चालू घडामोडी : ७ डिसेंबर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र सुरु

  • गेल्या पंचवीस वर्षांपासून रेंगाळलेले दिल्लीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र ७ डिसेंबर रोजी सुरु झाले आहे.
  • राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजधानी दिल्लीतील हे पहिलेच स्मारक आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रही पुढाकाराने केवळ ३२ महिन्यांमध्ये ही वास्तू साकारली आहे. २० एप्रिल २०१५रोजी मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते.
  • ‘१५, जनपथ’ असा तिचा पत्ता असून प्रसिद्ध ‘ल मेरिडियन’ या पंचतारांकित हॉटेलला खेटून ही वास्तू आहे.
  • या केंद्राला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याची शक्यता असून सामाजिक विषयांसाठी हे केंद्र सरकारसाठी ‘थिंक टँक’ असू शकते.
  • दलित, आदिवासी, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा सरकारचा विचार आहे.
  • बाबासाहेबांनी देशाला राज्यघटना दिली; पण त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करणारी एकही वास्तू राजधानीत नव्हती.
  • ही बाब हेरून बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये (१९९०-९१) ‘लुटेन्स दिल्ली’मधील ‘जनपथ’ मार्गावर त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी घेतला होता.
 असे असेल आंतरराष्ट्रीय केंद्र 
  • जागा : ३.२ एकर
  • खर्च : १९५ कोटी
  • बांधण्याचा कालावधी : ३२ महिने
  • दहा हजार पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय, ‘ई-लायब्ररी’च्या माध्यमातून दोन लाख पुस्तके आणि ७० हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय मासिके, जर्नल्स उपलब्ध.
  • सातशे क्षमतेचे एक भव्य सभागृह आणि प्रत्येकी शंभर क्षमतेची दोन छोटेखानी सभागृहे.
  • दर्शनी भागात आंबेडकर आणि ध्यानस्थ बुद्ध अशा दोन भव्य पुतळे आहेत. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे चिरंजीव अनिल यांनी हे पुतळे साकारलेत.
  • सत्तर फुटांचा अशोक स्तंभदेखील कोरलाय. कदाचित तो देशातील सर्वांत उंच ठरावा.
  • वास्तूची दोन प्रवेशद्वारे सांची स्तूपाच्या तोरणासारखी आहेत. एकूण बुद्धिस्ट वास्तूशैलीचा प्रभाव आहे.

येमेनच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या

  • सलग ३३ वर्षे येमेनवर राज्य करणाऱ्या अली अब्दुल्लाह सालेह यांची ४ डिसेंबर रोजी हौती बंडखोरांकडून हत्या करण्यात आली.
  • १९७८साली उत्तर येमेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सालेह सत्तेत आले होते. त्यानंतर १९९०साली देशाच्या दोन तुकड्यांचे एकत्रीकरण झाल्यानंतर ते बृहद अशा येमेनचे राष्ट्राध्यक्ष बनले.
  • बेकारी आणि चलनवाढीने त्रस्त झालेल्या लोकांनी अरब स्प्रींगमध्ये केलेल्या उठावात २०११साली सालेह यांना पायउतार व्हावे लागले होते.
  • त्यानंतर हादी यांचे सरकार अस्तित्वात आले. गेली अनेक वर्षे येमेनला हौती बंडखोरांनी पोखरुन ठेवलेले आहे.
  • सत्तापालट होऊनही येमेनमध्ये फारसा बदल झालेला नाही. गेल्या सहा वर्षांमध्ये येमेनमधील स्थिती अधिकाधिक चिघळत चालली आहे.
 येमेन आणि हौती बंडखोर 
  • तज्ज्ञांच्या मते हौती बंडखोरांचे मुळ ९०च्या दशकात वायव्य येमेनमध्ये प्रभावी असणाऱ्या शबाब-अल-मुमानीन संघटनेमध्ये आहे.
  • अमेरिकेच्या नेतृत्वाखाली २००३साली इराकवर हल्ला करण्यात आल्यानंतर या संघटनेचा एक नेता हुसैन अल हौती याने विरोध प्रकट केला होता.
  • त्याने अमेरिका आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सालेह यांच्याविरोधात निदर्शने केली होती. मात्र येमेनी संरक्षण दलाच्या हल्ल्यात त्याला ठार मारण्यात आले.
  • त्याच्या नावावरून या बंडखोराच्या गटाला हौती असे नाव पडले आहे. सध्या ३३ वर्षांचा अब्दुल मलिक अल हौती या गटाचे नेतृत्व करत आहे.
  • हौती बंडखोरांच्या मते, आताचे हादी सरकार भ्रष्ट असून अधिकारांचे विभाजन योग्यरित्या झाले नसल्याचे कारण पुढे करत हौती बंडखोरांनी यादवी सदृ्श्य स्थिती निर्माण केली.
  • त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर राष्ट्राध्यक्ष अब्द्राबुह मन्सूर हादी यांनी सौदी अरेबियाचा रस्ता धरला.
  • त्याचप्रमाणे येमेनमधील बंडखोरांना आटोक्यात आणण्यासाठी सौदीने सरळ हस्तक्षेप करत बंडखोरांवर हल्ले सुरु केले.
  • त्यामुळे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आणि सामान्य येमेनी नागरिक व इतर देशांतील नागरिकांच्या जिविताचा प्रश्न निर्माण झाला होता.
  • लढाईमध्ये वेगाने घडामोडी घडत जाऊन बॉम्बमुळे अनेक ठिकाणी इमारती, शाळा उद्धवस्त होण्याच्या घटना घडल्या आहेत.
  • यामुळे लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले तर हजारो लोकांना आपले प्राणही गमवावे लागले.
  • संयुक्त राष्ट्राच्या मते या संपुर्ण पेचप्रसंगात १० हजार लोकांची हत्या झालेली आहे. तसेच मानवाधिकाराच्या बाबतीत ही सर्वात मोठी समस्या असल्याचे मतही संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली आहे.
 येमेनचे महत्त्व 
  • येमेन हा तसा पाहायला गेल्यास मध्यम आकाराचा देश आहे. भूभागाच्या बाबतीत जगात त्याचा क्रमांक ५०वा आहे.
  • मात्र त्याचे स्थान आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्वाच्या ठिकाणी आहे. एडनचे आखात (अरबी समुद्र) आणि तांबडा समुद्र जोडणाऱ्या चिंचोळ्या पट्टीची जागा या येमेनजवळ आहे.
  • या चिंचोळ्या जलपट्ट्याला बाब-अल-मनुदाब असे नाव आहे. याच मार्गावरून आंतरराष्ट्रीय व्यापारातील मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. तेलाची वाहतूकही येथूनच होते.
  • इतकेच नव्हे तर तांबड्या समुद्रातील काही बेटांवरही येमेनचा अधिकार आहे. त्यामुळे येमेनचे महत्व अनन्यसाधारण आहे.

जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून अमेरिकेची मान्यता

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्त शहर असलेल्या जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देत असल्याचे जाहीर केले आहे.
  • तेल अवीव येथील अमेरिकी दूतावास जेरूसलेमला स्थलांतरित करण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्याचे आदेश ट्रम्प यांनी प्रशासनाला दिले आहेत.
  • ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या दीर्घकालीन भूमिकेला छेद देणारा असून, यामुळे आधीच स्फोटक असलेल्या मध्य-पूर्व क्षेत्रातील हिंसाचारात वाढ होईल, असा इशारा अनेक अरबी नेत्यांनी दिला आहे.
  • इस्रायलने सन १९८०मध्ये जेरूसलेमला आपली राजधानी जाहीर केल्यापासून अरब राष्ट्रांमध्ये तीव्र नाराजी आहे.
  • आता अमेरिकने जेरूसलेमला इस्रायलची राजधानी जाहीर केल्यानंतर ही नाराजी अधिकच तीव्र होण्याची दाट शक्यता आहे.
  • इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील विवादाचे केंद्र असलेल्या जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता न देण्याचा सल्ला पश्चिम आशियासह जगभरातील अनेक नेत्यांनी अमेरिकेला दिला होता.
  • असे झाल्यास या क्षेत्रातील शांतता प्रक्रिया संपुष्टात येईल व नवा संघर्ष उफाळून अशांतता पसरेल, असे मत या नेत्यांनी व्यक्त केले होते. मात्र, तो विरोध झुगारत अमेरिकेने ही मान्यता दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा