चालू घडामोडी : ४ ऑक्टोबर

नोबेल पुरस्कार (रसायनशास्त्र) २०१७

  • जॅक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रॅंक आणि रिचर्ड हेंडरसन या तिघांना यंदा रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे.
  • पदार्थांच्या जैवरेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी या तिघांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • या तिघांच्या या महत्त्वाच्या संशोधनामुळे जैवरेणू गोठवून त्यांचा अभ्यास करणे हे संशोधकांना सोपे जाणार आहे.
  • तसेच ‘झिका’सारख्या आजारांच्या विषाणूंना मूळ आणि ‘थ्री-डी’ स्वरूपात पाहणे या संशोधनामुळे शक्य झाले असून, त्याचा भविष्यामध्ये मोठा फायदा होणार आहे.
  • पुरस्कार विजेत्यांपैकी जॅक्स ड्युबोशे हे स्वित्झर्लंडचे, जोआकिम फ्रॅंक हे अमेरिकेचे आणि रिचर्ड हेंडरसन ब्रिटनचे नागरिक आहेत.
फ्रेडरिक सँगर या ब्रिटीश बायोकेमिस्टला १९५० ते १९८० या दरम्यान दोनवेळा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

एसबीआयच्या अध्यक्षपदी रजनीशकुमार

  • देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने रजनीशकुमार यांची नियुक्ती केली आहे.
  • कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) जारी केलेल्या आदेशानुसार, ३ वर्षांसाठी रजनीशकुमार यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
  • एसबीआयच्या विद्यमान अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाळ ६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यानंतर ७ ऑक्टोबरपासून रजनीशकुमार आपला पदभार स्वीकारतील.
  • रजनीशकुमार हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत. १९८०मध्ये ते स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी बँकेत विविध पदांवर काम केले.
  • २०१५मध्ये नॅशनल बँकींग ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बनण्यापूर्वी ते व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्टेट बँकेची मर्चंट शाखा आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्सचे काम सांभाळत होते.
  • सध्या अरुंधती भट्टाचार्य या स्टेट बँकेच्या अध्यक्षा आहेत. स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिल्या आहेत.
  • भट्टाचार्य यांनी ऑक्टोबर २०१३मध्ये या पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर गेल्याच वर्षी सरकारने त्यांना ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर १ वर्षाची मुदतवाढ दिली होती.

आरबीआयचे चौथे द्विमासिक पतधोरण

  • रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील चौथे द्विमासिक पतधोरण जाहीर केले असून त्यात रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.
  • ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले आहेत.
  • यानुसार रेपो दर ६ टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्क्यांवर कायम आहे. विकासदर ६.७ टक्के इतका राहिल, असे अनुमान रिझर्व्ह बॅंकेने वर्तविला आहे. यापूर्वी हाच अंदा ७.३ टक्के इतका वर्तविण्यात आला होता.
  • गेल्या द्विमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली होती.
 रेपो रेट 
  • रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे, तर रेपो रेट कमी होणे म्हणजे बँकेला स्वस्तात कर्ज मिळणे.
  • म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
 रिव्हर्स रेपो रेट 
  • बँका त्यांच्याकडे असलेला जास्तीचा निधी ठेवींच्या रुपात रिझर्व बँककडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बँक बँकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

कांडला बंदरास दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव

  • गुजरातमधील कांडला बंदरास पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यास केंद्रीय कॅबिनेटने मंजूरी दिली आहे.
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दीच्या निमित्ताने यावर्षी २५ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
  • त्यावेळी गुजरातमधील कांडला बंदराचे नाव बदलून दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. आता केंद्रीय कॅबिनेटने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
  • भारतीय बंदरे कायदा १९०८नुसार देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करत केंद्र सरकारने २५ सप्टेंबरपासून यां बंदराचे नाव बदलत असल्याचे जाहीर केले आहे.
  • याबरोबरच कांडला पोर्ट ट्रस्टही आता दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट या नावाने ओळखले जाणार आहे.
  • कांडला बंदर महाराव खेंगर्जी यांच्या प्रयत्नांमधून १९३१साली उभे राहिले होते. कच्छच्या आखातात बांधलेले हे बंदर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक महत्त्वाचे बंदर मानले जाते.
  • कालांतराने या बंदरातून मालवाहतुकीचे प्रमाण वाढत गेले आणि गुजरातमधून मालवाहतूक करणाऱ्या बंदरांमध्ये पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचले.

युपी सरकारने ताजला पर्यटनस्थळांच्या यादीतून हटवले

  • उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने ताजमहाल या वास्तूला आपल्या पर्यटनस्थळांच्या यादीतून हटवले आहे.
  • जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेली ताजमहाल ही वास्तू भारताचा ऐतिहासिक वारसा आहे.
  • योगी सरकारने उत्तर प्रदेशातील पर्यटनस्थळांची नवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये ताजमहालचा समावेश करण्यात आलेला नाही.
  • या नव्या पर्यटनस्थळांच्या यादीत गोरखधाम मंदिराचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी छापण्यात आलेल्या एका पुस्तिकेमध्ये मंदिराचा फोटो, त्याचे महत्व आणि इतिहास याची माहिती देण्यात आली आहे.
  • या पुस्तिकेचे पहिले पान वाराणसी येथील गंगा आरतीला समर्पित करण्यात आले आहे. त्यानंतर पर्यटन विकास योजनांबाबत माहितीही यात देण्यात आली आहे.
  • योगी सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात (२०१७-१८) ताजमहाल या वास्तूला आपल्या सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले नव्हते.
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालला भारतीय संस्कृतीचे प्रतिक मानण्यास नकार दिला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा