चालू घडामोडी : १० ऑक्टोबर

बंगळुरूमध्ये देशातील पहिले आधार आधारित विमानतळ

  • मार्च २०१८मध्ये बंगळुरूतल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातली पहिली आधार प्रवेश व बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टीम अस्तित्वात येणार आहे.
  • या विमानतळामुळे प्रवाशांना जागोजागी चेकपॉइंटवर आयडी व बोर्डिंग पास दाखवण्याची गरज उरणार नाही. तसेच प्रवाशांचा वेळसुद्धा वाचणार आहे.
  • विमानतळांची सुरक्षा वाढवण्यासह प्रवाशांचा प्रवेश सुकर होण्यासाठी आधार बेस प्रवेशाला चालना देण्यात येत आहे.
  • बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टीमने तयार झालेले बंगळुरूतील केआयए विमानतळ हे देशातील पहिले आधार बेसद्वारे प्रवेश देणारे विमानतळ असणार आहे.
  • विमानतळावर जागोजागी चेकपॉइंटवर प्रवाशांचा जवळपास २५ मिनिटांचा वेळ खर्ची पडतो. मात्र आधार प्रणालीमुळे ही सर्व प्रक्रिया केवळ १० मिनिटांत पूर्ण होणार आहे.

डॉ. निशा डिसिल्वा यांना अमेरिकेत पुरस्कार

  • भारतीय वंशाच्या अमेरिकी दंतवैद्य आणि वैज्ञानिक डॉ. निशा डिसिल्वा यांना अमेरिकेत ‘सस्टेनिंग आऊटस्टॅण्डिंग अचिव्हमेंटअंतर्गत ५२.७३ कोटी रुपयांचा अनुदान स्वरूपातील पुरस्कार प्राप्त झाला आहे.
  • मान व डोक्याच्या कर्करोगाने मरण पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्या संशोधन करीत आहेत, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे.
  • कुठल्याही कर्करोगात रुग्णांचे मरण्याचे प्रमाण जास्त असते याचे कारण म्हणजे त्यात रोगनिदान लवकर होत नाही. त्यामुळे डिसिल्वा यांच्या संशोधनाचा भर हा रोगनिदानाच्या नवीन पद्धती शोधण्यावर आहे.
  • उपचाराच्या नवीन पद्धती विकसित करण्यासाठी त्यांना आठ वर्षांत पुरस्काराची रक्कम टप्याटप्याने दिली जाणार आहे.
  • मानेचा व डोक्याचा कर्करोग जगात दरवर्षी सहा लाख लोकांना होतो, त्यामुळे त्याचे रोगनिदान व उपचार यावर भर देणे गरजेचे होते. जगातील हा सर्वत्र आढळणारा सहाव्या प्रकारचा कर्करोग आहे.
  • डिसिल्वा या बीडीएस, एमएसडी व पीएचडी आहेत. सध्या त्या अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात वैज्ञानिक म्हणून काम करतात. 
  • दंतवैद्यकात त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली. नंतर त्या अमेरिकेला गेल्या. तेथे इंडियाना विद्यापीठातून पीएचडी केली.
  • रोगनिदानशास्त्राच्या ख्यातनाम प्राध्यापक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्याच्या जोडीला त्या कर्करोग जीवशास्त्रज्ञही आहेत.
  • मिशिगन विद्यापीठातील कर्करोग संशोधन केंद्राच्या त्या सदस्य असून त्यांनी बायोमार्कर्स व रेणवीय रचनांच्या माध्यमातून कर्करोगाच्या गाठीची वाटचाल कशी होते व उपचारांना कर्करोग का दाद देत नाही यावर संशोधन केले आहे.
  • त्यांच्या या संशोधनातून जे फलित हाती येईल त्यातून मान व डोक्याच्या कर्करोगावर प्रभावी उपचार कालांतराने शक्य होतील.
  • त्यांना यापूर्वी रोगनिदान संशोधनासाठी रॉड कॉसन पुरस्कार व विज्ञान-अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगिरीसाठी क्रॉसबी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा