चालू घडामोडी : १० फेब्रुवारी

पंतप्रधान मोदींना पॅलेस्टाइनचा ग्रँड कॉलर सन्मान

  • पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांना पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या हस्ते ‘ग्रँड कॉलर ऑफ दि स्टेट ऑफ पॅलेस्टाइन’ या सन्मानाने गौरविण्यात आले.
  • भारत आणि पॅलेस्टाइनमध्ये परस्पर चांगले राजकीय संबंध राखण्यात महत्वाचे योगदान दिल्याबद्दल त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला.
  • पॅलेस्टाइनमध्ये आलेल्या राजांना, देशाच्या किंवा सरकारांच्या प्रमुखांना तसेच त्यांच्या समकक्ष पद भूषवणाऱ्या परदेशी पाहुण्यांना दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान मोदींना या सन्मानाने गौरविण्यात आले.
  • यापूर्वी पॅलेस्टाइनकडून सौदी अरेबियाचे राजे सलमान, बहारिनचे राजे हमद, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांसारख्या राष्ट्रप्रमुखांना ‘ग्रँड कॉलर’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
  • पॅलेस्टाइनला अधिकृत भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

सुंजवा लष्करी तळावर दहशतवादी हल्ला

  • जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या सुंजवा लष्करी तळावर १० फेब्रुवारी रोजी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला.
  • या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले असून एका लहान मुलीसह चार जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर जम्मू शहरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या ४० तासांच्या कारवाईत तिन्ही अतिरेक्यांना मारण्यात सैन्याला यश आले. या चकमकीत या चकमकीत ६ महिला आणि मुलांसह १० जण जखमी झाले आहेत. हे सर्व लष्करी तळाजवळील निवासी भागातील रहिवासी आहेत.
  • त्याचबरोबर शोध मोहिमेदरम्यान एका एके ४७ रायफलसह इतर हत्यारेही जप्त करण्यात आली.
  • सुरुवातीला या हल्ल्यामागे जैश- ए- मोहम्मद या संघटनेचा हात असल्याचा संशय होता. परंतु लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
  • ९ फेब्रुवारी २०१३ रोजी अफजल गुरूला फाशी दिल्याच्या घटनेला यंदा पाच वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी अशाप्रकारच्या हल्ल्याचा इशारा सुरक्षा दलांना दिला होता.
  • गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
  • यापूर्वी ५ फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी पुलवामाच्या काकापुरा येथील ५०व्या राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीवर हल्ला केला होता.
  • या हल्ल्यात भारतीय जवानांना कोणतीही इजा झाली नसली तरी दहशतवादी येथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

रंगना हेरथ सर्वाधिक गडी बाद करणारा डावखुरा गोलंदाज

  • श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज रंगना हेरथ याने बांग्लादेश विरुध्द कसोटी सामन्यात डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
  • हेरथने पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज वसिम अक्रम यांना मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
  • त्याने आतापर्यंत एकूण ४१५ गडी बाद केले आहेत. तर वसिम अक्रम यांच्या नावे ४१४ गडी बाद करण्याचा विक्रम होता.
  • कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे पहिले पाच डावखुरे गोलंदाज
    • रंगना हेरथ (श्रीलंका) : ४१५ बळी
    • वसिम अक्रम (पाकिस्तान) : ४१४ बळी
    • डॅनिअल व्हिटोरी (न्यूझीलंड) : ३६२ बळी
    • चामिंडा वास (श्रीलंका) : ३५५ बळी
    • मिचेल जॉन्सन (ऑस्ट्रेलिया) : ३१३ बळी

ज्येष्ठ साहित्यिक अनिल कुलकर्णी यांचे निधन

  • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सेवानिवृत्त संपादक, ज्येष्ठ साहित्यिक अनिल रघुनाथ कुलकर्णी ऊर्फ ‘अर सर’ यांचे वयाच्या ८१व्या वर्षी ८ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
  • मुंबईत शिक्षण घेतलेल्या अनिल कुलकर्णी यांनी काही काळ रेल्वेमध्ये तसेच दादर येथील शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. आजचे आघाडीचे अभिनेते नाना पाटेकर हे त्यांचे विद्यार्थी आहेत.
  • पुढे ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी मराठी विश्वकोश आणि वाई ही आपली कर्मभूमी मानली.
  • विश्वकोशाच्या पहिल्या खंडापासून ते विसाव्या खंडापर्यंत ज्यांनी यात योगदान दिले त्यात अनिल रघुनाथ कुलकर्णी यांचाही समावेश करावा लागेल.
  • त्यांनी विश्वकोशाच्या पहिल्या खंडापासून ते विसाव्या खंडापर्यंत त्यांनी लेखन आणि संपादनाची जबाबदारी सांभाळली.
  • इंग्रजीवर प्रभुत्व आणि जागतिक वाड.मयाचा अभ्यास असलेल्या कुलकर्णी यांनी विश्वकोशात मराठी साहित्याबरोबरच जागतिक साहित्य व साहित्यिक, धर्म, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र या विषयांचे लेखन केले.
  • आशयपूर्ण मांडणी आणि सारभूत व प्रमाणभूत विवेचन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यांनी विश्वकोशासाठी शेकडो नोंदी लिहिल्या.
  • अनेक वर्षे ते प्रतिष्ठेच्या अशा नवभारत मासिकाच्या संपादक मंडळावर होते. त्यामधून त्यांनी वैचारिक लिखाण केले आहे.
  • कथाकार म्हणूनही मराठी साहित्यात त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. सॉलिटरी क्रिपर्स, ऐलतीर पैलतीर, सांजसूर, तळ्याकाठच्या सावल्या आणि कांतार हे त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह.
  • त्यांच्या ‘तळ्याकाठच्या सावल्या’ या कथासंग्रहास महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. ‘सिटी ऑफ जॉय’ या त्यांनी अनुवादित केलेल्या साहित्यकृतीस महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला.

बौद्धिक संपदा निर्देशांकात भारत ४४वा

  • ५० देशांच्या बौद्धिक संपदा (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी) निर्देशांकात भारताने थोडीशी प्रगती करून ४४वे स्थान मिळविले आहे
  • गेल्या वर्षी या निर्देशांकात ४५ देशांचाच समावेश होता. त्यात भारताचे स्थान ४३ वे होते. यंदा भारताने काही गुणांची सुधारणा केली आहे.
  • यूएस चेंबर ऑफ कॉमर्सच्या ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटरने हा अहवाल सादर केला असून, यानुसार नव्या मापदंडावर भारताची कामगिरी मजबूत राहिली आहे.
  • त्याचप्रमाणे कम्प्युटर-इम्प्लिमेंटेड इन्व्हेन्शन्सच्या क्षेत्रात बौद्धिक संपदा हक्क मिळविण्याच्या बाबतीत भारताचे प्रयत्नही सकारात्मक आहेत.
  • भारताचे प्रयत्न वाखाणण्याजोगे असले तरी अजून खूप काही करावे लागणार असल्याचे दिसून येते. विशेषत: आयुर्विज्ञान बौद्धिक संपदा यांसह अनेक क्षेत्रात काम करणे भारताला आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा