमध्ये विकसित होत असलेल्या चाबहार बंदरमार्गे भारतातील ११ लाख टन गहू अफगाणिस्तानला निर्यात करण्यात आला आहे.
  • या निर्यातीला भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री सलाहुद्दीन रब्बानी यांनी व्हिडिओ काँन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला.  
  • इराणच्या चाबहार बंदरमार्गे हा गहू अफगाणिस्तानमध्ये दाखल होणार असून चाबहार बंदरचा भारताने पहिल्यांदाच वापर केला आहे.
  • चाबहार बंदरामुळे भारत, अफगाणिस्तान, इराण हे तिन्ही देश जवळ आले असून, यामुळे या देशांमधील व्यापारी संबंध आणखी दृढ होणार
  • आतापर्यंत भारत अफगाणिस्तानमधील व्यापार हा पाकिस्तानमार्गे होत होता. परंतु यापुढे भारताला पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तान आणि इराणशी संपर्क साधणे सहज शक्य होणार आहे.
  • हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तानमधील विकासकामात भारताने महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
 चाबहारचे महत्त्व 
  • इराणच्या आखातात होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तोंडावर वसलेले चाबहार बंदर भारतासाठी व्यापारी तसेच सामरिकदृष्ट्याही उपयुक्त ठरणार आहे.
  • २०१६साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इराणच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी या बंदराच्या विकासाच्या करारावर स्वाक्षरी केली होती.
  • या बंदराच्या विकासासाठी आणि इतर पायाभूत सुविधांसाठी भारताने इराणला ५० कोटी डॉलरची मदत केली होती.
  • चीनचा अरबी समुद्रामधील वाढता वावर पाहता भारतालाही येथे आपले स्थान निर्माण करण्याची गरज होती. चाबहार बंदरामुळे भारताला अरबी समुद्रक्षेत्रामध्ये भक्कम स्थान प्राप्त होईल.
  • चाबहार जवळच पाकिस्तानच्या किनाऱ्यावरील ग्वादर हे बंदर चीन विकसित करत आहे. हे बंदर चाबहार पासून समुद्रमार्गे केवळ १०० किमी अंतरावर आहे. त्यामुळे भारतासाठी चाबहार बंदर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
  • चाबहारला रस्ता व रेल्वेमार्गे अफगाणिस्तानला जोडण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पात अफगाणिस्तानही भारताचा भागीदार असणार आहे.
  • चाबहार बंदराचा एक मोठा फायदा म्हणजे मध्यपुर्वेत आणि मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी भारताला नवा मार्ग उपलब्ध होणार आहे.
  • त्याचप्रमाणे रशिया, युरोप, मध्य आशियातील उझबेकिस्तान, किरगिझिस्तान, ताजिकिस्तान अशा देशांपर्यंत भारत आता पोहोचू शकेल.
  • अफगाणिस्तानला कोणतीही मदत किंवा व्यापार करताना पाकिस्तानचा येणारा अडथळा आता दूर होणार आहे.
  • चाबहार बंदरामुळे इंधनाचे आयातमूल्य कमी होऊन भारतामधील इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. इंधनाप्रमाणे कोळसा, साखर व तांदुळाचा व्यापारही आता चाबहारमुळे सोपा होणार आहे.

श्रीकांतला फ्रेंच सुपर सीरिजचे जेतेपद

  • जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या भारताच्या किदम्बी श्रीकांतने विजयी घौडदौड कायम राखत या वर्षातील चौथ्या सुपर सीरिज विजेतेपदावर नाव कोरले.
  • फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत श्रीकांतने १०व्या मानांकित जपानच्या केंटा निशीमोटोचा २१-१४, २१-१३ असा पराभव केला.
  • फ्रेंच खुल्या बॅडमिंटन जिंकणारा श्रीकांत हा पहिलाच भारतीय खेळाडू असून, त्याचे हे कारकिर्दीतील एकूण सहावे सुपर सिरिज विजेतेपद आहे.
  • यंदाच्या हंगामात पाचव्यांदा सुपर सीरिज स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या श्रीकांतने उपांत्य फेरीत भारताच्याच एच एस प्रणॉयला पराभूत केले होते.
  • या विजयासह एका वर्षात ४ सुपर सीरिज जिंकण्याचा पराक्रम करणारा श्रीकांत पहिला भारतीय  बॅडमिंटनपटू ठरला आहे.
  • तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू आहे. यापूर्वी चीनच्या लीन डान आणि चेन लॉग यांच्यासह मेलिशियाच्या ली चॉग वीने चारवेळा सुपर सीरिज जिंकली आहे.

भारत-इटलीदरम्यान सहा करार

  • भारत दौऱ्यावर आलेले इटलीचे पंतप्रधान पाओले जेंटिलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये सहा करार करण्यात आले.
  • रेल्वे सुरक्षा, राजनैतिक संबंध, उर्जा, सांस्कृतिक सहकार्य, दोन्ही देशांमधील परराष्ट्र मंत्रालय आणि गुंतवणूक अशा सहा करारांचा यात समावेश आहे.
  • इटलीचे पंतप्रधान पाओले जेंटिलोनी हे एक दिवसाच्या भारत दौऱ्यावर असून जवळपास २००७नंतर प्रथमच इटलीचे पंतप्रधान भारतात आले आहेत.
  • नरेंद्र मोदी आणि पाओले जेंटिलोनी यांनी भारतातील १२ आणि इटलीतील १९ उद्योजकांच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत चर्चा केली.
  • आर्थिक आणि गुंतवणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सहा करारांवर स्वाक्षरी केली.
  • २०१८साली भारत आणि इटली यांच्या संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर जेंटिलोनी यांचा भारतदौरा अत्यंत महत्वाचा ठरणारा आहे.

सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत भारताला कांस्य

  • भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने यजमान मलेशियाचा ४-० असा पराभव करताना सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत कास्यपदक जिंकले.
  • या लढतीत भारताकडून विवेक प्रसाद व शैलानंद लाक्रा यांनी प्रत्येकी एक गोल तर विशाल अंतिलने दोन गोल केले.
  • भारतीय गोलकिपर सेंतामिज शंकरनेदेखील खूप चांगला बचाव करताना भारतीय संघाच्या विजयात योगदान दिले.
  • अखेरच्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघाकडून झालेल्या पराभवामुळे भारताला स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यात अपयश आले.

कादंबरीकार कुंजिक्का यांचे निधन

  • व्यवसायाने डॉक्टर असलेले केरळमधील हे कादंबरीकार डॉ. पुनाथिल कुंजब्दुल्ला यांचे २७ ऑक्टोबर २०१७ रोजी निधन झाले.
  • लोक प्रेमाने त्यांना कुंजिक्का म्हणत असत. आधुनिकतावादी विचारशैलीवर आधारित लेखन करीत त्यांनी साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान पटकावले. 
  • त्यांचा जन्म ३ एप्रिल १९४० रोजी कोझीकोड जिल्ह्यात झाला व त्यांचे शिक्षण थलसेरी येथील ब्रेनन कॉलेजात झाले. अलिगड मुस्लीम विद्यापीठातून त्यांनी एमबीबीएस केले.
  • व्यवसायाने ते डॉक्टर असले तरी त्यांचे मन साहित्य क्षेत्राकडे ओढ घेत होते व त्यातच त्यांनी कादंबरी लेखनास सुरुवात केली.
  • लेखक म्हणून ते लघुकथा, कादंबऱ्या व इतर लेखनामुळे प्रकाशात आले. कुठल्याही विषयावरची त्यांची मते बंडखोर व सडेतोड अशीच होती.
  • अलिगड कथाकल (स्टोरीज फ्रॉम अलिगड) हा लघुकथा संग्रह व मारिचुपोया एंटे अप्पनमामारकू (फॉर माय डेड पेरेंट्स) ही त्यांची पुस्तके गाजली.
  • २००१मध्ये त्यांनी भाजपकडून बेयपोरमधून विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले परंतु ते निवडणूक जिंकू शकले नाहीत.
  • १९८०मध्ये स्मारकासिलाकल या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.
  • त्यांनी एकूण ७ कादंबऱ्या व १५ लघुकथासंग्रह लिहिले. एम टी वासुदेवन नायर हे त्यांचे लेखन व जीवनातील गुरू होते.
  • केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना १९७८ मध्ये स्मारकासिलाकल व १९८० मध्ये मालमुकालिले अब्दुल्ला या पुस्तकांसाठी मिळाला होता.
  • त्याशिवाय केरळ साहित्य अकादमीची विद्यावृत्ती, मुथाथू वार्की पुरस्कार व विश्वदीपम पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले होते.

चालू घडामोडी : २९ ऑक्टोबर

७ नोव्हेंबरला विद्यार्थी दिवस

  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश केला तो दिवस आता विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, यासंबंधात अध्यादेशसुद्धा जारी केला आहे.
  • ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक जि. सातारा येथे शाळेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी शाळेत भिवा म्हणून त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती.
  • या शाळेतील रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर त्यांच्या नावाची नोंदणी व त्यासमोरील स्वाक्षरी ही ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून आजही शाळा प्रशासनाने जपून ठेवली आहे.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे.
  • कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाऊल शाळेत पडल्यामुळे ते स्वत: सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले आणि करोडो दलितांचे-वंचितांचे उद्धारकर्तेही झाले.
  • तसेच ज्या संविधानाचा आज सर्वात आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होत असतो त्या भारतीय संविधानाचे ते शिल्पकारही ठरले.
  • परिणामत: भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय ही मानवी मूल्ये रुजू शकली गेली.
  • म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्त्वाची आणि इतिहासाला कूस बदलवयास लावणारी क्रांतिकारी घटना ठरते.
  • डॉ. आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला हा विद्याव्यासंग आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला.
  • आजचा प्रत्येक विद्यार्थी हा या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होणे काळाची गरज आहे.
  • शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी ७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असे शासनाने जाहीर केले आहे.
  • शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय स्तरावर ७ नोव्हेंबर रोजी विद्यार्थी दिवस साजरा करण्यात येणार आहे.

सलाहउद्दीनच्या घरावर एनआयएचा छापा

  • राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीनच्या घरावर छापा टाकला.
  • एनआयएने दोन दिवसांपूर्वी सलाहउद्दीनचा मुलगा सय्यद शाहिद युसूफ याला २०११मध्ये दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवण्याच्या प्रकरणात अटक केली होती.
  • जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात सलाहउद्दीनचे घर असून, एनआयएने सलाहउद्दीनच्या घरावर छापा टाकला.
  • त्याच्या घरातून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून, कागदपत्रे हाती लागताच एनआयएचे पथक तिथून निघून गेले.
  • हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीनला अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने जागतिक दहशतवादी जाहीर केले होते. सलाहउद्दीन हा युनायटेड जिहाद काऊन्सिलचाही अध्यक्ष आहे.

आरकॉमची टूजी सेवा बंद

  • कर्जात आकंठ बुडालेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने (आरकॉम) अखेर आपला टूजी मोबाइल सेवेचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • साधारणपणे ३० नोव्हेंबरपर्यंत कंपनी आपला टूजी व्यवसाय बंद करेल. मात्र थ्रीजी आणि फोरजी मोबाइल सेवा सुरू राहणार आहेत.
  • थ्रीजी आणि फोरजी मोबाइल सेवा तसेच कंपनीचा मोबाइल टॉवर व्यवसायही नफ्यात चालेपर्यंत सुरू राहणार आहे. बाकी सर्व व्यवसाय कंपनी बंद करणार आहे.
  • रिलायन्स कम्युनिकेशन्सवर सध्या सुमारे ४६ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यातून सावरण्यासाठी कंपनीने एअरसेलचे अधिग्रहण करण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता.

ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान बार्नबी जॉयस अपात्र

  • ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान बार्नबी जॉयस यांच्यासह संसदेच्या चार सदस्यांना तेथील उच्च न्यायालयाने दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून अपात्र ठरविले आहे.
  • यामुळे एका मताचे बहुमत असलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांचे आघाडी सरकार सत्तेवरून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  • ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेनुसार दुहेरी नागरिकत्व असलेली व्यक्ती संसदेची सदस्य राहण्यास अपात्र आहे.
  • उपपंतप्रधान जॉयस यांनी वडिलांकडून जन्माने मिळालेल्या न्यूझीलंडच्या नागरिकत्वाचा त्याग न करता संसदेची निवडणूक लढविली होती.
  • आता त्यांनी ते नागरिकत्व सोडून दिले असल्याने ते त्याच मतदारसंघातून पुन्हा संसदेची निवडणूक लढवू शकतात.
  • मात्र त्यांना पराभूत करून विरोधी मजूर पक्ष टर्नबूल यांचे सरकार त्याआधारे सत्तेवरून खाली खेचू शकेल.
  • स्कॉटिश वडिलांमुळे ब्रिटिश नागरिकत्त्व मिळालेल्या मंत्री फियोना नॅश यांचाही पात्रता गमावलेल्या सदस्यांमध्ये समावेश आहे.

चालू घडामोडी : २८ ऑक्टोबर

द्रमुक देशातील सर्वांत श्रीमंत प्रादेशिक पक्ष

  • देशातील ४७ प्रादेशिक राजकीय पक्षांमध्ये तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) सर्वांत श्रीमंत पक्ष ठरला आहे.
  • असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) प्रादेशिक पक्षांच्या उत्पन्नाचे विश्लेषण करून अहवाल सादर केला असून, त्यात हा दावा करण्यात आला आहे.
  • आर्थिक वर्ष २०१५-१६ दरम्यान द्रमुककडे ७७.६३ कोटी रूपयांची देणगी प्राप्त झाली होती. तामिळनाडूमध्ये द्रमुक प्रमुख विरोधी पक्ष आहे.
  • सत्ताधारी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना ५४.९३ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
  • तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी पक्ष तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) आहे. त्यांचे २०१५-१६मधील उत्पन्न हे १५.९७ कोटी रूपये इतके होते. 
  • एडीआरच्या मते २०१५-१६ दरम्यान ३२ प्रादेशिक पक्षांना एकूण २२१.४८ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यातील ११० कोटी रूपये खर्च करण्यात आले नाही. हे एकूण उत्पन्नाच्या ४९ टक्के इतके आहे.
  • या अहवालानुसार २०१५-१६मध्ये सर्वांत जास्त खर्च करणाऱ्या पक्षांमध्ये संयुक्त जनता दल (२३.४६ कोटी रूपये खर्च), टीडीपी (१३.१ कोटी रूपये खर्च), आणि आप (११.१ कोटी रूपये खर्च) आघाडीवर आहे.
  • एडीआरच्या मते, यावर्षी ४७ पैकी ३२ प्रादेशिक पक्षांनी आपल्या उत्पन्न आणि खर्चाची माहिती निवडणूक आयोगाकडे सोपवली होती.
  • १५ पक्षांनी आपला लेखापरिक्षण अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केलेला नाही. सर्व राजकीय पक्षांना ३१ ऑक्टोबरपर्यंत आपला लेखापरिक्षण अहवाल सादर करायचा होता.

श्रीकांत फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत

  • भारताच्या एच एस प्रणॉयची झुंज मोडून काढत किदम्बी श्रीकांतने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत श्रीकांतचा सामना जपानच्या केंटा निशीमोटोशी होणार आहे.
  • श्रीकांतने प्रणॉयचा १४-२१, २१-१८, २१-१९ असा पराभव करत २०१७या वर्षात सलग पाचव्या सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
  • श्रीकांतने या वर्षांत इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क ओपन सुपरसिरीज स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
  • तर सिंगापूर ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याचा भारताच्या साई प्रणीतकडून पराभव झाल्यामुळे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

१७ वर्षाखालील फिफा विश्वचषक इंग्लंडला

  • इंग्लंडने स्पेनचा ५-२ असा धुव्वा उडवून पहिल्यांदा फिफा १७ वर्षाखालील विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला आहे.
  • कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात इंग्लंडने १७ वर्षाखालील विश्वचषकावर आपले नाव कोरले.
  • प्रथमच फायनलमध्ये खेळणाऱ्या इंग्लंडकडून फोडेनने २ गोल केले तर रेयान ब्रेवस्टर, मॉर्गन गिब्स व्हाईट आणि मार्क ग्युही याने प्रत्येकी १ गोल केला. स्पेनकडून दोन्ही गोल सर्जियो गोमेजने केले.
  • स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी ब्रेव्हस्टरला गोल्डन बूटच्या पुरस्कारने गौरवण्यात आले तर  फिलिप फोडेनला गोल्डन बॉलचा पुरस्कार देण्यात आला.
  • त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठी ब्राझिल आणि माली या संघांमध्ये रंगलेल्या सामन्यात ब्राझिलने मालीवर २-० अशी मात करत ब्राँझपदक पटकावले.
  • १९६६नंतर इंग्लंडला फिफाची एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नव्हती. त्यामुळे हा विजय इंग्लंडचा फुटबॉलमधला महत्वाचा विजय ठरला.
  • आजवर इंग्लंडला एकदाही १७ वर्षाखालील फिफा विश्वचषकाच्या अंतिम चार संघांमध्येही स्थान मिळवता आले नव्हते.
  • यावर्षी क्रोएशियात झालेल्या युरो १७ वर्षाखालील चषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडचा धुव्वा उडवला होता.
  • त्यानंतर इंग्लंडच्या अंडर २० संघाने यावर्षी कोरियात अंडर २० विश्वकप जिंकला होता. तसेच त्यांचा अंडर १९ संघही युरोपियन चॅम्पियन बनला होता.
  • स्पेन संघाने याआधी १९९१, २००३ आणि २००७च्या फायनलमध्ये धडक मारली होती आणि तिन्ही वेळेस त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
  • भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेली ही फिफा अंडर १७ वर्ल्डकप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक फुटबॉल चाहत्यांनी पाहण्याचा नवीन विक्रम रचला गेला आहे.
  • ब्राझील आणि माली या दोन संघांत तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या शेवटच्या सामन्यानंतर ही स्पर्धा पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या १२,८०,४५९पर्यंत पोहोचली आहे.
  • यापूर्वी १२,३०,९७६ प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहण्याचा विक्रम १९८५मध्ये चीन येथील फिफा अंडर १७ वर्ल्डकपदरम्यान बनला होता.
 स्पर्धेच्या पुरस्कारांचे मानकरी 
  • गोल्डन बॉल: फिल फोडेन (इंग्लंड)
  • गोल्डन ग्लोव्ह: ब्रेझाओ (ब्राझील)
  • गोल्डन बूट : रियान ब्रेवस्टर (इंग्लंड)
  • फेअर प्ले : ब्राझील

पाटण्याला प्रो-कबड्डीचे तिसरे विजेतेपद

  • प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजाएंट संघावर मात करत विजेतेपदाची हॅटट्रिक नोंदवली आहे.
  • अंतिम फेरीत गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाचे आव्हान ५५-३८ असे मोडून काढत पाटण्याने प्रो-कबड्डीत सलग तिसऱ्या विजेतेपदावर नाव कोरले.
  • प्रदीप नरवालने सामन्यात चढाईत १९, मोनू गोयतने चढाईत ९ तर विजयने बचावफळीत ७ गुणांची कमाई करत पाटण्याचा विजय सुकर केला.
 स्पर्धेतील बक्षीसे 
  • ३ कोटी - विजेता संघ – पाटणा पायरेट्स
  • १.८ कोटी - उपविजेता संघ – गुजरात फॉर्च्युनजायंट्स
  • १.२ कोटी - तिसऱ्या क्रमांकाचा संघ – बंगाल वॉरियर्स
  • १५ लाख - स्पर्धेचा मानकरी – प्रदीप नरवाल (पाटणा पायरेट्स)
  • १० लाख – अव्वल चढाईपटू – प्रदीप नरवाल (पाटणा पायरेट्स)
  • १० लाख - अव्वल बचावपटू – सुरेंद्र नाडा (हरियाणा)
  • सर्वोत्कृष्ट पंच – कृपाशंकर शर्मा, जमुना वेंकटेश
  • पदार्पणातील सर्वोत्कृष्ट खेळाडू – सचिन तवर (गुजरात).

विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत संग्रामला रौप्य

  • आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताच्या संग्राम दहियाने पुरुषांच्या दुहेरी ट्रॅप प्रकारात रौप्यपदक  पटकावले.
  • तसेच अमनप्रीत सिंगने पदार्पणातच कांस्यपदक मिळविले. जितू रायला मात्र खराब कामगिरीमुळे सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
  • वरिष्ठ गटात संग्रामचे हे पहिलेच पदक आहे. यापूर्वी त्याने २००९मध्ये ज्युनियर आशियाई नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
  • या स्पर्धेत संग्रामने ८० लक्ष्यांपैकी ७६ लक्ष्यांचा अचूक वेध घेतला. सुवर्णपदक विजेत्या हू बिनयुआनने (७९) त्याच्यापेक्षा तीन लक्ष्ये अधिक साधली. 
  • विश्वचषकाचा रौप्य विजेता असलेल्या अमनप्रीतने पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात २०२.२ गुण मिळवून कांस्यपदक पदक जिंकले.
  • सर्बियाच्या दमिर किमेच २२९.३ गुणांसह सुवर्णपदक मिळवले. तर युक्रेनच्या ओलेह ओमेलचक २२८ गुणांसह रौप्यपदक पटकावले.
  • याचप्रमाणे जितू राय आणि हिना सिंधू यांनी १० मीटर मिश्र एअर पिस्तूल प्रकारात पहिल्याच दिवशी सुवर्णपदक जिंकले होते.

चालू घडामोडी : २७ ऑक्टोबर

वारसा दत्तक योजना

  • पर्यटन मंत्रालयाच्या ‘वारसा दत्तक योजने’अंतर्गत देशातील १४ स्मारकांच्या देखभालीसाठी ७ कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
  • दिल्लीत आयोजित ‘पर्यटन पर्व’ या उपक्रमात या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भविष्यात या कंपन्या ‘स्मारक मित्र’ म्हणून कार्यरत राहणार आहेत.
स्मारक स्मारक मित्र
जंतरमंतर (दिल्ली) एसबीआय फाऊंडेशन
कोणार्क सुर्यमंदिर (ओडिशा) टी के इंटरनॅशनल लिमिटेड
राजा-राणी मंदिर (भुवनेश्वर, ओडिशा) टी के इंटरनॅशनल लिमिटेड
रत्नागिरी (ओडिशा) टी के इंटरनॅशनल लिमिटेड
हंपी (कर्नाटक) यात्रा ऑनलाईन प्रा. लि.
लेह पॅलेस (जम्मू-कश्मीर) यात्रा ऑनलाईन प्रा. लि.
कुतुबमिनार (दिल्ली) यात्रा ऑनलाईन प्रा. लि.
अजिंठा लेणी (महाराष्ट्र) यात्रा ऑनलाईन प्रा. लि.
मत्तान चेरी पॅलेस संग्रहालय (केरळ) ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
सफदरगंज मशिद (दिल्ली) ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
गंगोत्री मंदिर क्षेत्र आणि गोमुख (जम्मू-कश्मीर) ॲडव्हेंचर टुर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया
माऊंट स्टोकंग्री (जम्मू-कश्मीर) ॲडव्हेंचर टुर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया
अग्रसेन की बावली (दिल्ली) स्पेशल हॉलिडेज ट्रॅव्हल प्रा. लि.
पुराना किला (दिल्ली) एनबीसीसी

काश्मीरमध्ये हिंसक आंदोलकांवर होणार कारवाई

  • जम्मू काश्मीरमध्ये हिंसक आंदोलनादरम्यान सार्वजनिक संपत्तीचे करणाऱ्या आंदोलकांविरोधात कडक कारवाई सरकार करणार आहे.
  • जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन वोरा यांनी राज्य सरकारच्या ‘जम्मू अॅण्ड काश्मीर पब्लिक प्रॉपर्टी (प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज) ऑर्डिनन्स २०१७’ या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे.
  • सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरु नसल्याने मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या शिफाशीनंतर राज्यपालांनी हा अध्यादेश लागू केला आहे.
  • त्यानुसार आता उपोषण किंवा निदर्शन करत असताना झालेल्या सार्वजनिक संपत्तीची नुकसानभरपाई आंदोलकांकडून वसूल केली जाणार आहे.
  • आंदोलकांकडून फक्त दंड आकारला जाणार नाही, तर त्यांना जवळपास पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
  • बंद, उपोषण, निदर्शन यासारख्या आंदोलनादरम्यान जर सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे नुकसान झाले तर बंद किंवा आंदोलनासाठी उकसवणाऱ्यांना दोन ते पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
  • याशिवाय त्यांना बाजारमूल्याप्रमाणे नुकसान झालेल्या संपत्तीची दंड म्हणून भरपाई द्यावी लागणार आहे. 
  • याआधी खासगी संपत्तीचे नुकसान झाल्यास कारवाई करण्यासाठी कायद्यात कोणतीही तरतूद नव्हती. मात्र या अध्यादेशात ही तरतूद करण्यात आली आहे.

मुद्रांक घोटाळ्यातील गुन्हेगार तेलगीचा मृत्यू

  • बनावट मुद्रांक घोटाळ्यातील गुन्हेगार अब्दुल करिम तेलगीचा बंगळुरुमधील रुग्णालयात उपचार सुरु असताना २६ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला आहे.
  • गेल्या काही दिवसांपासून तेलगीची प्रकृती गंभीर होती. शरीरातील विविध अवयवांनी (मल्टिपल ऑर्गन फेल्युअर) काम थांबवल्याने त्याचा मृत्यू झाला.
  • त्याला वीस वर्षांपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ५६ वर्षांच्या तेलगीवर गेल्या १० दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते.
  • महाराष्ट्रासह १२ राज्यांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणात तेलगीला २००१मध्ये अजमेरमधून अटक करण्यात आली होती.
  • तेलगीने बोगस स्टॅम्प पेपर छापून ते अनेक बँका, विमा कंपन्या आणि शेअर ब्रोकिंग कंपन्यांना विकले होते.
  • या प्रचंड मोठ्या घोटाळ्यात अनेक नेत्यांचा सहभाग असल्याचीही चर्चा झाली होती. तसेच या घोटाळ्यातून तेलगीने कोट्यवधींची कमाई केली होती.
  • त्याच्या या महाघोटाळ्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
  • या प्रकरणात तेलगीला जानेवारी २००६मध्ये ३० वर्षांची शिक्षा झाली होती. याशिवाय तेलगीला सुमारे २०२ कोटींचा दंडदेखील ठोठावण्यात आला होता.
  • तेलगीचा मुद्रांक घोटाळा व हर्षद मेहताचा रोखे घोटाळा या दोन्ही गाजलेल्या घोटाळ्यांच्या सूत्रधारांचा मृत्यू तुरुंगात झाला आहे.

डब्ल्यूबीसीएसडीच्या अध्यक्षपदी सन्नी व्हर्गिस

  • ‘शाश्वत विकासविषयक जागतिक व्यापार परिषदे’च्या (वर्ल्ड बिझनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट - डब्ल्यूबीसीएसडी) अध्यक्षपदी सिंगापूर येथील भारतीय वंशाचे उद्योगपती सन्नी व्हर्गिस यांची नियुक्ती झाली आहे.
  • या परिषदेची स्थापना २५ वर्षांपूर्वी झाली असून त्याच्या अध्यक्षपदी प्रथमच एका आशियाई व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी पॉल पोलमन यांच्याकडून ते नवीन पदाची सूत्रे घेतील
  • डब्ल्यूबीसीएसडीचे जगभरात २००हून अधिक सदस्य असून शाश्वत विकासाच्या दृष्टीने परिषदेने लक्षणीय काम केले आहे.
 सन्नी व्हर्गिस यांच्याबद्दल 
  • या परिषदेचे नेतृत्व करणारे सन्नी व्हर्गिस हे सिंगापूर येथील ओलम इंटरनॅशनल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
  • १९७९मध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालयातून बीएस्सी (कृषी) ही पदवी घेतल्यानंतर असलेल्या आयआयएम, अहमदाबाद या संस्थेतून त्यांनी व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी घेतली.
  • काही वर्षे युनिलिव्हर या भारतीय कंपनीमध्ये काम केल्यानंतर १९८६मध्ये ते नायजेरियात गेले.
  • केवलराम चनराय समूहाच्या कापूस उत्पादन प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. शेतीत अनेक प्रयोग करून त्यांनी कापसाचे दर्जेदार उत्पादन बनवले. नंतर या समूहाचे ते महाव्यवस्थापक बनले.
  • १९८९मध्ये ते कंपनीची कृषी उत्पादने निर्यात करणाऱ्या विभागाचे ते प्रमुख बनले. दोन दशके केवलराम चनराय (केसी) समूहात ते होते.
  • त्यानंतर व्हर्गिस ओलम समूहात गेले आणि ओलम इंटरनॅशनलचे कार्यकारी संचालक बनले.
  • कंपनीच्या विस्तार योजना आखून त्यांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात व्हर्गिस यांचे योगदान मोलाचे राहिले.
  • उद्योगजगतातील असामान्य कामगिरीबद्दल त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तरुण उद्योजकांसाठी दिला जाणारा पुरस्कार २००८मध्ये त्यांना मिळाला.
  • सिंगापूरच्या कंपन्यांमधील सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून २०११मध्ये व्हर्गिस यांची एकमताने निवड करण्यात आली.
  • सिंगापूर सरकारतर्फे दिले जाणारे व तेथे अत्यंत मानाचे समजले जाणारे ‘पब्लिक सर्व्हिस मेडल’ही त्यांना मिळाले आहे.
 शाश्वत विकास 
  • १९८७मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि वैश्विक आयोगाने आपले समान भवितव्य या नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात शाश्वत विकास ही संकल्पना स्पष्ट करण्यात आली होती.
  • शाश्वत विकास या शब्दात नैसर्गिक आणि मानवनिर्मित संसाधनांचा जपून वापर करणे अपेक्षित आहे. सौर व पवनऊर्जा यांसारख्या स्रोतांचा जास्तीत जास्त वापर हा शाश्वत विकासाचा पाया आहे.
  • आपल्या येणाऱ्या पिढ्यांचा विचार करून आपल्याकडे जी मर्यादित संसाधने आहेत त्यांचा नियंत्रित वापर हेही या संकल्पनेत अभिप्रेत आहे.

जॉन केनेडी हत्या प्रकरणातील फाईल्स प्रसिद्ध

  • अमेरिकेचे ३५वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या हत्या प्रकरणातील सुमारे २८०० फाईल्स अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रसिद्ध केल्या आहेत.
  • अर्थात एफबीआय आणि सीआयएने सुरक्षेच्या कारणास्तव आक्षेप घेतल्यानंतर इतर फाईल्स जाहीर करणे थांबवण्यात आले.
  • २२ नोव्हेंबर १९६३ रोजी टेक्सास राज्यातील डल्लास येथे केनेडी यांची हत्या करण्यात आली होती.
  • गेल्या सहा दशकांमध्ये केनेडी यांच्या हत्येमध्ये नेमका कोणाचा सहभाग असेल याबाबत अमेरिकन जनमानसात याबाबत नेहमीच तर्कवितर्क उपस्थित केले जात होते.
  • मात्र या फाईल्स उघड केल्यानंतरही फारसे काही मिळण्याची शक्यता नाही असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
 जॉन केनेडी यांच्याबद्दल 
  • केनेडी यांचे पूर्ण नाव जॉन फिटझगेराल्ड केनेडी असे होते. त्यांचा जन्म २९ मे १९१७ रोजी मॅसॅच्युसेटसमधील ब्रुकलिन येथे झाला.
  • अमेरिकन नौदलात लेफ्टनंट पदावरती असणाऱ्या केनेडी यांनी दुसऱ्या महायुद्धासह अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता.
  • केनेडी हे १९४७ ते १९५३ याकाळात संसदेच्या कनिष्ठ सभागृहात तर १९५३ ते १९६० या काळात वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून कार्यरत होते.
  • १९६१साली ड्वाईट आयसेनहॉवर यांच्यानंतर ते अमेरिकेचे ३५वे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या हत्येनंतर उपराष्ट्राध्यक्ष असणारे लिंडन जॉन्सन राष्ट्राध्यक्ष झाले.
  • केनेडी यांच्या हत्येनंतर अनेक सरकारांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले. पण सर्व तपास आयोगांनी केनेडी यांची हत्या ली हार्वे ऑस्वल्डने टेक्सास स्कूल बुक डिपॉझिटरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन तीन गोळ्या झाडून केली असा निष्कर्ष मांडला होता.
  • मात्र याशिवाय या हत्येमध्ये आणखी कोणत्यातरी व्यक्तीचा किंवा यंत्रणेचा, कटाचा सहभाग असावा असे अमेरिकन लोकांना वाटते.
  • ऑस्वल्ड हा स्वयंघोषित मार्क्सवादी होता. त्याने रशियामध्ये रेडिओ आणि टिव्ही कंपनीमध्ये काम केले होते.
  • या हत्येसंदर्भात १९७९साली नेमलेल्या हाऊस सिलेक्ट कमिटीने या हत्येत दोन शूटर्सचा समावेश असावा अशी शक्यता असल्याचे निरीक्षण मांडले होते.

चालू घडामोडी : २६ ऑक्टोबर

सरकारकडून ‘भारतमाला’ योजनेची घोषणा

  • देशभरातील सीमावर्ती भागांना जोडणासाठीच्या भारतमाला महामार्ग योजनेच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजुरी दिली आहे.
  • या योजेनेंतर्गत ३५ हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात येतील. यासाठी ५.३५ लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
  • ३५ हजार किलोमीटर लांबीचे हे महामार्ग येत्या पाच वर्षांत (२०१७ ते २०२२) बांधण्याचा संकल्प सरकारने केला आहे.
  • यामुळे आर्थिक घडामोडीला चालना देत देशभरात येत्या ५ वर्षांत किमान १४.२ कोटी मनुष्यदिन रोजगार निर्माण होतील.
  • या योजनेत दोन मुख्य ठिकाणांदरम्यान चारपदरी रस्ते बांधून प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा वेग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
  • या नवीन महामार्ग विकास कार्यक्रमात रस्ते तयार करून गतिमानतेत सुधारणा करून वाहतुकीचा खर्च कमी करण्याचा समावेश आहे.
  • रस्त्यांचे उत्तम जाळे आणि नीटनेटके चिन्हाधारित रहदारीमुळे रस्ते वाहतूक क्षेत्रात लक्षणीय बदल होतील.
  • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यामुळे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यास मदत होईल.
  • केंद्रीय रस्ते महामार्ग, जहाजबांधणी आणि जलसंपदामंत्री: नितीन गडकरी
 प्रकल्पातील खर्चाची विभागणी 
  • आर्थिक कॉरिडोर: ९००० किमी (खर्च १ लाख २० हजार कोटी), 
  • अंर्तगत कॉरिडोर व जोड रस्ते (फीडर): ६००० किमी (खर्च ८० हजार कोटी)
  • सीमावर्ती रस्ते: २००० किमी (खर्च २५ हजार कोटी)
  • किनारी मार्ग व बंदरांना जोडणारे रस्ते: २००० किमी (खर्च २० हजार कोटी)
 भारतमाला प्रकल्प आणि महाराष्ट्र 
  • आर्थिक कॉरिडोर
  • भारतमाला प्रकल्पात देशभरात ४४ आर्थिक कॉरिडॉर विकसित करण्यात येत असून त्यात एकचतुर्थांश म्हणजे ११ आर्थिक कॉरिडॉर महाराष्ट्रातून जातील. त्यांच्यामुळे आठ राज्यांशी महाराष्ट्र जोडला जाईल.
  • या ११ कॉरिडोरमध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, जालना, नागपूर, रत्नागिरी, धुळे, पुणे, सोलापूर, जळगाव, लातूर, नांदेड, यवतमाळ व वर्धा या १६ जिल्ह्यांचा समावेश आहे.
  • मालवाहतूक तळ
  • देशात २४ मालवाहतूक तळ केले जाणार असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, जेएनपीटी, मुंबई पोर्ट, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, नाशिक या ९ शहरांचा समावेश आहे.
  • तीन रिंग रोड 
  • वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी देशातील २८ शहरांमध्ये रिंग रोड तयार करण्यात येतील. त्यामध्ये पुणे, नागपूर, धुळे या शहरांचा समावेश आहे.
  • लॉजिस्टिक पार्क
  • देशातील ३५ शहरांपैकी महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, जेएनपीटी, मुंबई बंदर, रायगड जिल्हा, पुणे, नागपूर, नाशिक अशा ८ ठिकाणी लॉजिस्टिक पार्क बांधण्यात येतील.
  • बडोदा-मुंबई एक्स्प्रेस वे
  • भारतमाला प्रकल्पात समाविष्ट असलेल्या सात एक्स्प्रेस-वे मधील ४२० किमी लांबीच्या बडोदा-मुंबई एक्सप्रेस वेचा समावेश आहे.
  • किनारपट्टीवरील रस्ते
  • सागरी किनारपट्टीवर बांधण्यात येणाऱ्या सात रस्त्यांमध्ये दिघी बंदर-दाभोळ-गुहागर-जयगड किल्ला-देवगड-मालवण-वेंगुर्ला आणि अरुंडा या ४४५ किमी लांबीच्या रस्त्याचा समावेश आहे.

बिहारमधील छोटीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

  • बिहारमधील मुशाहर या मागास समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या वीस वर्षीय छोटी कुमारी सिंह या मुलीला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • भोजपूर जिल्ह्याच्या छोटीला स्वित्झर्लंडच्या विमेन्स वर्ल्ड समिट फाउंडेशनने  ‘विमेन्स क्रिएटिव्हिटी इन रूरल लाइफ’ पुरस्कार जाहीर केला आहे.
  • हा पुरस्कार सर्जनशीलता, धैर्य व निश्चय दाखवून ग्रामीण समुदायांचा विकास करणाऱ्या महिलांना दिला जाते.
  • गरीब राजपूत कुटुंबातील छोटीने तिच्या रतनपूर खेडय़ातून २०१४मध्ये मुशाहर लोकांना मदत करण्यास सुरूवात केली.
  • ती माता अमृतानंदमयी यांच्या मठाने आयोजित केलेल्या एका योजनेत सहभागी झाली. १०१ खेड्यांना स्वयंपूर्ण करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट होते.
  • मुशाहर समुदायातील लोक भूमिहीन असून ते दारिद्र्याला तोंड देत आहेत. त्यांच्यात निरक्षरता अधिक असून व्यक्तिगत आरोग्याकडे दुर्लक्ष जास्त आहे. बालविवाहाचे प्रमाण जास्त असून शाळेतील हजेरीही कमी आहे.
  • छोटीने या समुदायातील लोकांना घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्त्व सांगितले. महिलांसाठी स्वमदत गट सुरू करून दिले, त्यात प्रत्येक महिला महिन्याकाठी २० रूपये वाचवू लागली.
  • तिने तिची शाळा सुटल्यानंतर मुलांच्या मोफत शिकवण्या घेतल्या. तिने घेतलेल्या वर्गातून १०८ मुले शिकली. केवळ १००० लोकवस्तीच्या गावात हे प्रमाण लक्षणीय होते.
  • मुशाहार लोक दारू-गांजा पित असत, शिवीगाळ करीत. पण छोटीच्या प्रयत्नांमुळे आता त्यांच्यात सकारात्मक बदल झाले आहेत.

नागरिकत्व मिळवणारी पहिली रोबॉट सोफिया

  • धातूचे तुकडे आणि तारांपासून बनलेली सोफिया ही एखाद्या देशाचे नागरिकत्व मिळवणारी पहिली कृत्रिम बुद्धिमान यंत्रमानव (Humanoid Robot) बनली आहे.
  • सौदी अरेबियाने सोफियाला नागरिकत्व बहाल केले आहे. यामुळे एखाद्या रोबोटला नागरिकत्व देणारा सौदी अरेबिया जगातला पहिला देश बनला आहे.
  • विशेष म्हणजे, नागरिकत्व मिळाल्यानंतर तिचा इंटरव्यू देखील घेण्यात आला. यामध्ये देशाचे नागरिकत्व मिळविणारी जगातील पहिली रोबोट बनणे हे ऐतिहासिक आहे असे सोफिया म्हणाली.
  • निर्णय घेण्याची तसेच विचार करायची क्षमता असलेली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली सोफिया यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.
  • सोफिया चेहऱ्यावरील हावभाव ओळखण्यासाठी आणि कोणासोबतही सामान्य व्यक्तीपणे बोलण्यासाठी ओळखली जाते. तसेच अनेक मीडिया चॅनल्सना इंटरव्यू देण्यासाठीही ती ओळखली जाते. 
  • हॅन्सन रोबोटीक्स कंपनीने सोफियाची रचना केली आहे. हॅन्सन रोबोटिक्सचे संस्थापक डेव्हिड हॅन्सन यांनी रोबोट सोफियाला बनवले आहे.

सिंगापूर पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली

  • ग्लोबल पासपोर्ट इंडेक्सच्या माहितीनुसार सिंगापूरच्या पासपोर्ट जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट ठरला आहे.
  • जागतिक स्तरावरच्या या स्पर्धेत १९३ देशांच्या पासपोर्टची एकमेकांशी तुलना केली गेली. यामध्ये सिंगापूर पहिल्या, जर्मनी दुसऱ्या तर स्वीडन आणि दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानी आले.
  • यामध्ये भारताचा क्रमांकात सुधारणा झाली असून, यापूर्वीच्या ७८ क्रमांकावरून त्याने ७५व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
  • या यादीतील पहिल्या १० क्रमांकावर युरोपियन देशांचंच प्रभुत्व असायचे. परंतु यंदा पहिल्यांदाच आशियाई देशांनी या यादीत स्थान मिळवले आहे.
  • गेल्या काही वर्षांपासून नागरिक एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करत असून, काही अंशी त्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
  • शिक्षण, नोकरी यासारख्या गोष्टींसाठी लोक परदेशी जात असतात. त्यामुळे अनेकांना तात्काळ व्हिसा मिळणेही गरजेचे असते.
  • सिंगापूरमधील नागरिकांना १५९ देशांचा व्हिसा सहजरीत्या (व्हिसा फ्री) मिळू शकतो. त्यानंतर जर्मनीतल्या नागरिकांना १५८ देशांचा व्हिसा उपलब्ध होतात.
  • स्वीडन आणि दक्षिण कोरियामधील नागरिकांना १५७ देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात. तर भारतातील नागरिकांना ५१ देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात.
  • गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेत जर्मनी सातत्याने पहिला क्रमांक राखून होती, परंतु यंदा त्या देशाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

रोनाल्डो व मार्टिन्स यंदाचे सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू

  • फिफाच्या २०१७ च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँडची लिके मार्टिन्स यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोनाल्डोने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळविला आहे. 
  • जगभरातील नावाजलेल्या फुटबॉलपटूंसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत लंडन येथे पार पडलेल्या सोहळ्यात त्यांना गोल्डन बॉलने सन्मानित करण्यात आले.
  • याच समारंभात फिफाच्या सर्वोत्तम जागतिक संघाची (बेस्ट वर्ल्ड इलेव्हन) संघाची घोषणा करण्यात आली. त्यात ख्रिस्तियानो रोनाल्डो, जियानलुकी ब्युफॉन, मेस्सी व नेमार यांचा समावेश आहे. 
 पुरस्कार विजेते 
  • सर्वोत्तम गोलरक्षक: जियानल्युकी ब्युफॉन
  • सर्वोत्तम गोल: ऑलिव्हर जिरुड
  • सर्वोत्तम प्रशिक्षक (पुरुष):  झिनेदिन झिदान(रियाल माद्रिद) 
  • सर्वोत्तम प्रशिक्षक (महिला): सरिना विगमन (नेदरलँड)
  • सर्वोत्तम चाहते: सेल्टिक एफ सी
  • खेळाडूवृत्ती पुरस्कार: फ्रान्सिस कोने
  • सर्वोत्तम महिला खेळाडू: लुकी मार्टिन्स (नेदरलँड) 
  • सर्वोत्तम पुरुष खेळाडू: ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)

चालू घडामोडी : २५ ऑक्टोबर

आधारसक्तीला ३१ मार्च २०१८पर्यंत मुदतवाढ

  • सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१७पासून आता ३१ मार्च २०१८पर्यंत वाढवण्यात आली आहे.
  • ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, अशांना या निर्णयाचा फायदा होणार असून, त्यांना ३१ मार्च २०१८पर्यंत सर्व समाज कल्याण योजनांचा विनाआधार लाभ मिळणार आहे.
  • तसेच आधार कार्ड नसलेल्या लोकांपुढे अडचण निर्माण होईल, असे कोणतेही पाऊल उचलले जाणार नसल्याची हमीदेखील सरकारने दिली आहे.
  • केंद्र सरकारने विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डची जोडणी अनिवार्य केली आहे. मात्र देशात आधार कार्ड नसलेल्या लोकांची संख्याही मोठी आहे.
  • त्यामुळे आधार कार्डला जोडण्याच्या सक्तीला आणि त्याबद्दलच्या संवैधानिक वैधतेला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
  • बँक खाते आणि मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक करण्याची सक्ती बेकायदा असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

जितू आणि हिना यांना विश्वविजेतेपद

  • इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट्स फेडरेशन विश्वचषक स्पर्धेत भारताच्या जितू राय आणि हिना सिद्धूने १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र दुहेरीत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.
  • जितू आणि सिंधू जोडीने ४८३.४ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत फ्रान्सला रौप्य आणि चीनला कांस्य पदक मिळाले.
  • भारतात पहिल्यांदाच इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट्स फेडरेशन विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • दिल्लीमधील कर्णी सिंह शुटिंग रेंजवर सुरु असलेल्या या विश्वचषक स्पर्धेत २५ संघांनी सहभाग घेतला आहे.
  • आशियाई क्रीडा स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या जितू रायचे हे पहिलेच विश्व विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक मिळवले आहे.
  • तर हिनाचे हे दुसरे विश्वविजेतेपद आहे. याआधी २०१३मध्ये महिलांसाठीच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात हिनाने विश्वविजेतेपदावर नाव कोरले आहे.
  • आयएसएसएफ विश्वकपमध्ये प्रथमच अधिकृतपणे मिश्र सांघिक स्पर्धेचा समावेश झाला असल्याने भारतासाठी हे पदक ऐतिहासिक ठरले आहे.
  • टोकियो २०२० ऑलिंपिकमध्ये प्रथमच मिश्र प्रकाराचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळेच प्रयोग म्हणून या स्पर्धेत मिश्र प्रकार समाविष्ट करण्यात आला होता.
  • जितू-हीनाचे हे या प्रकारातील २०१७मधील हे तिसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी नवी दिल्ली आणि गॅबला येथे झालेल्या स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते.

चीन कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा जिनपिंग

  • चीन कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा पाच वर्षांच्या कालावधीसाठी देशाचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची निवड झाली आहे.
  • जिनपिंग यांची साम्यवादाची संकल्पना ही नवीन काळातील असून, त्याला चीनच्या मूल्यांची डूब दिलेली आहे.
  • चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या घटनेत दुरुस्ती मंजूर करताना त्यात शी जिनपिंग यांच्या नव्या साम्यवादी विचारसरणीचा व नावाचा समावेश करण्यात आला.
  • त्यामुळे आता ते पक्षाचे संस्थापक माओ झेडाँग व त्यांचे वारसदार डेंग शियाओपेंग यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.
  • माओ व डेंग या दोनच नेत्यांचे विचार व नावे पक्षाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आली होती. आता त्यात जिनपिंग यांची भर पडली आहे.
  • त्यामुळे माओ यांच्यानंतर जिनपिंग हे चीनमधील सर्वात शक्तिशाली नेते ठरले आहेत. सध्या राष्ट्राध्यक्षपदासह ते पक्षाचे व लष्कराचेही प्रमुख आहेत.
  • पक्षाच्या पद क्रमवारीत ते पहिल्या व पंतप्रधान ली केकियांग दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनी २०१२मध्ये पदभार हाती घेतला होता व २०२२ पर्यंत ते पदावर कायम राहतील.
  • यापूर्वी हू जिंताओ व जियांग झेमिन यांच्या विचारसरणीचाही समावेश पक्षाच्या घटनेत करण्यात आला होता, पण त्यांच्या नावाचा समावेश केला नव्हता.

सरकारचे बँकांना २.११ लाख कोटींचे अर्थसाहाय्य

  • देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना केंद्र सरकारने येत्या दोन वर्षांकरिता २.११ लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देऊ केले आहे. 
  • या वित्तसहाय्यामुळे बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढेल. बँकांची कर्जपुरवठा करण्याची क्षमता वाढली की त्याचा खासगी क्षेत्राला लाभ होईल.
  • यापूर्वी २०१५मध्ये जाहीर झालेल्या ‘इंद्रधनुष’ योजनेंतर्गत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकरिता चार वर्षांकरिता ७०,००० कोटी रुपये दिले आहेत.
  • बँकांना १ लाख ३५ हजार कोटींची मदत पुनर्भांडवली रोख्यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून अर्थसंकल्पाद्वारे तसेच बाजारातून ७६ हजार कोटी रुपये उभारण्यात येतील.

पाइक विद्रोहाची होणार पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून नोंद

  • पुढील शैक्षणिक वर्षापासून सन १८१७मध्ये ओडिशामध्ये घडलेल्या ‘पाइक विद्रोहा’ची नोंद इतिहासाच्या पुस्तकांत पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून केली जाणार आहे.
  • पाइक विद्रोहाला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली.
  • सध्या सन १८५७मध्ये ब्रिटिश लष्करातील भारतीय सैनिकांनी पुकारलेला लढा हा ब्रिटिशांविरुद्धचा पहिला लढा मानला जातो. पण त्यापूर्वी ४० वर्षे हा पाइक विद्रोह उभारण्यात आला होता.
  • ओडिशामधील राजे गजपती यांच्या पदरी पाइक जमातीमधील लोकांचे दल असे. हे नागरिक राजाला गरज असेल तेव्हा युद्धभूमीवर जाऊन लढाई करत, तर शांततेच्या काळात शेती करत.
  • पाइकांनी सन १८१७मध्ये जगबंधू विद्याधर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात लढा पुकारला होता.
  • संपूर्ण ओडिशामध्ये या लढ्याचे लोण पसरले होते. हा संघर्ष सन १८२५पर्यंत चालला. मात्र, ब्रिटिशांनी तो चिरडून टाकला.
  • ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी यापूर्वी यासंर्भात केंद्राला पत्र लिहून पाइक विद्रोहाला पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे स्थान मिळावे, अशी विनंती केली होती.

नोटाबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती

  • नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळा दिवस’ (ब्लॅक डे) पाळणार असल्याची घोषणा भाजप विरोधकांनी केली आहे.
  • याला उत्तर म्हणून आता भाजपने देखील हा दिवस ‘काळा पैसाविरोधी दिवस’ (अँटी ब्लॅक मनी डे) म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे.
  • सरकारने काळ्या पैशाविरोधात उचलेल्या उपाययोजनांची माहिती भाजप नेते ८ नोव्हेंबर रोजी देशभरातील जनतेला देणार आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या.

राजस्थानचे वादग्रस्त विधेयक निवड समितीकडे

  • राजस्थान सरकारचे घोटाळेबाजांना अभय देणारे वादग्रस्त विधेयक विधानसभेच्या निवड समितीकडे पाठवले आहे.
  • गेल्या ६ सप्टेंबर रोजी राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारने ‘गुन्हेगारी कायदे (सुधारणा) अध्यादेश’ जारी केला होता.
  • या अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर करण्यात येणार होते. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात ते मांडण्यात येणार होते.
  • मात्र या विधेयकाला भाजपमधील आमदारांसह काँग्रेसनेही विरोध दर्शवला होता. तर राजस्थान हायकोर्टात या विरोधात याचिकाही दाखल झाली होती.
  • वादग्रस्त विधेयकावरुन मंगळवारी राजस्थान विधानसभेत गदारोळ झाला. विरोधकांच्या दबावासमोर नमते घेत राजस्थान सरकारने हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला.
  • सर्वपक्षांनी या निर्णयाला पाठिंबा दिला असून, निवड समिती पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयकाबाबत अहवाल सादर करेल.
  • सप्टेंबरमध्ये राजस्थान सरकारने गुन्हेगारी कायदे (सुधारणा) वटहुकूम २०१७ जारी केला होता.
  • त्यामध्ये विद्यमान व माजी न्यायाधीशांना तसेच दंडाधिकारी व सरकारी कर्मचारी यांनी सेवेत असताना घेतलेल्या निर्णयांबाबत सरकारच्या परवानगीशिवाय चौकशी करता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती.
  • याशिवाय सरकारी नोकर, न्यायाधीश आणि दंडाधिकारी यांच्याविरोधात सरकारने चौकशी करण्याची परवानगी दिल्याशिवाय माध्यमांना वार्तांकन करता येणार नाही, असेही वटहुकूमात म्हटले होते. याचा भंग केल्यास २ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली होती.

चालू घडामोडी : २४ ऑक्टोबर

मेट्रो ५ आणि मेट्रो ६ प्रकल्पांना मंजुरी

  • महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने मेट्रो ५ आणि मेट्रो ६ या दोन्ही प्रकल्पांना परवानगी दिली असून, यामुळे मुंबई आणि परिसरातील वाहतूक अधिक वेगवान होणार आहे.
  • मेट्रो-५ द्वारे ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांना जोडले जाणार आहे तर मेट्रो-६ प्रकल्पाने समर्थनगर, जोगेश्वरी, कांजूरमार्ग व विक्रोळी ही शहरे जोडली जातील.
  • या दोन्ही प्रकल्पांना सुमारे १५ हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच हे दोन्ही प्रकल्प २०२१पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 मेट्रो प्रकल्पांचा तपशील 
मेट्रो ५: ठाणे-भिवंडी-कल्याण
  • खर्च: ८,४१६ कोटी
  • मार्गाची लांबी: २४ कि.मी.
  • एकूण स्थानके: १७
  • सहा डब्यांच्या गाड्या
  • रोज अपेक्षित प्रवासी: २०२१मध्ये २.२९ लाख, तर २०३१ मध्ये ३.३४ लाख
  • स्थानके: कल्याण एपीएमसी, कल्याण स्थानक, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कोनगाव, गोव एमआयडीसी, राजनोली गाव, टेमघर, गोपाळ नगर, भिवंडी, धामनकर नाका, अंजुर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळकुंभ नाका, कापुरबावडी
मेट्रो-६: स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-कांजुरमार्ग-विक्रोळी
  • खर्च अपेक्षित: ६,६७२ कोटी
  • मार्गाची लांबी: १४.५ कि.मी.
  • एकूण स्थानके: १३
  • सहा डब्यांच्या गाड्या
  • रोज अपेक्षित प्रवासी: २०२१ मध्ये ६.५ लाख, तर २०३१ मध्ये ७.६९ लाख
  • स्थानके: स्वामी समर्थ नगर, आदर्श नगर, मोमिन नगर, जेव्हीएलआर, श्याम नगर, महाकाली गुंफा, सीप्झ गाव, साकी विहार रोड, राम बाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजुरमार्ग पश्चिम, विक्रोळी पूर्व द्रूतगती महामार्ग.

आग्रा द्रुतगती मार्गावर हवाईदलाचा सराव

  • उत्तर प्रदेशमधील आग्रा द्रुतगती मार्गावर हवाई दलाच्या विमानांचा सराव २४ ऑक्टोबर पासून सुरु झाला आहे.
  • युद्ध किंवा युद्धसदृश्य कारवायांसाठी सज्ज राहण्यासाठी हवाई दलाकडून हा सराव केला जात आहे. या सरावामध्ये एकूण २० विमानांचा समावेश आहे.
  • हवाई दलाच्या या सरावासाठी आग्रा एक्स्प्रेस वेवरील उन्नवजवळील अरौल ते लखनऊ दरम्यानची वाहतूक २० ऑक्टोबरपासून बंद ठेवण्यात आली आहे.
  • या सरावादरम्यान मिराज २०००, जॅग्वार, सुखोई ३० आणि एएन-३२ विमाने एक्स्प्रेसवर वेवर उतरविण्यात आली.
  • या सरावादरम्यान, हवाई दलाचे आवाढव्य मालवाहतूक विमान सी-१३०जे सुपर हर्क्युलिस हेदेखील आग्रा एक्स्प्रेस वेवर उतरले आहे.
  • यंदा पहिल्यांदाच हवाई दलाच्या अशा प्रकारच्या अभ्यासात वाहतूक विमानांचा समावेश करण्यात आला.
  • गेल्या वर्षीही आग्रा एक्स्प्रेस वेवर हवाई दलाच्या विमानांनी सराव केला होता. त्यावेळी ८ लढाऊ विमाने सरावात सहभागी झाली होती.
  • २०१५मध्ये पहिल्यांदा दिल्लीजवळ यमुना द्रुतगती मार्गावर मिराज हे विमान उतरवण्यात आले होते.
  • आपत्कालीन परिस्थितीमध्ये महामार्गांचाही धावपट्टीसारखा वापर होऊ शकतो, हे सिद्ध करण्यासाठी हवाई दलाकडून या सरावाचे आयोजन केले होते.

‘ठुमरीची राणी’ गिरिजा देवी यांचे निधन

  • ठुमरी गायनावर विलक्षण हुकूमत असलेल्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे २४ ऑक्टोबर रोजी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले.
  • गिरिजा देवी यांचा जन्म ८ मे १९२९ रोज उत्तर प्रदेशातील बनारस येथे झाला. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनासाठी त्या प्रसिद्ध होत्या.
  • गिरिजा देवी बनारस आणि सेनिया घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. त्यांनी शास्त्रीय गायनाचे पूर्ण शिक्षण वाराणसीतच घेतले.
  • शास्त्रीय संगीताबरोबरच त्यांनी ‘ठुमरी’ या गाण्याच्या प्रकारात त्या पारंगत होत्या. त्यामुळेच ‘ठुमरीची राणी’ अशीही त्यांची ओळख झाली होती.
  • गिरिजा देवी यांनी 'ऑल इंडिया रेडिओ अलाहाबाद'वर १९४९मध्ये पहिला कार्यक्रम केला आणि त्यानंतर त्यांच्या गायनाचा प्रवास अखंड सुरू राहिला.
  • संगीत क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना भारत सरकारने गिरिजा देवी यांना १९७२मध्ये पद्मश्री त्यानंतर १९८९मध्ये पद्मभूषण तर २०१६मध्ये पद्मविभूषण किताबाने सन्मानित केले.  
 गिरिजा देवी यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार 
  • पद्मश्री (१९७२) 
  • पद्मभूषण (१९८९) 
  • पद्मविभूषण (२०१६) 
  • संगीत अकादमी पुरस्कार (१९७७) 
  • संगीत नाटक अकादमी फेलोशिप (२०१०) 
  • महासंगीत सन्मान पुरस्कार (२०१२) 
  • संगीत सन्मान पुरस्कार (डोवर लेन संगीत संमेलन) 
  • GIMA पुरस्कार (जीवनगौरव)

पंजाबमध्ये प्राणी पाळण्यासाठी विशिष्ट कर

  • पंजाबमध्ये कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, घोडा, डुक्कर, शेळी, मेंढी, हरिण यासारखे पाळीव प्राणी पाळायचे असल्यास विशिष्ट कर भरावा लागणार आहे.
  • पंजाबचे पर्यटनमंत्री माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांच्या खात्याने याबाबत एक परिपत्रक जरी केले आहे.
  • पाळीव प्राणी पाळायचे असतील तर त्याकरिता प्रत्येक प्राण्यासाठी वर्षाला विशिष्ट कर भरावा लागणार आहे.
  • यामध्ये कुत्रा, मांजर यांसारख्या छोट्या प्राण्यांसाठी २५० रुपये प्रतिवर्ष आणि गाय, म्हैस, बैल, घोडा, हत्ती यांसारख्या प्राण्यांसाठी ५०० रुपये प्रतिवर्ष इतका कर संबंधित मालकाला भरावा लागणार आहे.
  • त्याचबरोबर पंजाबमधील पाळीव प्राण्यांच्या मालकांना संबंधित यंत्रणेकडून परवाना घेणे बंधनकारक असणार आहे. या परवान्याचे त्यांना दरवर्षी नव्याने नुतनीकरण करावे लागणार आहे.
  • ही करवसुली योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी प्रत्येक जनावराला एक ब्रँडिंग कोड दिला जाणार आहे. तसेच, जनावरांची ओळख पटविण्यासाठी विशिष्ट क्रमांक किंवा मायक्रो चीपचा वापर करण्यात येणार आहे. 
  • पंजाबमध्ये गो सेसच्या नावाने आधीपासूनच कर घेतला जातो. परंतु अशा प्रकारचा कर भारतात पहिल्यांदाच आकारण्यात येणार आहे.

मल्याळी दिग्दर्शक आय व्ही शशी यांचे निधन

  • अवलुडे रावूकल आणि देवासुरम यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी परिचित असलेले ज्येष्ठ मल्याळी दिग्दर्शक आय व्ही शशी यांचे २४ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
  • आपल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत शशी यांनी मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेतील सुमारे १५०हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
  • मोहनलाल, कमल हसन आणि रजनीकांत यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले.
  • २८ मार्च १९४८ रोजी केरळमधील कोझिकोडे येथे जन्मलेल्या शशी यांनी कला दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली.
  • १९७५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उल्सावन’ चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.
  • १९७८मध्ये ‘अवलुडे रावूकल’ चित्रपटाने शशी यांना मळ्याळी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक ओळख दिली.
  • २०१४ साली त्यांना केरळ राज्यातर्फे चित्रपटकर्मीना दिला जाणारा सर्वोच्च कारकीर्दगौरव जे सी डॅनियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चालू घडामोडी : २३ ऑक्टोबर

श्रीकांतला डेन्मार्क सुपरसिरीजचे विजेतेपद

  • भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  • अंतिम सामन्यात कोरियाच्या ली ह्यूनवर २१-१०, २१-०५ अशी एकतर्फी मात करत श्रीकांतने डेन्मार्क ओपन स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.
  • डेन्मार्क ओपन स्पर्धा जिंकणारा श्रीकांत हा प्रकाश पडुकोण (१९८०) आणि सायना नेहवाल (२०१२) यांच्यानंतर तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • श्रीकांतचे २०१७ या वर्षातील हे तिसरे सुपरसिरीज विजेतेपद आहे. याआधी त्याने इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया या सुपरसिरीज स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे.
  • तसेच श्रीकांतचे कारकिर्दीतील हे पाचवे सुपरसिरीज विजेतेपद ठरले. श्रीकांतने २०१४मध्ये चीन ओपन, २०१५मध्ये इंडिया ओपन स्पर्धा जिंकली होती.
  • या विजेतेपदासह श्रीकांतने सायना नेहवालच्या एकाच वर्षात तीन सुपरसिरीज विजेतेपदाच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

दिनेश्वर शर्मा काश्मीरमध्ये संवादक म्हणून नियुक्त

  • काश्मीरमधील शांतता प्रक्रियेअंतर्गत स्थिर संवादासाठी गुप्तचर विभागाचे (आयबी) माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची संवादक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • शर्मा यांना कॅबिनेट दर्जा दिला असून, शांतताप्रक्रियेअंतर्गत कोणत्या गटाशी अथवा संघटनेशी चर्चा करावी, याचा निर्णय घेण्याचा अधिकारही देण्यात आला आहे.
  • ते १९७९च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असून, डिसेंबर २०१२ ते डिसेंबर २०१६ दरम्यान ते गुप्तचर विभागाचे संचालक होते.
  • ते काश्मीरमधील सर्व स्तरावरील लोकांशी आणि संघटनांशी चर्चा करतील. हा मुद्दा संवेदनशील असल्याने या संदर्भात कालमर्यादा आखून देण्यात आलेली नाही.
  • जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शर्मा यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.

जपानमध्ये पुन्हा शिंझो आबे यांचे सरकार

  • जपानमध्ये २२ ओकॉत्बर रोजी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत पंतप्रधान शिंझो आबे यांनी विजय मिळवला.
  • शिंझो आबे यांच्या नेतृत्त्वाखालील लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) आणि कोमितो या पक्षांच्या युतीने संसदेत दोन तृतीयांश जागा जिंकल्या आहेत.
  • या निवडणुकीत विजयासाठी संसदेतील एकूण ४६५ जागांपैकी २३३ जागांवर विजय मिळवणे आवश्यक होते. मात्र, आबे यांच्या युतीला सुमारे ३११ जागा मिळाल्या.
  • या विजयामुळे आबे यांना जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवलेले नेते हा मान मिळाला आहे.
  • तसेच या विजयामुळे जपानवर अमेरिकेने लादलेल्या राज्यघटनेत बदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्याचा अधिकार आबे यांना मिळेल. 
  • सध्याच्या राज्यघटनेअंतर्गत जपानला स्वसंरक्षणाव्यतिरिक्त अन्य उद्देशांसाठी लष्कर बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
  • उत्तर कोरियाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, संसदेचा एक वर्षाचा बाकी असतानाही आबे यांनी जपानमध्ये मध्यावधी निवडणूक घोषणा केली होती.
  • उत्तर कोरियाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याने सध्या आबे जनतेचा पाठिंबा मिळत असून, विरोधक कमकुवत झाले होते. मध्यावधी निवडणुकांमध्ये याचाच फायदा आबे यांना झाला.
  • आबे यांच्यासमोर टोकियोचे गव्हर्नर युरिको कोईके यांनी गेल्या महिन्यात स्थापन केलेल्या ‘पार्टी ऑफ होप’चे आव्हान होते.
  • याशिवाय काही आठवड्यांपूर्वीच स्थापन झालेली कॉन्स्टिट्युशनल डेमोकॅट्रिक पार्टीदेखील (सीडीपी) निवडणुकीच्या रिंगणात होती.
  • मात्र, या दोन्ही पक्षांना आबे यांना टक्कर देता आली नाही. या निवडणुकीत आबे यांना दुबळ्या विरोधकांचा फायदा झाला.

चालू घडामोडी : २२ ऑक्टोबर

भारताला आशिया चषक हॉकीचे विजेतेपद

  • आशिया खंडातील हॉकीवर भारताने आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित करत आशिया चषक जेतेपदावर आपले नाव कोरले.
  • बांगलादेशमधील ढाका येथे झालेल्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या संघावर २-१ अशी मात करत भारताने आशिया चषक जिंकला.
  • रमणदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर मलेशियाकडून शाहरिल सबाहने एकमेव गोल केला.
  • भारतीय संघाने २०१७ आशिया कपमध्ये एकही सामना गमावलेला नाही. सहापैकी पाच सामने भारताने जिंकले, तर एका सामन्यात भारताला बरोबरीवर समाधान मानावे लागले.
  • या स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दोनदा हरविले. सुपर फोर लढतीत भारताने पाकिस्तानचा ४-० ने धुव्वा उडवला होता.
  • भारताचे हे तिसरे आशिया चषक विजेतेपद ठरले. याआधी भारताने २००३ (मलेशिया येथे) आणि २००७ (भारतात) ही स्पर्धा जिंकली आहे.
  • तर १९८२, १९८५, १९८९, १९९४ आणि २०१३मध्ये भारताला आशिया चषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

तमिळ चित्रपट ‘मेर्सल’ वादाच्या भोवऱ्यात

  • तमिळ भाषेतील ‘मेर्सल’ चित्रपट वस्तू व सेवा कराविषयी (जीएसटी) काही वादग्रस्त संवादांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
  • अटाली दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशीच कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले असले, तरी या चित्रपटातील वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची मागणी भाजपने केली आहे.
  • भाजपव्यतिरिक्त अन्य पक्षांनी या चित्रपटातील संवादांचे समर्थन केले आहे. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी वेळ पडल्यास गैरसमज पसरवणारे हे संवाद काढून टाकण्याची तयारी दर्शवली आहे.

दलाई लामांना भेटणे गुन्हा : चीन

  • कुठल्याही विदेशी नेत्याने किंवा देशाने तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांना निमंत्रित करणे किंवा त्यांना भेटणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे.
  • दलाई लामा हे फुटीरवादी नेते आहेत, असा आरोप चीनकडून करण्यात आला आहे. धार्मिक नेते या नात्याने दलाई लामा यांना भेटण्याचा कुठल्याही देशाने केलेला दावा चीनला मान्य नाही.
  • दलाई लामा यांना भेटणाऱ्या जागतिक नेत्यांचा चीनकडून सातत्याने निषेध केला जातो.
  • तिबेट हा चीनचा भाग असून, बीजिंगच्या माध्यमातूनच जगाने तिबेटशी राजनैतिक संबंध ठेवायला हवेत, अशी सक्तीही चीनकडून करण्यात आलेली आहे.
  • यावर्षी अरुणाचल प्रदेशसह इशान्य भारतातील काही ठिकाणांना भेटी देण्यास दलाई लामा यांना भारताने परवानगी दिली होती, त्यालाही चीनने तीव्र विरोध केला होता.

स्पेनमध्ये घटनात्मक पेच

  • कॅटलोनिया या स्पेनमधील सर्वात श्रीमंत प्रांताने देशातून स्वतंत्र होण्यासाठी लढा सुरु केला आहे.
  • परंतु स्पेनचे पंतप्रधान मरिआनो रजॉय यांच्या नेतृत्वाखालील स्पेनच्या संघीय सरकारने हा लढा सक्तीने चिरडून टाकण्याचा निर्धार जाहीर केला आहे.
  • कॅटलोनियाची स्वातंत्र्याची मागणी घटनाबाह्य असल्याने तिचा बीमोड करण्यासाठी राज्यघटनेतील विशेष तरतुदींचा वापर करण्याचे ठरविण्यात आले आहे, असे रजॉय यांनी सांगितले.
  • त्यानुसार कॅटलोनियाच्या प्रांतिक कायदेमंडळाच्या अधिकारांवर मर्यादा आणल्या जातील. तसेच तेथील सरकार बरखास्त करून केंद्रीय राजवट लागू केली जाईल.
  • येत्या सहा महिन्यांत तेथे प्रांतिक कायदेमंडळासाठी नव्याने निवडणुका घेतल्या जातील. अर्थात येत्या २७ आॅक्टोबर रोजी भरणाऱ्या अधिवेशनात स्पेनच्या संसदेने यास मंजुरी दिली तरच पंतप्रधान हे खास अधिकार वापरू शकतील.
  • केंद्र सरकारचा विरोध डावलून दोन आठवड्यांपूर्वी कॅटलोनियात स्वातंत्र्यासाठी सार्वमत घेण्यात आले होते.
  • त्यात बहुसंख्य लोकांनी कौल दिल्याचा दावा करून प्रांतिक कायदेमंडळाने स्वतंत्र होण्याचा ठरावही मंजूर केला होता.
  • स्पेनच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घटनात्मक पेच मानला जात आहे.

भारत आणि रशियाचा संयुक्त युध्दसराव

  • भारत आणि रशियादरम्यान तिन्ही सेनादलांचा संयुक्त युध्दसराव ‘इंद्र-२०१७’ २० ऑक्टोबर पासून रशियामध्ये सुरु झाला. 
  • आतापर्यंत या सरावात आलटून पालटून केवळ एकच सेनादल समाविष्ट होत असे. यंदा प्रथमच तिन्ही सेनादले एकाच वेळी सहभाग घेत आहेत.
  • या सर्वमध्ये भाग घेण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या आयएनएस सातपुडा आणि आयएनएस कडमट या युद्धनौका रशियामध्ये पोहचल्या आहेत.

चालू घडामोडी : २१ ऑक्टोबर

गुजरातमधील रो-रो नौका सेवेचे उद्घाटन

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात ‘रोल ऑन, रोल ऑफ (रो-रो)’ नौका सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.
  • या प्रकल्पासाठी ६१५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. भारतातील तसेच दक्षिण आशियातील अशा प्रकारची ही पहिलीच सेवा आहे.
  • घोघा (भरूच) व दाहेज दरम्यान हा प्रकल्प असून, रस्ते मार्गाने दोन्ही शहरातील ३१० किमी असलेले अंतर या नौका सेवेमुळे घटून ३० किमी इतके होईल.
  • या फेरीसेवेमुळे रस्त्यावरून होणारा आठ तासांचा प्रवास फेरी बोटीने समुद्रमार्गे केवळ एका तासात होऊ शकतो.
  • तसेच जी वस्तू रस्ते मार्गाने नेण्यासाठी दीड रूपये खर्च येत होता. तेच साहित्य जल मार्गाने नेण्यासाठी फक्त २० ते २५ पैसे खर्च येईल.
  • याशिवाय या प्रकल्पामुळे इंधन बचत, प्रवास व वाहतूक खर्च कमी झाल्याने व्यापारवाढ, रोजगार निर्मिती, पर्यटन क्षेत्राचा विकास हे फायदेदेखील गुजरातला मिळणार आहेत.
  • रो-रो फेरी सेवेमुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात समुद्र मार्गाने जोडले जाणार आहेत. यामध्ये एका फेरीत ५०० हून अधिक लोक आणि सुमारे १०० कार आणि ट्रक नेता येतील.
  • भविष्यात मुंबई आणि दक्षिणेतील राज्ये यांनाही या सेवेद्वारे जोडण्याचा सरकारचा विचार आहे.

श्रीकांतकडून सायना नेहवालचा विक्रम मोडीत

  • भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करत एका वर्षात चौथ्या सुपरसिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
  • उपांत्य फेरीत श्रीकांतने हाँगकाँगच्या व्होंग विंग की व्हिन्सेटचा २१-१८, २१-१७ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
  • याचसोबत त्याने भारताच्या सायना नेहवालचा विक्रम मोडला आहे. सायनाने २०१० तसेच २०१२ या दोन्ही वर्षी प्रत्येकी तीन सुपरसिरीज स्पर्धांची अंतिम फेरी गाठली होती. या सर्व स्पर्धांमध्ये सायना विजेतीही ठरली होती.
  • अंतिम फेरीत श्रीकांतचा सामना दक्षिण कोरियाच्या ली ह्यूनविरुद्ध होणार आहे. 
  • या सामन्यात श्रीकांतने विजय मिळवल्यास, एका वर्षात ३ सुपर सिरीज स्पर्धांची अंतिम फेरी जिंकण्याच्या सायना नेहवालच्या विक्रमाशी तो बरोबरी करेल.

सरकार देशात ७.५ लाख इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित करणार

  • डिजिटल इंडियाचे ध्येय साध्य करण्यासाठी, पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत वायफायद्वारे कमीत कमी ७.५ लाख पब्लिक इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. 
  • निमशहरी तसेच ग्रामीण भागांत हायस्पीड इंटरनेट सुविधा सुरू करण्यासाठी ही योजना आहे. यासाठी खासगी कंपन्याही इंटरनेट सेवा देणार आहेत.
  • रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया व सरकारी कंपनी बीएसएनएल यांच्या मदतीने ही योजना राबवली जाणार आहे.
  • हायस्पीड व स्वस्त इंटरनेटद्वारे ई-गव्हर्नन्स तसेच डिजिटल विकासासाठी लोकांचा पुढाकार वाढविण्याचा सरकारचा विचार आहे.
  • जगातील अनेक देशांमध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचे मूळ हे वायफाय सुविधा आहे. पण भारत त्यात खूपच मागे आहे.
  • भारतात २०१६पर्यंत केवळ ३१ हजार हॉटस्पॉट होते. याउलट तर फ्रान्समध्ये १.०३ कोटी, अमेरिकेमध्ये ९८ लाख तर ब्रिटनमध्ये ५६ लाख हॉटस्पॉट आहेत. 
  • देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फायबर नेटवर्क पसरविण्याचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत ७५ हजार ग्रामपंचायतींमध्ये हे काम पूर्ण झाले आहे.