चालू घडामोडी : ९ व १० डिसेंबर

९१व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

  • फेब्रुवारी २०१८मध्ये बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे.
  • या अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर असे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
  • ज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांना ४२७ मते मिळाली तर रवींद्र शोभणे यांना ३५७ मते मिळाली.
  • सनदी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना देशमुख यांनी सलोमी, ऑक्टोपस, अंधेरनगरी, हरवलेले बालपण, अग्निपथ, मृगतृष्णा अशा २६ पुस्तकांचे लेखन केले.

विश्व हॉकी लीगमध्ये भारताला कांस्यपदक

  • भारतीय पुरुष हॉकी संघाने विश्व हॉकी लीगमध्ये जर्मनीला २-१ असे पराभूत करत कांस्यपदकाची कमाई केली.
  • या सामन्यात गोलकिपर सुरज करकेरा याने लक्षवेधी कामगिरी केली. सुरजने उत्कृष्ट बचाव करत जर्मनीचे अनेक हल्ले परतवून लावले.
  • भारताकडून एसव्ही सुनीलने २०व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. परंतु, जर्मनीच्या मार्क अॅपलने ३६व्या मिनिटाला गोल डागत आपल्या संघाला बरोबरीत आणले.
  • हरमनप्रीत सिंहने ५४व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला सामन्यात निर्णायक बढत मिळवून दिली.

इराक ‘आयसिस’मुक्त

  • सीरियाच्या सीमेजवळील वाळवंटाच्या भागात धडक कारवाई करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर इराकने आयसिसविरुद्धचा लढा यशस्वीपणे संपल्याचे जाहीर केले.
  • गेल्या साडेतीन वर्षांपासून ‘आयसिस’विरोधात इराकचा लढा सुरू होता. 'आयसिस'विरुद्धच्या लढाईत इराकी सैन्याला अमेरिकी सैन्याची साथ मिळाली.
  • इराकचे पंतप्रधान हैदर अली अबादी यांनी पत्रकार परिषदेमध्ये 'आयसिस' विरोधातील सैन्याची कारवाई संपल्याचे जाहीर केले.
  • देशाच्या सीमा आता पूर्णपणे आमच्या सैन्याच्या नियंत्रणाखाली आहेत, असा दावा हैदर यांनी केला.
  • २०१४मध्ये 'आयसिस'ने इराकवर हल्ला चढवत मोसुल शहरासह एक तृतियांश भागावर कब्जा केला होता.
  • त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून इराकी सैन्याने 'आयसिस'चे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा