चालू घडामोडी : १८ जानेवारी

विराट कोहली : आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी)च्या प्रतिष्ठेच्या ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी भारतीय संघाचा कप्तान विराट कोहलीची निवड झाली आहे.
  • याशिवाय आयसीसीचा ‘ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर’ हा पुरस्कारही विराटला मिळाला आहे.
  • आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदीही विराटची निवड करण्यात आली आहे.
  • क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार म्हणून देण्यात येणारी सर ग्रॅफिल्ड सोबर्स ट्रॉफी विराटला प्रदान करण्यात येईल.
  • २१ सप्टेंबर २०१६ पासून डिसेंबर २०१७पर्यंतच्या कामगिरीच्या आधारे २०१७च्या या पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
  • या काळात विराटने कसोटी सामन्यांमध्ये ७७.८०च्या सरासरीने ८ शतकांच्या मदतीने २,२०३ धावा केल्या आहेत.
  • तर एकदिवसीय सामन्यांमध्ये विराटने ८२.६३च्या सरासरीने ७ शतकांच्या मदतीने १,८१८ धावा केल्या आहेत. त्याशिवाय टी-२० सामन्यांमध्ये त्याने १५३च्या सरासरीने २९९ धावा केल्या आहेत.
  • कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मागच्या वर्षभरात वनडेमध्ये चांगले यश मिळवले आहे.
  • आयसीसीच्या फलंदाजीच्या क्रमवारीत ८८९ गुणांसह (रेटिंग पॉइंटस) विराट पहिल्या स्थानावर आहे.
  • सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार भारतीय खेळाडूला मिळणार आहे. मागील वर्षी हा पुरस्कार भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनला मिळाला होता.
  • कसोटी क्रिकेटसाठी ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ हा मान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने पटकावला आहे.

भारताच्या अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • सुमारे ५००० किलोमीटरपेक्षा लांब अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या अग्नी-५ या क्षेपणास्त्राची भारताने १८ जानेवारी रोजी यशस्वी चाचणी घेतली.
  • ओडिशाच्या समुद्रातील अब्दुल कलाम बेटावरुन ही चाचणी करण्यात आली. चीनचा उत्तर भागासह संपूर्ण पाकिस्तान या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आला असून भारताची प्रतिहल्ल्याची क्षमता वाढली आहे.
  • अग्नी-५ हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ने विकसित केले आहे. त्याची उंची १७ मीटर असून वजन ५० टन आहे.
  • हे क्षेपणास्त्र दीड टन वजनापर्यंतची अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा २४ पटआहे.
  • कमी अंतरावरील लक्ष्य भेदण्यासाठी भारताच्या ताफ्यात पृथ्वी आणि धनुष ही लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत.
  • पाकिस्तानपासून असलेला धोका लक्षात घेऊन भारताने अग्नी-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ ही अधिक ताकदीची मध्यें पल्ल्याची क्षेपणास्त्रे सज्ज ठेवली आहेत.
  • चीनची वाढती घुसखोरी आणि कुरापती यांना शह देण्यासाठी अग्नी-४ आणि अग्नी-५ या दोन क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
  • ५००० ते ५५०० किमीपर्यंत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे इंटरकॉन्टिनेन्टल बॅलास्टिक मिसाइल (ICBM) म्हणून ओळखली जातात.
  • सध्या अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनकडेच अशी क्षेपणास्त्र आहेत. अग्नी-५ ताफ्यात दाखल झाल्यानंतर भारतही या पंक्तीत विराजमान होइल.

प्रसिद्ध सरोद वादक पंडित बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन

  • पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध सरोद वादक पंडित बुद्धदेव दासगुप्ता यांचे १५ जानेवारी रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
  • बुद्धदेव दासगुप्ता यांचा जन्म १ फेब्रुवारी १९३३ रोजी बिहारमधील भागलपुर येथे झाला. घरातील संगीतामय वातावरणामुळे त्यांनाही सुरुवातीपासून संगीतात रूचि निर्माण झाली.
  • त्यांनी सरोद उस्ताद संगीताचार्य राधिका मोहन मित्र यांच्याकडून सरोद वादनाचे धडे घेतले. घराण्याच्या परंपरेत राहून वेगळी वाट चोखाळणारे सरोदिये म्हणून त्यांची ओळख होऊ लागली.
  • सरोदवर रबाब या वाद्यातील विशिष्ट शैली त्यांनी आत्मसात केली. त्याबरोबरच या वाद्यावर तालवाद्यातील बोलकारीचाही अंतर्भाव केला.
  • रागदारी संगीतात रवींद्र संगीताचा मिलाफ कसा करता येईल, याचा विचार त्यांनी केला, त्यामुळेही त्यांचे सरोदवादन वेगळेपणाने उठून दिसू लागले.
  • संगीत प्रभाकर आणि संगीत प्रवीण या पदव्या त्यांना मिळाल्या. आकाशवाणीवरील एक नामांकित वादक म्हणून त्यांना मान्यता मिळाली.
  • संगीत नाटक अकादमी, शिरोमणी पारितोषिक, अल्लादीन पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांबरोबरच २०१२साली भारत सरकारचा पद्मभूषण हा किताबही त्यांना मिळाला.
  • त्यांच्या जीवनावर आधारित ‘बामानेर चंद्रस्पर्शविलास’ हे पुस्तक प्रकाशित झाले. २००४मध्ये हे पुस्तक बंगाली आत्मकथांमध्ये सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक ठरले.
  • सरोद वादनातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल २०११मध्ये त्यांना पद्मश्री किताब प्रदान करण्यात आला. परंतु दासगुप्ता यांनी तो नाकारला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा